मुंबई ते बांदा शयनयान प्रवास फक्त ५ रुपयांत; रेल्वेने वाऱ्यावर सोडलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा दिलासा

मुंबई :एसटीची शयनयान Sleeper बस सेवा राज्यात सुरू करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा या सेवेची सुरवात झाली असून पहिली बस सेवा मुंबई ते बांदा अशी सुरू करण्यात आली आहे.
रेल्वे आणि ईतर खाजगी बस प्रमाणे लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासासाठी ही सेवा निश्चितच उपयोगी ठरणार आहे. मात्र या सेवेचा विशेष लाभ ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे.
याचे कारण असे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने MSRTC या बस साठी ईतर बस प्रमाणे देण्यात येणार्‍या सवलती या बस दिल्या आहेत. त्यात महिलांना अर्धे तिकीट आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास मोफत या महत्त्वाच्या सवलतींचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांना कुठल्याही स्थानका दरम्यान च्या प्रवासासाठी फक्त 5 रुपये एवढे आरक्षण शुल्क भरून प्रवास करता येणार आहे.
आरोग्याच्या समस्या असल्याने दहा ते बारा तास बसुन प्रवास करणे हे अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्रासदायक आणि गैरसोयीचे होते. सध्या रेल्वे प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या तिकिट दरांमध्ये असलेल्या सवलती कोरोना काळापासून बंद केल्या आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आरामदायक आणि मोफत असलेला पर्याय एसटीने उपलब्ध करून दिला आहे. याचा फायदा राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना नक्किच होईल.
Facebook Comments Box

”त्यादिवशी विवाह मुहुर्त असल्याने… ” निवडणूकीच्या तारखेत बदल करण्याचे दिले गेले अजब कारण…

राजस्थान :निवडणूक आयोगाने राजस्थान विधानसभेसाठी मतदानाची तारीख बदलली आहे. 23 नोव्हेंबर ऐवजी आता 25 नोव्हेंबरला राजस्थानमध्ये मतदान होणार आहे. ही तारीख बदलण्याचे कारण ऐकून तुम्हीपण थोडे आश्चर्यचकित व्हाल. 

23 नोव्हेंबर या दिवशी लग्नाचा चांगला मुहूर्त आहे. त्यामुळे त्याचा मतदानावर परिणामाची भीती सर्वच पक्षांनी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून हा बदल करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 

दिनांक 23 नोव्हेंबर हा दिवस विवाह आणि मंगलकार्यासाठी शुभ असल्याने या दिवशी मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे आणि इतर सामाजिक कार्ये असतिल त्यामुळे या दिवशी मतदान करणे मतदारांना गैरसोयीचे जाईल. तसेच त्याचा परिणाम होवूनकमी मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या तारखेत बदल करावा अशी निवेदने राजकीय पक्षांकडून आणि सामाजिक संस्थे कडून आली होती. त्याचप्रमाणे समाज माध्यमातून सुद्धा हा याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. या सर्वांचा विचार करून आपण या तारखेत बदल करत असल्याचे भारतीय निवडणूक आयोगाने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे. 

 

 

Facebook Comments Box

फक्त चीन, मलेशिया देशांत अस्तित्वाची नोंद असलेला दुर्मिळ प्रजातीचा ‘जम्पिंग स्पायडर’ सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडला

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गच्या कुडाळमधील वेताळबांबर्डे येथील अभ्यासक गौतम कदम आणि केरळमधील अभ्यासकांनी जम्पिंग स्पायडर’ च्या नवीन कोळीच्या प्रजातीचा शोध घेतला आहे.चीन, मलेशियामध्ये झालेल्या नोंदीनंतर भारतातील या कोळ्याच्या प्रजातीची ही पहिलीच नोंद सिंधुदुर्गात झाली आहे. ऋषिकेश त्रिपाठी, गौतम कदम या दोन संशोधकांनी गेली दोन वर्षापासून या कोळीवर संशोधन केलं आहे. ‘जम्पिंग स्पायडर’ च्या नवीन कोळीच्या प्रजातीचा शोध घेतला आहे.

