Author Archives: Kokanai Digital

कोकण पर्यटनात होणारे अपघात आणि त्यानिमित्ताने मंथन

कोकण पर्यटनात होणारे अपघात आणि त्यानिमित्ताने मंथन……

कोकणात सुरक्षित आणि निसर्ग स्नेही पर्यटन ही चळवळ व्हावी

आर्नाळ्याला आठ जणांचा बुडून मृत्यू, गणपतीपुळ्याच्या समुद्रात सात जण बुडाले, एका कॉलेजची आलेली ट्रीप आणि पंधरा वीस मुलं मुरुड जंजिरा येथील समुद्रात बुडून मृत्यू, तारकर्ली च्या समुद्रात पर्यटक बुडाले, गुहागरला पर्यटकांचा बुडून मृत्यू …..दरवर्षी कोकणात वीस ते पन्नास पर्यटक समुद्रात बुडून मृत्युमुखी पडतात. चार दिवस या विषयांची चर्चा होते नंतर प्रशासन, स्थानिक माणसे आणि पर्यटक हे सगळे विषय विसरून जातात. हे दरवर्षी होणारे अपघात कसे टाळता येतील यावर एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण केली पाहिजे किंवा शून्य अपघातांत साठी कोकणातील समुद्र पर्यटनात असे अपघात जिथे घडतात या किनाऱ्यांवर बीच सेफ्टी लाईफ गार्ड अशा व्यवस्था उभारल्या पाहिजे असा विचार दुर्दैवाने होत नाही , केवळ या विषयांवर त्या त्या वेळी भावनिक चर्चा होते आणि हे दुर्दैवी चक्र असेच सुरू राहते.

अर्थात पर्यटक बुडून दुर्दैवी मृत्यू होत आहे त्यामध्ये वॉटर्स स्पोर्टस्मुळे हे मृत्यू होतात असं नाही तर समुद्रात पोहोताना खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक बुडून मृत्युमुखी पडत आहे.

आपण हरिहरेश्वरचे उदाहरण घेऊ हरिहरेश्वर मंदिराच्या पाठच्या बाजूला एक घळ आहे तिथून खाली उतरल्यानंतरखूप सुंदर निसर्ग आहे आणि समुद्राच्या लाटा पाठच्या बाजूने दगडांवर आपटतात. या निसर्गाच्या प्रेमात पडून अनेक जण तिथे उभे राहून फोटो काढण्याचा मोह होतो. सात आठ लाटा नंतर एक मोठी लाट येते. आणि ती पर्यटकांना घेऊन समुद्रात जाते. असंख्य वेळा हरिहरेश्वरच्या या ठिकाणी पर्यटक बुडून मृत्युमुखी पडले. पण या ठिकाणी एक वॉचमन ठेवावा आणि तिथे बॅरिकेड्स बनवाव्या अशा व्यवस्था निर्माण कराव्यात असं संबंधित विभागांना कधी वाटलं नाही. आणि त्याच त्याच पद्धतीने पर्यटक मृत्युमुखी पडत राहिले. असंच गणपतीपुळ्यात ,मुरूडमध्ये, अलिबाग मध्ये, तारकर्लीला वारंवार का घडतात याचं आत्मपरीक्षण पर्यटनाशी संबंधित असलेल्या शासनाच्या विभाग यांनी करणे आवश्यक आहे.

याकरता या धोकादायक जागांवर आणि बीचेस वर कायमस्वरूपी पर्यटक बुडण्यापासून वाचवण्याच्या व्यवस्था निर्माण करायला हव्यात. दरम्यान एक चांगली गोष्ट मागच्या आठ दहा वर्षात घडली यातील बहुतेक सर्व बीचेस वर वॉटर स्पोर्टसच्या व्यवस्था निर्माण झाल्या.

यात काम करणारी 98 टक्के मुले कोकणातील आणि स्थानिक कोळी समाजाची भंडारी समाजाची किंवा दर्यावर्दी आहेत. त्यामुळे या समुद्रात किनाऱ्यावर पोहोताना कोणी बुडत असेल तर हे वॉटर स्पोर्ट्स करणारे व्यवसायिक स्वतःचा जीव धोक्यात घालून अशा पर्यटकांना वाचवतात मागच्या आठ दहा वर्षात शेकडो पर्यटकांना बुडण्यापासून वाचवण्याचे काम वॉटर स्पोर्टस चालवणारी कोकणातील तरुण मुले करतात. आणि त्यामुळे पूर्वीपेक्षा अपघाताचे आणि बुडण्याचे खूप कमी प्रमाण समुद्रकिनारी आता घडतात.

पर्यटकांची संख्या प्रचंड वाढली तरीही अपघातांचे प्रमाण कमी झाले याचे कारण कोकण किनाऱ्यावर सुरू झालेले वॉटर स्पोर्ट्स हे आहे. अनेक तरुणांचे जीव वाचवणाऱ्या या पर्यटन सेवकांचे आभार व्यक्त केले पाहिजे त्यांचे ही कधीतरी कौतुक झाले पाहिजे.शासकीय व्यवस्थेतून अशा स्वरूपाची सुरक्षितता निर्माण केली केली पाहिजे ते नसतानाही कोकणातील तरुण स्वयंसेवी पद्धतीने हे काम गेली अनेक वर्षे करत आहेत.

थोडेसे कोकणात येणाऱ्या पर्यटकांविषयी, कोकणात येणारे लाखो पर्यटक हे समुद्र नसलेल्या भागातून येतात समुद्र पाहून उत्तेजित होतात, आणि कळत-नकळत समुद्रात आत मध्ये खोलपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात, काहीवेळा नशा हासुद्धा एक विषय असतो ज्यामुळे पर्यटक बुडण्याचे प्रमाण वाढते. ओहोटीच्या वेळी समुद्र आत मध्ये खेचतो . त्या त्या ठिकाणी नियमित अपघात घडणारे काही धोकादायक पॉईंट आहेत . सूचना देऊनही स्थानिक लोकांनी विनंती करूनही पर्यटक ऐकत नाहीत समुद्रात उतरतात अधिक खोलपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. सुदैवाने वॉटर स्पोर्ट्स त्या त्याठिकाणी आहेत म्हणून अनेक अपघात घडण्यापासून वाचले आहेत आणि शेकडो पर्यटकांचे जीव वाचले आहेत.

