Author Archives: Kokanai Digital

मोठी बातमी : मराठा आंदोलनाचा विजय, सर्व मागण्या मान्य, पहाटे अध्यादेश निघाला

नवी मुंबई, दि.27 जानेवारी 2024 | मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढण्यात आले आहेत. मराठा आंदोलनाच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. यामुळे शनिवारी दि 27 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थित आपली विजयी सभा पार पडणार आहे.
सर्व मागण्या मान्य, अध्यादेश मिळाला
मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी रात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सर्व मागण्या मान्य झाल्या असून त्याचे अध्यादेश निघाल्याचे सांगितले. कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाण पत्र द्यावे तसेच त्यांच्या कुटुंबाना सुद्धा प्रमाणपत्र द्यावे ही मागणी मान्य झाली आहे. तसेच सरकारने सगा सोयराबद्दल अध्यादेश काढले आहे. तो मला देण्यात आल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
गुन्हे मागे घेतले जाणार
राज्यातील मराठी बांधव यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार आहे. मराठवाड्यात कमी प्रमाण पत्र सापडले त्या बाबत आता शिंदे समिती गॅझेट काढून त्यावर काम करणार आहे. तसेच विधानसभेत यावर कायदा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे आरक्षणचे काम केले आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्याशी विरोध संपला
समाज म्हणून आमचा आता एकनाथ शिंदे यांचा विरोध संपला आहे. उद्या सकाळी 8 वाजता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री पत्र घेऊन येणार आहेत. मी सगळ्यांना विचारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावले आहे. उद्या आम्ही येथे सभा घेणार आहे मुंबईत जाणार नाही.

महाराष्ट्राच्या चित्ररथाला जिंकवून देण्यासाठी आपले मत महत्वाचे; ‘असे’ देता येईल मत

मुंबई: कर्तव्यपथावरील संचलनात आज अनेक नेत्रदीपक चित्ररथ समाविष्ट झाले होते. या सर्व चित्ररथातील विजेता चित्ररथ निवडण्यासाठी जनतेकडून मते मागविण्यात आली आहेत. महाराष्ट्र राज्यातर्फे ‘छत्रपतीशिवाजीमहाराज : लोकशाहीचे जनक’ या विषयावर अतिशय चित्त वेधक आणि नितांत सुंदर असा चित्ररथ कर्तव्यपथावरील संचलनात सहभागी झाला. या चित्ररथाला जिंकून देण्याची संधी आता आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे सर्वानी आपले मत नोंदवून या राज्याच्या चित्ररथाला जिंकवून द्यावे असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचनालय तर्फे काण्यात आले आहे.
उद्या २७ जानेवारी सायं. ५.३० पर्यंत हे मतदान आपणास करता येणार आहे.
कसे नोंदवाल मत?
👇मार्ग पहिला :-
स्वत:च्या नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावरून MYGOVPOLL(स्पेस)344521(comma) 9 असा संदेश 7738299899 या क्रमांकावर पाठवावा.
म्हणजेच हा मेसेज खालील प्रमाणे होईल
MYGOVPOLL 344521,9 
👇मार्ग दुसरा :-
प्रथमत: https://mygov.in/group-poll/vote-your-favourite-tableau-republic-day-2024/ या लिंकवर क्लिक करुन लॉगिन करा. त्यानंतर महाराष्ट्राचा चित्ररथ निवडून मत नोंदवा.

कोल्हापूर ते कोकण प्रवास एका तासात शक्य; आंबोली घाटाला छेदून येणार ‘हा’ महामार्ग

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाचे संरेखन अखेर निश्चित केले आहे. कोल्हापूर ते सावंतवाडी दरम्यान लागणाऱ्या आंबोली घाटाखालून हा महामार्ग येणार आहे. आंबोली घाटातून मोठा बोगदा खोदला जाऊन तेथून हा महामार्ग जाणार असल्याने कोल्हापूर ते कोकण अंतर १ तासात गाठणे शक्य होणार आहे. 
सध्या आंबोली घाटातून वाहतूक खूप धीम्या गतीने होते. पावसाळ्यात अनेकदा वाहतूक धोक्याची होते. दरी कोसळल्याने वाहतूक कित्येकदा बंद होते. मात्र शक्तीपीठ महामार्ग झाल्यास पश्चिम महाराष्ट्र आणि तळकोकण जवळ येणार आहे. 
समृद्धी महामार्गापेक्षाही मोठा नागपूर – गोवा ‘शक्तिपीठ’ महामार्ग बांधण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात जोडणारा महामार्ग असावा, यातून एमएसआरडीसीने समृद्धी महामार्गाची संकल्पना पुढे आणली. त्यातही विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील धार्मिक स्थळांना, देवस्थानांना जोडणारा आणि तेथील पर्यटनासह सर्वांगीण विकासाला चालना देणारा महामार्ग असावा. यातून ‘शक्तिपीठ’ महामार्ग एमएसआरडीसीने हाती घेतला आहे. या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सध्या सल्लागार कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. येत्या सहा महिन्यात हा आराखडा तयार होण्याची शक्यता आहे. 

