सावंतवाडी, दि. २७ जुलै:
सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मंजूर झालेल्या बहुप्रतिक्षित मंगळुरू एक्सप्रेसच्या थांब्यामुळे येथील प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी प्रथमच ही गाडी स्थानकात दाखल झाली. कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी तसेच तालुक्यातील नागरिकांनी गाडीचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी रेल्वेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच लोको पायलट यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
रेल्वेला मिळालेल्या या नव्या थांब्यामुळे सावंतवाडीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. १६ वर्षे या गाडीसाठी प्रयत्न सुरू होते. गेली ४ वर्षे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने सतत पाठपुरावा केल्यानंतर आज मोठं यश आम्हाला मिळालं आहे. सुपरफास्ट एक्सप्रेसला सावंतवाडीत थांबा मिळाला. यासाठी रेल्वे बोर्ड, कोकण रेल्वे, मंत्री व सर्व जनप्रतिनिधींचे आभार मानतो. तसेच कोकण रेल्वेचे शिल्पकार लोकनेते मधू दंडवते टर्मिनस असं नाव या स्थानकाला मिळालं आहे. त्यामुळे त्या नावासा शोभेल असं टर्मिनस जनप्रतिनिधींच्या प्रयत्नांतून निर्माण व्हावं, अशी अपेक्षा कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी व्यक्त केली. यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व सावंतवाडीकर उपस्थित होते.
यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीचे सचिव श्री. मिहीर मठकर, उपाध्यक्ष श्री. सागर तळवडकर, मुंबई विभागाचे श्री. गणेश चमणकर, श्री. मिहीर गावडे, श्री. नंदू तारी, श्री. देवेंद्र मातोंडकर, श्री. सुभाष शिरसाट, ॲड. तेजस परब, श्री. नरसु रेडकर, श्री. शेखर पाडगावकर, सौ. सान्वी तळवडकर, कु. राशी परब, कु. प्रेरणा पोकळे, श्री. बसवराज गुरव, श्री. अश्वैफ गवस, श्री. भावेश भिसे, तसेच सर्व रिक्षाचालक आदी उपस्थित होते.