नुकताच तारकर्लीला एक होडी उलटून अपघात झाला व या निमित्ताने कोकणातील पर्यटन किती सुरक्षित यावर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे. या सर्व चर्चेकडे नकारात्मक न पाहता यापुढील काळात कोकणातील साहसी पर्यटन आणि समुद्रपर्यटन यातील सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि अधिक दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने काय केले पाहिजे याचे आत्मपरीक्षण सर्वांनीच करणे आवश्यक आहे. समुद्र पर्यटन आणि जलपर्यटन हा विषय प्रचंड वेगाने कोकणात वाढतो आहे, आणि या करता आवश्यक त्या पायाभूत सुविधा आणि व्यवस्था उभारणे अत्यंत आवश्यक आहेत

मला असं वाटतं की कोकणातील वॉटर स्पोर्ट्स करणारे पर्यटन व्यवसायिक, पर्यटनाशी संबंधित असलेले शासनाचे विभाग, आणि कोकणात येणारे पर्यटक या तिघांचा योग्य समन्वय व्हायला हवा. अधिक चांगल्या व्यवस्था निर्माण करायला हव्यात. परदेशात असतात तसे वॉच टॉवर त्या त्या ठिकाणच्या पॉप्युलर पर्यटनाच्या समुद्रकिनाऱ्यांवर उभारायला हवेत. त्या त्या समुद्रकिनाऱ्यावर किमान व्यवस्था उभारली पाहिजे. वॉटर स्पोर्ट्स व्यवसाय करणाऱ्या तरुणांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून समुद्रकिनाऱ्यावर दरवर्षी होणारे अपघात शून्यावर कसे येतील किंवा कमीत कमी कसे होतील याकरता काम केले पाहिजे.

कोकणात मोठ्या प्रमाणात येणारे पर्यटक, वॉटर स्पोर्ट विषयी वाटणारे आकर्षण आणि त्यामुळे लाखो पर्यटकांचा यामध्ये सहभाग यात शुन्य अपघात किंवा कमीत कमी अपघात हे करायचे असेल तर डिझास्टर मॅनेजमेंट, पर्यटकांची सुरक्षितता या विषयात या सर्व वॉटरस्पोर्टस व्यवसायिकांना स्वयंसेवी पद्धतीने सहभागी करून दर दोन-तीन महिन्यांनी त्यांचे सुरक्षितता विषयातील आणि डिझास्टर मॅनेजमेंट विषयातील प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेतले पाहिजे. आणि एक जबाबदार सागरी पर्यटनाची व्यवस्था कोकणात उभारली पाहिजे. या करता वॉच टॉवर आवश्यक असलेल्या वॉटर स्कूटर या पायाभूत सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. प्रशिक्षणाची एक व्यवस्था उभारली पाहिजे.

पुन्हा मला इथे सांगायला अभिमान वाटतो जेव्हा चिपळूणमध्ये आणि महाड मध्ये महापूर आला त्या वेळी शेकडो कोकणवासीयांचे प्राण वाचविण्याचे काम मालवण मधील रत्नागिरी मधील किंवा कुंडलिका नदी वर काम करणारे महेश सानप, रत्नदुर्गचे वीरेंद्र वणजु आणि त्यांचे वॉटर स्पोर्ट्स मध्ये काम करणारे सहकारी यांनी केले. त्यामुळे कोकणात सुरू झालेले साहसी पर्यटन आणि वॉटर स्पोर्ट्स हे कोकण पर्यटनाला मिळालेले एक वरदान आहे.

अर्थात हे पर्यटन खूप मोठ्या प्रमाणात कोकणात वाढत असल्यामुळे काही चुका होत आहेत ज्या नीट व्यवस्था निर्माण केल्या तर टाळता येईल.

सर्वप्रथम वॉटर स्पोर्ट्स चालवणाऱ्या पर्यटन व्यावसायिकांसाठी

बोटीच्या ज्या क्षमता आहेत त्यापेक्षा एकही जास्त पर्यटक बोटीत सोडता कामा नये.पर्यटकांनी कितीही ओव्हर कॉन्फिडन्स दाखवला तरी कंपल्सरी प्रत्येकाला लाइफ जॅकेट संपूर्ण प्रवासात घालण्याचा आग्रह धरला पाहिजे मे महिन्यात सिझन संपल्यानंतर व्यवसाय सुरू ठेवण्याचा आग्रह धरता कामा नये. दर्जा आणि सुरक्षितता या दोन विषयात कोणतीही तडजोड करता कामा नये

या व्यवसायात मोठी गुंतवणूक असते पाच सहा महिन्याचा व्यवसाय आहे म्हणून जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्याचा मोह होणे सहाजिक आहे पण कमी शुल्क घेऊन जास्तीत जास्त पर्यटकांना स्कुबा डायविंग किंवा जलक्रीडा अशा सेवा देण्यापेक्षा. कमी पर्यटकांना योग्य किंमत घेऊन दर्जेदार व सुरक्षित सेवा देणं आवश्यक आहे . त्यामुळे कभी पर्यटकांना सेवा देऊन जास्त पैसे मिळतील आणि सुरक्षित पर्यटन होईल. या करता व्यवसायातील स्पर्धा आणि बार्गेनिंग या दोन्ही गोष्टी पूर्णपणे बंद झाल्या पाहिजेत. अंदमान आणि देशात इतरत्र वॉटर स्पोर्टस् चे जे रेट आहेत त्याचा अभ्यास करून महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने रेट ठरवून द्यावेत आणि त्याच रेटने सर्वांनी व्यवसाय करावा. म्हणजे उत्पन्न अधिक मिळेल आणि पर्यटकांना दर्जेदार आणि सुरक्षित सेवा देता येणे शक्‍य होइल.

महाराष्ट्र शासनाचे पर्यटनाशी संबंधित असलेले विभाग स्थानिक प्रशासन आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे अपेक्षा

कोकणात सर्वाधिक अपघात जा समुद्रकिनाऱ्यावर झाले आणि ज्या जागांवर झालेत अशा जागा निश्चित करून तेथे कायमस्वरूपी पर्यटकांना वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा आणि शासनाच्या खर्चाने लाईफ गार्ड आणि आवश्यक असलेल्या बोटी या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. या संपूर्ण प्रक्रियेत स्वयंसेवी पद्धतीने त्या त्या ठिकाणी काम करणाऱ्या वॉटर स्पोर्ट्स पर्यटन व्यवसायिक कोकणातील तरुणांना सहभागी करून घेता येणं शक्य आहे

कोकणात काशीद किंव्हा नागाव येथे सिंगल विंडो वॉटर स्पोर्ट्स बुकिंगची व्यवस्था त्या त्या ठिकाणच्या युवकांनी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे व्यावसायिक स्पर्धा बार्गेनिंग किंवा निष्काळजीपणा या ठिकाणी होत नाही. अशाच स्वरूपाच्या व्यवस्था कोकणातील सर्व प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवर जिथे वॉटर स्पोर्ट्स आयोजित केले जातात तिथे निर्माण केल्या पाहिजे. या सर्व समुद्रकिनाऱ्यांवर पोहणार्या पर्यटकांसाठी नाममात्र भाड्याने लाईफ जॅकेट उपलब्ध होतील अशी व्यवस्था उभारावी.

