सिंधुदुर्ग | वंदे भारत एक्सप्रेसला कुडाळ येथे थांबा मिळाला नसल्याने कुडाळवासिय प्रवासी नाराज झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या गाडीला एका स्थानकावर थांबा मिळणार हे निश्चित झाल्यापासून ते स्थानक कोणते असणार याबाबत प्रवाशांना मोठी उत्सुकता लागून राहिली होती.
साहजिकच तो थांबा या जिल्हय़ात मध्यवर्ती भागातील कुडाळ या स्थानकावर मिळण्याची अपेक्षा होती. मात्र या गाडीला अखेर कणकवली या स्थानकांवर थांबा मिळाला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वतः या एक्सप्रेसला कणकवली येथे थांबा मिळावा यासाठी प्रयत्न केले होते.
कुडाळवासियांची नाराजी दूर करण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेसला कुडाळ ऐवजी कणकवली येथे थांबा का देण्यात आला याचे स्पष्टीकरण माजी खासदार नीलेश राणे यांनी ट्विट करून काल केले आहे. त्यांच्या मते ”मागच्या नऊ वर्षांमध्ये कुडाळ रेल्वे स्टेशनसाठी कुठल्याही प्रकारचं अपग्रेडेशन झालेलं नाही. भारतीय रेल्वे जेव्हा एका महत्त्वाच्या रूट वर ट्रेन सुरू करते तेव्हा स्टेशनचा ग्रेड तपासते. मागच्या नऊ वर्षांमध्ये कुडाळ रेल्वे स्टेशन चं कसलंही अपग्रेडेशन चं काम झालं नसल्यामुळे कुडाळ रेल्वे स्थानकाला वंदे भारत ट्रेन स्टॉप मिळाला नाही आणि मागच्या पंचवीस वर्षांपासून कणकवली रेल्वे स्टेशन हेच जिल्ह्याचे प्रमुख रेल्वे स्टेशन म्हणून बघितले जाते. त्यामुळे या एक्सप्रेसला कणकवली येथे थांबा देण्यात आला आहे.”
माझे काही सहकारी वंदे भारत ट्रेन जी ३ जून पासून कोकणात धावणार आहे त्या ट्रेनला कुडाळ स्टेशनसाठी थांबा मिळाला नाही याबद्दल निराश झाले पण आपल्याला मी सांगू इच्छितो मागच्या नऊ वर्षांमध्ये कुडाळ रेल्वे स्टेशनसाठी कुठल्याही प्रकारचं अपग्रेडेशन झालेलं नाही. भारतीय रेल्वे जेव्हा एका…
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 1, 2023
त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. यातील काही मोजक्या खालीलप्रमाणे…
मागील २ टर्म कुडाळ मतदारसंघात शिवसेनेचे (उबाठा) आमदार/खासदार निवडून आले आहेत. याचा राग मनात ठेवून राणे परिवाराने कुडाळला डावलले असल्याचा आरोप काहींनी केला आहे.
येथील आमदार वैभव नाईक यांच्याकडून कुडाळ स्थानकाकडे दुर्लक्ष झाले असून अपग्रेडेशनचे काम झाले नसल्याने थांबा मिळाला नसल्याचा आरोप काहींनी केला आहे.
सावंतवाडी स्थानकावर सर्व अपग्रेडेशन झाले आहे, एवढेच नव्हे तर या स्थानकाला टर्मिनस चा दर्जा देण्यात आला आहे. असे असूनही सावंतवाडी स्थानकावर या एक्सप्रेसला थांबा का देण्यात आला नाही असाही प्रश्न विचारण्यात आला आहे.