Absenceof FOB :कोकण रेल्वे मार्गावरील वैभववाडी रेल्वे स्थानकावर पादचारी पूल नसल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पूल नसल्याने दोन प्लॅटफॉर्म च्या मधील रुळावरून जीव मुठीत पलीकडे जावे लागत आहे. खासकरून वरिष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती आणि लहानमुले आणि स्त्रियांना रेल्वे रूळ ओलांडताना मोठी पराकाष्टा करावी लागत आहे. सध्याच्या परिस्थितीवरून येथे मोठा अपघात घडण्याची दाट शक्यताही वर्तविली जात आहे. मात्र येथे प्रवासी संख्या आणि चांगले उत्पन्न मिळत असूनही तसेच अनेक वर्ष मागणी करूनही येथे पादचारी मंजूर होत नसल्याने येथे अपघात घडल्यावरच प्रशासनाचे डोळे उघणार का असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे.
सध्या वैभववाडी मांडवी एक्सप्रेस, कोकणकन्या एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस आणि दिवा सावंतवाडी एक्सप्रेस स्थानकावर सध्या ४ नियमित गाड्या थांबा घेतात. तसेच सणावारीआणि हंगामात चालविण्यात येणाऱ्या जवळपास सर्वच गाडयांना येथे थांबा देण्यात येतो. या स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढत आहे. मागील वर्षी उत्पन्नाच्या बाबतीत वैभववाडी स्थानक रत्नागिरी विभागातून सातव्या स्थानावर तर संपूर्ण कोकण रेल्वेच्या स्थानकांचा विचार करता ७२ स्थानकामध्ये १४ व्या स्थानावर आहे. हे वास्तव असूनही या स्थानकावर एक पादचारी पूल का मंजूर होत नाही हा पण एक मोठं प्रश्च म्हणावा लागेल
Video | रूळ ओलांडण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी; रेल्वे प्रशासन दुर्घटनेच्या प्रतीक्षेत? – Kokanai
देवगड: देवगड तालुक्यातील मुणगे आडबंदर येथील सडा भागात दोन मानवाकृती कातळचित्रे सापडली आहेत. येथील देवगड इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने त्याची पाहणी करण्यात आली. सापडलेल्या कातळचित्राच्या परिसराची जागा स्वच्छ करून चित्र खुले करण्यात आले. या परिसरात आणखी काही कातळचित्रे मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली.
कोकण इतिहास परिषद व देवगड इतिहास संशोधन मंडळ सातत्याने गेली काही वर्षे कातळचित्र शोधमोहीम राबवत आहे. याच मोहिमेतंर्गत तालुक्यातील मुणगे आडबंदर येथील सडा भागात दोन मानवाकृती कातळचित्रे सापडली. याची माहिती मिळताच प्राच्यविद्या अभ्यासक रणजित हिर्लेकर व अजित टाककर यांनी या कातळी चित्रांचा शोध घेतला. त्यावेळी तेथे पुसटशा मानवाकृती रेषा दिसत होत्या.
या दोन उलट सुलट साडेपाच फूट उंचीच्या मानवाकृती आहेत. उत्तर-दक्षिण अशी इथे जर मध्य रेषा काढली तर यातील एक आकृती पूर्वेकडे पाय सोडून व दुसरी आकृती पश्चिमेकडे पाय सोडून आहे. दोन्ही आकृत्यांची डोकी जवळ जवळ काढलेली नसावीत असे दिसते. डोक्याच्या जागी फक्त एक एक खळगे कोरलेले दिसते. या कातळचित्राच्या रेषा अतिशय सफाईने काढलेल्या दिसतात. खांदे, हात, कंबर, पायाच्या पोटऱ्या दर्शविणाऱ्या बाह्यरेषा सराईतपणे कोरलेल्या दिसतात. अन्यत्र आढळणाऱ्या मानवाकृती इतक्या सफाईने कोरलेल्या दिसत नाहीत.
कातळचित्राचे “मामा भाचे” नामकरण
येथील काही ग्रामस्थ या कातळचित्रांना “मामा भाचे” असे संबोधतात. या मागे एक ऐकिव कथा पण आहे. एके काळी मामा आणि भाचा येथे शिकारीला आले होते. हे दोघे कातळावर शिकारीसाठी फिरत असताना त्यांना शिकार न मिळाल्यामुळे येथे थकून बसले होते. इतक्यात एक कुठला तरी जंगली प्राणी या दोघांच्या मधून पळून जाताना त्यांना दिसला. दोघांनी तात्काळ त्या प्राण्याच्या दिशेने आपल्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या. पण तो प्राणी शिफाईने पळून गेला व बंदुकीच्या गोळ्या लागून दोन्ही मामा भाचे ठार झाले. या मानवाकृतीच्या डोक्याच्या जागी जे दोन खळगे दिसतात त्या त्यांना लागलेला गोळ्या आहेत असे येथील गाववाले समजतात. (या कथेस कोकणाई दुजोरा देत नाही. फक्त वाचकांच्या माहितीसाठी हे येथे लहिण्यात आले आहे.)