त्यापुढे जाऊन पर्यटन विभागाने या सर्व प्रमुख पर्यटन स्थळ वर पर्यटकांसाठी स्वच्छतागृहे, शोवर्स आणि आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात

सर्वात महत्त्वाचे पर्यटकांसाठी

कृपया अंदमानला तीन आणि चार हजार रुपयांना स्कुबा डायव्हिंगची सुविधा असेल तर कोकणात 400 रुपयात स्कूबा डायव्हिंग मिळावी अशा स्वरूपाची अपेक्षा ठेवू नये. स्वस्तात असुरक्षित वॉटर स्पोर्ट करण्यापेक्षा योग्य दरात सुरक्षित वॉटर स्पोर्ट्स देणाऱ्या ऑपरेटर कडून कोकणातल्या समुद्र पर्यटनाचा आनंद घ्यावा.

समुद्रात पोहोताना किंवा वॉटर स्पोर्टस अॅक्टिविटी करताना समुद्र म्हणजे तलाव नाही इथे भरती ओटी असते हे समजून घ्यावे. आणि त्यामुळे कंपल्सरी प्रत्येकाने पोहता येत असेल तरीसुद्धा लाईक पॅकेट घालावे.

स्थानिक ठिकाणी ठराविक स्पॉट आहेत जिथे खाडी समुद्राला येऊन मिळते किंवा काही धोकादायक खड्डे आहेत अशा ठिकाणी वारंवार अपघात होतात ही माहिती स्थानिक लोक देत असताना सुद्धा ओव्हर कॉन्फिडन्सने. अशा ठिकाणी समुद्रात उतरू नये. जलक्रीडा उपक्रमांमध्ये लहान मुलांचा सहभाग टाळावा.

सुरक्षित पर्यटन हे अभियान याची चळवळ कोकणात उभारली जावी आणि यामध्ये कोकणातील सर्व स्थानिक पर्यटन संस्थांनी आणि ग्रामपंचायतीने सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही यानिमित्ताने करतो.

श्री.संजय यादवराव
अध्यक्ष समृद्ध कोकण पर्यटन संस्था

कोकणाई ब्लॉग च्या नियमित whatsapp अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा

.

Loading

देव वेतोबा, तू माझा सांगाती

श्री देव वेतोबा म्हणजे आरुलकरासाठी (आरवलीचे रहिवाशी) काय आहे, हे शब्दांत सांगणे कठीण आहे. संत तुकारामांसाठी विठ्ठल हा जसा मायबाप, तसा आम्हा समस्त आरवली ग्रामस्थांसाठी श्री देव वेतोबा. 

ग्रामदैवत असे म्हटले तरी देव वेतोबा हा  आरवलीकरांसाठी कुटुंबप्रमुख, पिता, पालनहार या भूमिकेत दिसून येतो. कोणतीही समस्या, संकट असो “देवा वेतोबा तू पाव” एवढी हांक पुरेशी असते. अतिशय जागृत देव अशी याची ख्याती आहे. दररोज रात्री देव वेतोबा गांवाच्या रक्षणासाठी फिरतो अशी समस्त ग्रामस्थांची श्रद्धा आहे. या संदर्भांतला एक किस्सा मला आठवतो.


आमच्या घराभोवती खूप जमीन आहे. गांवी याला बाग असे संबोधले जाते.  या बागांत तोरिंजन(पपनस), आंबा, फणस, माड, पोफळी, साग, तिरफळ, केळी, जाम अशी अनेक झाडे आहेत. शिवाय दसवंती (जास्वंद), गुलाब, सहस्रमोगरा, अनंत, नागचाफा अशी विविध फुलांची झाडे तसेच भोपळ्याचा वेल, चवळी, लाल माठ, पडवळाचा/दोडक्याचा  वेल अशी भाज्यांची रोपेसुद्धा आहेत. कांही वेळां कुंपण ओलांडून, गडगा (दगड आणि चिऱ्याने बांधलेली कंपाउंडची भिंत) पार करून बाहेरची वशाडी जनावरे आमच्या बागांत घुसून या झाडांची नासधूस करत. म्हणून हे नुकसान थांबवण्यासाठी माझ्या चुलत्यांनी या गडग्याला उंच दार करून त्याला कुलूप लावले. रात्री त्यांना स्वप्नांत दिसले की देव वेतोबा त्यांना विचारतो आहे “ माझ्या फेरीच्या मार्गावर कुलूप लावतोस ? चल उघड ते …” आणि खाडकन ते कुलूप उघडून खाली पडले. माझे काका दचकून जागे झाले. टॉर्च घेऊन ते बाहेर आले…तसेच त्या गडग्याच्या दाराकडे गेले. बघतात तर काय ?? ते कुलूप जमिनीवर पडले होते. प्रत्यक्ष वेतोबा आपल्याशी बोलला, या आनंदात माझ्या काकांचे भान हरपले होते. त्यानंतर कुलूप सोडा… तो दरवाजाही कधी बंद झाला नाही. देव वेतोबाच्या रात्रीच्या फेरीचा मार्ग आमच्या आवारातून जातो, ही बातमी त्यांनी जो जो भेटेल त्याला ऐकवली.

ग्रामस्थांच्या घरांत कोणतंही मंगल कार्य असेल तर सर्वप्रथम  वेतोबाला प्रसाद लावून कौल घ्यायची प्रथा आमच्या गांवी आहे. देवळाचे गुरव  विशिष्ट पाने देवाच्या उत्तरांगावर लावतात. आणि देवाला कौल देण्यासाठी गाऱ्हाणे घातले जाते. देवाचा कौल मिळेपर्यंत कौल मागणारे देवासमोर बसून रहातात. माझ्या लहानपणी भाऊ गुरव हे देवाची पूजा-अर्चा व इतर दैनंदिन धार्मिक विधी बघायचे. कोणाच्याही बागेत केळ्यांचा घड पिकला की तो देव वेतोबासमोर ठेवण्याची प्रथा आहे. मग त्यातली कांही केळी गुरव त्या माणसाला प्रसाद म्हणून देतात व बाकीची केळी देवळांत उपस्थित असणाऱ्या भक्तगणांमध्ये वाटतात. तसंच धोतरजोडी व चपला देवाला भेट देण्याचीही पद्धत आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण देवळांत अशा दिलेल्या नव्या कोऱ्या चपलांचे, कालांतराने तळ झिजलेल्या अवस्थेतल्या चपलाही जपून ठेवलेल्या आहेत. भाविक यांचेही दर्शन आवर्जून घेतात. देव वेतोबा आहे आणि त्यामुळेच हा गांव सुरक्षित, सुखी व समृद्ध आहे हा अवघ्या आरवलीकरांचा दृढ विश्वास आहे.

