कुडाळ: तालुक्यातील एका १९ वर्षीय तरुणीने घर सोडून थेट पुण्यात आपल्या प्रियकराकडे धाव घेतल्याची घटना समोर आली होती. मुलगी अचानक गायब झाल्यामुळे चिंतेत असलेल्या पालकांनी तत्काळ कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कुडाळ पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली. सुरुवातीला दोन्ही तरुण-तरुणींचे मोबाईल फोन बंद असल्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते, तसेच पालकांकडेही युवकाबाबत कोणतीच ठोस माहिती नव्हती.
परंतु, कुडाळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अत्यंत वेगाने पावले उचलत तांत्रिक विश्लेषणाची मदत घेतली. या तांत्रिक तपासाच्या आधारे दोघेही पुण्याच्या स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे स्पष्ट झाले. कुडाळ पोलिसांनी तत्काळ स्वारगेट पोलिसांशी संपर्क साधून सविस्तर माहिती आणि मोबाईल क्रमांक त्यांच्याकडे सुपूर्द केला.
दोन्ही पोलीस दलांमधील उत्कृष्ट समन्वयामुळे अवघ्या ४८ तासांच्या आत या प्रेमीयुगुळाचा शोध घेण्यात यश आले आणि त्यांना सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले. स्वारगेट पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या पालकांसमोर या तरुण-तरुणींनी आपण स्वेच्छेने आणि परस्पर संमतीने एकत्र येऊन लग्नाचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे मुलीचा सुरक्षित शोध लागल्याने पालकांनी कुडाळ पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.