सिंधुदुर्ग :दोडामार्ग तालुक्यातील तळकट-खडपडे-कुभंवडे रस्त्यावर शनिवारी सकाळी नागरिकांना वाघाचे दर्शन झाले या भागात पूर्वीपासून वाघाचे अस्तित्व आहे . दोडामार्ग तालुक्याचे जैवविविधतेच्या दृष्टीने असलेले महत्त्व यापूर्वी देखील अधोरेखित झाले आहे.
दोडामार्ग तालुक्याला सावंतवाडी तालुक्याशी जोडण्यासाठी तळकट येथून चौकुल येथे जाणारा कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याला लागून राखीव जंगलाचे काही क्षेत्र आहे. रात्री-अपरात्री या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना वन्यजीवांचे दर्शन होत असते. शनिवारी सकाळी या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. त्यांनी लागलीच या वाघाचे छायाचित्र आणि व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपले. वन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छायाचित्रित झालेल्या वाघाचे लिंग हे मादी असून पूर्वीपासून या मादीचा वावर या परिसरात आहे.
तळकट पंचक्रोशीत समृद्ध जंगल आहे; मात्र या भागात खनिज प्रकल्पांसाठी गेली अनेक वर्षे मायनिंग लॉबी प्रयत्न करत आहे. पश्चिम घाट अभ्यास समितीचे अध्यक्ष माधव गाडगीळ यांनी या भागाचा दौरा करून आपल्या अहवालात हा भाग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असून त्याच्या संवर्धनासाठी उपाय योजण्याची शिफारस केली होती; मात्र नंतर आलेल्या कस्तुरीरंगन समितीने हा अख्खा दोडामार्ग तालुकाच पर्यावरण निर्बंध अर्थात इकोसेन्सिटीव्हमधून वगळला होता.
Nagpur Goa Expressway: नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गावर हरकती नोंदविण्यासाठी शासनातर्फे २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ही मुदत या महामार्गाची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून म्हणजे दिनांक ७ मार्च ते २८ मार्च अशी असणार आहे. या हरकती त्या त्या तालुक्यातील भूसंपादन प्रांताधिकाऱ्यांकडे या मुदतीत दाखल करता येतील.
राज्यातील सर्वात मोठा महामार्ग ठरणाऱ्या या महामार्गास काही जिल्ह्यातून विरोध व्हायला सुरु झाला आहे. मुख्यत्वेकरून सांगली आणि कोल्हापूर भागातील शेतकऱ्यांनी याला विरोध केला आहे. या महामार्गाने सध्या कसल्या जाणाऱ्या जमिनी जातील आणि येथील शेतकरी भूमिहीन होईल. त्याचप्रमाणे या महामार्गामुळे येथे पुराचा धोका निर्माण होईल असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. हा महामार्ग होऊ नये किंवा आपल्या भागातून जाऊ नये अशा मागण्यासाठी शेतकऱ्यांकडून आंदोलनाचे हत्यार बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे शासनास हा महामार्ग पूर्णत्वास नेण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
Mumbai Goa Highway :मुंबई-गोवा महामार्ग सप्टेंबर 2024 पासून वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ‘ग्रीनफिल्ड कोकण एक्स्प्रेस वे’ असे नाव त्या महामार्गास देण्यात आले असून तो मुंबईसह रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग, गोवा राज्यात जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांना जोडणाऱ्या एनएच-66 या महामार्गाचा भाग असून तो पनवेलपासून सुरू होतो.
हाच मार्ग गोव्यातील राजधानी पणजीमधून तो केरळमधील कन्याकुमारीपर्यंत जातो. या महामार्गाची अंतिम तारीख न्यायालयाने देखील सरकारला विचारली होती. तेव्हा राज्य सरकारने व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तो 31 डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. तथापि एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर 2024 मध्ये महमार्गाचे काम पूर्ण होईल आणि तो चाकरमान्यांसाठी खुला करण्याचे आश्वासन दिले आहे. सिंधुदुर्ग ते गोवा असा ग्रीनफिल्ड कॉरिडॉर रस्ता या महामार्गात तयार करण्यात येणार असून संपूर्ण कामे 31 डिसेंबर 2024 पूर्वी संपवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यंदा गणेश चतुर्थीला मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करायला मिळेल, असा दिलासा जनतेला मिळाला आहे.