सुरवातीला देव वेतोबाची भव्य मूर्ती फणसाच्या लाकडापासून बनवली जायची. त्यामुळे आमच्या गांवांत फणसाच्या लाकडापासून कोणतीही वस्तू …उदाहरणार्थ खुर्ची, टेबल, बसायचा पाट वगैरे , बनवली जात नाही …. वापरली जात नाही. आता मात्र देवाची मूर्ती पंचधातूची आहे.

 


देव वेतोबाच्या कृपेचा आणखी एक प्रसंग सांगण्याचा मोह मला आवरत नाही. अर्थांत हा मी माझ्या घरातील वडीलधाऱ्या मंडळींकडून ऐकलेला आहे. माझे पणजोबा श्री वासुदेवराव रेगे हे ग्वाल्हेरच्या महाराजांकडे नोकरीला होते. त्याकाळी सुट्टीत घरी येताना प्रवासाचे वहान म्हणजे घोडा. तर ते घराजवळ आले, पण त्यांना घर कुठे आहे तेच कळेना. आतापर्यंत शहाण्यासारखा दौड करणारा घोडा बिथरल्यासारखा चालत होता. तोंडाने फुरर्र…फुर्र असे आवाज काढत होता. बराच वेळ झाला, पण घराचा रस्ता कांही उमगेना. माझ्या पणजोबांनी वेतोबाचा धांवा सुरू केला. “देवा वेतोबा, माका मार्ग दाखय…तुज्या दाराकडे आयलसय…पण वाट गावणासा नाय…चकवो लागलोसा असा दिसता … देवा कृपा कर …” तेवढ्यांत शेजारच्या पांन्नीतून (अरुंद पायवाट) एक माणूस, डोक्याला मुंडासं..खांद्यावर कांबळ आणि हातात काठी अशा जाम्यानिम्यात आला. माझ्या पणजोबांनी त्याला आवाज दिला. तो माणूस  थांबला.
“काय झाला धनयानो… दोंपारच्या ऊनांत हंयसर खंय फिरतसात ??” त्या माणसाने विचारले. पणजोबांनी त्याला सर्व हकीगत सांगितली. आपलं घर कुठे आहे, तेही सांगितलं आणि वाट चुकल्यामुळे गेले तासभर इथेच फिरतो आहे हे सांगितलं.

“माज्या पाठी..पाठी या. मी दाखयतंय तुमका वाट. आणि पुढच्या दहा मिनिटांत तो सज्जन गृहस्थ माझ्या पणजोबांना आमच्या घरापर्यंत घेऊन आला. पणजोबा पायउतार झाले. “जरा थांबा. तुमचेसाठी गूळपाणी आणूक सांगतय.”

“नको….नको.. मी शेतार जातसंय. आगपेटी असली तर जरा द्या.” तो गृहस्थ बहुतेक घाईत असावा. पणजोबा आगपेटी आणायला घरांत गेले. दोन मिनिटांत बाहेर आले…बघतात तर बाहेर कोणी नाही. धांवत धांवत ते आखांड्यापर्यंत (कंपाऊंडचे फाटक) आले. कोणीच दिसत नव्हते. दुसऱ्या दिवशी वेतोबाच्या देवळांत त्यांनी कौल लावला. ‘संकटांत तू मला हांक मारलीस…मी तुझ्यासाठी आलो होतो.’ हा कौल मिळाला. आता हा सर्व श्रद्धेचा भाग आहे.

माझ्या चुलत्यांचा तर वेतोबावर एवढा विश्वास होता की ताप वगैरे आला तर मला सांगायचे “जा देवळांत जावन तीर्थ आणि आंगारो घेवन ये”. मी एका बाटलीत तीर्थ व पुडीत अंगारा घेऊन यायचो. आणि माझे चुलते ते तीर्थ अक्षरश: औषधाच्या डोसाप्रमाणे घ्यायचे आणि त्यांना बरेही वाटायचे.

आमच्या वेतोबाचे देऊळ कधीच बंद होत नसे. संध्याकाळी गांवातील ज्येष्ठ मंडळी दर्शनासाठी येत…बाहेरच्या सिमेंटच्या सोप्यावर बसून सुखदु:खाच्या गप्पा मारत…वेतोबाच्या अस्तित्वाने पुनीत झालेल्या वास्तूत स्वत:चा आनंद शोधत. मुलाबाळांच्या कल्याणासाठी प्रार्थना करत.

वैशाख शुद्ध पंचमी हा आमच्या देव वेतोबाचा वाढदिवस. “आमच्या” हा शब्द संवयीने आला. “आमच्या” म्हणजे आरवलीचे ग्रामदैवत श्री देव वेतोबा.

आता बरीच वर्षे झाली गांवाला जाऊन. पण नजरेसमोर देऊळ जसेच्या तसे आहे. देवाच्या गाभाऱ्यातील देव वेतोबाची भव्य मूर्ती तशीच डोळ्यासमोर येते. मी हात जोडून उभा रहातो. त्यावेळी मी देवळातच असतो. “ओम नम: पराय शिवात्मने, वेतालाय नम:”चा गजर आपोआप मनांत सुरु होतो. “तो” माझ्या जवळच आहे…त्याची कृपादृष्टी सदैव लाभणार आहे.. तोच आमचा रक्षणकर्ता…मायबाप आहे हे माझे मन मला सांगत असते. बस्स !! याशिवाय काय हवं दुसरं ??

हे जे कांही लिहिले गेले, तेसुद्धा त्याच्याच इच्छेने…त्याच्याच आदेशाने आणि आशिर्वादाने.

अनिल रेगे.
मोबाईल : 9969610585.

Loading

असा होता जगातील सर्वात लांब बस मार्ग

भारतातून लंडनला बसने जाता येत होते…!

 

१९५७ ला अल्बर्ट ट्रॅव्हल्सने ही बस सेवा चालू केली होती.त्यांची पहिली बस लंडन येथून १५ एप्रिल १९५७ रोजी सुटली ती भारतात कलकत्ता येथे ५ जून रोजी पोहचली होती.कलकत्ता ते  लंडन ७९०० किलोमीटरचा रुट अस्तित्वात होता. जगातील सर्वात लांबचा असा हा बसचा मार्ग होता.

 

हा मार्ग बस कलकत्ता येथून निघून दिल्ली, अमृतसर, वाघा बॉर्डर, लाहोर (पाकिस्तान), काबूल, हैराण (अफगाणिस्तान), तेहरान ( इराण), इस्तांबुल ( तुर्कस्थान ), बुल्गारिया, युगास्लाव्हिया, ऑस्ट्रीया, जर्मनी, बेल्जियम मार्गे थेट लंडन असा जात होता.

