नवी दिल्ली:
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आहे. ३ मे २०२६ रोजी पार पडलेल्या NEET-UG परीक्षेमध्ये झालेल्या अनियमितता आणि गैरव्यवहाराची संपूर्ण नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी हा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची दखल घेत केंद्र सरकारने तपास त्वरित सीबीआयकडे (CBI) सोपवला होता आणि परीक्षा रद्द करून २१ जून २०२६ रोजी ती पुन्हा सुरळीत पार पाडली होती. तसेच पुढील वर्षापासून ही परीक्षा ‘CBT’ (Computer-based-test) मोडमध्ये घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. १६ जुलै रोजी घोषित झालेल्या पुनर्रचित निकालांमध्ये अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना यश मिळाले असले, तरी गेल्या काही दिवसांतील घडामोडींमुळे मन अत्यंत व्यथित झाल्याचे प्रधान यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
गेल्या दहा दिवसांतील घडामोडी, जंतर-मंतर येथील आंदोलने आणि देशभरात निर्माण झालेली परिस्थिती पाहता, राष्ट्रविरोधी शक्तींनी याचा गैरफायदा घेऊ नये आणि विद्यार्थ्यांचे भविष्य कायदेशीर अडचणींत अडकू नये, यासाठी पद सोडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “परीक्षेतील गैरव्यवहाराची जबाबदारी मी पहिल्या दिवसापासून स्वीकारली असून कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याचे नुकसान होऊ दिले जाणार नाही,” असा पुनरुच्चार त्यांनी केला. पंतप्रधानांचे मार्गदर्शन व सहकाऱ्यांचे आभार मानत, भविष्यातही जगन्नाथ स्वामींच्या आशीर्वादाने देश, ओडिशाची जनता आणि युवा पिढीच्या सेवेसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला आहे.


