Author Archives: Kokanai Digital




कोकणात आई-वडिलाच्या घरातच गणपती बसतो. आई वडीलाच्या पश्चात थोरल्या मुलाच्या घरी किंवा जो आई वडिलाच्या घरात राहतो, फक्त त्यालाच गणपती बसवण्याचा अधिकार असतो, हा तेथील कडक सामाजिक नियम आहे.
नोकरीच्या निमित्ताने चार भावांची शहरात किंवा गावात चार घरे असली तरी, मुळ घरातच गणपती एकच बसवतात व सर्व भाऊ व त्यांची बायका, मुले तिथे एकाच चुलीवर, दहा दिवस जेवण बनवून त्या घरात राहतात. भावा भावात कितीही भांडणे असले तरी, या दहा दिवसात एकत्र राहणे, एकत्रच स्वयंपाक करून जेवणे व तिथेच झोपणे हा तिथला कडक नियम आहे.
असे गणपतीमुळे एकत्र आल्याने, कधी कधी जुने भावांतील वाद एकत्र आल्याने मिटले जातात. नाही मिटवायचे तरी दहा दिवस कोणीही घरात वाईट बोलणे, भांडण करणे मनाई असते, नाहीतर देवाचा कोप होईल या श्रध्देने सर्वजण मोठी माणसे एकत्र आनंदाने राहतात. मुले तर लगेच एकमेकांत मिसळून जातात.
कोकणात या गणपती सणाच्या निमित्ताने आपलं घर, संपूर्ण गावं भरून जातं. आपुलकीला उधाण येतं. माणसं एकत्र येतात, भेटतात, भजने, दशावतार, शक्ती तुरा नाच, नमन भारुड,कथा इत्यादी रात्री कार्यक्रम उत्साहात करतात. आणि पुन्हा आपापल्या शहरात पोटं भरण्यासाठी गणपती सणानंतर निघून जातात.
गणपतीत झालेली माणसांची गर्दी आणि दारासमोर झालेली पादत्राणांची, पाऊलांची दाटी, दहा दिवस सर्व कुटुंब एका छताखाली येणं, गुण्या गोविंदाने रहाणं आणि सुख-दुःखाच्या गप्पा गोष्टी करणं. पोरांनी आई म्हणून मारलेली प्रेमळ हाक, दिरानी वहिनींकडे हक्काने मागीतलेला कपभर चहा, तुम्ही राहू द्या, मी करते असा एका जावेने, दुसऱ्या जावेला केलेला प्रेमळ हट्ट हे कोकणात गावा गावात, घरा-घरात पहायला मिळते. योग्य वेळी, योग्य वागणं आणि घर नावाच्या मंदिराच्या भिंतीला तडे न जाऊ देणं, हे सर्व कोकणाच्या बाहेर प्रेम, माया संपत चालली आहे.
एक भाऊ कारमधून फिरतोय आणि एकाकडे सायकल पण नाही. एका आई वडिलाची मुले पण द्वेष, मत्सर वाढत चाललाय. त्यांने मोटारसायकल घेतली की, लगेच दुसरा भाऊ कर्ज काढून कार घेतोय, ही कोकण बाहेरील परिस्थिती आहे. दुसऱ्या भावाला मदत करायची नाही या ईर्षेने एक एक भाऊ पेटलेला आहे. आपल्याच आई वडिलाचा विसर पडलेला आहे तर मग गावटगे बसलेत तुमच्या काडी लावायला व सर्रास भाऊ याला बळी पडतात.
संपत्तीवरून बहीणीत वाद आहेत तर तिच्याकडे बघत पण नाहीत. काय मागते ते द्या ना. बहीण, भावापुढे कसला स्वार्थ धरता रे? एकाच आईच्या उदरातून येवून माता ऐवजी मातीसाठी, जमीनीसाठी भांडता, हे केवढे कुटुंबाचे दुर्दैव आहे. सुधरा, नाहीतर नरक आहे का नाही माहिती नाही पण तिथे सुद्धा जागा मिळणार नाही.