 

ह्या बस चा प्रवास एखाद्या सहली सारखा असायचा. मार्गात भेटणारी काही निवडक प्रेक्षणीय स्थळांना भेट देता येत होते. त्यात ताजमहाल, बनारस ईत्यादी ठिकाणांचा समावेश असायचा. त्याचप्रमाणे शॉपिंग साठी पण बस काही प्रसिद्ध बाजारपेठेत थांबायची त्यात प्रवासी दिल्ली, तेहरान, काबुल, इस्तंबुल, साल्जबर्ग, विएन्ना येथे शॉपिंग करू शकत होते. साहजिकच ह्या सर्वांसाठी काही दिवस राखीव ठेवण्यात आले होते.

 

या बस प्रवासात सर्व प्रकारची सोय करण्यात आली होती. लक्झरीस बसमध्ये वाचन, वैयक्तिक झोपेचे बंक, पार्टीसाठी रेडिओ/टेप संगीताचा आनंद घेऊ शकत होते. फॅन, हीटरची सुविधा उपलब्ध होती. झोपण्यासाठी सीट स्लीपर मोड मध्ये करायची सुविधा उपलब्ध होती.

 

तेव्हा बसभाडे होते ८५ पौंड.( आत्ताचे साधारण ८०१९रु.)

 

ही बस काही काळासाठी ऑस्ट्रेलिया च्या सिडनी पर्यंत विस्तारित करण्यात आली होती. सिडनी-कलकत्ता-लंडन असा तो मार्ग होता. हा मार्ग कापण्यासाठी ह्या बसला तब्बल १३०/१३५  दिवस लागायचे.

 

पुढे भारत-पाक यांच्यातील सीमावादामुळे ही बस बंद करावी लागली.

 

 

 

Loading

‘या’ तारखेला कोकणात दाखल होणार मान्सून!

नियोजित वेळेपेक्षा सहा दिवस आधीच मान्सूनचे वारे सक्रीय झाले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात मान्सून केरळमध्ये तर ५ जूनपर्यंत मान्सून कोकणात पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

बंगालच्या उपसागराबरोबरच सध्या अरबी समुद्रातूनही जमिनीकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. मान्सूनच्या अगोदरच केरळमध्ये पाऊस दाखल झाला आहे. केरळमध्ये अनेक ठिकाणी पूरसृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

राज्यातील खरीप हंगामापूर्वी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये भारतीय हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्र ज्याची आतुरतेनं वाट पाहात आहे, त्या मान्सूनचं महाराष्ट्रात नेमकं कधी आगमन होणार आहे, याविषयी देखील होसाळीकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

या बैठकीमध्ये राज्यातील खरीप हंगामाचा आढावा घेण्यात आला. या हंगामासाठी आवश्यक असणारा पाऊस यंदा होईल की नाही, याविषयी होसाळीकर यांच्याकडे विचारणा केली असता संपूर्ण महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज होसाळीकर यांनी या बैठकीत व्यक्त केला आहे.

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1527322484252348417?t=nEvK1W5REYX6t75HKW3oSw&s=19
 

कोकणाई ब्लॉग च्या नियमित whatsapp अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

कोकणातील रस्त्यांच्या विकासासाठी १२५ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर

कोकण विभागातील रस्त्यांची डागडुजी आणि विकास करण्यासाठी सुमारे  १२५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये १२५६ किलोमीटरपर्यंत रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे.  राज्यातील अस्तित्वात असलेल्या रस्त्यांचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा एकच्या धर्तीवर योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे.जिल्हा नियोजन समितीला प्रतिवर्षी उपलब्ध होणाऱ्या निधीच्या दहा टक्के निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोनसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या कामाला अधिक गती मिळणार आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोनसाठी खालील प्रमाणे जिल्हावार खर्च अपेक्षित ठरविण्यात आला आहे

ठाणे जिल्हा – १३० किलोमीटरसाठी ९७ कोटी ५० लाख.

पालघर जिल्हा – २५१ किलोमीटरसाठी १८८ कोटी २५ लाख.

रत्नागिरी जिल्हा – ३५९ किलोमीटरसाठी २६९ कोटी २५ लाख

रायगड जिल्हा -२४३ किलोमीटरसाठी रायगडला १८२ कोटी २५ लाख

सिंधुदुर्ग जिल्हा – २४३ किलोमीटरसाठी २०४ कोटी ७५ लाख

 

 

कोकणाई ब्लॉग च्या नियमित whatsapp अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

मालवणी मुलुख – जिल्हा सिंधुदुर्ग

पूर्वीच्या रत्नागिरी जिल्ह्याचा दक्षिणेकडील भाग म्हणजेच आजचा सिंधुदुर्ग जिल्हा होय. या प्रदेशाला ‘मालवणी मुलुख’ अशी स्वतंत्र ओळख प्राप्त झाली आहे.मालवणच्या कुरटे बेटावर भर सागरात छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या सिंधुदुर्ग या जलदुर्गामुळे १ मे १९८१ रोजी या दक्षिण कोकणाला ‘सिंधुदुर्ग जिल्हा’ हे स्वतंत्र बाणेदार नाव प्राप्त झाले.

भौगोलिक स्थिती

सुमारे ५२१९ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ, १२१ किलोमीटर सागर किनारा या जिल्ह्याला लाभला आहे. संपूर्ण साक्षर असलेल्या या जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे नऊ लाख आहे. देवगड, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी व दोडामार्ग असे आठ तालुके असलेल्या या जिल्ह्याला समृद्ध निसर्ग संपदा लाभली आहे. जलश्री, वनश्री व शैलश्री या तिन्हींचा जणू अपूर्व संगमच येथे पहायला मिळतो.

उत्तरेला विजयदुर्गाची खाडा आणि दक्षिणेला तेरेखोलची खाडी, पश्चिमेचा अथांग सिंधुसागर तर पूर्वेला उत्तुंग सह्याद्रीचे कडे – दऱ्या आणि डोंगर. सागर सह्याद्रीच्या मधल्या भागात लालमातीचा हा मुलुख साहित्य, संगीत, नृत्य, लोककला, शिल्प या क्षेत्रात खूप आघाडीवर आहे.

लालमाती, काळीभोर कातळे, जांभा खडक, नारळ- पोफळी, आंबा, काजू, फणस यांच्या सदाहरित बागा, हिरवेगार भात फळे, पावसाळ्यात दुथडी भरुन वाहणाऱ्या नद्या, प्रत्येक गावात एकापेक्षा एक अधिक घनदाट देवराया, त्याच्यासोबत माऊली सातेरी, भूमिका, पावणाई, रवळनाथ, वेतोबा इ. देवतांची विस्तीर्ण सभामंडप असलेली भक्ती, शांती व समाधान प्राप्त करुन देणारी मंदिरे, खास प्राचीन बारा-पाचाची देवस्थान पध्दती, दशावतार ही उत्स्फूर्त नाट्याविष्कार दाखवणारी लोककला, हौशी मराठी रंगभूमीचे माहेर आणि फक्त जिल्ह्यापूरती खास ठसकेबाज, नादमधूर, चिमटे काढीत पण समोरच्याच्या हृदयाचा ठाव घेणारी ‘मालवणी’ बोली. ही या प्रदेशाची स्वतंत्र ओळख आहे.

