मुंबई : येत्या २६ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘पिकोलो’ चित्रपटाचा ट्रेलर मागील आठवड्यात प्रदर्शित झाला आहे. एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट म्हणून ह्या चित्रपटाकडे पहिले जात आहे.
‘पिकोलो’ चित्रपट हा संगीतप्रेमी कलावंताची गोष्ट आहे. संगीताच्या साथीने जगण्याची नवी उमेद निर्माण करणारा हा कलावंत संगीतसाधनेत येणाऱ्या अडथळ्यांवर मात करीत आपली कला कशी जिवंत ठेवतो? व त्यासाठी त्याला कोण आणि कशी मदत करतो? हे ‘पिकोलो’ मध्ये पहायला मिळणार आहे. आनंदाने कसे जगावे याचा मूलमंत्र देणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असलेले प्रेमीयुगुल जगण्याच्या संघर्षावर संगीताची फुंकर घालून त्यातून कसा मार्ग काढतात? हे ‘पिकोलो’ चित्रपटात पहाणं रंजक ठरणार आहे.
राजेश मुद्दापूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर दिग्दर्शन अभिजीत वारंग यांनी केले आहे. चित्रपटात प्रमुख भूमिका असलेल्या प्रणव रावराणे आणि अश्विनी कासार या दोघांसोबत किशोर चौघुले, अभय खडपकर, दीक्षा पुरळकर, नमिता गावकर, पद्मा वेंगुर्लेकर, विश्वजीत पालव, मिलिंद गुरव, हर्षद जाधव, रघु जगताप, रोहन जाधव, हर्षद राऊळ, शुभम सुतार, हर्षद परब, विद्याधर कार्लेकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा प्रमोद शेलार यांची आहे. छायाचित्रण कार्तिक परमार तर संकलन पराग सावंत यांचे आहे.
कोकणच्या मातीचा गंध
ह्या चित्रपटाला कोकणच्या मातीचा गंध आहे. कारण ह्या चित्रपटाचे चित्रीकरण कोकणातील निवती आणि कोकणातील इतर भागात झाले आहे. कोकणात मूळ असेलेले आणि आपल्या मातीविषयी अतुल प्रेम असलेले अभिजीत वारंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांचे या आधीचे चित्रपट देखील कोकणात चित्रित झाले होते. त्यातील त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पिकासो’ या अमेझॉन प्राईम ओटीटी प्लँटफॉर्म वर प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटाने ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘विशेष उल्लेखनीय’ श्रेणीत गौरव प्राप्त केला होता. ह्या चित्रपटाचे चित्रीकरण तळकोकणातील कुडाळ ह्या गावात झाले होते. कोकणातील पारंपरिक कला दशावतार कलेवर हा चित्रपट आधारित होता. कोकणात मूळ असल्याने इथे मला चित्रपट सुचतात आणि मी करतो असे त्यांचे म्हणणे आहे. एका आगामी हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन आणि चित्रीकरण पण ते कोकणात करणार आहेत असे म्हणाले आहेत.
Facebook Comments Box
Vision Abroad