रस्ता खचल्याने माळशेज घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद

   Follow us on        

सातारा: सततच्या मुसळधार पावसामुळे ओतुर पोलीस स्टेशन हद्दीतील कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ हा करंजाळे गावाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात खचला आहे. यामुळे प्रशासनाने तातडीची खबरदारी घेत माळशेज घाट मार्गे मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद केली आहे.

​रस्ता खचल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांनी वाहतूक बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. संबंधित मार्गाची दुरुस्ती पूर्ण होऊन तो सुरक्षितपणे वाहतुकीसाठी खुला होईपर्यंत हा बंदी आदेश कायम राहणार आहे.

​दरम्यान, अहिल्यानगर व पुण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले असून, वाहनचालकांसाठी आळेफाटा – नारायणगाव – खेड – चाकण – तळेगाव एमआयडीसी – लोणावळा – खोपोली – मुंबई हा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. आवश्यकतानुसार इतर पर्यायी मार्गांचाही वापर करण्याचे सांगण्यात आले आहे.

​माळशेज घाट परिसरात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागातील परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी विनाकारण प्रवास टाळावा, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ओतुर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी ही माहिती देत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search