कोकणी मेवा

तुम्हाला फणसांचे – आंब्यांचे शेकडो प्रकारचे स्वाद चाखायचे असतील, कोकम रस, सोलकढी, अप्रतिम शाकाहारी भोजन तसेच असंख्य प्रकारचे चवदार स्वाद प्राप्त झालेले ‘मत्साहारी’ भोजन हवे असेल तर ‘मालवणी मुलुखाला’ महाराष्ट्रात दुसरा पर्याय नाही. वडे – सागोती, तिखला, पापलेट, सरंगा, माशांची कडी, सांबारे, भाजी – पाव – उसळ, कांदाभजी, शेवकांडे किंवा चिरमुऱ्याचे लाडू , जत्रेतले गोड खाजे, ग्रामीण भागात मिळणारी खोबऱ्याची कापे, एवढेच काय जांभुळ, करवंदे, हसोळी, नीव, जगमे – चाफरे, ओवळधोडे, चार भाजलेल्या किंवा उकडलेल्या आठल्या (फणस बिया) चिनी, कणग्या, कारंदे हा सारा रानमेवा व त्यांचा अनोखा स्वाद घ्यायचा असेल, ओल्या काजूगरांचा गुळ – खोबरं घातलेला ‘मोवला’, काळ्या वाटाण्याची उसळ, आंबोळी, गरमागरम उकडा भात व सोबत रसदार फजाव, वालीचे झणझणीत सांबारे यांची चव हवी असेल तर या प्रदेशात वेगवेगळ्या ऋतूत यावे लागेल.

प्रेक्षणीय स्थळे

सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, रांगणा, पारगड, मनोहर मनसंतोषगड यासारखे २९ गड – किल्ले, आंबोली थंड हवेचे ठिकाण, श्रीसंत सोहिरोबा, साटम महाराज, टेंबे स्वामी, राऊळ महाराज, भालचंद्र महाराज अशा संत महंतांचे मठ, असंख्य साहित्यिक कवी, कलावंतांची घरे-गावे, कुडोपी, हिवाळे, बुधवळे परिसरातील अत्यंत प्राचीन कातळशिल्पे, नेरुर-वालावल-पेंडूरचा अनोखा निसर्ग,पेंडूरचे प्राचीन जैन मंदिर, मठगाव आणि वेतोरे येथील प्राचीन शिलालेख, वेंगुर्ले येथील ‘डचवखार’ दाभोलीचे ‘कुडाळदेशकर मठसंस्थान’, बांदा येथील बैल -रेडे घुमट, सावंतवाडीची रंगीत खेळणी, मोती तलाव, नरेंद्र डोंगर, धामापूरचा शांत – निरव तलाव, तिलारीचे मातीचे धरण, हत्तीचे वास्तव्य असलेला परिसर, पिंगुळीची ठाकर आदिवासीची लोककला, धनगरांचे ‘चपई नृत्य’, सावंतवाडीचे शिल्पग्राम, कुडाळ, कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील असंख्य प्रेक्षणीय स्थळे…

 

हे सारे मालवणी मुलखाचे बाह्यरुप झाले. तुम्हाला जर कष्टात, गरिबीत पण स्वाभिमानाने, रसिकतेने प्रत्येक गोष्टीत कलात्मक पध्दतीचा आविष्कार करीत स्वत:शी खूश असणारी, जराशी ओळख झाल्यावर भरभरुन बोलणारी आपल्या अजब जीवनकथा व चटका लावणाऱ्या व्यथा विशिष्ट हातवारे, अभिनय करीत उत्कट जीवन जगणारी माणसं पाहायची आहेत ? तर तुम्हाला येथे वारंवार यावे लागेल. कुणाही रसिक निसर्गप्रेमीला पुन्हा पुन्हा यावे असा मोह वाटेल असा हा निसर्गरम्य प्रदेश आहे.

साभार – “मालवणी लोकगीते” (प्रा.डॉ. बाळकृष्ण लळीत)

 

कोकणाई ब्लॉग च्या नियमित whatsapp अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

असा साकारला कोकण महामार्गावरचा सर्वात उंच ब्रिज.

          मूळ रस्त्याचा प्लॅन बदली करून. कोकण महामार्गावरचा सर्वात उंच ब्रिज बांधल्या बद्दल माननीय नितीन गडकरी यांना धन्यवाद.

          नॅशनल हायवे चे इंजिनियर   आणि कॉन्ट्रॅक्टरला प्लॅन बदली करायला भाग पाडणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांचा आणि माय राजापूरची टीम जगदीश ठोसर तुमचे सर्वांचे मनापासून अभिनंदन.

           राजापूर शहरानंतर उत्तरातील सर्व धोकादायक वळणे तशीच ठेवून अपघातग्रस्त. जसा आहे तसा हायवे वाढवण्याचा अधिकाऱ्यांचा आणि ठेकेदार यांचा प्लान होता. राजापूर मधील जगदीश ठोसर रिटायर्ड पीडब्ल्यूडी इंजिनियर व तेथील कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला. देशाचे रस्ते विकास मंत्री माननीय नितीन गडकरी याना तो पटला म्हणूनच राजापूर मधून सरळ बाहेर जाणारा आणि ही सर्व वळणे टाळणारा अतिशय देखणा रस्ता बनला. थोडा खर्च वाढला पण अतिशय सुरक्षित आणि कोकण हायवे वरचा सर्वात मोठा ब्रिज राजापूरच्या अर्जुना नदीवर बनला.

          कोकण महामार्गावरील अनेक धोकादायक वळणे तशीच ठेवणारे धेडगुजरी कॉन्ट्रॅक्टर व डोकं बाजूला ठेवून डिझाईन करणारे नॅशनल हायवेचे  इंजीनियर्स यांची डिझाईन सर्वसामान्य माणसे बदलू शकतात हे जागरूक जगदीश ठोसर आणि टीमने सिद्ध केलं. छोट्या छोट्या मुद्द्यांवर भांडणारे आपण कोकणी विकासाच्या मुद्द्यावर असे जागरूक राहून व्यवस्थेशी संघर्ष केला तरच कोकणात चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण होतील.

