




आजचे पंचांग
आजचे पंचांग
Konkan Railway:सीमावर्ती भागातील मराठी जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असताना आता कोकण रेल्वे प्रशासन सुद्धा त्यांच्यावर अन्याय करत असल्याचे सिद्ध झाले आहे. कोकण रेल्वे मार्गावर पूर्वी चालणारी कारवार- रत्नागिरी गाडी बंद करून कोकण रेल्वेने कारवारच्या मराठी माणसावर अन्याय केला असल्याची खंत कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर यांनी व्यक्त केली आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई मडगाव कोकणकन्या एक्सप्रेसचा अतिरिक्त भार कमी व्हावा म्हणून या गाडीला समांतर अशी दुसरी गाडी असावी अशी वारंवार मागणी व्हायला लागली व कोकणकन्याला पर्याय म्हणून कारवार ते मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस (आताची मुंबई-मंगळुरू एक्सप्रेस) सुरू करण्यात आली होती. परंतु सुरेश कलमाडी रेल्वेमंत्री झाल्यानंतर या गाडीचा थेट मेंगलोर पर्यंत या गाडीचा विस्तार केला गेला.
कारवार या शहरांमध्ये 80 टक्के मराठी लोक राहतात त्यांची मूळ कुलदैवता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. जसे गोव्यामध्ये मराठी तसेच कारवार मधले मराठी हे मूळचे मराठीच आहेत. मेंगलोर पर्यंत विस्तार केला गेलेल्या या गाडीचा कारवार वासियांना कोणताही फायदा होत नाही कारण मेंगलोर पासून कारवारला गाडी येईपर्यंत त्याची जनरल डबे फुल झालेले असतात. इथे पण “केला तुका झाला माका” अशी परिस्थिती आहे.
या गाडीला दक्षिणेकडे मेंगलोर पर्यंत आता दोन थांबे वाढवले परंतु सावंतवाडीला मात्र थांबा दिला जात नाही इथेही अन्याय. ही गाडी मराठी माणसांचीच होती ती थेट मेंगलोरला नेली आहे. मुळात कोकण रेल्वे ही सुद्धा महाराष्ट्रापुरती सीमित होती परंतु जॉर्ज फर्नांडिस यांच्या दूरदर्शी विचारांमुळे कोकण रेल्वेचा मेंगलोर पर्यंत विस्तार करण्यात आला. पण त्यामुळे ज्या महाराष्ट्राने कोकण रेल्वेसाठी पन्नास वर्षे वाट बघितली त्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना अनेक सीमावर्ती मराठी माणसांच्या तोंडाला आता कोकण रेल्वेने पाने पुसल्यासारखीच आहेत. आता सीएसटी मेंगलोर गाडीला कारवार साठी स्वतंत्र डबा जोडण्यात यावा व सीमावर्ती कारवारच्या मराठी लोकांवर होणारा अन्याय दूर करण्यात यावा अशी मागणी सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर पत्रकाद्वारे केली आहे.
आजचे पंचांग
सावंतवाडी : सांगेली खालचीवाडी येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोमवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. या मुलाचे नाव निशांत धोंडिबा नार्वेकर असून त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून सावंतवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, निशांत नार्वेकर हा आपल्या आई-वडिलांसोबत सांगेली खालचीवाडी येथे राहत होता. तो स्थानिक हायस्कूलमध्ये इयत्ता अकरावीत शिकत होता.सोमवारी त्याच्या घरी आई-वडील नसल्याने तो एकटाच होता. याच संधीचा गैरफायदा घेत त्याने आपल्या राहत्या घरातील खोलीचा दरवाजा बंद करून वाशाला दोरीने गळफास घेतला. ही घटना निशांतचा मामे भाऊ दर्श पोतदार याला समजताच त्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार मनोज राऊत आणि पोलीस शिपाई संतोष गलोले यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
Konkan Railway: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांसोबत पालक पिकनिकचं प्लानिंग करतात. तर अनेक पालक हे आपल्या मुलांसोबत गावी जात असतात. यामुळे दैनंदिन रेल्वे सेवेवर अधिक भार येतो आणि गर्दीमुळे प्रवाशांची गैरसोय होते. उन्हाळी सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर अजून काही उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
गाडी क्रमांक ०११०४ मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष ०६/०४/२०२५ ते ०४/०५/२०२५ पर्यंत दर रविवारी १६:३० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:२५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११०३ लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जंक्शन. साप्ताहिक विशेषांक लोकमान्य टिळक (टी) येथून ०७/०४/२०२५ ते ०५/०५/२०२५ पर्यंत दर सोमवारी ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 21:40 वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचेल.