कोकणासारखे वागून बघावे, कोकणात एकाही शेतकऱ्यांने आजपर्यंत आत्महत्या केली नाही. तिकडे चार एकर म्हणजे मोठा शेतकरी. कोकण बाहेर दहा एकरवाला आत्महत्या करतोय त्याला कारण मोठेपणा व विभक्त कुटुंब पद्धतीमुळे विचाराची देवाणघेवाण होत नाही व रात्री मुड बनला की, घेतला फास.
साधेपण जपावा, कुटुंबाने वर्षातून दहा दिवस अशा सणाला एकत्र येवून घरी दरवर्षी कोकणा प्रमाणे दहा दिवसाचा सण साजरा करावा. गौराई बसवतात तसे दोन दिवस बहीणीला घरी बोलवून मातीच्या गौराईवर प्रेम करतात, तसे आपल्याच बहिणीला वडे आदी सागोती नाही जमले तर, कमीत कमी पुरणपोळी घासाचा तिला पाहुणचार केला पाहीजे,
जीवंत आई-बापानी हे पाहिले तर ते गदगद् होतील व नसतील तर त्यांचा आत्मा सर्वास एकत्र पाहून आनंदीत होईल,
ही भोळी अपेक्षा जरी असले तरी, प्रेम कुटुंबाचे एकत्रित येण्यामुळे द्विगुणित होईल व पुढील वर्षासाठी भावांचे बहिणींचे, भावा भावांचे एकमेकाला चांगले आर्शिवाद मिळतील, यात तिळमात्र शंका नाही.
साभार – माहिती सेवा ग्रुप




Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावरून येणार्या-जाणार्या वाहनांची नोंद झाली असून मागील ९ दिवसांत सुमारे ७ लाख या मार्गावरून गेल्या आहेत.
महामार्गावरुन गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणार्या व येणार्या चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्नपणे होण्याकरिता खारपाडा येथे कोकणात जाणार्या सर्व प्रकारच्या वाहनांची नोंद रायगड पोलीसांच्या विशेष यंत्रणेच्या माध्यमातून घेतली गेली होती. या नोंदी नुसार आज पर्यंत नऊ दिवसात अंदाजे सात लाख गाड्या महामार्गावरून धावल्या आहेत. बाप्पाच्या विसर्जनानंतर रविवार दुपारी ३ वाजल्या पासून पुन्हा मुंबई, गुजरातच्या दिशेने येणार्या या वाहन संख्येमध्ये वाढ होत असून मोठ्या प्रमाणात वाहने परतीचा प्रवास करत आहेत.
दिवस रात्रभर सुरू असणारा सदरचा प्रवास पहाटे पर्यंत सुरूच होता. परतीच्या प्रवासासाठी सुद्धा मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरु असून माणगाव जवळ बायपासचे काम अपूर्ण असल्याने माणगाव- कोलाड बाजारपेठेत वाहतुकीचा ताण पडत आहे.
महामार्गावरील चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्न, सुखकर आणि वाहतूक कोंडी विना व्हावा याकरिता महामार्गाच्या खारपाडा ते कशेडी या रायगड जिल्ह्याच्या हद्दीत रायगड जिल्हा पोलीस दलातील १६३ पोलीस अधिकारी आणि १ हजार ७०० पोलीस जवान २४ तास तैनात करण्यात आले आहेत. तर अवजड वाहनांची बंदी आदेश मोडणार्या अंदाजे ५० हुन अधिक अवजड वाहनांवर रायगड पोलीसांनी कारवाई केली आहे.