         म्हणूनच राजापूरच्या या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यातले अनेक अपघात आणि माणसांचे बळी आपण वाचवले. अशीच जागृतता कोकण हायवे वरील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या त्या ठिकाणी दाखवणे आवश्यक आहे कारण कोकणी माणसाची सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची आहे. हायवे अनेक ठिकाणी धोकादायक आहे आणि म्हणून खूप अपघात होत आहेत त्या त्या ठिकाणी बदल आवश्यक आहेत. यासाठी संघर्ष करूया पाठपुरावा करूया.

संजय यादवराव
कोकण हायवे समन्वय समिती

Loading

आमच्या गावात शिमगा – कलात्मकतेचा मांड उत्सव – कोकणातील एक अनोखी परंपरा

वेंगुर्ला प्रतिनिधी – निर्जिवाला सजिव करणा-या कुळातच जन्म, त्यात कलेचा ईश्वर अशा कलेश्वराचा आशिर्वाद, त्यामुळे नेहमीच त्यांच्याकडून असे काही नाविन्यपूर्ण घडते की, ज्यामुळे त्यांचे नाव अबालवृद्धांच्या तोंडी असते. ही कथा नसून वास्तव आहे ते कुडाळ तालुक्यातील नेरुर गावातील ‘मेस्त्री‘ समाजातील कलाकारांचे. शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर नवनविन हालते देखावे साकारत लोकांनाच आपल्याकडे खेचून आणण्याचे कसब या मेस्त्री वर्गाकडे पहायला मिळत आहे.

      सध्या सर्वत्र शिमगोत्सव सुरु आहे. प्रत्येक ठिकाणच्या परंपरेनुसार हा शिमगोत्सव साजरा केला जात आहे. त्यातून ब-याच रुढीपरंपरा जपण्याचे काम या उत्सावातून होत आहे. अशीच प्रथा नेरुर गावात ‘मांड‘ या उत्सवातून जपली जात आहे. होळीच्या तिस-या दिवशी माड्याची वाडी येथील श्री गावडोबा मंदिराकडून ‘गावडे‘ समाजाचे रोंबाट तळी घेऊन ढोलताशांच्या गजरात श्री देव कलेश्वराच्या भेटीस येते. या रोंबटामध्ये मद्य, मांस नसल्याने याला ‘गोडा रोंबाट‘ असे म्हणतात. भेटीनंतर परतताना प्रत्येक वाडीत या रोंबटाला गा-हाणी घातली जातात, नवस बोलले जातात. हे रोंबाट सायचे टेंब येथे आल्यावर मांडाच्या ठिकाणी गा-हाणी वैगरे होतात आणि त्यानंतर मुख्य ‘मांड उत्सवाला‘ प्रारंभ होतो. राधा आणि शिमग्याचे खेळ या मर्यादेत असलेला हा मांड उत्सव कथांमधील विविध हलत्या देखाव्यांच्या संकल्पनेमुळे लोकप्रिय झाला आहे. कै. आना मेस्त्री, दिनू मेस्त्री, बाबा मेस्त्री व विलास मेस्त्री ही मंडळे आध्यात्मिक आणि पौराणिक कथांवर आधारीत बनविलेले ट्रिकसिनयुक्त हलते देखावे भजनाच्या साथीने सादर करतात. विशेष म्हणजे सर्व देखावे २५ ते ३० फुट उंचीपर्यंतचे असतात. एका ग्रुपमध्ये जवळपास २५च्या वर माणसे असतात. असतो. गणपती, मारुती, राक्षस, वाघ, हंस, बदक, फुलपाखरु, किडा, सिह असे पशूपक्षी कलात्मक पद्धतीने या मांडावर येऊन नृत्य करतात. यात लहान मुलांचाही सहभाग उत्स्र्फूत असतो.

      या ‘मांड‘ उत्सवाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे देखावे सादर करणारी जी चार मंडळे आहेत, ती यावर्षी कोणता देखावा सादर करणार याची पुसटशीही कल्पना एकमेकांना नसते. साधारण शिवरात्रीच्या दरम्याने श्री कलेश्वराला श्रीफळ ठेऊन देखाव्यांच्या कामाला प्रारंभ केला जातो. जो तो आपल्या देखाव्यातील वेगळेपण जपण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत असतो. त्यासाठी लाखोनी रुपये खर्च येतो. परंतु, याचा विचार न करता आपली कला असंख्य जनसमुदायासमोर आणण्यासाठी सिद्ध होतात. मांड उत्सवाला लाभलेला जनसमुदाय आणि त्यांच्याकडून टाळ्यांच्या स्वरुपात मिळणारा प्रतिसाद तसेच त्यांच्या कलाकृतीला कॅमेरात टिपणारा प्रेक्षकवर्ग हेच त्यांचे बक्षिस म्हणायाला हरकत नाही.

      आजपर्यंत पिढ्यान्पिढे हा मेस्त्री समाज ही परंपरा जपत आहे. कालानुरुप त्यात बदलही करत आहेत. त्यांच्या युवा पिढीकडून नेहमी वास्तव मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला जात आहे. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमी या उत्सवासाठी मर्यादा होती. त्यामुळे यावर्षी गर्दीने तर उच्चांक गाठला. ‘मांड उत्सव‘ व्यवस्थित पहाता यावा यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून गॅलरीची सोय करण्यात आली होती. तरीही अफाट गर्दीमुळे काहींनी झाडावर तर काहींनी टाचा वर करुन या उत्सवाची मजा लुटली. यावर्षी आना मेस्त्री ग्रुपने रावण-इंद्र युद्ध, विलास मेस्त्री ग्रुपने नंदीवरील शंकर, दिनेश मेस्त्री ग्रुपने महाकाली अवतार विस्तार आणि ज्योतिर्लिग दर्शन व बाबा मेस्त्री ग्रुपने विश्वाचा मुलाधार अवतार ओंकार दर्शन असे देखावे सादर केले. शिमगोत्सवातील या ‘मांडा‘मुळे नेरुर गावाची एक वेगळी ओळख सर्वत्र होत आहे.

 

विशेष आभार
श्री. प्रथमेश गुरव, वेंगुर्ला
लेखक आणि संकलक
संपर्क – ९०२१०७०६२४

           

  तुम्हालासुद्धा तुमच्या गावातील शिमगा साजरा करण्याच्या अनोख्या परंपरा आमच्या संकेतस्थळावर आपल्या नावासहित प्रकाशित करता येतील. अधिक माहिती साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करा.

https://kokanai.in/2022/03/16/shimga/

कोकणाई ब्लॉग च्या नियमित whatsapp अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा

.

टीप : आमच्या लेखात मांडलेल्या आख्यायिका,चालीरीती आणि माहिती यात अनेक मते आणि मतांतरे असू शकतात. कोकणातील परंपरारूढी आणि चालीरीती यांची माहिती देणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे.

