रत्नागिरी/सिंधुदुर्ग: आषाढी आणि कार्तिकी एकादशीप्रमाणेच कोकणात माघी एकादशीला विशेष महत्त्व आहे. या निमित्ताने कोकणातील हजारो वारकरी पंढरपूरला विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. मात्र, कोकणातून पंढरपूरला जाण्यासाठी थेट रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने वारकऱ्यांचे, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर, यावर्षी तरी सावंतवाडी ते पंढरपूर दरम्यान विशेष गाडी चालवावी, अशी मागणी प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
रस्ते प्रवास ठरतोय त्रासदायक
कोकणातून पंढरपूर रस्तेमार्गे जवळ असले तरी, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कठीण घाटमार्गामुळे हा प्रवास अत्यंत वेळखाऊ आणि थकवणारा होतो. वयोवृद्ध वारकऱ्यांसाठी तासनतास बसचा किंवा खासगी वाहनाचा प्रवास शारीरिकदृष्ट्या त्रासदायक ठरतो. रेल्वेने हा प्रवास केल्यास तो अधिक आरामदायक आणि सुरक्षित होऊ शकतो, असे वारकऱ्यांचे म्हणणे आहे.
मध्य रेल्वे दरवर्षी आषाढी-कार्तिकी एकादशीला नागपूर, अमरावती, कोल्हापूर, भुसावळ, लातूर आणि मिरज यांसारख्या विविध भागांतून विशेष गाड्यांची घोषणा करते. मात्र, दरवर्षी मागणी करूनही कोकण रेल्वे मार्गावरून पंढरपूरसाठी थेट विशेष गाडी अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. यामुळे कोकणातील भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही महत्वाच्या एकदशा ऐन शेतीच्या हंगामात येत असल्याने वारकर्यांची ईच्छा असूनही कोकणकरांना पंढरपुरात जाणे शक्य होत नाही. माघी एकादशी सोयीच्या काळात येत असल्याने हा वारकरी नित्यनेमाने पंढरपूरला भेट देतो. त्यामुळे माघी वारीला मोठ्या प्रमाणात कोकणी भक्त दिसून येतात. येवढेच नाही तर या एकादशीच्या वारीला कोकणवासीयांची वारी असेही संबोधले जाते.
या महिन्याच्या अखेरीस माघी एकादशी येत असल्याने रेल्वेने तातडीने यावर निर्णय घ्यावा.
आता रेल्वे प्रशासन या मागणीची दखल घेऊन कोकणातील वारकऱ्यांचा विठुरायापर्यंतचा प्रवास सुकर करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


