मुंबई : मुंबई पश्चिम उपनगरी रेल्वे डब्यांवर लवकरच पॅनोरमा डिजिटल डिस्प्ले बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता रेल्वे प्लॅटफॉर्म कडेच्या बाजूने देखील सर्व माहिती समजणार आहे. ही माहिती इंग्रजी, मराठी आणि हिंदी अशा तिन्ही भाषांमध्ये ३ सेकंदांच्या अंतराने दिसेल.
उपनगरी रेल्वेच्या १२ डब्यांच्या गाडीच्या दर्शनी भागावर दोन्ही बाजूला मिळून एकूण आठ डिजिटल डिस्प्ले बसविण्यात येणार आहेत. ज्यामुळे प्रवाशांना ट्रेनचा क्रमांक, ट्रेन सुरू होण्यापूर्वी गार्डने दिलेली माहिती आता प्लॅटफॉर्मवर बसूनदेखील मिळविणे शक्य होणार आहे.
सध्या डब्यांच्या आतमध्ये आणि मोटरमन केबिनच्या दर्शनी भागावर लोकांना प्रवासाबाबत माहिती मिळत होती. पण, प्लॅटफॉर्मवर थांबलेल्या प्रवाशांना ती सहजरीत्या समजत नव्हती. यासाठी आता रेल्वेने डब्यांच्या बाहेरील बाजूसदेखील माहिती प्रदर्शित करणार आहे. सध्या एका गाडीवर असा डिस्प्ले बसविण्यात आला असून, येत्या काळात पश्चिम रेल्वेच्या आणखीन १० गाड्यांवर असे डिस्प्ले बसविण्यात येणार आहेत.
पॅनोरमा डिस्प्लेची वैशिष्ट्ये काय ?
१) फुल एचडी टीएफटी (पातळ फिल्म ट्रान्झिस्टर) डिस्प्ले.
२) डिस्प्ले याडफ काचेने संरक्षित.
३) माहिती ५ मीटर अंतरापर्यंत स्पष्ट दिसण्यासाठी कॉन्ट्रास्ट सेन्सरद्वारे स्वयंचलितपणे नियंत्रित केली जाणार आहे.
४) नट सैल झाल्यास डिस्प्ले पडू नये म्हणून सर्व नट स्लिप्ट पिनने लॉक केले आहेत.
मुंबई: वांद्रे टर्मिनस – मडगाव द्वि-साप्ताहिक एक्सप्रेसला केंद्रीय रेल्वे वाहतूक मंत्री आश्विनी वैष्णव यांनी हिरवा बावटा दाखवून मार्गस्थ केले. बोरिवली स्थानकावर या एक्सप्रेसच्या शुभारंभाचा कार्यक्रम दुपारी साडे तीन वाजता पार पडला.
पश्चिम रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या या ट्रेनमुळे कोकणात जाणाऱ्यांसाठी नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक्सप्रेसला हिरवा बावटा दाखवला. यावेळी बोरिवली रेल्वे स्थानकावर भाजप नेते पियुष गोएल, प्रविण दरेकर यांच्यासह रेल्वे अधिकारी व राजकीय नेते उपस्थित होते.
बोरिवली – मडगाव ट्रेन क्रमांक ०९१६७ ला बावटा दाखवल्यानंतर ट्रेनने मडगावच्या दिशेने प्रस्थान केले.
वांद्रे टर्मिनस – मडगाव द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस कोकणात आर्थिक विकास वाढवेल तसेच, या ट्रेनचा स्थानिक व्यापार आणि व्यवसायांना फायदा होणार आहे. तसेच, सिंधू एक्स्प्रेसद्वारे प्रवास सुलभ झाल्याने या प्रदेशाच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल.वांद्रे टर्मिनस ते मडगाव दर बुधवार आणि शुक्रवार तर, मडगाव ते वांद्रे टर्मिनस दर मंगळवार आणि गुरुवार ही ट्रेन धावणार आहे. प्रवाशांना IRCTC च्या संकेतस्थळावरुन यासाठी बुकींग करता येणार आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने पश्चिम मार्गावर वांद्रे – मडगाव एक्सप्रेस सुरु करण्याचा निर्णय घेतला.
गणेशोत्सवादरम्यान प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना या ट्रेनमुळे प्रवासाचा आणखी एक सोयीस्कर आणि आरामदायी पर्याय उपलब्ध झाला आहे.
सिंधुदुर्ग: मालवण राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानंतर अवघ्या ९ महिन्यात कोसळला. तमाम महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या महाराजांची अशी अवहेलना खुद्द महाराष्ट्रातच होत असेल तर त्यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते? महाराजांची यापेक्षा मरणोत्तर अपमान आणि अवहेलना ती कोणती?
घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यादृष्टीने कारवाई केली गेली पाहिजे होती. कोणी जबाबदार नेत्यांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे होती. मात्र घडले विपरीत…. कोणत्याही गोष्टीतील राजकीय फायदा बघणाऱ्या राजकारण्यांनी या घटनेचेही राजकारण सुरु केले. काल ठाकरे गट आणि राणे समर्थक एकाच वेळी राजकोट किल्ल्यावर आल्यावर खूप मोठा राडा झाल्याची घटना घडली. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते एकमेकांशी भिडले. या राड्याचे विडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेत. हे विडिओ बघताना ही घटना यूपी बिहारमध्ये घडत असल्याचे भासत होते.