ज्ञानवापी मशीदच्या जागी हिंदू मंदिर होते; ASI ने पुरावे समोर आणले

नवी दिल्ली: ज्ञानवापी मशीद संदर्भात भारतीय पुरातत्व विभागाचा (ASI) रिपोर्ट आला आहे. या अहवालातून ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी मंदिरच होते. मंदिर पाडून मशीद उभारण्यात आली आल्याचे स्पष्ट झाले आहे. मंदिर असल्याचे 32 पेक्षा जास्त पुरावे मिळाले आहेत. 32 शिलालेखमधून हिंदू मंदिर असल्याचे स्पष्ट होत आहे. हा अहवाल दोन्ही पक्षांना एएसआयने दिला आहे. मशीद बांधताना हिंदू मंदिरातील खंबे थोड्याप्रमाणात बदलण्यात आल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. या अहवालातील काही माहिती पुढे आली आहे. 
नेमके काय आहे रिपोर्टमध्ये
ज्ञानवापीत मंदिर असताना एक मोठा केंद्रीय कक्ष होता. तसेच उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम विभागात एक एक खोली होती. त्यातील उत्तर, दक्षिण आणि पश्चिम विभागातील अवशेष मिळाले. परंतु पूर्व विभागाचे अवशेष अजून मिळाले नाही. मंदिराचे जे केंद्रीय कक्ष होते ते आता मशिदीचे केंद्रीय कक्ष आहे. मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेकडून होता. हे प्रवेशद्वार दगडांनी बंद करण्यात आला आहे. मशीद बनवताना मंदिराच्या अनेक खुणा मिटण्याचा प्रयत्न झाला असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
  • मशिदीच्या आधी, तिथे बांधलेल्या मंदिरात एक मोठा मध्यवर्ती कक्ष होता आणि उत्तर बाजूला एक लहान खोली होती.
  • मध्यवर्ती कक्ष आणि पूर्व-अस्तित्वात असलेल्या संरचनेचे मुख्य प्रवेशद्वार आहे.
  • मशिदीची पश्चिमेकडील खोली आणि पश्चिमेकडील भिंत आहे.
  • मशिदीच्या बांधकामादरम्यान, मंदिराच्या खांबांमध्ये तसेच इतर भागांमध्ये किरकोळ बदल करण्यात आले. ज्यामुळे त्याला मशिदीचा आकार देण्यात आला.
  • विद्यमान संरचनेवर शिलालेख दिसून आले.
  • दगडांवर अरबी आणि पर्शियन शिलालेख आहे.
  • तळघरात शिल्पाचे अवशेष आहेत.
  • शिलालेखामध्ये देवनागरी, तेलुगू आणि कन्नड लिपी
ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी 32 शिलालेख सापडले. त्यात देवनागरी, तेलुगू आणि कन्नड लिपी मिळाली आहे. त्यावर जनार्दन, रुद्र आणि उमेश्वर असे देवांचे नाव मिळाले. महा-मुक्तिमंडप यासारखे तीन शब्द शिलालेखांमध्ये मिळाले आहे. मंदिराचे अनेक शिलालेख मशीद बनवताना वापरल्याचे अहवालात म्हटले आहे.
त्याचप्रमाणे येथे शिवलिंग, हनुमान आणि गणेशजी च्या मुर्त्या आढळून आलेल्या असल्याने येथे मंदिरच असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. 

सावंतवाडीत रामभक्त नाही आहेत का? ‘आस्था स्पेशल एक्स्प्रेस’ ला थांबा न दिल्याने प्रवाशांचा रेल्वेला प्रश्न..