‘स्पारबांबॅरस सिंधुदुर्ग’ या नावाने या ‘जम्पिंग स्पायडर’ कोळीचं नामकरण करण्यात आलं आहे. या नावाने आता जगभरात या कोळीची ओळख होणार आहे. स्पारबांबॅरस हे नाव हा कोळी बांबूच्या झाडावर याचा अधिवास असल्याने तस नामकरण करण्यात आले आहे. हा कोळी ज्या ठिकाणी जाळ बनवतो त्याचं ठिकाणी जाळ्यात अडकलेल्या कीटकांचा भक्ष करतात. भारतात जवळपास 2000 कोळ्याचे प्रजाती सापडतात. तर जगभरात 51,000 कोळ्यांचे प्रजाती सापडतात. जम्पिंग स्पायडरच्या 300 प्रजाती भारतात आढळतात.

Facebook Comments Box

वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामन्यासाठी मुंबईहून दोन विशेष वंदे भारत ट्रेन

मुंबई : वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामन्यासाठी मुंबईहून गुजरातमध्ये जाणाऱ्या क्रिकेटप्रेमी प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेने ‘मुंबई ते अहमदाबाद’ दोन विशेष वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचे नियोजन केले आहे. क्रिकेट सामन्यांसाठी विशेष एक्स्प्रेस चालवण्याची भारतीय रेल्वे इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.

यंदाच्या वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामना शनिवारी, १४ ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरू होणार आहे. स्टेडियमची आसनक्षमता एक लाख ३२ हजार असून सामन्यांची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. यामुळे मुंबई ते अहमदाबाददरम्यान सामन्याच्या आदल्या दिवशी रात्री उशिरा आणि सामन्याच्या दिवशी पहाटे अशा दोन वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचे नियोजन आहे.

तात्पुत्या वेळापत्रकानुसार १३ ऑक्टोबरला रात्री दहा वाजता मुंबईहून अहमदाबादसाठी वंदे भारत एक्स्प्रेस रवाना होईल आणि १४ ऑक्टोबरला पहाटे सहा वाजता अहमदाबादमध्ये पोहोचेल. दुसरी विशेष एक्स्प्रेस मुंबईहून सामन्याच्या दिवशी म्हणजे १४ ऑक्टोबरला पहाटे पाच वाजता सुटेल आणि १२ वाजेपर्यंत अहमदाबादला पोहोचेल. तूर्त गाड्यांचे थांबे निश्चित करण्यात आले नसले, तरी महत्त्वाच्या स्थानकांवर गाड्यांना थांबा देण्यात येणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Facebook Comments Box

”तेथे सभा घेतलीही असती. परंतु…” शिवाजी पार्कवर सभा न घेण्याबद्दल नेमके काय बोलले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? येथे वाचा..

मुंबई : शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार याबाबत दोन्ही बाजूने तुफान राडा चालू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कवर सभा घेणार नाही असे जाहीर करून या विषयाला पूर्णविराम लावला. आपण माघार का घेतली याबाबत त्यांनी समाज माध्यमातून स्पष्टीकरणही दिले.

या स्पष्टीकरणात ते म्हणाले

“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा बुलंद आवाज ज्या शिवाजी पार्कवर शिवसैनिकांनी ऐकला, ज्या मैदानातून शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसला गाडण्याचा विचार मांडला, ज्या मैदानातून प्रखर हिंदुत्वाचा जागर त्यांनी केला, त्याच मैदानातून काँग्रेसला डोक्यावर घेतले जाणार असेल तर तो शिवसेनेचा दसरा मेळावा असूच शकत नाही.

बाळासाहेबांच्या पवित्र विचारांनी भारावलेले #शिवतीर्थ गेल्याच वर्षी या मंडळींनी बाटवले आहे. आम्ही ठरवले असते तर या मैदानावर सभा घेतलीही असती. परंतु, राज्याचा प्रमुख म्हणून मला कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणायची नव्हती.

बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व एवढे अस्सल आहे की ते कुठेही सांगितले तरी त्यांचे तेज कमी होत नाही. त्या विचारांना शिवाजी पार्कची गरज नाही. आम्ही जाऊ तिथे त्यांचे विचार नेऊ. आपल्याला वारसा मिळाला असे म्हणणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा म्हणजे खरे काय ते कळेल.