सिंधुदुर्ग जिल्हा आणि राडा हे आता जणू समीकरणच झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे नाव खराब होत आहे. याला जबाबदार आहेत येथील राजकारणी. पण कालचा विषय हा राजकारणाचा नव्हताच. तरी यांनी ती संधी वाया जाऊ दिली नाही. अगदी प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार घडला. पुतळा कोसळल्यानंतर महाराज येथून गायबच झाले जणू. मुख्य विषय बाजूलाच राहिला आणि त्याची जागा राजकारणाने घेतली. संपूर्ण देशात ज्या महाराजांची आराधना केली जाते त्यांचा पुतळा आपल्या घरात पडला ही शरमेची गोष्ट असताना येथील राजकारणी ताठ मानेने राडे करत आहेत? महाराजांचा पुतळा कोसळला हे कमी होते की काय म्हणून राजकारण्यांनी राजकोट किल्ल्याची तोडफोडही केली. त्यापेक्षा दुर्देव म्हणायचे तर त्यांना समर्थन देणारे आपलेच लोक आहेत.
आज सर्व सोशल नेटवर्किंग मीडियावर कालचा राडा कसा होता? कोणाला कशी धमकी दिली? कोणाची किती फा… ली? यासारख्या पोस्ट्स दिसत आहेत. अरे ज्यांच्यासाठी हे सर्व चालले ते छत्रपती शिवाजी महाराज कुठे गायब झालेत? पुतळा बांधणारा तो कंत्राटदार फरार झाला आहे याबाबत कोणाला काही सोयरसुतक आहे का?
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी येथे महाराजांचा १०० फुटी येथे लवकरच उभारला जाणार असे विधान केले. एक शिवप्रेमी म्हणून मला वाटते ईथे १०० फुटी सोडाच तर १ फुटी पुतळा सुद्धा नका उभारू. जेथे महाराजांची अशी अवहेलना केली जाते तिथे आमच्या दैवताचा पुतळा नकोच.
Konkan Railway :वांद्रे मडगाव एक्सप्रेस ही नवीन गाडी कोकण रेल्वे मार्गावर पुढच्या आठवड्यापासून धावणार आहे. पाश्चिम रेल्वे मार्गावरून खास कोकणी जनतेसाठी सोडण्यात आलेल्या या गाडीचे कोकणकरांनी स्वागत केले असले तरी या गाडीच्या विचित्र वेळापत्रकामुळे तसेच अनेक प्रमुख स्थानकांना थांब्यांच्या यादीतून वगळण्याने काही प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अनेक वर्षांनी कोकण रेल्वेला दुर्लक्षित स्थानकांना न्याय देण्याची संधी उपलब्ध झाली होती. पण ती वाया गेलेली पाहताना अतीव दुःख होत आहे. या गाडीला प्रत्येक तालुक्यात किमान १ ते २ थांबे देण्यात यावेत यासाठी रेल्वे अभ्यासक श्री. अक्षय महापदी यांनी रेल्वे प्रशासनाला ईमेल द्वारे एक निवेदन दिले आहे.
निवेदन:
बोरिवली – वसई – सावंतवाडी नियमित गाडी सुरु व्हावी यासाठी महाराष्ट्रातील अनेक प्रवासी संघटनांनी गेली १० ते १५ वर्षे सतत प्रयत्न केले. एक प्रकारचा लढा उभारून हा निवडणुकीचा मुद्दा केला. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे लवकरच १०११५/१०११६ मडगाव वांद्रे मडगाव द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस सुरु होत आहे.
आजच रेल्वे बोर्डाचे पत्र सर्वांना मिळाले आहे. त्यात नमूद केल्यानुसार ही गाडी केवळ बोरिवली, वसई, भिवंडी, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, थीवी आणि करमळीला थांबणार आहे. ही मोठी निराशा असून बहुतांश कोकणवासीयांचा हिरमोड झाला आहे.
पेण, माणगाव, खेड, संगमेश्वर, लांजा (विलवडे), राजापूर, वैभववाडी अशा ७ तालुक्यांत तर कुडाळसारख्या महत्वाच्या स्थानकावर तसेच नागोठणे, सापे-वामने, करंजाडी, सावर्डा, आरवली रोड, आडवली, झाराप, मडुरे यांसारख्या इतर स्थानकांतही वाढीव गाड्यांची आवश्यकता असताना थांबे दिलेले नाहीत.