सावंतवाडी : कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रोड हे महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. बांदा, वेंगुर्ला, शिरोडा, रेडी पासून आंबोली चौकुळ अशा विस्तारित क्षेत्रातील प्रवाशांसाठी हे सोयीचे स्थानक आहे. उत्पन्नाच्या बाबतीतही हे कोकण रेल्वे च्या पूर्ण मार्गातील पाहिल्या दहा स्थानकांत मोडते. असे असूनही येथे खूप कमी गाड्यांना थांबे दिले आहेत. प्रवासी संघटनांनी वेळोवेळी मागणी करूनही अजूनही काही मुख्य गाड्यांना थांबे मिळाले नाही आहेत. त्यात भर म्हणजे आता विशेष गाड्यांच्या थांब्यांसाठी सावंतवाडी स्थानकाला वगळण्यात येत आहे. उदाहरण द्यायचे झाले तर आताच जाहीर करण्यात आलेल्या अयोध्ये यात्री साठी चालविण्यात येणार्‍या ‘आस्था स्पेशल एक्स्प्रेस’ ला सावंतवाडी स्थानकावर थांबा देण्यात आला नाही आहे. त्यामुळे सावंतवाडीत रामभक्त नाहीत का? असा सवाल प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाला विचाराला जात आहे. रेल्वे अभ्यासक आणि कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे श्र. सागर तळवडेकर यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले असून या गाडीला सावंतवाडी रोड स्थानकावर थांबा देण्यात यावा अशी मागणी केली आहे. 

विविध मागण्यांसाठी सावंतवाडी येथे आज लाक्षणिक उपोषण. 

सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस जलदगतीने पुर्ण व्हावं, त्याला निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे नाव टर्मिनसला द्यावे आणि काढून घेतलेल्या रेल्वे गाड्यांना पुन्हा थांबा मिळावा म्हणून आज २६ जानेवारी रोजी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबई व कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीसह सहयोगी २३ संस्थांच्या वतीने लाक्षणिक उपोषण छेडण्यात येत आहे. 

 

 

 

 

 

 

कोकण रेल्वेसंबधी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी २३ संघटना एकत्र; उद्या दिनांक २६ जानेवारीला सावंतवाडी येथे लाक्षणिक उपोषण

सावंतवाडी: सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस जलदगतीने पुर्ण व्हावं, त्याला निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे नाव टर्मिनसला द्यावे आणि काढून घेतलेल्या रेल्वे गाड्यांना पुन्हा थांबा मिळावा म्हणून उद्या २६ जानेवारी रोजी अ अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबई व कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीसह सहयोगी २३ संस्थांच्या वतीने लाक्षणिक उपोषण छेडण्यात येत आहे. 
संघटनेमार्फत खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत 
१) सावंतवाडी टर्मिनस परिपूर्ण करून त्याला प्रा. मधु दंडवते यांचे नाव देण्यात यावे.
२) कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करणे
३)ZBTT अंतर्गत काढलेले थांबे पूर्ववत करणे.
४)सावंतवाडी स्थानकावर प्रवासी सुविधांचा विस्तार करणे(पूर्णवेळ PRS,अमृत भारत स्थानक योजना,एक स्थानक एक उत्पाद, आदी.
५) प्रा. मधु दंडवते यांचा प्रत्येक स्थानकावर तैल चित्र लावणे.
६)चिपळूण – कराड, वैभववाडी – कोल्हापूर, सावंतवाडी – बेळगाव या रेल्वे मार्गांना चालना देणे.
७)सावंतवाडी स्थानकावर मंगलोर, मंगला सहित अतिरिक्त सुपरफास्ट गाड्यांना थांबा देणे.
८. याच बरोबर पश्चिम रेल्वेवरुन कोकण रेल्वेमार्गावर नेहमीसाठी बांद्रा – वसई – सावंतवाडी नवीन एक्सप्रेस किंवा मधू दंडवते एक्सप्रेस व मध्य रेल्वेवरून पुणे – कल्याण – सावंतवाडी एक्सप्रेस तसेच दादर-चिपळूण मेमू व मुंबई-रत्नागिरी एक्सप्रेस सुरू करावी.
९. येथील भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाव्यात व न्याय मिळावा.
सामाजिक आणि राजकीय पक्षांचा पाठिंबा
या उपोषणास कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीसह एकूण २३ संस्था एकत्र आल्या आहेत. सिंधुदुर्ग प्रतिष्ठान-मुंबई, संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था-मुंबई, पागवाडी मुळीक प्रतिष्ठान- इन्सुली सिंधुदुर्ग, घे भरारी फाऊंडेशन-चर्चगेट, जनजागृती सेवा संस्था-ठाणे , ऑटो रिक्षा चालक मालक संघटना-सावंतवाडी, मुस्लिम हेल्थ अँड वेलफेअर फाऊंडेशन- सावंतवाडी इत्यादी संघटनांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. याचप्रमाणे अनेक राजकीय नेत्यांनी आपले समर्थन दिले आहे. मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे.   
  