कोण कुठे बोलतो, यापेक्षा काय बोलतो हे महत्त्वाचे आहे. तोंड उघडले की रडगाणेच गाणार असाल तर ते कोण ऐकणार? बाळासाहेबांचा विचार त्यांनी पायदळी तुडवलाय, हे जनतेने पाहिले आहे. आम्ही बाळासाहेबांनी पेरलेले, जपलेले विचार हृदयात घेऊन पुढे निघालोय. विचारांचा वारसा आमच्याकडेच आहे. छाती बडवून रडायला शिवाजी पार्क ही जागा नाही, जिथे बाळासाहेबांनी अंगार फुलवला होता तिथे आता हा वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार”

Facebook Comments Box

मध्य रेल्वेच्या १० गाड्यांच्या डब्यांत कायमस्वरूपी वाढ; कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या एका गाडीचा समावेश

Konkan Railway News :मध्यरेल्वेच्या काही गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद आणि गर्दी लक्षात घेऊन काही गाड्यांच्या डब्यांत वाढ करण्याचा निर्णय मध्य रेल्वेतर्फे घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार एकूण 10 एक्सप्रेस गाड्यांमध्ये  एकुण 34 (सर्व 10 गाड्यांचे मिळून) डबे कायमस्वरुपी वाढविण्यात येणार आहेत. 

या गाड्यांमध्ये कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणार्‍या नागपूर-मडगाव-नागपूर या गाडीचा समावेश आहे. या गाडीला एक थ्री टायर एसी आणि एक जनरल असे दोन अतिरिक्त डबे कायमस्वरूपासाठी जोडण्यात येणार आहेत. 

Nagpur – Madgaon Jn Special (Bi-Weekly) 01139 या  गाडीला दिनांक 14 ऑक्टोबर 2023 पासून तर 

Madgaon Jn – Nagpur Special (Bi-Weekly) 01140 या  गाडीला दिनांक 15 ऑक्टोबर 2023 पासून हे अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत.

या गाडीच्या डब्यांची सुधारित संरचना 

2 Tier AC – 01, 3 Tier AC – 05, Sleeper – 11, General – 05, SLR-02 =एकूण 24 आयसिएफ कोच. 

Facebook Comments Box

राज्यातील मुलींना १ लाख १ हजार रुपये लाभ देणाऱ्या ‘लेक लाडकी’ योजनेस मंत्रिमंडळाकडून मान्यता.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज मंगळवारी  पार पडली. या बैठकीत मुलींसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मार्च 2023 च्या आर्थसंकल्पीय अधिवेशनात लेक लाडकी योजनेची (Lek Ladki Yojana) घोषणा झाली होती, या योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. या योजनेनुसार, मुलगी जन्माला आल्यापासून ते मुलगी सज्ञान होईपर्यंत तिला आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेनुसार, राज्यात मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये देण्यात येणार आहेत. तर मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर मुलीला रोख 75 रुपये देण्यात येतील.
या ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना मिळणार आहे.  
अशी मिळणार मुलींना आर्थिक मदत
मुलगी जन्माला आल्यानंतर 5,000 रुपये
मुलगी पहिलीत गेल्यावर 6,000 रुपये
मुलगी सहावीत गेल्यावर 7,000 रुपये
मुलगी अकरावीत गेल्यावर 8,000 रुपये
मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये 
अशा रितीने मुलीला एकूण 1 लाख 1 हजार रुपये एवढा लाभ राज्य सरकारकडून मिळणार आहे.
Facebook Comments Box

दिवा सावंतवाडी एक्सप्रेसला जोडण्यात आलेल्या एसी डब्यांना मुदतवाढ

Konkan Railway News : गाडी क्रमांक 50107 / 50108 सावंतवाडी – मडगाव – सावंतवाडी आणि त्याच रेकसह प्रवास विस्तार करणारी गाडी क्रमांक 10105 / 10106  दिवा – सावंतवाडी – दिवा एक्सप्रेस या गाड्यांना यंदाच्या  गणेशोत्सवासाठी  प्रथमच इकॉनॉमी थ्री टायर श्रेणीचे दोन वातानुकूलित डबे जोडण्यात आले होते. प्रवाशांची मागणी आणि गरज लक्षात घेऊन हे डबे  पुढील सूचना मिळेपर्यंत या गाडीला कायम ठेवण्यात येणार आहेत अशी माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.  
मडगाव ते सावंतवाडी आणि पुढे सावंतवाडी दिवा या गाडीच्या प्रवासाला अधिक आरामदायी बनवण्यासाठी वातानुकूलित डबे जोडले जावेत अशी मागणी रेल्वेकडे करण्यात आले होती. कोकण रेल्वेने नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवा त्याची अंमलबजावणी देखील केली. गणेशोत्सवात रेल्वेने जाहीर केल्याप्रमाणे इकॉनोमी थ्री टायर श्रेणीचे दोन डबे 14 ऑक्टोबर 2023 पर्यंत राहतील असे कळवले होते. मात्र आता त्यांना पुढील सूचनेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Facebook Comments Box

