देवगड:
तालुक्यातील लिंगडाळ येथील एका चिरेखाणीवर काम करणारा सुखदेव बड्डा टेकाम (३६, मूळ रा. कोडल, तेंडूखेडा, जि. दमोह, रा. मध्य प्रदेश) हा कामगार चिरे कापण्याच्या मशिनवर पडून गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना २७ जून, २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. लिंगडाळ येथील चिरेखाणीवर काम करत असताना तो अचानक मशिनवर पडल्याने त्याच्या गळ्याला गंभीर दुखापत होऊन तोंडातून रक्तस्राव झाला.
ही बाब लक्षात येताच इतर कामगारांनी त्याला तातडीने देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचार सुरू करण्यापूर्वीच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह अंत्यविधीसाठी त्याच्या मूळ गावी नेण्यात आला.
या प्रकरणी सुखदेव टेकाम (२६, रा. कोडल) यांनी २९ जून रोजी तेंडूखेडा पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून, सुरुवातीला तिथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडल्याने, तेंडूखेडा पोलिसांनी हे प्रकरण तपासासाठी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत देवगड पोलीस स्थानकाकडे वर्ग केले. त्यानुसार देवगड पोलीस स्थानकात मंगळवारी रात्री उशिरा या घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुले पुढील तपास करत आहेत.