ईमेल अभियान 
आपल्या रेल्वे प्रशासन,केन्द्र सरकार व राज्य सरकार पर्यंत पोहोचवण्यासाठी संघटनेतर्फे ‘ई-मेल करा’ अभियान राबविण्यात येत आहे. आपल्या हक्कासाठी, कोकणकरांच्या सुखकर व निर्विघ्न प्रवासासाठी,न्यायासाठी सांवतवाडी येथे रेल्वे टर्मिनस  व्हावे जेणेकरून आम्हा कोकणवासियांना हक्काच्या गाड्या मिळतील यासाठी रेल्वे प्रशासन,केन्द्र सरकार व राज्य सरकारला जाग येण्यासाठी शेकडोच्या संख्येने ईमेल पाठवण्याचे आवाहन संघटनेमार्फत करण्यात आले आहे. त्यासाठी  खाली लिंकवर  ई-मेल चा मायना दिला आहे त्यात स्व:ताचे नाव व मोबाईल नंबर टाकुन आपल्या ईमेल ने सन्माननीय पंतप्रधान तसेच रेल्वे मंत्री, रेल्वेराज्यमंत्री, रेल्वे बोर्ड व कोकण रेल्वेचा व्यवस्थापकीय संचालक यांना आणि महाराष्ट्र शासनाचे मंत्री यांना पाठवायचे आहेत.

अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांसाठी कोकणरेल्वे मार्गे २ विशेष फेऱ्या

Konkan Railway News: फेब्रुवारीपासून वास्को वरुन कोकण रेल्वेमार्गावर अयोध्येला जाण्यासाठी आय.आर.सी.टि.सी. कडून दोन वेळा विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. ही ट्रेन कोकणातील स्थानकांवर थांबणार असून १२ फेब्रुवारीला या गाडीची पहिली ट्रिप असणार आहे. या गाडीच बुकिंग हे फक्त आय.आर.सी.टि. सी. च्या माध्यमातून केल जाणार असून देशभरातून 66 स्थानकांवरून अशा ट्रेन सुटणार आहेत. याच बुकिंग राउंड ट्रिप मधे केल जाणार आहे. लवकरच IRCTC च्या वेबसाईटवर हे बुकिंग उपलब्ध होईल. जे रामभक्त अयोध्येत जाऊ इच्छितात त्यांनी या आस्था ट्रेनचा लाभ घ्यावा अस आवाहन कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य सचिन वहाळकर यांनी केल आहे. त्यांनी नुकतीच कोकण रेल्वेमार्गावरुन अयोध्ये साठी ट्रेन सोडण्याची मागणी केली होती. सदर विशेष ट्रेन कोकण रेल्वेमार्गावरुन सोडल्याबद्दल त्यांनी IRCTC तसेच रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले.
गाडी क्रमांक ०६२०५ वास्को – दर्शन नगर- वास्को द गामा स्पेशल एक्सप्रेस 
ही गाडी दिनांक १२ फेब्रुवारी आणि २६ फेब्रुवारी (सोमवारी) चालविण्यात येणार आहे. रात्री १० वाजून १० मिनिटांनी ही गाडी  वास्को स्थानकावरून सुटून तिसऱ्या दिवशी रात्री ८ वाजता अयोध्येला  पोहोचणार आहे.
परतीचा प्रवासात म्हणजे दुसऱ्या दिवशी  ही गाडी दिनांक १६ फेब्रुवारी आणि ०१ मार्च (शुक्रवारी) रोजी  रात्री  ८ वाजता ही गाडी सुटून तिसऱ्या दिवशी रात्री  १२ वाजता  वास्को या स्थानकावर पोहोचणार आहे.
या गाडीचे कोकणात मडगाव , थिवी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल आणि वसई या स्थानकावर थांबे आहेत.
ही गाडी २० सेकंड स्लीपर आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २२ कोचसहित चालविण्यात येणार आहे.

कोकणात रुजतोय ‘डेस्टिनेशन बीच वेडिंग’ चा ट्रेंड; निर्माण करतोय रोजगाराच्या नवीन संधी

सिंधुदुर्ग : हल्ली वेगवेगळ्या लग्नाचे वेगवेगळे ट्रेंड पहायला मिळतात. त्यातीलच एक ट्रेन्ड म्हणजे बीच वेडिंग. भारतात बीच वेडिंगसाठी गोवा हे सगळ्यांचे आवडते डेस्टिनेशन आहे. मात्र आता कोकणातील समुद्र किनाऱ्यावर लग्न करण्याचं स्वप्न बघणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वच्छ सुंदर आणि जगभरात ब्लु फ्लॅक नामांकन असलेल्या भोगवे समुद्र किनाऱ्यावर असे लग्न करू शकता.

