रत्नागिरी, दि. ०१ मे: सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आज एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रत्नागिरीत सामंत विरुद्ध सामंत असा सामना सुरू झाला आहे. किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी संपर्क कार्यालयावरील बॅनर बदलला आहे. उदय सामंत जनसंपर्क कार्यालय असा बॅनर होता. आता किरण सामंत संपर्क कार्यालय असे बॅनर लावण्यात आला आहे. त्यामुळे किरण सामंत अद्यापही उमेदवारीवरून नाराज असल्याची चर्चा तळ कोकणात सुरू झाली आहे. नव्याने लावण्यात आलेल्या बॅनरवरून उदय सामंत यांचाही फोटो काढण्यात आला आहे.
उदय सामंत यांचे बॅनर हटवण्यात आल्यानंतर किरण सामंत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “माझं कार्यालय आहे. तिथेच मी बसणार. माझ्या कार्यालयात काय करायचं हे मी ठरवणार, अशी प्रतिक्रिया किरण सामंत यांनी दिली आहे. शिवसेनेचं जिल्हा संपर्क कार्यालय हे माझ्या मालकीचं आहे”, असं किरण सामंत यांनी म्हटलं आहे.
नारायण राणेंच्या अडचणींत वाढ
किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात लोकसभेसाठी इच्छुक होते. शेवटपर्यंत ही जागा शिवसेनेकडे जाते कि भाजपाकडे याबाबत रस्सीखेच चालू होता. अखेर भाजपने बाजी मारून नारायण राणे यांना उमेदवारी दिली. उदय सामंत आणि किरण सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि माघार घेत असल्याची घोषणा केली.. महायुतीचे उमेदवार नारायण राणेंचा प्रचार करणार.. असं आश्वासन उदय सामंत आणि किरण सामंतांनी पत्रकार परिषदेतून दिले होते. मात्र आजची घटना नारायण राणे आणि भाजपाची झोप उडवणारी ठरणार आहे. किरण सामंत यांची नक्की भूमिका काय आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण किरण सामंत यांनी साथ न दिल्यास ही निवडणूक जिंकणे युतीला कठीण होणार असून सामंत बंधुतील या वाढच फायदा शिवसेना (उबाठा) च्या विनायक राऊत यांना होणार आहे.
किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी संपर्क कार्यालयावरील बॅनर बदलला आहे. नव्याने लावण्यात आलेल्या बॅनरवरून उदय सामंत यांचा फोटो नाही.
मुंबई :मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथे पुन्हा लोकल रुळावरून घसरल्याची घटना बुधवारी दुपारी ४.१३ च्या सुमारास घडली. गेल्या तीन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. तसेच सध्या हार्बर मार्ग ठप्प झाला आहे.
लोकलची चाचणी सुरू होती. मात्र ती अयशस्वी झाली. लोकल घसरली त्याठिकाणी ब्लॉक घेऊन दुरुस्ती करण्यात आली होती. त्याच्यानंतर त्या रुळावरून एक रिकामी लोकल चालवून पाहण्यात आली. मात्र ती घसरली, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.
हार्बर मार्गावरील सीएसएमटी – वडाळा रोड दरम्यान लोकल बंद ठेवण्यात आल्या आहेत. प्रवाशांना सीएसएमटी आणि कुर्ला दरम्यान अप आणि डाऊन दिशेने मुख्य मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सावंतवाडी, दि. ०१ मे : येत्या रविवारी (ता.५) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सावंतवाडीमध्ये सभा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीचे लोकसभा उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी ते सावंतवाडी येथे येणार असल्याची माहिती सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे समन्वयक माजी आमदार राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली
‘‘निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून राणेंचा विजय निश्चित आहे. सहाही विधानसभा मतदारसंघातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी अजित पवार गट व रामदास आठवले आरपीआयच्या माध्यमातून कार्यकर्ते व पदाधिकारी प्रयत्न करत आहेत. केंद्राच्या ५४ योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी आणल्यात त्या आम्ही जनतेसमोर घेऊन जात असून कणखर नेतृत्व म्हणून मोदी हे जगभरात प्रसिद्ध आहेत. आम्ही जनतेसमोर मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेली कामगिरी घेऊन जात आहोत आणि चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. ऑनलाइन अर्थात डिजिटल पद्धतीने चलनात पैसा येऊ लागल्याने अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आली आहे. ती पुढील काळात तीन नंबरवर आणण्यासाठी मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम होईल. केंद्रीय मंत्री राणे यांनी बेरोजगारीवर पर्याय शोधले असून त्यांनी प्रकल्प साकारण्याचा निश्चय केला आहे. सी वर्ल्ड प्रकल्प झाला असता तर आज मोठ्या प्रमाणात बेरोजगारी दूर झाली असती. पण, खासदार विनायक राऊत आणि ठाकरे यांच्या आमदारांनी त्याला विरोध केला. रिफायनरीला देखील विरोध राहिल्याने तो होऊ शकला नाही. असे राजन तेली या वेळी म्हणालेत.
