सावंतवाडी : गोवा राज्याची कदंबा प्रवासी बस आजगावकडून दुचाकी वाहन चालकाला वाचवताना कलंडली, ज्यामध्ये ४५ प्रवासी बालबाल बचावले असून चालकाच्या प्रसंगवधानामुळे मोठी हानी टळली आहे. गोवा येथील पणजी येथून संध्याकाळी साडेचार वाजता सुटणारी पणजी शिरोडा मार्गे वेंगुर्ला ही वस्तीची गाडी शिरोडाच्या दिशेने येत असताना आजगाव वाघबीळाजवळ आली. या वेळी मळेवाडच्या दिशेने चार चाकी गाडी जात असताना त्या घातक वळणावर दुचाकी वाहन चालकाने ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न केला, आणि त्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात ही बस खोलदूरीच्या काही फूट अंतरावर कलंडली.
या बसमध्ये एकूण ४५ प्रवासी प्रवास करत होते, ज्यांना आपत्कालीन दरवाज्यातून बाहेर काढण्यात आले. या बसचे चालक धनंजय आसोलकर व वाहक सर्वेश नाईक यांनी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले, तसेच या वेळी परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेऊन प्रवाशांना वाचवण्यात मदत केली.
या प्रवाशांपैकी कोणालाही दुखापत झालेली नाही, परंतु काही फूट अंतरावर जर ही बस कलंडली असती तर किमान २०० फूट खोल दरीत ही बस कोसळून मोठा अपघात झाला असता. बस चालकाच्या प्रसंगवधानामुळे बस अलिकडेच कलंडली आणि दुचाकीस्वाराच्या चुकीमुळे ४५ प्रवाशांचे जीव धोक्यात जाणार होते, मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.