सावंतवाडी टर्मिनससाठी निधी ‘सिंधुरत्न’ योजनेतून उपलब्ध करून दिला जाईल; दीपक केसरकर यांची ग्वाही

सावंतवाडी: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्या सावंतवाडी रेल्वे स्थानकावर थांबल्या पाहिजेत यासाठी आग्रही आहे. सावंतवाडी टर्मिनस देखील झाले पाहिजे. कोकण रेल्वेकडे निधी नसेल तर सिंधुरत्न योजनेतून उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी दिली.
खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे स्वप्न निधी अभावी धुसर झाले अशा प्रकारे केलेले वक्तव्य चुकीचे आहे. रखडलेले काम मार्गी लागण्यासाठी सिंधुरत्नमधून मी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देईन. त्याचबरोबर वंदे भारतसह अन्य गाड्या थांबविण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे आपण मागणी केली आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे दिली
खासदार राऊत यांनी सावंतवाडी टर्मिनसचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी रेल्वेकडे निधी नाही, त्यामुळे हा प्रकल्प होण्याची शक्यता धुसर बनली आहे, अशी वक्तव्य केले होते. याबाबत श्री. केसरकर यांना विचारले असता ते म्हणाले, “याठिकाणी वंदे भारत ट्रेनसोबत अन्य महत्वाच्या गाड्या थांबविण्यासाठी मी केंद्रीय रेल्वेमंत्र्याकडे मागणी केली आहे. टर्मिनसचे स्वप्न धुसर होणार, असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. काही झाले तरी ते काम पुर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेला निधी मी सिंधुरत्न योजनेतून उपलब्ध करून देणार आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची नुकतीच भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सुविधा व रेल्वे गाड्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. 
Facebook Comments Box

सावंतवाडी: माडखोल व कारिवडे येथील चार शाळा ‘निपुण शाळा’ म्हणून घोषित

सावंतवाडी: निपुण भारत अंतर्गत माडखोल केंद्रातील चार शाळांनी गुणवत्तेची प्रमुख तीन ध्येय पूर्ण केल्याने या शाळांना ‘निपुण शाळा’ म्हणून घोषित करण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रथमच या चार शाळा ‘निपुण शाळा’ म्हणून घोषित झाल्या असून आता माडखोल केंद्रातील सर्व प्राथमिक शाळा घोषित करण्यात येणार असल्याची माहिती माडखोल केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर यांनी दिली.
निपुण शाळा घोषणेची १०० टक्के उद्दिष्ट यशप्राप्ती करणाऱ्या शाळांमध्ये कारिवडे डंगवाडी, कारिवडे आपट्याचे गाळू माडखोल धुरीवाडी, माडखोल बामणादेवी या शाळांचा समावेश आहे. या चारही निपुण शाळांना आयएसओ मानांकित शाळा माडखोल धवडकी शाळा नं. २ चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय राऊत, शाळेच्या मुख्याध्यापिका भावना गावडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. निपुण शाळा घोषणेची १०० टक्के उद्दिष्टे पूर्ण केल्यानंतर त्या शाळांनी त्याची घोषणा करायची आहे. या शाळेतील शिक्षक एकसमन्वय आणि समाधानाची जाणीव यातून शैक्षणिक कार्य करतात. त्यामुळे निपुण शाळेचे सर्व श्रेय या शाळेतील शिक्षकांचे असून त्यांना गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांचेही मार्गदर्शन मिळत असल्याचे वालावलकर यांनी सांगितले. यावेळी वारंग, शुभदा (डंगवाडी), सतीश राऊळ (आपट्याचे गाळू), प्रशांत कांदे (धुरीवाडी), अमिषा कुंभार (बामणादेवी) या निपुण शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक अरविंद सरनोबत यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search