‘‘आडाळी एमआयडीसी, दोडामार्ग तालुका निर्मिती राणे यांनी केली आहे. या ठिकाणी देखील रोजगार आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील काळात जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबतच रोजगाराच्या प्रश्नावर नारायण राणे यांचे मॉडेल तयार आहे. ते निश्चित काम करतील.’’ असे ते पुढे म्हणालेत
Konkan Railway News:रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली (MORTH) आणि राष्ट्रीय महामार्ग (NH) PWD गोवा तर्फे माजोर्डा जं- मडगाव जं. विभागातील रोड ओव्हर ब्रिजच्या बांधकामासाठी, मडगाव वेस्टर्न बायपाससाठी स्टील गर्डर्स लाँच करण्यासाठी लाइन आणि पॉवर ब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास महिनाभर चालणाऱ्या या ब्लॉकचा परिणाम कोकण रेल्वे मार्गावर रोज धावणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेसवर होणार आहे.
कोकण रेल्वे तर्फे आलेल्या माहितीनुसार लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर दिवशी ११ वाजून ४० मिनिटांनी सुटणारी गाडी क्रमांक १६३४५ लोकमान्य टिळक – तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्सप्रेस दिनांक ०२ मे ते २९ मे पर्यंत करमाळी ते रत्नागिरी दरम्यान सुमारे ७० मिनिटे उशिराने धावणार आहे. या गाडीला कोकणात रोहा, खेड, चिपळूण संगमेश्वर रोड, रत्नागिरी आणि कुडाळ येथे थांबे आहेत.
Ad -
मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंडयेथे नोकरीच्या संधी....
India Squad for T20 World Cup 2024 : अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट नियामक मंडळने टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी आज टीम इंडियाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियामध्ये काही नवीन खेळाडूंनाही स्थान मिळाले आहे. तर हार्दिक पांड्या उपकर्णधार म्हणून काम करताना दिसणार आहे.
संघात दोन यष्टिरक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ऋषभ पंत आणि संजू सॅमसन आहे. त्याचबरोबर केएल राहुलला संघातून वगळण्यात आले आहे. राहुल गेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा भाग होता.
टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ (India Squad for T20 World Cup 2024) : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
राखीव : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान
टीम इंडियाचे टी-20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक – (T20 World Cup 2024 Schedule)
Covishield Vaccine Side Effects:कोरोना महामारीपासून बचाव व्हावा यासाठी लोकांना लस देण्यात आली. दरम्यान यावेळी ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेका लस लोकांना देण्यात आली होती. आपल्या भारतात अदार पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूटने ही लस तयार केली होती. देशभरातील अनेकांनी ही लस घेतली. साथीच्या आजारानंतर जवळपास 4 वर्षांनी AstraZeneca ने आता कबूल केलंय की, या लसीचे लोकांमध्ये दुर्मिळ दुष्परिणाम दिसून येऊ शकतात.
कोविशील्ड लसीमुळे हार्ट अटॅकचा धोका
एका कायदेशीर प्रकरणात, AstraZeneca ने कबूल केलं आहे की, कोविशील्ड आणि वॅक्सजेव्हरिया या ब्रँड नावाने जगभरात विकल्या जाणाऱ्या कोरोना लसीमुळे ब्लड क्लॉट्स होण्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. याशिवाय यामुळे हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक आणि प्लेटलेट्स कमी होऊ शकतात. कंपनीने असंही सांगितलंय की, हे केवळ अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये होईल आणि सामान्य लोकांना घाबरण्याची गरज नाही.
ब्रिटनमध्ये जेमी स्कॉट नावाच्या व्यक्तीने AstraZeneca कंपनीविरोधात कोर्टात केस दाखल केली आहे. या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, ॲस्ट्राझेनेकाची लस दिल्यानंतर मेंदूला हानी पोहोचल्याचं दिसून आलं. इतर अनेक कुटुंबांनीही लसीच्या दुष्परिणामांबाबत न्यायालयात तक्रारी केल्या आहेत.