ही गाडी करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापुरा रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच : टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०३ कोच, थ्री टायर इकॉनॉमी – ०२ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.
गाडी क्रमांक ०११०४ चे आरक्षण दिनांक ०२/०४/२०२५ रोजी सर्व पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम (PRS), इंटरनेट आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होईल.
Follow us on
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हे एक वादग्रस्त प्रकरण महाराष्ट्रात गाजत आहे., जे ऐतिहासिक सत्यता आणि सांस्कृतिक भावनांभोवती फिरते. ही समाधी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ आहे आणि ती वाघ्या नावाच्या कुत्र्याची असल्याचे मानले जाते. लोककथेनुसार, वाघ्या हा शिवाजी महाराजांचा निष्ठावान कुत्रा होता, ज्याने १६८० मध्ये महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या चितेत उडी मारून प्राण त्यागले. ही कथा निष्ठेचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे, विशेषत: राम गणेश गडकरी यांच्या “राजसंन्यास” नाटकामुळे, ज्यामध्ये या घटनेचा उल्लेख आहे.
प्रकरणाची मुळे अशी आहेत की, १९२७ मध्ये शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार झाला आणि त्यानंतर सुमारे १०-१२ वर्षांनी, म्हणजे १९३६ मध्ये, रायगड स्मारक समितीने गडकरींच्या नाटकाला आधार मानून वाघ्याचा पुतळा आणि समाधी उभारली. पण या कथेला ऐतिहासिक पुराव्यांचा आधार नाही. शिवकालीन दस्तऐवज किंवा समकालीन नोंदींमध्ये वाघ्या नावाच्या कुत्र्याचा किंवा अशा घटनेचा उल्लेख सापडत नाही. भारतीय पुरातत्व विभागानेही (ASI) असा कोणताही पुरावा नसल्याचे स्पष्ट केले आहे.
या समाधीवरून वाद का आहे? काही इतिहासकार आणि शिवप्रेमी, जसे की संभाजीराजे छत्रपती, यांचे म्हणणे आहे की ही समाधी कपोलकल्पित आहे आणि शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ अशी संरचना असणे हा त्यांच्या स्मृतीचा अपमान आहे. संभाजीराजे यांनी २०२५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही समाधी ३१ मेपर्यंत हटवण्याची मागणी केली, कारण ती ऐतिहासिकदृष्ट्या सिद्ध नसलेली आणि रायगडावरील अतिक्रमण आहे. याउलट, काही लोकांना ही समाधी सांस्कृतिक आणि भावनिक मूल्य असलेली वाटते, कारण ती निष्ठेचे प्रतीक म्हणून पाहिली जाते.
दुसरीकडे, संभाजी भिडे यांनी वाघ्याची कथा सत्य असल्याचा दावा केला आहे आणि संभाजीराजेंच्या विधानाला विरोध दर्शवला आहे. त्यांनी ही कथा लोकपरंपरेतून आल्याचे सांगितले, परंतु ठोस पुराव्यांऐवजी त्यांचा भर भावनिक आणि पारंपरिक विश्वासांवर आहे.
भारतीय पुरातत्व विभागानेही असा खुलासा केला आहे की, वाघ्या कुत्र्याच्या समाधीचे ऐतिहासिक महत्त्व सिद्ध करणारी कोणतीही माहिती किंवा पुरावे त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत.
ऐतिहासिक सत्यतेचा मुद्दा: वाघ्याची कथा लोककथा असू शकते, पण ती सिद्ध करणारे ठोस पुरावे नाहीत. काहींच्या मते, समाधी उभारताना सापडलेली हाडे उद-मांजराची होती, कुत्र्याची नव्हे.
सांस्कृतिक महत्त्व: काही समुदाय, उदा. धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके, यांनी समाधी हटवण्यास विरोध केला आहे, कारण त्यांना ती परंपरेचा भाग वाटते.
राजकीय आणि सामाजिक आयाम: हा वाद औरंगजेबाच्या कबरीसारख्या इतर प्रकरणांशी जोडला गेला असून, काहींनी याला राजकीय रंग दिला आहे.