आंतरराष्ट्रीय: क्रिकेटवर पूर्णपणे बंदी घालण्याची तयारी तालिबान सरकारने केली असल्याची चर्चा आहे. तालिबानी नेता हिबतुल्लाह अखुंदजादा यांनी देशात क्रिकेटवर बंदी घालण्याचे आदेश दिल्याचं वृत्त आहे. याबाबतची बातमी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये आली आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट संघाने अल्पावधीतच क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत बलाढ्य संघांना पराभूत करत अफगाणिस्तानने लक्ष वेधून घेतलं. तसेच उपांत्य फेरीत स्थान मिळवलं होतं. आता अफगाणिस्तान संघ कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. असं असताना तालिबान सरकारच्या डोळ्यात क्रिकेट खुपलेलं दिसत आहे.
क्रिकेटमुळे देशात वाईट वातावरण तयार होत आहे.तसेच हा खेळ शरिया कायद्याच्या विरोधात असल्याचं तालिबानी नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या खेळावर बंदी घालण्यात येत असल्याचं तालिबानचा नेता हिबतु्ला अखुंदजादा याने सांगितलं. देशात तालिबान सरकार आल्यानंतर सरकारने पहिल्यांदा महिला क्रिकेट आणि महिला सहभागी होत असलेल्या इतर खेळांवर बंदी घातली होती. आता पुरुष क्रिकेटवरी बंदी घालणार असल्याने क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे.
तालिबान सरकारने ही बंदी कधी आणि कशी लागू करणार याबाबत काही अधिकृत माहिती सांगितलेली नाही.
जर कोल्हापूर वंदे भारत ही ०७, ३२.७ आणि ३५ किलोमीटर दरम्यानच्या अंतरावर थांबू शकते तर मडगाव वंदे भारत सावंतवाडी स्थानकावर का थांबू शकत नाही? असा प्रश्न कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीच्या वतीने विचारला जात आहे.
Follow us on



सिंधुदुर्ग: कोल्हापूर -पुणे आणि पुणे – हुबळी मार्गावर नवीन वंदे भारत येत्या १६ तारीख पासून सुरू होत आहे, वादाच्या भोवऱ्यात सापडलेली ही वंदे भारत ट्रेन कोल्हापूरकरांचा दबावानंतर कोल्हापूरकरांना पुण्यासाठी स्वतंत्र वंदे भारत मिळाली.
पुण्याहून कोल्हापूर साठी सुरू झालेली ही वंदे भारत मिरज, सांगली,किर्लोस्करवाडी, कराड, सातारा येथे थांबेल, तसेच हुबळी साठी सुरू झालेली वंदे भारत सातारा,सांगली,मिरज,बेळगाव,धारवाड येथे थांबेल
या दोन्ही वंदे भारत ट्रेनचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या गाड्या सांगली जिल्ह्यातील सांगली आणि मिरज या दोन्ही स्थानकांवर थांबणार आहेत आणि या स्थानकातील अंतर आहे अवघे ७ किलोमीटर, तसेच कोल्हापूर वंदे भारत ही कराड आणि किर्लोस्करवाडी येथे देखील थांबेल,कराड ते किर्लोस्करवाडी स्थानकादरम्यान अंतर हे ३५ किलोमीटर आणि किर्लोस्करवाडी ते सांगली हे अंतर ३२.७ किलोमीटर आहे.म्हणजेच एकूण ३२६ किलोमीटरच्या या पूर्ण प्रवासात या गाडीला मध्ये ५ थांबे देण्यात आले.
परंतु कोकण रेल्वे मार्गावर सुरू करण्यात आलेली मडगाव – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ कणकवली येथे थांबते. या गाडीला सावंतवाडी थांबा मिळावा म्हणून स्थानिकांनी आणि प्रवासी संघटनांनी आपल्या परीने प्रयत्न केले आहेत. तसे बघता कणकवली ते सावंतवाडी रेल्वे स्थानक हे अंतर ४९ किलोमीटर आहे आणि सावंतवाडी ते थिवी (गोवा) हे अंतर ३२.५ किलोमीटर आहे. जर कोल्हापूर वंदे भारत ही ०७, ३२.७ आणि ३५ किलोमीटर दरम्यानच्या अंतरावर थांबू शकते तर मडगाव वंदे भारत सावंतवाडी स्थानकावर का थांबू शकत नाही असा सवाल सावंतवाडी येथील जनता करत आहे. या व्यतिरिक्त मुंबई ते मडगाव या ७६५ किलोमीटर ( कोल्हापूर – पुणे स्थानकाच्या अंतरापेक्षा दुप्पट )अंतरात केवळ ७ थांबे देण्यात आले आहेत.