१०११५/१०११६ वांद्रे मडगाव एक्सप्रेसचा सरासरी वेग ताशी ३८ ते ४० किमीच्या दरम्यान आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे १०१०५/१०१०६ दिवा सावंतवाडी एक्सप्रेस आणि ५०१०३/५०१०४ रत्नागिरी दिवा पॅसेंजरचा वेगही तेवढाच आहे. परंतु दिवा सावंतवाडीला पनवेल व सावंतवाडी दरम्यान ३०, दिवा रत्नागिरीला पनवेल व रत्नागिरी दरम्यान २६ थांबे आहेत तर नव्याने सुरु होत असणाऱ्या गाडीला केवळ ७ थांबे आहेत. एवढ्या संथ गाडीला अपेक्षेप्रमाणे थांबे न दिल्यामुळे बहुतांश महाराष्ट्राला या गाडीचा फायदा होणार नाही. कोणतीही मागणी न करता गोव्याला थिवी आणि करमळी या केवळ १५ किलोमीटरवर असणाऱ्या दोन्ही स्थानकांवर थांबणारी गाडी दिली. परंतु, तीच गाडी महाराष्ट्रात पनवेल-रोहा ७५ किमी, वीर-चिपळूण ९८ किमी, चिपळूण-रत्नागिरी ७५ किमी, रत्नागिरी ते कणकवली १११ किमी अशा मोठ्या अंतरावर कुठेही थांबणार नाही. अनेक वर्षांनी कोकण रेल्वेला दुर्लक्षित स्थानकांना न्याय देण्याची संधी उपलब्ध झाली होती. पण ती वाया गेलेली पाहताना अतीव दुःख होत आहे.
अनेक वर्षांच्या संघर्षानंतर पश्चिम रेल्वेवरून नियमित गाडी सुरु होत असल्यामुळे त्या गाडीला मध्य रेल्वेमार्गावरून कोकण रेल्वेवर सुरु झालेली पहिली गाडी दिवा सावंतवाडी प्रमाणे जास्तीत जास्त थांबे मिळणे आवश्यक आहे. तरी, १०११५/१०११६ मडगाव वांद्रे एक्सप्रेस या गाडीला अंधेरी, पेण, नागोठणे, माणगाव, सापे-वामने, करंजाडी, दिवाणखवटी, खेड, अंजनी, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, आडवली, वेरवली, विलवडे, सौंदळ, राजापूर रोड, खारेपाटण रोड, वैभववाडी रोड, कुडाळ, झाराप आणि मडूरे येथे वाढीव थांबे देण्यात यावेत ही विनंती. प्रत्येक तालुक्यात किमान एक किंवा दोन थांबे मिळाल्याशिवाय या गाडीचा म्हणावा तसा उपयोग होणार नाही व गाडी लोकप्रिय होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
एकदा गाडी सुरु झाल्यानंतर नव्याने थांबे मिळवणे किचकट प्रक्रिया आहे. त्यामुळे गाडी सुरु होण्याआधीच रेल्वे बोर्डला सुधारित प्रस्ताव पाठवून वाढीव थांबे मंजूर करण्यात यावेत, ही विनंती.
मालवण:सार्वजनिक बांधकाम कार्यालयात जाऊन तोडफोड केल्या प्रकरणी आमदार वैभव नाईक यांच्यासह अन्य दोघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालवणला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर संतप्त बनलेल्या आमदार वैभव नाईक यांच्यासह अन्य शिवप्रेमींनी सार्वजनिक बांधकाम कार्यालयात शिरून तोडफोड केली होती.
राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला. या घटनेमुळे शिवप्रेमी संतप्त बनले होते. आमदार वैभव नाईक यांनी घटनास्थळी भेट देत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढत तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यानंतर दुपारी आमदार वैभव नाईक यांच्यासह उबाठा गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी यांच्यासह अन्य शिवप्रेमी यांनी मेढा येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयात जात कार्यालयातील साहित्याची, खिडक्यांची तोडफोड केली होती. त्यानुसार रात्री उशिरा पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई: वांद्रे – मडगाव दरम्यान धावणाऱ्या नवीन गाडीचा शुभारंभ उद्या दिनांक २९ ऑगस्ट रोजी बोरिवली येथे होणार आहे. त्यासाठी शुभारंभ Inaurgual विशेष गाडीला दुपारी १.२५ वाजता बोरिवली येथे हिरवा कंदील दाखविला जाणार आहे. या सोहळ्याला कोकणकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उत्तर मुंबई भाजप पक्षातर्फे करण्यात आले आहे.
गुरुवार २९ ऑगस्ट रोजी दुपारी १.२५ वाजता बोरीवली वरून कोकणात जाण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या ट्रेनचा नं ०९१६७ असून त्याचे आरक्षण बुधवार २८ ऑगस्ट रोजी दुपारी १२.०० वाजता ऑनलाईन पीआरएस आणि आरक्षण खिडक्यांवर सुरु होणार आहे.
ही गाडी टू टियर एसी – ०१, थ्री टियर एसी – ०२, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०१, स्लीपर – ०६, जनरल – ०३, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१ असे मिळून एकूण १५ एलएचबी डब्यांसहित चालविण्यात येणार आहे.
