Mumbai Goa Highway :दिनांक १५ सप्टेंबर पूर्वी मुंबई गोवा महामार्गाच्या सिंगल लेनवरून वाहतूक खुली करण्यात येईल असे आज मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी कशेडी बोगदा उद्घाटन आणि वृक्षारोपण प्रसंगी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दर १५ किमी अंतरावर नागरी सुविधा केंद्र
मुंबई-गोवा महामार्गाच्या सिंगल लेनचे ९०% काम पूर्ण झाले आहे. सध्या काँक्रिटीकरणाच्या या कामातील महत्त्वाचा क्युरिंग पिरियड सुरु आहे.तो येत्या दोन दिवसांत पूर्ण करून वाहतुक सुरू करून देण्यात येणार आहे. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या आणि विशेषतः वाहन चालकांच्या सोयीसाठी महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून दर १५ किमी अंतरावर नागरी सुविधा केंद्र उभारण्यात आले आहेत. याठिकाणी चहा-पाण्याची व्यवस्था, शौचालय सुविधा, पोलीस मदत कक्ष, वाहनचालकांसाठी आराम कक्ष अशा अत्यावश्यक सोयी-सुविधा पुरवण्यात येत आहेत असे ते म्हणालेत.
कशेडी बोगद्यामुळे वेळेची बचत होणार.
कशेडी बोगदा वाहतुकीसाठी खुला झाला आहे. हा बोगदा एकूण दोन किलोमीटरचा असून या बोगद्याला असलेले रस्ते धरून हा सगळा मार्ग नऊ किलोमीटरचा आहे. अशा या बोगद्यामुळे पोलादपूर ते कशेडी हे अंतर अवघ्या १० ते १५ मिनिटांत कापता येणार आहे. त्यामुळे वाहनाने जाणाऱ्या प्रवाशांचा जवळपास ४५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांचा प्रवास सुखाचा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मालवण : चालत्या रिक्षात माकडाने उडी घेतल्याने चालकाचे नियंत्रण सुटून रिक्षा उलटून झालेल्या अपघातात रिक्षाचालक जागीच ठार झाल्याची घटना मालवण येथे घडली आहे. या जयराम ऊर्फ बाबजी दिगंबर मसूरकर (वय ५५, रा. खैदा कोळंब) असे त्या रिक्षाचालकाचे नाव आहे.
ही काल सकाळी साडेअकराच्या सुमारास मसूरकर रिक्षा (एमएच ०७ एएच १८६०) घेऊन मालवणहून आडारी मार्गे खैदाच्या दिशेने जात होते. चढावाच्या रस्त्यावर मसूरकर यांची रिक्षा पोहोचली. यावेळी बाजूच्या झाडीतून आलेल्या माकडांच्या कळपातील एकाने मसूरकर यांच्या रिक्षामध्ये उडी घेतली.यामुळे मसूरकर यांचे नियंत्रण सुटून रिक्षा उलटली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मसूरकर जागीच ठार झाले.
पोलिस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, हवालदार हेमंत पेडणेकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटना समजताच येथील रिक्षा चालकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली. मसूरकर यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
Konkan Railway News :गणेश चतुर्थी सण जवळ येत आहे; चाकरमान्यांची गावी जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. मध्य रेल्वे आणि पाश्चिम रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त गाड्या सोडून प्रवाशांची सोय केली आहे. तरीही या फेर्या अपुऱ्या पडताना दिसत आहेत. या कारणास्तव या मार्गावर गणेशोत्सवासाठी चालविण्यात येणार्या काही विशेष गाड्यांच्या डब्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.
खालील गाड्या अतिरिक्त डब्यांसहित चालविण्यात येणार आहेत.
1)01155/01156 दिवा-चिपळूण मेमू विशेष गाडी – एकूण 36 फेऱ्या (अप आणि डाऊन)
ही गाडी एकूण 8 डब्यांसह चालविण्यात येणार होती तिचे 4 डबे वाढविले असून ही गाडी आता 12 डब्यांसहित चालविण्यात येणार आहे.
2) 01165/01166 मुंबई आणि मंगळुरू जंक्शन विशेष सेवा – एकूण 16 फेर्या (अप आणि डाऊन)
ही गाडी एकूण 20 डब्यांसहित चालविण्यात येणार होती. मात्र या गाडीला दोन अतिरिक्त स्लीपर कोच जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे या गाडीच्या डब्यांची संख्या 22 होणार आहे.
3) 01167/01168 एलटीटी – कुडाळ विशेष सेवा – एकूण 24 फेर्या (अप आणि डाऊन)
ही गाडी सुद्धा एकूण 20 डब्यांसहित चालविण्यात येणार होती. मात्र या गाडीला दोन अतिरिक्त स्लीपर कोच जोडण्यात येणार आहे. त्यामुळे या गाडीच्या डब्यांची संख्या 22 होणार आहे.
या अतिरिक्त डब्यांमुळे प्रतीक्षा यादीत आरक्षण असणार्या प्रवाशांचा फायदा होणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घेऊन या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे
कोकण विकास समितीच्या मागणीला यश
दिवा-चिपळूण, दिवा-रत्नागिरी या मेमू गाड्यांच्या डब्यांची संख्या 16 करावी अशी मागणी कोकण विकास समितीने रेल्वेकडे केली होती. त्यांची मागणी अंशतः का होईना, ती मान्य करून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दिलासा दिला आहे.