त्यामुळे प्रत्येक वेळी सावंतवाडी साठी वेगळा न्याय का, सावत्र वागणूक का ? आणि सावंतवाडी हे ऐतिहासिक, पर्यटन शहर असूनही या ठिकाणी वंदे भारत का थांबत नाही असे मत कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी चे सचिव मिहिर मठकर आणि भूषण बांदिवडेकर यांनी व्यक्त केले.




मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे छत्रपती शिवाजी maharajaaMcaa १०० फूट उंचीचा पुतळा उभारण्यात यावा. त्याचबरोबर या परिसरात भव्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची शिवसृष्टी उभारण्यात यावी, अशी विनंती शालेय शिक्षण तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे
मंत्री श्री.केसरकर यांनी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे प्रत्यक्ष भेट घेऊन यासंदर्भातील विनंतीपत्र तसेच ‘ऊर्जा हिंदुत्वाची’ या शीर्षकाखाली सविस्तर आराखड्यासह प्रस्ताव सादर केला. मालवण येथे भारतीय नौदलामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. नुकत्याच घडलेल्या दुर्देवी घटनेमध्ये हा पुतळा कोसळला. यामुळे याच ठिकाणी पुन्हा नव्याने १०० फूट उंचीचा पुतळा उभारण्यात यावा, त्याचबरोबर सध्या ३३ गुंठे जागेवर असलेल्या स्मारकाऐवजी लगतच्या परिसराचा विकास करुन तेथे भव्य दिव्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘शिवसृष्टी’ उभारण्यात यावी, अशी विनंती श्री.केसरकर यांनी kolaI Aaho.




Konkan Railway Updates, दि.१२ सप्टें: यावर्षी कोकणात गावी गेलेल्या चाकरमान्यांसाठी रेल्वेकडून एक खुशखबर आहे. चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर करण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे काही अनारक्षित गाड्यांची घोषणा आज करण्यात आली आहे. या गाड्यांमुळे जनरल डब्यांतील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.
१) गाडी क्र. ०१०६९ / ०१०७० मुंबई सीएसएमटी – खेड – मुंबई सीएसएमटी स्पेशल (अनारक्षित):
गाडी क्रमांक ०१०६९ मुंबई सीएसएमटी – खेड स्पेशल (अनारिक्षित) मुंबई सीएसएमटी येथून १२/०९/२०२४ रोजी रात्री २३:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०५:१५ वाजता खेडला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१०७० खेड – मुंबई सीएसएमटी स्पेशल (अनारक्षित) खेड येथून १६/०९/२०२४ रोजी पहाटे ०६:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 13.30 वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.
ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी आणि कळंबणी बुद्रुक स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण 20 डबे = सामान्य – १४, (अनारक्षित) स्लीपर – ०४, एसएलआर – ०२ .
२) गाडी क्र. ०१०७४ / ०१०७१ खेड – पनवेल – खेड अनारक्षित विशेष:
गाडी क्रमांक ०१०७४ खेड – पनवेल अनारक्षित विशेष खेड येथून १३/०९/२०२४, १४/०९/२०२४ आणि १५/०९/२०२४ रोजी पहाटे ०६:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी १० वाजता पनवेलला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१०७१ पनवेल – खेड अनारक्षित विशेष पनवेलहून १३/०९/२०२४, १४/०९/२०२४ आणि १५/०९/२०२४ रोजी सकाळी १ वाजता सुटेल आणि खेडला त्याच दिवशी दुपारी १४.४५ वाजता पोहोचेल.