शुभारंभ विशेष गाडीचे वेळापत्रक
बोरिवली – १३.२५ (गुरुवार)
वसई – १४.१०
भिवंडी – १५.०५
पनवेल – १६.०७
रोहा – १७.३०
वीर – १८.००
चिपळूण – १९.२५
रत्नागिरी – २१.३५
कणकवली – ००.०१ (शुक्रवार)
सिंधुदुर्ग – ००.२०
सावंतवाडी – ०१.००
थिवी – २.००
करमाळी – २.३०
मडगाव – ०४.००
हीच गाडी वेगळ्या वेळापत्रकावर आणि २० डब्यांच्या संरचनेसह पुढील आठवड्यापासून दर बुधवार व शुक्रवार वान्द्रे – मडगाव (गाडी नं १०११५) एक्सप्रेस आणि दर मंगळवार व गुरुवार मडगाव – वान्द्रे एक्सप्रेस (गाडी नं १०११६) एक्सप्रेस अशी चालविण्यात येणार आहे.
Konkan Railway: केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या प्रयत्नाने चालू होणाऱ्या वांद्रे – मडगाव या गाडीचा प्रस्ताव आणि कच्चा आराखडा कोकण रेल्वे तर्फे दिनांक २१ ऑगस्ट रोजी पाश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. त्याला आज रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाली आहे.
ही मजुरी मिळाल्याने आता फक्त कोकण रेल्वे प्रशासनाकडून ही गाडी जाहीर करण्याची औपचारिकता बाकी आहे.
या गाडीची माहिती खालीलप्रमाणे
Train No. 10116 Madgaon – Bandra (T) Express
मडगाव ते बांद्रा दरम्यान धावताना ही गाडी आठवड्यात दोन दिवस म्हणजे मंगळवारी आणि गुरुवारी सकाळी ७.४० वाजता मडगाव येथून सुटणार असून वांद्रे येथे रात्री २३.४० वाजता पोहोचणार आहे. तर
Train No. 10115 Bandra (T) – Madgaon Express
बांद्रा ते मडगाव दरम्यान धावताना ही गाडी बांद्रा येथून दर बुधवारी आणि शुक्रवारी ही गाडी पहाटे ६.५० वाजता सुटून मडगाव येथे रात्री २२.०० वाजता पोहोचणार आहे.
या गाडीच्या प्रास्तावित थांब्या व्यतिरिक्त कणकवली येथे थांबा देण्यात आला आहे. या गाडीचे अंतिम थांबे – करमाळी, थिवी, सावंतवाडी, सिंधुदुर्ग, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, वीर, रोहा, पनवेल, भिवंडी रोड, वसई रोड आणि बोरिवली
या गाडीला एकूण २० LHB स्वरूपाचे डबे असणार असून त्यात सेकंड स्लीपर ८ डबे, थ्री टायर एसीचे ३ डबे, थ्री टायर एसी इकॉनॉमीचे २ डबे, टू टायर एसीचा १ डबा, जनरल – ०४ डबे, एसएलआर – ०१, पँट्री कार – ०१, जनरेटर कार – ०१ समावेश आहे.
सिंधुदुर्ग: मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा २८ फुटी पुतळा कोसळण्याची घटना काल घडली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून याबाबत संताप व्यक्त केला गेला. पुतळा उभारणीत हलगर्जीपणा झाला असून हा पुतळा कोसळण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी नौदलाने एक पथक नेमले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला झालेल्या नुकसानीबाबत नौदलाने सांगितले की, “राज्य सरकार आणि तज्ञांसह, नौदलाने या अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यासाठी एक पथक नियुक्त केले आहे.” लवकरच हे पथक या घटने मागची कारणे शोधून आपला अहवाल सादर करेल. मात्र त्याआधी पुतळा कोसळण्यामागची कोणते कारणे असू शकतात, कोणते आरोप होत आहेत ते पाहू.
निकृष्ट दर्जाचे काम?
राज्य सरकारने योग्य ती काळजी न घेतल्याने ही पडझड होण्यास राज्य सरकार जबाबदार आहे. सरकारने कामाच्या दर्जाकडे फारसे लक्ष दिले नाही. केवळ कार्यक्रम आयोजित करण्यावर भर दिला. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे शिवसेनेचे (यूबीटी) आमदार वैभव नाईक यांनीही कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत राज्य सरकारवर टीका केली आहे.
लोखंडी अँगल अर्धवट?
पुतळ्याच्या चौथऱ्यासाठी १५ फूट खोलीचे लोखंडी अँगल टाकून पक्के बांधकाम करण्यात आले होते. त्यावर पुतळ्याचे पार्ट जोडण्यात आले. जमिनीतून उभारण्यात आलेले अँगल पुतळ्याच्या छातीपर्यंत उभारले असते तर पुतळा कोसळून पडला नसता, असे मत स्थानिक बांधकाम व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे.
पुतळा निर्मितीसाठी खूप कमी कालावधी?
उद्घाटन करण्यासाठी घाई केल्यानेच पुतळा कोसळला, अशी टीका माजी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर या पुतळ्याच्या निर्मितीस खूपच कमी कालावधी भेटला असे या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे हे म्हणाले होते. अशा प्रकारच्या भव्य पुतळ्याच्या निर्मितीसाठी किमान ३ वर्षे लागतात मात्र आपण हा पुतळा अवघ्या सहा महिन्यांत पूर्ण केला असल्याचे ते म्हणाले होते.
अपूर्ण अभ्यास?
या घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मागील २ दिवस ताशी ४५ किमी वेगाचा वारा होता. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुतळ्याचं नुकसान झालं होते . तर पालकमंत्री रविन्द्र चव्हाण यांनी येथील खाऱ्या हवेमुळे पुतळ्याच्या नट बोल्ड्सना गंज पकडली असे विधान केले आहे. कोणतेही बांधकाम करताना तेथील भौगोलिक परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्याप्रमाणे बांधकामात बदल करणे अपेक्षित आहे. मात्र हा पुतळा उभारताना हा अभ्यास झाला नसल्याचे दिसून आले आहे.
सार्वजनिक बांधकाम उपविभागाने २० ऑगस्टला नौदलाला पाठविले होते पत्र
महाराजांच्या पुतळ्याचे जॉईंट करण्यासाठी ज्या नट-बोल्टचा वापर केला होता ते आता पाऊस आणि खारे वारे यामुळे गंजले असल्याने पुतळा विद्रूप दिसत आहे. तेव्हा संबंधित शिल्पकारांना सांगून कायमस्वरुपी उपाययोजना तत्काळ कराव्यात, असे पत्र मालवणमधील सार्वजनिक बांधकाम उपविभागाने २० ऑगस्ट रोजी नौदलाचे विभागीय सुरक्षा अधिकारी कमांडर अभिषेक कारभारी यांना पत्र पाठवून पुतळ्याबाबत तत्काळ उपाययोजना करण्यास कळविले होते. मात्र या पत्राची दखल का घेतली नाही याबाबत नौदलाकडून काही उत्तर आले नाही आहे.
मालवण, दि. २६ ऑगस्ट :ज्या महाराजांचा त्यांनी केलेल्या मजबूत किल्ल्यांच्या बांधकामांची उदाहरणे देवून गौरव केला जातो त्यांचाच पुतळा अवघ्या काही महिन्यांत कोसळण्याची अपमानास्पद आणि चीड आणणारी घटना आज सकाळी मालवणात घडली आहे. मालवण राजकोट किनारी उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना आज, सोमवारी दुपारी घडली. छत्रपतींचा पुतळा कोसळल्यामुळे येथील शिवप्रेमी संतप्त झाले असून निकृष्ट बांधकामामुळे हा पुतळा पडला असल्याचा आरोप केला आहे.
अवघ्या ९ महिन्यांत पुतळा कोसळला
४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने मोठा गाजावाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. राजकोट येथे शिवपुतळा परिसराच्या सुशोभिकरणासाठी आणि इतर व्यवस्थेसाठी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांच्या कार्यालयाकडून सुमारे पाच कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली होती. राज्य शासन आणि नौदल विभागाने निश्चित केल्या नंतरच राजकोट येथील जागेवर पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुमारे ४३ फूट उंच होता. जमिनी पासून बांधकाम १५ फूट तर त्यावर २८ फूट उंच हा पुतळा उभारण्यात आला होता.
शिवप्रेमी संतप्त
ज्या महाराजांचा त्यांनी केलेल्या मजबूत किल्ल्यांच्या बांधकामांची उदाहरणे देवून गौरव केला जातो त्यांचाच पुतळा अवघ्या काही महिन्यांत कोसळण्याची घटना अपमानास्पद आणि आणि चीड आणणारी असल्याची भावना शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे. हे बांधकाम बेजबाबदारपणे करण्यात आले असून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
रत्नागिरी:कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या विविध श्रेणीच्या पदांसाठी अधिसूचना क्र. CO/P-R/01/2024 दिनांक 16/08/2024 रोजी जाहीर झालेली झाली आहे. अधिसूचनेनुसार दिनांक 16/09/2024 पासून ऑनलाईन अर्ज करायचे आहेत व अर्ज करण्याची शेवटची तारीख 06/10/2024 रोजी रात्री 11.59 पर्यंत आहे. परंतु सदरच्या अधिसूचनेचे अवलोकन करता एकिकडे प्रकल्पग्रस्त उमेदवारांना प्रथम प्राधान्य देऊ असे आवाहन केले जाते आणि दुसरीकडे प्रकल्पग्रस्तेतर उमेदवार याना अर्ज करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. याचाच अर्थ कोकण रेल्वे भरती अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेच्या नियुक्ती प्रक्रियेसंबंधी प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे आणि कोकण रेल्वे प्रशासनावरचा अविश्वास दृढ झाला आहे अशी प्रतिक्रिया कृती समितीचे अध्यक्ष श्री. संतोष चव्हाण, कार्याध्यक्ष श्री. विनय मुकादम, सचीव श्री. अमोल सावंत आणि सहसचीव श्री. प्रभाकर हातणकर यांनी व्यक्त केली आहे.
कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी या सन 1989-90 मध्ये कवडीमोल भावाने म्हणजेच रु. 150/- प्रति गुंठा या भावाने विकत घेतल्या गेल्या आहेत. आता त्या जमिनीची सदर किंमत प्रति गुंठा दहा लाख रुपये आहे. त्या वेळेला तेव्हाचे अर्थमंत्री माननीय मधु दंडवते साहेब व रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस साहेब यांनी जेव्हा कोकण रेल्वे प्रकल्पास मंजूरी देऊन स्वतंत्र कोकण रेल्वे महामंडळ स्थापन केले तेव्हा ज्या भुमिपुत्रानी कोकण रेल्वे प्रकल्पासाठी जमिनी दिल्या आहेत, त्यांना प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस विनाअट कोकण रेल्वेमध्ये नोकरीत घेतली जाईल अशी घोषणा केली होती व तसे त्यांचे स्वप्नही होते. परंतु आजतागायत तसे झालेले नाही. सदर पॉलिसी 1996 पर्यंत लागू होती. परंतु त्यानंतर आलेले व्यवस्थापकीय संचालक भानुप्रकाश तायल यांनी सदर पॉलिसी संबंधित भरती अधिकाऱ्यांनी त्यांच्या सहमतीने काढून टाकली. ह्याचाच अर्थ परप्रांतीय अधिकाऱ्यांमुळेच आजतागायत कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत आहे हे स्पष्ट होत आहे.
कोकण रेल्वेमध्ये नोकरीसाठी फक्त प्रकल्पग्रस्तांचाच विचार करणेसाठी आम्ही अनेक वर्षांपासून वेळोवेळी पत्रव्यवहार, समक्ष भेटीत कोकण रेल्वे च्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्मिक अधिकारी यांचेशी चर्चाही केली आहे. त्याही पेक्षा दिनांक 27/02/2024 रोजी आम्ही आमच्या मागण्यांसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करणेसाठी संयुक्त बैठक लावणेबाबत कळविले होते. परंतु ह्यावर कोकण रेल्वेकडून कृती समितीकडे कोणताच पत्रव्यवहार वा चर्चा झालेली नाही. ही बाब दुर्देवाची आहे अशी खंत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यानी व्यक्त केली आहे.
सदर भरती प्रक्रियेसाठी कोकण रेल्वेचे अधिकृत नियुक्ती मंडळ आहे ते संपूर्णतः भ्रष्टाचाराने माखलेले आहे. तसेच जमीन घोटाळ्यामध्ये, नोकरभरती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाने माखलेले आहे. तरी सदर भरती प्रक्रियेसाठी नेमलेले मंडळ बरखास्त करून नवीन नेमण्यात यावे आणि त्यावर कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचा एक सदस्य त्या मंडळावर नेमावा अशी आम्ही पूर्वीपासून मागणी करीत आलो आहोत. त्यानंतरच भरती प्रक्रिया राबवावी. सदर भरती प्रक्रिया ही भ्रष्टाचाराने झालेली आहे आणि ती पूर्वीच्या भरती मंडळाच्या आपल्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे. याचे सबळ पुरावे माहितीच्या अधिकाराखाली कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीकडे आहेत. त्याचप्रमाणे हे पुरावे आपल्या मुख्य कार्यालयातील तत्कालिन मुख्य व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय गुप्ता साहेब तसेच मुख्य कार्मिक अधिकारी श्री. के. के. ठाकूर यांचेसमोर सादर केले असता त्यांनी मान्यही केले होते. तसेच सदर भरती प्रक्रियेमध्ये शंभर टक्के प्रकल्पग्रस्तांना सामावून घेतले पाहिजे यासंदर्भात कोकणचे जेष्ठ नेते आणि मा. खासदार श्री नारायण राणे साहेब यांनाही कल्पना देण्यात आली आहे. तरी याबाबत त्वरीत कार्यवाही करावी अन्यथा कोकण भूमी प्रकल्पग्रस्त शेतकरी रेल्वे ट्रॅक वरती आंदोलनात उतरेल व त्याच्या परिणामाला जबाबदार म्हणून व्यवस्थापकीय संचालक या नात्याने आपण असाल. तरी असा प्रकार होऊ नये याची आपण पूर्णतः दखल घ्याल अशी आम्हाला अपेक्षा आहे. असे कृती समितीच्या वतीने कोकण रेल्वे व्यवस्थापनाला लवकरच कळविण्यात येत आहे.
कोकण रेल्वे मार्गावरून अनेक रेल्वे गाड्या भारताच्या उत्तरेच्या टोकाकडून दक्षिणेकडे धावत आहेत आणि हजारो किलोमिटरचे अंतर कमी झाल्याने अनेक भारतीयांचा वेळ आणि पैसा वाचतो आहे. हे श्रेय नक्कीच कोकण रेल्वेचे उद्गाते कै. मा. मधु दंडवते साहेब आणि जॉर्ज फर्नांडिस साहेबांना द्यायला हवे. ह्या महान द्वयींचे एक मोठे स्वप्न होते की कोकण रेल्वेसाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमीनीच्या मालकांना कोकण रेल्वेमध्ये नोकरी देण्याचे. काही अंशी कोकण रेल्वेने ते पाळले मात्र आज आमचे तिन्ही जिल्ह्यातील अनेक प्रकल्पग्रस्त कोकण रेल्वेमध्ये आपल्याला नोकरी मिळेल ह्या आशेवर जगत आहेत. ही वाट पहाता पहाता त्यांची वयेही उलटून गेली आहेत.