यूके उच्च न्यायालयात उत्तर देताना, कंपनीने मान्य केलंय की, अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये त्यांच्या लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) होऊ शकतो. यामुळे लोकांना हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो. ही कबुली देऊनही कंपनी लोकांच्या भरपाईच्या मागणीला विरोध करत आहे. कंपनीचे म्हणण्यानुसार, इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण केल्यानंतर ही समस्या काही लोकांमध्ये दिसण्याची शक्यता आहे.
AstraZeneca-Oxford ही लस सुरक्षिततेच्या कारणास्तव यूकेमध्ये दिली जात नाही. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्यांचा दावा मान्य केल्यास कंपनीला मोठी रक्कम भरावी लागू शकते. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार हे पहावं लागणार आहे.
आवाज कोकणचा | सागरतळवडेकर : गेल्या वर्षी मी लिहिलेला मालवणी माणूस आणि रेल्वे हा उत्पन्नासंदर्भात लेख प्रचंड व्हायरल झाला होता त्याबद्दल सर्वांचे अजूनही आभार.
त्याच प्रमाणे आज मी कोकण रेल्वे मार्गावरील आर्थिक वर्ष २०२३-२४ चे प्रत्येक स्थानकाचे प्रवासी उत्पन्न आणि प्रवासी संख्या या ठिकाणी मांडणार आहे. हा सर्व डाटा माझा नसून माहितीच्या अधिकाराचा उपयोग करून मिळविलेला आहे. प्रत्येक स्थानकावर प्रवासी सुविधा ही त्या स्टेशनच्या वापरावर अवलंबून असते. ज्या ठिकाणी जास्त प्रवासी वर्दळ आणि त्यापासून मिळालेले उत्पन्न,त्या ठिकाणी जास्त सुविधा.
आज मी ह्या माहितीच्या आधारे काही तथ्य मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मला काही यातील जास्त माहिती नाहीय परंतु जेवढे समजते तेवढे मांडण्याचा नक्की प्रयत्न करतोय.
सावंतवाडी स्थानकाचे मागील आर्थिक वर्षी म्हणजेच २०२२-२३ ला १३ कोटी ४२ लाख एवढे होते.आणि एकूण प्रवासी संख्या ही ०६ लाख ९४ हजार एवढी होती. म्हणजेच प्रतिदिन सरासरी १९०२ प्रवाशांनी या स्थानकाचा वापर प्रवासासाठी केला.
या वर्षी म्हणजेच आर्थिक वर्ष २०२३-२४ ला सावंतवाडी स्थानकाचे उत्पन्न हे १४ कोटी ६८ लाख एवढे आहे. येथील प्रवासी संख्या ही ०७ लाख ७९ हजार एवढी आहे. आणि प्रतिदिन सरासरी २१३४ प्रवाशांनी या स्थानकाचा वापर प्रवासासाठी केला. या माहितीच्या आधारे आपण असा निष्कर्ष काढू शकतो की सावंतवाडी स्थानकाचे उत्पन्न गेल्यावर्षीच्या तुलनेत १.२६ कोटीने रुपयांनी वाढले,आणि एकूण प्रवास करणारे प्रवासी ८५ हजार ने वाढले म्हणजेच प्रवासी संख्या सरासरी प्रतिदिन २३२ ने वाढली देखील. परंतु या असे असताना देखील या स्थानकात नवीन एकही गाडीचा थांबा देण्यात आला नाही. कोरोना काळात काढून घेण्यात आलेल्या त्रिवेंद्रम राजधानी एक्स्प्रेस आणि कोचिवेली गरीबरथ एक्स्प्रेस चा थांबा देखील पुन्हा देण्यात आला नाही. आता अजून स्पष्ट समजण्यासाठी एक उदाहरण घेऊ.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख ३ स्थानके अनुक्रमे कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी.
कुडाळ स्थानकाचे उत्पन्न हे ३१ कोटी ६३ लाख एवढे आहे. आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत ३.१ कोटी रुपयांनी ते वाढले. या ठिकाणी एकूण १६ गाड्या म्हणजेच ७ दैनिक, एक प्रीमियम गाडी तेजस एक्स्प्रेस, जी आठवड्यातून ५ दिवस धावते, अजून एक प्रीमियम गाडी मडगाव राजधानी,जी आठवड्यातून २ दिवस धावते,५ साप्ताहिक गाड्या आणि २ स्पेशल गाड्या ज्या बरीच वर्षे स्पेशल म्हणून धावतात त्या मधे नागपूर मडगाव एक्स्प्रेस आणि जबलपूर कोइंबतूर एक्स्प्रेस चा समावेश आहे. ह्या गाड्या अप आणि डाऊन अश्या दोन्ही बाजूला धावत असल्याने त्यांचा एकूण फेऱ्या एका आठवड्यात ह्या १२८ एवढ्या आहेत.
कणकवली स्थानकाचा विचार केल्यास ह्या वर्षी कणकवली स्थानकाचे उत्पन्न हे ३० कोटी ६५ लाख एवढे आहे. मागच्या वर्षीचा तुलनेत हे ०४.५२ कोटी रुपयांनी हे वाढले या ठिकाणी एकूण १५ गाड्या (वंदे भारत पकडुन) थांबतात. या मध्ये ७ दैनिक, एक प्रिमियम गाडी वंदे भारत, एक आठवड्यातून ४ वेळा धावणारी (पावसाळ्यात आठवड्यातून दोन वेळा), २ गाड्या आठवड्यातून दोन वेळा धावणाऱ्या, आणि २ साप्ताहिक व दोन स्पेशल गाड्या (कुडाळ ला थांबतात त्याच) थांबतात. या गाड्यांचा दोन्ही बाजूने फेऱ्या असल्याने या ठिकाणी आठवड्यातून एकूण १२४ फेऱ्या (वंदे भारत वगळून, कारण या ठिकाणी ही ट्रेन नवीन सुरू केली असून वंदे भारतच्या वर्ष भरात केवळ १८० फेऱ्या झाल्यात. त्या पकडल्या तर कुडाळ पेक्षा जास्त फेऱ्या होतील.)
सावंतवाडी स्थानकाचा विचार केल्यास या ठिकाणी एका आठवड्यात एकूण ९२ (८८ – ९२ फेऱ्या, त्यातील एक गाडी पावसाळ्यात आठवड्यातून २ दिवस धावते आणि इतर वेळी ४ दिवस धावते) फेऱ्या होतात. आणि या ठिकाणी एकाही प्रीमियम दर्जाच्या गाडीला थांबा नाही.
असे असताना देखील येथील प्रवासी संख्या आणि उत्पन्न हे कमालीचे वाढले आणि भविष्यात ते वाढत जाईल. या ठिकाणी अजून एखादी नवीन दैनिक गाडी, एक प्रिमियम दर्जाची गाडी आणि एक साप्ताहिक गाडी चा थांबा दिल्यास आताच्या उत्पन्नात अधिक भर पडेल हे नक्कीच..
परंतु कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्ड थांबे देण्यासाठी आणि थांबे काढून घेण्यासाठी फक्त सावंतवाडी साठी असा कोणता निकष लावते ते माझ्या तरी समजण्याचा पलीकडे आहे. आम्ही गेल्या वर्ष भरात या ठिकाणी मंगलोर एक्स्प्रेस, वंदे भारत एक्स्प्रेस आणि नागपूर मडगाव एक्स्प्रेस किंवा दिल्ली ला जाणाऱ्या एर्नाकुलम – निजामुद्दीन एक्स्प्रेसचा थांबा मिळावा म्हणून कृतिशील पणे कोकण रेल्वे महामंडळ, खासदार, आमदार, मंत्री, केंद्रीय मंत्री आणि रेल्वे बोर्डाकडे सतत पाठपुरावा करतच आहोत तरी देखील आम्हाला यश आले नाही. आंदोलन करून देखील थांब्यासंदर्भात काही हालचाल होताना दिसत नाही.
परंतु आम्ही देखील हार मानणारे नाहीत. आमच्या हक्काचे एकूण तीन थांबे या स्थानकातून हया नाहीतर त्या कारणाने काढून घेण्यात आले, आम्ही देखील तीन थांबे मिळवण्यासाठी मेहनत घेऊच. रेल्वे जर बिझनेस बघते तर तो सावंतवाडीला आहे.
परंतु सावंतवाडीकडे रेल्वे का बघत नाही हाच माझ्या समोर मोठ्ठा प्रश्न आहे.येणाऱ्या काळात सावंतवाडीकरांचा भावनांचा उद्रेक नक्कीच होईल हे लक्षात असूद्या.आपल्याला जर हा लेख आवडला असेल तर शेअर नक्की करा.धन्यवाद.