थोडक्यात, वाघ्या कुत्र्याची समाधी ही एका कथेवर आधारित आहे, ज्याला ऐतिहासिक आधार नाही, पण ती सांस्कृतिक प्रतीक म्हणून टिकून आहे. सध्या, संभाजीराजे आणि समर्थक ती हटवण्याची मागणी करत आहेत, तर काहींना ती ठेवायची आहे. हे प्रकरण ऐतिहासिक अचूकता आणि भावनिक मूल्यांमधील संघर्षाचे उदाहरण आहे…
रत्नागिरी:निसर्गरम्य श्री क्षेत्र टेरवच्या श्री कुलस्वामिनी भवानी – वाघजाई या सुप्रसिद्ध व जागृत देवस्थानचा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. देवस्थानचे मानकरी, ग्रामस्थ तसेच पुजारी यांच्याकडून उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली होती.
१३ मार्च रोजी रात्रौ हुताशनी पोर्णिमेला वाडी-वाडीतील ग्रामस्थांनी पूजन करून होळी प्रज्वलित केली. १४ मार्च रोजी सकाळी श्री कुलस्वामिनी भवानी- वाघजाई मंदिरासमोर ग्रामस्थांनी आणलेली लाकडे, कवळ, शेणी व गवत इत्यादीने सजविलेल्या होमाची पुजाऱ्यानी पारंपारिक पद्धतीने गावच्या मानकऱ्यांच्या हस्ते यथासांग विधीवत पुजा करुन घेतली. गावच्या पुजाऱ्यानी (गुरवानी) मंदिरातून चांदीने मढविलेली पालखी सजवून “कुलदैवत श्री भवानी, ग्रामदैवत श्री वाघजाई, भैरी, केदार, महालक्ष्मी व कुलस्वामिनी” या देवतांची रुपी लावून मंदिरा व होमा समोरील मानाच्या नूतन सहाणेवर आसनस्थ केली. सकाळी ९ वाजता ढोल, ताश्यांच्या गजरात, वाजंत्र्यासह होमाभोवती पालखीच्या पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर होम प्रज्वलीत करुन ग्रामस्थांनी होळीत अग्निदेवतेस श्रीफळ अर्पण केले. होमाभोवती पालखीची प्रदक्षिणा घालून “भैरी- केदाराच्या चांगभलं” असे म्हणत पालखी उंचावून उपस्थित भाविकांना उत्साहवर्धक वातावरणात दर्शन देण्यात आले तो क्षण डोळ्याचे पारणे फेडणारा होता. सुवासिनींनी सहाणेवर पालखीतील देवींच्या आस्थेने ओट्या भरल्या व नंतर पालखी मंदिरात स्थानापन्न करण्यात आली. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे वद्य प्रतिपदेला प्रज्वलीत करण्यात आलेल्या ह्या होळीला “‘भद्रेचा शिमगा'” असे संबोधले जाते, कारण या दिवशी भद्रा करण असते. हुताशनी पौर्णिमेला घराघरांतून पूरणपोळीचा नैवेद्य करण्यात आला. संध्याकाळी चार वाजता पालखी लिंगेश्वर वाडीतील स्वयंभू पुरातन जागृत शंकर मंदिर येथील मानाच्या सहाणेवर नेण्यात आली. लिंगेश्वर वाडीतून पालखीचा “छबिना” काढून निम्मेगाव, गुरववाडी, कुंभारवाडी, राधाकृष्णवाडी, भारतीवाडी आणि तळेवाडी अशी वाजत-गाजत रात्रौ मंदिरात आणण्यात आली. छबिन्याच्या वेळी वाडी-वाडीतील ग्रामस्थांनी आकर्षक विद्युत रोषणाई सह रांगोळी काढून फटाक्यांची आतिषबाजी केली व गुलाल उधळून ढोल ताशांच्या गजरात पालखीचे जल्लोषात स्वागत केले. वाडी- वाडीतील सुवासिनींनी छबेन्याच्या वेळी ठिकठिकाणी पालखीतील देवतांची आरती करुन ओट्या भरल्या. गावचा छबेना भक्तिमय आणि अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात व आनंदात पार पडला.
होमाच्या दिवशी व्यापाऱ्यांनी कुरमुर्यांचे, शेंगदाण्याचे लाडू, मिठाई, सरबत, आइस्क्रीम तसेच विविध प्रकारची खेळणी अशी नाना तऱ्हेची दुकाने थाटली होती.