आजवर अनेक प्रकल्पगग्रस्त शिक्षित, उच्चशिक्षित, तांत्रिक परीक्षा उत्तीर्ण झालेले असतानाही बऱ्याच जणांना काही ना काही क्षुल्लक कारणाने डावलून अन्य आसामींना नोकरीत सामावून घेतले आहे. ह्याबाबाबत आम्ही प्रशासनाकडे वेळोवेळी अनेक बाबी पुराव्यानिशी स्पष्ट केलेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याबाबत त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याबाबत, त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना ग्रुप ‘डी’ व तत्सम पदांसाठी परीक्षा न घेता प्रकल्पग्रस्त उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आणि शारिरिक चाचणी यांचेवर आधारित प्रतिक्षा यादी तयार करून त्याप्रमाणे नोकरीत सामावून घेण्याबाबत आम्ही वारंवार अर्ज विनंत्या तसेच मा. मुख्य कार्मिक अधिकारी यांचेशी समक्ष चर्चाही केल्या आहेत.
कोकणातील जनसामान्यांमध्ये तसेच प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबामध्ये कोकण रेल्वे भरती प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
• ज्या भुमिपुत्रांनी कवडीमोल भावाने कोकण रेल्वेसाठी जमीनी दिल्या त्या भुमिपुत्रांना, गोरगरीब प्रकल्पग्रस्तांना कोकण रेल्वे मध्ये नोकरी का देऊ शकत नाही. फक्त प्रकल्पग्रस्तांसाठीच अधिसूचना काढण्यात येत नाही? प्रकल्पग्रस्तांमध्ये पात्र मुले असताना देखील त्यांना क्षुल्लक कारणांनी डावलले जात आहे. प्रकल्पग्रस्त मुलांची पात्र यादी कोकण रेल्वेला देऊन देखील पदभरती किंवा कंत्राटी भरती यात प्रथम प्राधान्य एक ते दोन टक्के आहे.
• कोकण रेल्वे मध्ये निघालेल्या भरती मध्ये प्रथम प्राधान्य हे प्रकल्पग्रस्त उमेदवारांना देणार असे म्हटले असले तरी प्रत्यक्ष तसे होताना दिसत नाही. ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जात नाहीये. त्रयस्थ कंपनीला नोकरभरतीचे कंत्राट देऊन ही प्रक्रिया राबवली जाते. पण प्रत्यकक्षात भरतीमध्ये प्रकल्पग्रस्त दिसत नाहीत.
• याही पुढे जाऊन जे कंत्राटदार कोकण रेल्वेने नियुक्त केले आहेत.ते देखील प्रकल्पग्रस्त मुलांना डावलून पर जिल्हयातील मुले भरत आहेत.
कोकण रेल्वेच्या जमीनी कवडीमोलाने अधिग्रहित करुन आज सुमारे 36 वर्षे झाली तरी आज कोकण रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतलेले नाही ही शोकांतिका आहे. आम्ही कोकण रेल्वेचे प्रकल्पग्रस्त कोकण रेल्वेमध्ये नोकरीत सामावून न घेतल्याने वैफल्यग्रस्त झालो आहोत. कोकण रेल्वेमुळे आज सुमारे 4500 प्रकल्पग्रस्तेतर कर्मचारी व त्यांची कुटुंबे जगतायत परंतु आमचेवर मात्र अन्याय होतोच अशी आम्हा प्रकल्पग्रस्तांची मानसिकता झाली आहे. त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्तांसमोर नोकऱ्यात सामावून न घेतल्यामुळे असूयेपोटी अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. अशी प्रतिक्रिया कोकण रेल्वेच्या अनेक भुमिपुत्रांकडून होत आहे. त्याचप्रमाणे आम्हा प्रकल्पग्रस्तांनी कोकण रेल्वेला जमिनी दिल्या परंतु आज आमची घरे जमीनदोस्त होऊन बेघर झालो आहोत. बेरोजगारीमुळे त्रस्त झालो आहोत. आम्हा प्रकल्पग्रस्तांना काही क्षुल्लक कारणाने डावलल्याने नियुक्तीअभावी वय वाढत चालले आहे. त्यामुळे नोकरी आवेदनासाठी वयाची मर्यादा 45 वर्षे करणेसाठी आम्ही वारंवार कोकण रेल्वेकडे विनंती करीत आलो आहोत. मात्र कोकण रेल्वे ह्यासाठी रेल्वे बोर्डाची मंजूरी आवश्यक असल्याचे कारण सांगून हेतुपुरस्सर नाकारत आहे. ही बाब अत्यंत खेदजनक आहे. अशाही प्रतिक्रिया को. रे. प्रकल्पगग्रस्तांमधून व्यक्त करण्यात येत आहेत.
एकंदीत कोकण रेल्वे भरती प्रक्रिया अधिकाऱ्यांकडून कोकण रेल्वेच्या भुमिपुत्रांना दुजाभाव देऊन निव्वळ आपल्याच अधिकारातील उमेदवारांना प्राधान्य देण्याच्या दृष्टिने आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहेत हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या वतीने कृती समितीमार्फत सदरहू अधिसूचना रद्द करुन ती फक्त प्रकल्पग्रस्तांसाठीच असावी ह्याबाबत कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या वतीने खालीलप्रमाणे मागण्या करण्यात येणार आहेत :
1. कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांची कोणतीही परीक्षा न घेता ग्रुप डी व ग्रुप सी साठी योग्य असे प्रशिक्षण (ट्रेनिंग) देऊन त्यांना कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त म्हणून या पदांवरती नियुक्ती करावी.
2. कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांनी ह्यापूर्वी परीक्षा दिल्या होत्या परंतु अनेक उमेदवारांना कागदपत्रांच्या छाननीमध्ये व इतर किरकोळ कारणाने डावलण्यात आलेले आहे, कागदपत्रे मुदतीत सादर करुनही नोकरीत सामावून घेण्यात आलेले नव्हते व अनेक उमेदवारांच्या फिजिकल, मेडिकल उत्तीर्ण झालेले आहेत परंतु प्रतिक्षायादीत समाविष्ट आहेत अशा उमेदवारांची नियुक्ती त्वरित करावी. तसेच अधिसूचना 5/2018 डी ग्रुपसाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना तीस ते पन्नास सेकंदासाठी अनुत्तीर्ण केलेल्यांना त्वरित घ्यावे. (ह्या संदर्भात कोकण रेल्वे मुख्य कार्यालयात अनेक वेळा चर्चा केलेली आहे).
3. कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांची वयोमर्यादा वय वर्ष 45 एवढी करण्यात यावी. (अनेक प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी ह्यापूर्वी ग्रुप-डी व ग्रुप-सी परीक्षा उत्तीर्ण झाले होते. परंतु कागदपत्र पूर्ततेमध्ये क्षुल्लक कारणावरून सदरहू उमेदवारांना डावलण्यात आले होते. गेल्या पाच वर्षात अशा पदांची भरती न झाल्याने ह्या उमेदवारांची निर्धारित वयोमर्यादा ओलांडण्याची शक्यता आहे. ह्याचा विचार करुन फक्त प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेचा निकष ठेवून तो 45 वर्षे ठेवावा).
4. प्रकल्पग्रस्तांच्या कागदपत्रांच्या छाननी करताना 12/2 च्या नोटीसीमागे एक उमेदवार अशी नियुक्ती करण्यात यावी.
5. यापूर्वी कोकण रेल्वे विरुध्द कोर्टामध्ये अनेक उमेदवारांनी केसेस दाखल केल्या होत्या आणि त्या केस निकाली लागून त्यांना भरती करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आलेले आहेत. परंतु त्या उमेदवारांना अद्याप कोकण रेल्वेमध्ये सामावून घेतलेले नाही व बरीच वर्षे केसेस चालू राहिल्यामुळे तसेच अधिसूचना न आल्यामुळे त्यांचे वय वाढले आहे. अशा उमेदवारांना नियुक्ती देण्यासंदर्भात समितीसमवेत आपली चर्चा व्हावी ही विनंती.
दिनांक 9 मे 2018 रोजी झालेल्या बैठकीत आणि डिसेंबर 2018 मधील कोकण रेल्वे च्या अधिकाऱ्यांच्या संपन्न झालेल1या बैठकीत क्षुल्लक कारणावरून डावलेल्या कृती समीतीच्या नोंदीत उमेदवारांचा आम्ही पुनश्च विचार करू आणि पुढील भरतीत सामावून घेऊ असे तत्कालिन सीएमडी मा. गुप्ता साहेब आणि मुख्य कार्मिक अधिकारी श्री. के. के. ठाकूर साहेब यांनी आश्वासन दिले होते. सदर प्रकरणावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सदरबाबत आम्ही लेखी पुरावेही सादर केलेले होते व त्यास त्यांनी मान्यताही दिली होती. अशा उमेदवारांची व प्रतिक्षायादीत असलेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण घेऊन नेमणुक होणेबाबत कृती समितीची आग्रहाची मागणी आहे.
ह्याबाबत रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कोकणातील जनतेची व्यथा जाणून घेणारे एकमेव जेष्ठ नेते आणि खासदार मा. ना. नारायण राणे साहेब यांना ह्यामध्ये योग्य तो मार्ग काढून प्रकगल्पग्रस्तांना वरील मागण्या मान्य करणेसाठी मे. कोकण रेल्वे व्यवस्थापनाकडे चर्चा करणेसाठी आग्रहाची विनंती करण्यात येणार आहे. याबाबत कृती समितीचे पदाधिकारी गोरगरीब कोकण रेल्वेचे भुमिपुत्र ह्यावेळी आवर्जुन उपस्थित राहून आपल्या व्यथा कथन करणार असल्याचे कृती समितीचे कार्याध्यक्ष श्री. विनय मुकादम यांनी सांगितले आहे.
त्याचप्रमाणे कोकण रेल्वे प्रकल्प्रस्तांच्या व्यथां मांडताना कृती समितीचे वतीने, सन 2027 पर्यंत सुमारे 2500 पदे रिक्त होणार असल्यामुळे कोकण रेल्वे आधी भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण न करता ही पदे प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातूनच भरावीत जेणेकरुन ही भरती म्हणजे कोकण रेल्वेचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण करणाऱ्या कै. मा. मधु दंडवते व मा. जॉर्ज फर्नांडिस साहेब यांना आदरांजली ठरेल असे वक्तव्य कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त आणि कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे