Mumbai Goa Highway | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओसरगाव येथील टोल नाका आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. मात्र या टोलवसुली वरून येथील वातावरण तापून तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना टोल माफी मिळाल्याखेरीज ओसरगाव टोल नाका सुरू होऊ देणार नाही, असा इशारा सर्वपक्षीय त्यांनी दिला होता. ही मागणी पूर्णपणे मान्य न करता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना 50% सुट मिळणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या निर्णयाला विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं सकाळी 10 वाजता टोलनाक्यावर आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकवटणार आहेत. टोलविरोधी कृती समिती सुद्धा या निर्णयाविरुद्ध आक्रमक झाली आहे, त्यामुळे आज ओसरगाव टोलनाक्यावर तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जानवली ते पत्रादेवी या 60 किमी लांबीच्या मार्गासाठी टोल वसूल केला जाणार आहे. आता, सिंधुदुर्गवासियांसाठी संपूर्ण टोल माफी करण्याच्या मागणीवर टोलविरोधी कृती समिती आक्रमक असताना दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं टोल वसुली करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे मंगळवारी ओसरगावमध्ये तणावाची स्थिती असण्याची शक्यता आहे. ओसरगाव टोल नाका येथील वसुलीचे कंत्राट कोरल असोसिएट या राजस्थानमधील कंपनीला देण्यात आलं आहे. आतापर्यंत तीन वेळा टोल नाका सुरू करण्याचे आदेश दिले होते.