सिंधुदुर्ग: सावंतवाडीकरांसाठी एक अभिमान वाटेल अशी बातमी समोर आली आहे. सावंतवाडी तालुक्यातील कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभाग व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोलगाव सावंतवाडीस, ज्येष्ठ समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, सिंधुदुर्गातील कामगार चळवळीचे प्रणेते माजी आमदार स्वर्गीय जयानंद शिवराम मठकर यांचे नाव देण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील 108 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नावात बदल करून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती तसेच समाजसुधारकांची नावे देण्याचा शासन निर्णय जाहीर केला असून माजी आमदार ज्येष्ठ पत्रकार जयानंद मठकर यांनी कोकण रेल्वेसाठी लढा दिला. कोकणातील सामाजिक आणि विकासात्मक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. त्यांचे नाव आज सावंतवाडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस दिल्याने ही समस्त सावंतवाडीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
मठकर यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९२९ रोजी मुंबईत झाला. त्यांचे शिक्षणही मुंबईत झाले. मालवणच्या टोपीवाला स्मारक शाळेतही ते काही काळ शिक्षणासाठी होते. त्यांनी १९४२ मध्ये समाजवादी पक्षाच्या विचाराने प्रभावित होऊन सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उडी घेतली.
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कामगार आणि गरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी वेचले. त्यासाठी आंदोलने, संघर्ष केले. ज्येष्ठ समाजवादी नेते बॅ. नाथ पै, मधु दंडवते, ना. ग. गोरे, मृणाल गोरे, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या ज्येष्ठ समाजवादी नेत्यांच्या बरोबर त्यांनी काम केले.
मठकर यांनी राजकीय, सामाजिक, ग्रंथालय, सहकार, कामगार, पत्रकारिता, साहित्य अशा विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला. कामगार आणि ग्रंथालय चळवळीत विशेष कार्य केले. पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, वनखात्यातील रोजंदारी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले.
कामगार क्षेत्राबरोबरच तयांनी ग्रंथालय चळवळीसाठीही कार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनातून जिल्ह्यात अनेक ग्रंथालये उभी राहिली. गोवामुक्ती संग्रामातही त्यांचा सक्रीय सहभाग होता. तेरेखोल किल्ल्यावर पाठवण्यात आलेल्या सत्याग्रहींच्या एका तुकडीचे नेतृत्वही त्यांनी केले होते.
पत्रकारितेतील त्यांचे योगदानही मोठे होते. १९५३ पासून ते १९७४ पर्यंत त्यांनी नवशक्ती, लोकमान्य, केसरी आदी वृत्तपत्रांत वार्ताहर म्हणून काम केले होते.
Vision Abroad