Loksabha Election Updates:देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत आज निवडणुकांची घोषणा केली आहे. एकूण ७ टप्प्यात देशात मतदान पार पडणार आहे. या सात टप्प्यांमध्ये विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे.
◾️चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
◾️पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे.
पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिलला होणार आहे.
तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी होणार आहे.
चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी होणार आहे
पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे.
सहाव्या टप्प्यातील मतदान २५ मे रोजी होणार आहे.
सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे. तर ०४ जूनला मतमोजणी होणार आहे.
निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की १.८२ कोटी तरुण मतदार मतदान करणार आहेत. 18 ते 29 वयोगटातील 21.5 लाख मतदार आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी यंदा देशात ९७ कोटीहून अधिक मतदार मतदान करणार आहेत. यासाठी ५५ लाखापेक्षा जास्त ईव्हीएम तयार आहेत. यासाठी देशात दीड कोटी निवडणूक अधिकारी काम करणार आहेत. १६ जूनला लोकसभेचा कार्यकाळ संपणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी दिली आहे.
मुंबई, दि. १६ फेब्रु. :मुंबईतील आठ रेल्वे स्थानकाची जुनी ब्रिटिशकालीन नावे बदलून अस्सल मराठी नावे देण्याचा प्रस्ताव नुकताच मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयाचे स्वागत सर्व जनतेकडून होत असले तरी यातील दोन स्थानकाच्या नावाबद्दल मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
यातील पहिले स्थानक आहे ते किंग्ज सर्कल. या स्थानकाचे नाव तीर्थंकर पार्श्वनाथ असे नामकरण होणार आहे. मात्र मराठी एकीकरण कृती समितीने याला विरोध दर्शविला आहे. तीर्थंकर पार्श्वनाथ हे अनेकांना माहिती नाहीत त्यामुळे या नावाला विरोध आहे.तीर्थंकर पार्श्वनाथ हे मराठी नाव नसल्याने या नावावर या समितीने आक्षेप घेतला आहे.
मुंबई सेंट्रलचे नाव नाना जगनाथ शंकर शेठ असे होणार आहे. या नावाला विरोध नाही पण या नावात ‘मुंबई’ हा शब्द कायम ठेवावा अशी मागणी संयुक्त महाराष्ट्र लढा स्मृती मंडळाचे अध्यक्ष भाऊ सावंत यांनी केली आहे यासाठी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचेही म्हणाले आहेत.
सावंतवाडी, दि. १६ मार्च: सावंतवाडी शहराचे वैभव असणाऱ्या व जैवविविधतेने समृद्ध असलेल्या नरेंद्र डोंगरावर पर्यटकांना उद्यापासून नरेंद्र वन उद्यान निसर्ग पर्यटन सफारी वाहन, सावंतवाडी दर्शन मनोरा, निसर्गमाहिती केंद्र अशा सुविधा अनुभवता येणार आहेत. सावंतवाडी वन विभागांतर्गत येणाऱ्या नरेंद्र वन उद्यान येथे सिंधुरत्न योजनेतून पर्यटनवाढीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध निसर्गपर्यटन सुविधांचा अनुभव घेण्यासाठी सर्व सावंतवाडीकरांना आवाहन करण्यात येत आहे.
पर्यटकांना मोती तलावा शेजारी असलेल्या जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान ते नरेंद्र वन उद्यानापर्यंत जाण्यासाठी सफारी वाहनाने प्रवास करता येईल. नरेंद्र वन उद्यानामध्ये पोहोचल्यावर तिथे असलेला सावंतवाडी दर्शन मनोरा, निसर्ग माहिती केंद्र हे देखील पर्यटकांसाठी उपलब्ध असणार आहे.
सफारीचा मार्ग
येणार्या पर्यटकांना सावंतवाडी भोसले उद्यान ते नरेंद्र डोगर असे फिरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्या ठिकाणी जाताना सावंतवाडीच्या मोती तलाव तसेच राजवाडा आदींची माहिती देवून शहराला वळसा घालून ही सफर थेट सालईवाडा गणपती मंदिर हॉलकडुन नरेंद्र डोंगरावर नेण्यात येणार आहे. त्या ठिकाणी जाताना सर्व झाडांची स्थानिक स्तरावर आढणारे प्राणी, पक्षी, बुरशी आदींची माहिती देण्यात येणार आहे. त्याच बरोबर त्या ठिकाणी जावून निसर्ग माहिती केंद्रांत सिंधुदुर्गात आणि सह्याद्री पट्ट्यात आढळून येणार्या प्राणी, पक्षी व फुले, फळे आदींची माहिती देण्यात येणार आहे.
वेळापत्रक
जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान ते नरेंद्र डोंगर प्रवास करण्यासाठी उपलब्ध असलेले सफारी वाहन प्रत्येक 2 तासाच्या अंतराने सकाळी 8 वाजता, 10 वाजता, 12 वाजता, दुपारी 2 वाजता, सायंकाळी 4 वाजता व शेवटची फेरी सायंकाळी 6 वाजता या वेळापत्रकानुसार सोडले जाईल.
शुल्क
या नरेंद्र डोंगर सफारीसाठी भोसले उद्यान ते नरेंद्र डोंगर सफारी चार्जेस, गाईड चार्जेस व निसर्ग माहिती केंद्र प्रवेश फी हे सर्व मिळून एकत्रितरित्या प्रौढांसाठी 100 रु. प्रति व्यक्ती तर 14 वर्षांखालील लहान मुलांसाठी 50 रु. शुल्क करण्यात येणार आहे. तरी सावंतवाडीकरांनी या निसर्ग पर्यटनाचा नक्की अनुभव घ्यावा असे सावंतवाडी वन विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे.
कुडाळ:कोकणातील पारंपरिक दशवतार लोककलेस बळ मिळावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ३० दशावतार नाटक कंपन्यांना शासनातर्फे अनुदान देण्यात येणार आहे. सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून कंपन्यांना साहित्य आणि वाहन खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. याबाबतची मागणी शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी योजनेचे अध्यक्ष तथा मंत्री दीपक केसरकर आणि संचालक किरण उर्फ भैय्या सामंत यांच्याकडे केली होती. त्यानुसार संबधितांना अनुदान प्राप्त होणार आहे. याबाबतची माहिती श्री. पावसकर यांनी दिली आहे. त्यांनी हे अनुदान देणार्या योजनेच्या सर्व पदाधिकार्यांचे आभार मानले आहेत.
शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्याकडे दशावतार मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र नाईक यांनी दशावतार मंडळांसाठी साहित्य आणि वाहन खरेदीसाठी अनुदान मिळण्यासंदर्भात मागणी केली होती. श्री. पावसकर यांनी तातडीने या मागणीचे पत्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व सिंधुरत्न समिती संचालक किरण सामंत यांच्या जवळ केली.
मंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा प्रशासनाला ही मागणी तातडीने पूर्ण करण्यास सांगितले. जिल्हा प्रशासनाने याबाबतची अंमलबजावणी करून तत्काळ प्रस्ताव तयार करून मंजुरी देखील मिळाली
मुंबई, दि. १५ मार्च: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्वाचा निर्णय घेऊन त्याला मंजुरी देण्यात आली आहे. शासकीय कागदपत्रांमध्ये आता वडिलांच्या नावाप्रमाणेच आईचे नाव लावणे देखील बंधनकारक करण्यात आलंय. फक्त हेच नाही तर वडिलांच्या नावाच्या अगोदर आईचे नाव लावणे आवश्यक असणार आहे. 11 मार्च 2024 च्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. 14 मार्च 2024 रोजी याबाबतच्या अध्यादेश शासनाकडून काढण्यात आला.
दिनांक 1 मे 2024 नंतर जन्मलेल्या सर्व बालकांची नावाची नोंदणी करताना वडिलांच्या अगोदर आईचे नाव येईल. म्हणजेच सुरूवातीला बालकाचे नाव, त्यानंतर आईचे नाव वडिलांचे नाव आणि आडनाव याप्रमाणे. महसूल, शासकीय कागदपत्रे, शैक्षणिक कागदपत्रे, विविध परीक्षा यासर्वांमध्ये हा नियम लागू करण्यात आलाय.
वडिलांच्या नावासोबत आईचे नाव लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेत दालनाबाहेर तशी पाटी लावली.
गेल्या बऱ्याच वर्षांपासून हा मुद्दा गाजत होता की, शासकीय कागदपत्रांवर वडिलांप्रमाणेच आईचे देखील नाव असावे. शेवटी मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये त्याला मान्यता देण्यात आलीये. आता 1 मे 2024 नंतर जन्मलेल्या सर्व बालकांची नावाची नोंदणी करताना वडिलांच्या अगोदर आईचे नाव येईल. हा नक्कीच एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागणार आहे.