 

 

Loading

आमच्या गावात शिमगा – डोंगरावरील देव – कोकणातील एक अनोखी परंपरा

              डोंगर आणि देवाचा संबंध आपण नेहमीच पाहतो. हिंदूंची अनेक तीर्थस्थळे, मंदिरे उंच डोंगरावर, शिखरावर दिसून येतात. श्री देव शिव शंकर पण हिमालयात वास्त्यव करतो. कोकणात पण अनेक देवस्थाने डोंगरावर आढळून येतात. आज आपण माहिती घेणार आहोत अशाच एका गावातील अनोख्या होळी उत्सवाची जेथे होळी गावात किंवा सपाट भागावर न उभारता एका उंच डोंगर शिखरावर उभारली जाते.

           

              सावंतवाडी तालुक्यातील मळगाव ह्या गावी ही प्रथा खूप पूर्वीपासून जपली जाते. सावंतवाडी आणि मळगांवच्या सरहद्दीवर असलेल्या नरेंद्र डोंगराचा एक उंच कडा असलेल्या सुवारड्याच्या कड्यावर एका प्रशस्त खडकावर ही होळी उभारली जाते. गावचे मानकरी आणि ग्रामस्थ ह्या ठिकाणी डोंगर चढून दाखल होतात. गाऱ्हाणे घालून गतवर्षीच्या होळी उतरून नवीन होळी उभारली जाते.  ह्या होळीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गावातील इतर होळीप्रमाणे शिमगोत्सव संपल्यावर चैत्र पौर्णिमेला होळी न तोडता पूर्ण वर्षभर ही होळी उभी ठेवली जाते. वर्षानुवर्षे मळगावची ही परंपरा भक्तिभावाने सुरु आहे. 

प्रतिनिधी – कोकणाई 

विशेष सहाय्य –  श्री. प्रज्वल नेवार

              तुम्हालासुद्धा तुमच्या गावातील शिमगा साजरा करण्याच्या अनोख्या परंपरा आमच्या संकेतस्थळावर आपल्या नावासहित प्रकाशित करता येतील. अधिक माहिती साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करा.

https://kokanai.in/2022/03/16/shimga/

कोकणाई ब्लॉग च्या नियमित whatsapp अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

टीप : आमच्या लेखात मांडलेल्या आख्यायिका,चालीरीती आणि माहिती यात अनेक मते आणि मतांतरे असू शकतात. कोकणातील परंपरारूढी आणि चालीरीती यांची माहिती देणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे.

Loading

आमच्या गावात शिमगा – फणसाचा देव – कोकणातील एक अनोखी परंपरा

 

तळकोकणातील सांगेली गावात शिमगा जरा वेगळया परंपरेने साजरा केला जातो. काय आहे हे वेगळेपण हे पुढील मुद्दे वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल.


१. येथे शिमगा सणाची सुरवात आदल्या रात्री पासून सुरू होते. ह्या सणाला गिरोबा उत्सव असे पण म्हंटले जाते. गावातील एक मोठे आणि सरळ फणसाचे झाड देवासाठी निवडून त्याला तोडून उंच देव महादेवाच्या पिंडीचा आकार देऊन त्याची प्राणप्रतिष्ठा मंदिराच्या गाभाऱ्यात मुख्य ग्रामदेवता म्हणून केली जाते.


. खरेतर महाशिवरात्रीला देवासाठी फणसाचे झाड निवडले जाते. महाशिवरात्रीला येथे गाव आणि मानकरी जमा होतात आणि देव कोठे काढायचा हे प्रथेप्रमाणे ठरवितात.


३. ज्या वाडीतील झाड निवडायचे आहे त्याठिकाणी पाच मानकरी त्या झाडाला हात लावतात व त्यांनतर हर हर महादेव असा जयघोष करतात. या दिवसापासून गिरोबा उत्सवापर्यंत झाडाची पूजाअर्चा करण्याची प्रथा आहे.


.  होळीच्या आदल्या दिवशी झाडाला तोडून गावातील आणि आजूबाजूच्या गावातील सुतार ह्या झाडाला सुंदर आकार देतात. त्यानंतर गावातील तरुण स्वयंपूर्तीने खांदा लावून देव देवळात भव्य मिरवणुकीने नेतात. एकूण १४ फुटी असलेला देव जमिनीखाली ७ फूट आणि वर ७ फूट उभारला जातो. ह्या सोहळ्याला जिल्ह्यातीलच नाही तर आसपासच्या जिल्ह्यातील, तसेच गोवा आणि कर्नाटकातून भक्त उपस्थिती दर्शवितात.

 

. प्राणप्रतिष्ठा केलेल्या देवाची ग्रामदेवता म्हणुन वर्षभर पूजा अर्चा केली जाते. अशाप्रकारे झाडापासून बनवलेले ग्रामदैवत असलेले हे देशातील एकमेव मंदिर आहे. त्याचप्रमाणे फणसाच्या झाडापासून लाकडी पिंडी बनवून पुजणारे हे एकमेव गाव आहे.

 



. प्रत्येक शिमगा सणाला नवीन देवांची(पिंडीची) प्राणप्रतिष्ठा करून जुने देव मंदिराच्या आवारात एका जागेत ठेवले जातात जागेत ठेवले जातात, त्या जागेस खुट्याचा चाळा असे म्हणतात. असे बोलतात की दैवी चमत्काराने ह्या जुन्या देवांची संख्या त्यामध्ये दरवर्षी नवीन देवाची भर घातली तरी २१ च राहते.


. अजून एक वैशिष्टय म्हणजे हे गिरोबा फणसाचे झाड देवळात पाषाण म्हणून पुजण्यात येते त्यापासून पाळेमुळे खड्डयात मिळतात ती औषधी असतात असे जाणकार सांगतात.

. या गावात फणसाच्या झाडाला देवाचे स्थान आहे. येथील ग्रामस्थ फणसाच्या झाडासमोर नतमस्तक होतात. आपल्या परसातील फणसाचे झाड देवासाठी वापरले गेले तर त्याला ते पुण्य मानतात. त्यासाठी ते फणसाच्या झाडाची लागवड आणि जतन करताना दिसतात.

 

टीप : आमच्या लेखात मांडलेल्या आख्यायिका,चालीरीती आणि माहिती यात अनेक मते आणि मतांतरे असू शकतात. कोकणातील परंपरा, रूढी आणि चालीरीती यांची माहिती देणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे.

 

तुम्हालासुद्धा तुमच्या गावातील शिमगा साजरा करण्याच्या अनोख्या परंपरा आमच्या संकेतस्थळावर आपल्या नावासहित प्रकाशित करता येतील. अधिक माहिती साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करा.

https://kokanai.in/2022/03/16/shimga/

 

कोकणाई ब्लॉग च्या नियमित whatsapp अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search