मुंबई, दि. २९ एप्रिल : हार्बर मार्गावरून पनवेल ते सीएसएमटी धावणाऱ्या लोकलचा एक डबा सीएसएमटी रेल्वे स्थानकापूर्वी रुळावरून घसरला. ही घटना सोमवारी सकाळी ११.३५ च्या सुमारास घडली. त्यामुळे लोकल सेवा खोळंबली आहे. तसेच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सकाळी १०.०५ वाजता पनवेलवरून लोकल सीएसएमटीच्या दिशेने निघाली होती. ही लोकल सीएसएमटी येथे फलाट क्रमांक दोनवर येत असताना एका डब्याचे चाक रुळावरून घसरले.
या घटनेमुळे अनेक प्रवाशांनी लोकलमधून उड्या मारल्या. या मार्गावरील अनेक लोकल या घटनेमुळे रखडल्या आहेत. तसेच डाऊन मार्गावर परिणाम झाला आहे. त्यामुळे संपूर्ण हार्बर मार्ग प्रभावित झाला आहे. सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल मस्जिद स्थानकापर्यंत आणल्या जात आहेत. तसेच अनेक लोकल वडाळ्यापर्यंतच आणून पुन्हा परतीचा प्रवास करतील. दुरुस्तीचे काम वेगात सुरू आहे. या दुर्घटनेचा कोणताही परिणाम मुख्य मार्गावर झालेला नाही, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.
HSC and SSC result 2024 : दहावी आणि बारावीच्या निकालाच्या तारखेबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. बारावीचा निकाल 25 मे पर्यंत तर दहावी चा निकाल दिनांक 6 जून पर्यंत जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळातर्फे करण्यात देण्यात आली आहे.
उत्तर पत्रिका तपासण्याचे काम जोरात चालू असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच निकालाची नेमकी तारीख जाहीर करणार असून बारावीचा निकाल 25 मे पर्यंत तर दहावी चा निकाल दिनांक 06 जून पर्यंत जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थी दहावी आणि बारावीचा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या साईटवर जाऊन बघू शकतात.
दहावी आणि बारावीच्या मिळून एकून 31 लाख विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिलीये. बारावीच्या परीक्षा तब्बल 3 हजार 320 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आल्या. दुसरीकडे दहावीची परीक्षा 5 हजार 86 केंद्रावर घेण्यात आली. मंडळाकडून या परीक्षेची जोरदार तयारी करण्यात आली. काॅपीमुक्त परीक्षा करण्यासाठी मंडळाने अगोदरच कंबर कसल्याचे देखील यंदा बघायला मिळाले.
नांदगाव, दि. २८ एप्रिल : मटण भाकरीच्या प्रसादासाठी प्रसिद्ध असलेला नांदगाव येथील श्री देव कोळंबा देवाचा जत्रोत्सव येत्या रविवारी (दि. ०५ मे) होणार आहे. राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या या उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी होते.
‘कोळंब्याचा चाळा’ म्हणून महाराष्ट्रासह इतर राज्यात प्रसिद्ध असणारा आणि विशेष करून मुक्या प्राण्यांचा रक्षणकर्ता म्हणून कोळंबा देवाची सर्वदूर ख्याती आहे. श्री देव कोळंबाचा नवस फेडण्यासाठी श्रीफळासह कोंबड्या, बकरीचा बळी देण्याची व मटण भाकरीच्या प्रसादासाठीची जत्रा म्हणून याची ओळख आहे.
येथे हजारो वर्षांपासून श्रीदेव महादेवाचे निराकाररुपी लिंग गर्द अशा झाडीत होते. याच लिंगरुपी पाषाणाला स्थानिक ग्रामस्थ ‘श्री देव कोळंबा’, या नावाने गावाचा रक्षणकर्ता म्हणून पूजाअर्चा करतात. ‘‘आपल्या घराचे-गावाचे रक्षण कर, सांभाळ कर’’, असे म्हणून श्रद्धेने देवाच्या चाळ्याला कोंबडा व देवाला श्रीफळ अर्पण करतात. याच्या श्रद्धेची प्रचिती आल्याने आज लाखाहून अधिक श्री देव कोळंबाचे भक्त आहेत. पूर्वी जत्रेला शे-दीडशे भाविक दर्शनास येत. त्यांची संख्या आता लाखाच्या घरात पोचली असून प्रत्येक भक्ताला अनुभूती मिळत आहे. यानिमित्त सकाळी ८ ते ९ पूजाविधी, ९ ते २ नवस फेडणे, दुपारी १२ ते ४ नवीन नवस बोलणे आणि सायंकाळी चारनंतर महाप्रसाद वाटप असे कार्यक्रम होणार आहेत.