रूढी परंपरे प्रमाणे १५ रोजी पालखी प्रथम तळेवाडीतील मानकऱ्यांच्या घरी नेण्यात आली व नंतर निम्मेगाव येथील मानकऱ्यांच्या घरी नेण्यात आली. तदनंतर निम्मेगाव येथील ग्रामस्थांच्या घरी नेण्यात आली व अशा प्रकारे १६ रोजी तळेवाडी – दत्तवाडी १७ रोजी लिंगेश्वरवाडी, १८ रोजी राधाकृष्णवाडी येथे नेण्यात आली. १९ तारखेला पालखी कुंभरवाडीतील ग्रामस्थांच्या घरी नेण्यात आली. त्याच दिवशी पालखी संध्याकाळी परत मंदिरात आणून रुढी परंपरेप्रमाणे विधिवत पूजन करुन “धुळवड” (रंगपंचमी) साजरी करण्यात आली, यालाच “शिंपणे” असे म्हणतात. यावेळी अनेक ग्रामस्थांनी मंदिरात गुलाल उधळून रंगपंचमी साजरी केली. शिंपणे झाल्यावर पालखी पुनश्च कुंभरवाडीतील उर्वरीत घरे घेण्यासाठी नेण्यात आली.
२० रोजी तांदळेवाडी-गुरववाडी व खांबेवाडी, २१ रोजी दत्तवाडी (हनुमान नगर), २२ रोजी वेतकोंडवाडी, २३ रोजी भारतीवाडी, २४ रोजी तांबडवाडी आणि २५ रोजी सुतारवाडीतील ग्रामस्थांच्या घरी नेण्यात आली.
प्रत्येक घरात राखणेचे, पूजेचे श्रीफळ पालखीत अर्पण करण्यात आले, तसेच माहेरवाशिणीनी व सासरवाशिनिणी ओट्या भरल्या. काही ठिकाणी नवस करण्यात आले तर काही ठिकाणी नवस फेडण्यात आले. पुजाऱ्यानी रूढी परंपरेप्रमाणे देवतांस “आर्जव” घातले. गोडाधोडाचे नैवद्य दाखविण्यात आले. पालखी वाहणाऱ्या सेवकांस “भोई” असे संबोधले जाते. तसेच पुजारी, भोई, ताशावाला व ढोलवाला बांधवांना स्वखुशीने बक्षीस देण्यात येते त्यास ”पोस्त”असे संबोधले जाते.
घरोघरी पालखी नेण्यात येते यास *भोवनी* असे संबोधले जाते. सदर शिमगोत्सवास अनेक चाकरमानी कुटुंबियांसह आवर्जुन उपस्थित होते. पालखी कुठेही वास्तव्यास न राहता ती मिरवणुकीने वाजत-गाजत वाडी-वाडीतील घरे झाल्यावर रात्री मंदिरात आसनस्थ करण्यात आली. रात्रौ ग्रामस्थ वाडीतील पाळ्यांप्रमाणे मंदिरात पहाऱ्यासाठी (सेवेसाठी)उपस्थित राहिले होते.
सदर कालावधीत मंदिर सकाळी ७ ते रात्रौ १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. पालखीसोबत अब्दागिरी व भगवे निशाण नाचवत ढोल, ताशा वाजविण्यात आला. परंपरेनुसार गावातील मुस्लिम बांधवानी पालखीसोबत ताशा वाजवीला , अशा या सांस्कृतिक, सामाजिक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या शिमगोत्सवाची सांगता सुतारवाडीतील घरे झाल्यावर मंगळवार दिनांक २५ मार्च, २०२५ रोजी (कांदल) रुपी भंडारुन करण्यात आली. या उत्सवात सर्व जाती-धर्माचे लोक आनंदाने आणि उत्साहाने सहभागी झाले होते.
राखले पावित्र्याचे भान!
वाढविले संस्कृतीची शान!!
ठेवले उत्सवांचे भान!
केला देवतांचा सन्मान!!
आपले:- ग्रामस्थ श्री क्षेत्र टेरव.
संकलन :- श्री सुधाकर राधिका कृष्णाजीराव कदम, ( विशेष कार्यकारी अधिकारी) राधाकृष्णवाडी, श्री क्षेत्र टेरव.
सरस्वती कोचिंग क्लासेस, मुंबई.
Content Protected! Please Share it instead.