सध्या प्री विडिंग फोटोशूट समुद्र किनाऱ्यावर होतात. मात्र आता लग्न सोहळे देखील कोकणातील समुद्र किनाऱ्यावर होत आहेत. लग्नाच्या आठवणी जपून राहाव्यात यासाठी प्रत्येक जण आपलं लग्न खास व्हावे यासाठी धडपडत असतो. हल्ली वेगवेगळ्या लग्नाचे वेगवेगळे ट्रेंड पहायला मिळतात. त्यातीलच एक ट्रेन्ड म्हणजे बीच वेडिंग मुंबई, पुणे सारख्या शहरातील युवा पिढी कोकणातील निसर्गरम्य समुद्र किनाऱ्यावर लग्न करत आहेत. हल्लीच सोलापूर येथील डॉ. चिराग होरा आणि स्नेहल शिंपी ठाणे यांनी आपलं लग्न अविस्मरणीय व्हावा यासाठी भोगवे समुद्र किनारी लग्न केलं.

नवा ट्रेंड नेमका काय?
सध्या लग्नसोहळे हे ट्रेंडनुसार केले जातात. काही जणं मोकळ्या मैदानात, काही जणं आलिशान जागेत लग्न सोहळा आयोजित करतात. त्यातच आता समुद्र किनारी लग्न सोहळे आयोजित करणं हा एक नवा ट्रेंड सुरु झालाय. यामुळे बऱ्याचदा अस्ताला जाणाऱ्या सुर्याचा मुहूर्त निवडला जातो. निळाशार समुद्र हा नव्या नात्यांचा साक्षीदार देखील होतोय. यामुळे तो लग्नसोहळा हा फक्त लग्न करणाऱ्या दोन व्यक्तींच्याच नाही तर कुटुंबाताली प्रत्येक जणाच्या लक्षात राहण्यासारखा केला जातोय.

रोजगाराच्या संधी उपलब्ध
कोकणात जर ट्रेंडमुळे रोजगाराच्या संधी कोकण वासीयांना उपलब्ध होणार आहेत. या नव्या ट्रेंड मूळे हॉटेल आणि कॅटरिंग व्यवसायाला चांगले दिवस येणार येवू शकतील. तसेच लग्नसोहळा संबधित व्यावसायिकांना त्याचा फायदा होऊ शकतो.

Mumbai Goa Highway | हळवल फाट्यावर कारला अपघात; तिघेजण जखमी

Accident News : आज मुंबई-गोवा महामार्गावरील हळवल फाट्यावरील अवघड वळणावर कार अपघात झाला. या अपघातात ३ प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात  दुपारी साडेबाराच्या सुमारास झाला. जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई हुन गोव्याच्या दिशेने जाणारी कार (एमएच १४ एफ एस ९८५१) ही कार दुपारी १२: ३० वा. च्या सुमारास महामार्ग सोडून दोन तीन पलटी खात महामार्गालगतच्या जागेत जाऊन थांबली.या अपघातात तीन जणांना दुखापती झाल्या असून त्यांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.या घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बापू खरात व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी; परीक्षेसाठी दहा मिनिटे जादाचा वेळ मिळणार

पुणे: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना १० मिनिट वाढीव वेळ मिळणार आहे. परीक्षेची प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी ही वाढीव वेळ मिळणार आहे. महाराष्ट्र बोर्डाने परिपत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे.
राज्य मंडळातर्फे दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी परीक्षेच्या वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिकांचे वाटप विद्यार्थ्यांना यापूर्वी करण्यात येत होते. दरम्यान, दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालकांसह आणि समाज घटकांचेही या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा, यांसारख्या घटना काही अंशी घडत असल्याचे निदर्शनास आले.
अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि परीक्षा निकोप, भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात, यासाठी परीक्षेच्या दिलेल्या वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या परीक्षेपासून रद्द करण्यात आली होती. परंतु विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आणि पालक-विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या परीक्षांसाठी दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. परीक्षेच्या वेळेनंतरची दहा मिनिटे वाढवून दिली आहेत, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
परीक्षेपूर्वी ३० मिनिटे अगोदर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर हजर राहावे
फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये सकाळच्या सत्रात ११ वाजता, तर दुपारच्या सत्रात तीन वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल आणि लेखनास प्रारंभ होईल. विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रात साडे दहा वाजता, तसेच दुपारच्या सत्रात अडीच वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search