ही गाडी कळंबणी बुद्रुक, दिवाणखावटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, पेण या स्थानकांवर गाडी थांबेल.
डब्यांची रचना : एकूण 20 डबे = सामान्य – १४, (अनारक्षित) स्लीपर – ०४, एसएलआर – ०२ .
3) ट्रेन क्र. ०१०७२ / ०१०७३ खेड – पनवेल – खेड अनारक्षित विशेष :
गाडी क्रमांक ०१०७२ खेड – पनवेल अनारक्षित विशेष खेड येथून १३/०९/२०२४, १४/०९/२०२४ आणि १५/०९/२०२४ रोजी दुपारी १५:१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २०.३० वाजता पनवेलला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१०७३ पनवेल – खेड अनारक्षित स्पेशल पनवेल येथून १३/०९/२०२४, १४/०९/२०२४ आणि १५/०९/२०२४ रोजी रात्री २१:१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ०१:०० वाजता खेडला पोहोचेल.
ही गाडी कळंबणी बुद्रुक, दिवाणखावटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, पेण या स्थानकांवर गाडी थांबेल.
डब्यांची रचना : एकूण 20 डबे = सामान्य – १४, (अनारक्षित) स्लीपर – ०४, एसएलआर – ०२ .




चिपळूण:- श्री रामवरदायिनी मंदिर देवस्थान ट्रस्ट, यांच्या वतीने मजरे दादर, कळकवणे येथे दसपटी विभागातील शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश संपादन केलेल्या श्री समर्थ अविनाश शिंदे कळकवणे (आय. ए. एस), कु. हरिज्ञा लक्ष्मण शिंदे ओवळी (नेव्ही अधिकारी), श्री अथर्व श्रीधर कदम टेरव (सी. ए.), कु. स्नेहा अरूण शिंदे कळकवणे (सी. ए.), श्री शुभम शशिकांत शिंदे कोळकेवाडी (कबड्डी क्षेत्रात विशेष प्राविण्य), डॉ. सलोनी सुभाष शिंदे तिवरे (एम.बी.बी.एस.), श्री कृपाल दिलीप शिंदे कोळकेवाडी (पी. एच.डी. डॉक्टरेट परीक्षेत विशेष प्राविण्य), कु. अनुजा अनिल चव्हाण मोरवणे (डॉक्टरेट इन फिजिओथेरपी), श्री निलेश कृष्णाजी शिंदे कळकवणे (वैद्यकीय क्षेत्रात विशेष पुरस्कार) प्राप्त केलेल्या या नवरत्नांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व दसपटीभूषण, दसपटीरत्न असे सन्मानचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले.
सदर किर्तींवंतांचा गौरव करताना न्यासाचे अध्यक्ष श्री प्रतापराव शिंदे यांनी सांगितले की या गुणवंतांनी घेतलेले कठोर परिश्रम, चिकाटी, सातत्य तसेच आईवडिलांचे व कुलस्वामिनी रामवरदायिनी- भवानीचे आशीर्वाद यामुळेच त्यांना हे घवघवीत यश प्राप्त झाले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपण आपल्या समाजाचेही काही देणे लागतो याचा विसर पडू देवू नये असा मोलाचा सल्ला दिला.
गुणवंतांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आमचे गुणगौरव सोहळे अनेक झाले पण आई रामवरदायिनीच्या प्रांगणात आमच्या समाज बांधवांनी केलेला सन्मान आमच्यासाठी विशेष आहे व त्यामुळे आम्ही सर्व भारावून गेलो आहोत.
या सन्मान सोहळ्यास न्यासाचे विश्वस्त, व्यवस्थापन समिती, सल्लागार समिती, दसपटी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, दसपटी विभागातील मान्यवर तसेच आदरणीय समाज बांधव उपस्थित होते.