वाचकांचे व्यासपीठ :कोकणात गणेशोत्सवाला येणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता रेल्वे स्टेशन व बस स्थानक येथील गर्दीवर नियंत्रणासाठी व आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीकरिता स्वयं सेवक, स्वयंसेवी संस्था यांनी पुढे आले पाहिजे.गणपती विसर्जन ठिकाणी अनेक स्वयंसेवी संस्था सेवा देतात. अनिरुद्ध अकॅडमी, संत निरंकारी मिशन ,नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान असे अनेक संस्था आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी व निर्माण झाल्यानंतर सेवा देतात. त्याच धर्तीवर कोकण गणेशोत्सवाला येणाऱ्या भाविकांसाठी मदत होईल. कोकणातील रेल्वे स्टेशन बस स्थानके येतील सेवा सुविधांचा अभाव आहे .काळजी घेणे गरजेचे आहे. स्वयंसेवी संस्थांची भाविकांसाठी सेवाभावी उपक्रम ही पण एक गणपती बाप्पा चरणी सेवा अर्पण होईल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे आणि पनवेल या स्थानकावर गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. गर्दी आणि नियोजनाअभावी अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागते. दुसरीकडे कोकणातील स्थानकांवरील अपुऱ्या सुविधांमुळे येणार्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागतो अशा वेळी स्वयंसेवी संस्थांनी यात लक्ष घालून मदत केल्यास कित्येक चाकरमानी प्रवाशांचा त्रास नक्किच कमी होईल.
भालचंद्र माने.नेरूळ, नवी मुंबई.
रायगड :मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे कोकणवासियांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरत आहे. आता तर या खड्ड्याबाबत अचंबित करणारी बातमी समोर आली आहे. या मार्गावरील खड्ड्यांमुळे एका महिलेची प्रस्तुती चक्क एसटी बस मध्ये झाल्याची ही बातमी आहे.
मुंबई गोवा महामार्गावरून एसटीतून प्रवास करणाऱ्या महिलेची एसटीतच प्रसूती होण्याची घटना घडली आहे मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचा व त्यावरील निर्माण झालेले खड्डे हा विषय सध्या चर्चेत आहे त्यातच या खड्डेमय रस्त्यावरून एसटीबस मधून प्रवास करणाऱ्या महिलेची एसटी बस मध्ये प्रसूती होण्याचा हा प्रकार ९ सप्टेंबर रोजी रविवारी सायंकाळी उशिरा घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यात महाड एसटी आगारातील चालक गोविंद जाधव आणि वाहक नामदेव पवार हे आपली ड्युटी क्रमांक ४७/४८ करीत असताना एका प्रवासी महिलेस प्रसूती वेदना सुरू झाल्या. मूळ रोहा आगाराच्या असलेल्या या बसमध्ये त्या महिलेची प्रसूती झाली. आपल्या कर्तव्यावर तत्पर असलेले चालक जाधव आणि वाहक पवार क्षणाचाही विलंब न लावता या महिलेला कोलाड येथील शासकीय रुग्णालयात घेऊन गेले. बाळ आणि आई दोघेही सुखरूप दवाखान्यात पोहोचल्याने
बसमधील अन्य प्रवाशांनीही त्यांचे आभार मानले.कोलाड आंबेवाडी येथील रुग्णालयात उपचार केल्यावर बाळाची प्रकृती मात्र
नाजूक असल्याने या महिलेला अलिबाग येथील उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ हलवण्यात आले..
मुबई– दिनांक ०१ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग विमानतळावर नियमित सेवा देण्याचे विधान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविन्द्र चव्हाण यांनी केले होते. मात्र आता त्यांनी घुमजाव केले असल्याचे दिसत आहे. नियमित चिपी विमानसेवा पाहणार्या एअरलाईन्सची परिस्थिती नाजुक बनली असल्याने नियमित सेवा देता येत नसल्याने ही सेवा शक्य नाही असे ते आता म्हणाले आहेत.
नियमित चिपी विमानसेवा पाहणार्या एअरलाईन्सची परिस्थिती नाजुक बनली आहे. सद्यस्थितीत केवळ 7 विमाने सुरू होती. त्यापैकी आता केवळ 4 विमानेच सुरू आहेत. अजुनही त्या एअर लाईन्सची परिस्थिती नाजुक बनत चालली आहे. चिपी विमानतळावरील सेवा सुरू राहण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमाणे शिवसेना ठाकरे गटाचे खा. विनायक राऊत यांच्यासह आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करत आहोत असे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
कुडाळ एमआयडीसी येथे शनिवारी माध्यमांशी बोलताना पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बॅकेंचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ. संध्या तेरसे, भाई सावंत, राजु राऊळ, दिपक नारकर, श्रीपाद तवटे, चेतन धुरी आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, दि. 1 सप्टेंबर पासून मुंबई ते चिपी सिंधुदुर्ग विमानसेवा सुरळीत होणे गरजेचे होते. यासाठी चिपी विमानतळा प्रश्नी बर्याच बैठका झाल्या. पूर्वी उडाण योजनेअंतर्गत एअरलायन्सची सेवा सुरू झाली होती. ज्या कंपनीला हा ठेका दिला होता. त्या एअरलायन्स कंपनीचा ठेका ऑक्टोबर पर्यंत आहे. मुंबई येथे चिपीसाठी एकच स्लॉट उपलब्ध आहे.