मुंबई उपनगरीय लोकल सेवा संपूर्णपणे एसी करण्याच्या दिशेने प्रवास सुरू

   Follow us on        

मुंबई: मुंबईत उन्हाळ्याचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, घामाघूम करणाऱ्या उकाड्यामुळे मुंबईकरांचा कल आता वातानुकूलित (AC) लोकल प्रवासाकडे मोठ्या प्रमाणावर वळताना दिसत आहे. साधारणपणे मार्च महिन्यापासूनच उष्णतेने जोर धरल्याने एसी लोकलच्या प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारीत दररोज सरासरी १.५८ लाख असणारी प्रवाशांची संख्या मार्चमध्ये २.०५ लाखांच्या पार गेली आहे. एप्रिल आणि मे महिन्यापर्यंत या गर्दीत आणखी ३० ते ४० टक्क्यांनी वाढ होईल, असा अंदाज रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील फेऱ्यांचा विस्तार

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये सातत्याने वाढ केली आहे. सध्या पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १० एसी गाड्या असून त्याद्वारे दररोज १३३ फेऱ्या चालवल्या जात आहेत. २०२३ मध्ये या फेऱ्यांची संख्या केवळ ९६ होती, ज्यामध्ये आता २८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे, मध्य रेल्वेवरही २०२३ मध्ये असणाऱ्या ६६ फेऱ्यांची संख्या २०२६ पर्यंत ९४ वर पोहोचली आहे. जसजसे नवीन रेल्वे संच उपलब्ध होतील, तसतसे या फेऱ्यांचे नियोजन आणखी वाढवण्यात येणार आहे.

मुंबईकरांच्या सेवेत येणार २३८ नवीन एसी लोकल

मुंबईची उपनगरीय रेल्वे सेवा पूर्णपणे वातानुकूलित करण्याच्या दिशेने मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC) मोठे पाऊल उचलले आहे. ‘एमयूटीपी-३’ आणि ‘३-ए’ प्रकल्पांतर्गत सुमारे १९,२९३ कोटी रुपये खर्चून एकूण २३८ नवीन एसी लोकल खरेदी करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. सध्या या गाड्यांच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, या नवीन गाड्या दाखल झाल्यामुळे भविष्यात मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि गारवा देणारा होणार आहे.

एसी लोकलच्या फेऱ्या वाढवणे ही प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असली, तरी अनेक प्रवाशांनी या गाड्यांच्या वक्तशीरपणाबाबत आग्रही भूमिका मांडली आहे. फेऱ्यांची संख्या वाढवण्यासोबतच गाड्या वेळेवर धावणे गरजेचे असल्याचे मत नियमित प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. रेल्वे प्रशासन सध्या उपलब्ध संसाधनांचा वापर करून जास्तीत जास्त प्रवाशांना गारव्याचा प्रवास देण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून वाढत्या उष्णतेपासून मुंबईकरांना दिलासा मिळेल.

Facebook Comments Box

सिंधुदुर्ग: पर्यटनाचा नवा ट्रेंड ठरतोय स्थानिकांची डोकेदुखी

   Follow us on        

दोडामार्ग: उन्हाळा सुरू होताच दोडामार्ग तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी उसळताना दिसत आहे. विशेषतः गोवा तसेच आसपासच्या भागातील युवक-युवतींचा कल तिराळी नदी परिसराकडे वाढला असून, अनेक ठिकाणी बेधडकपणे पाण्यात उतरण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र या वाढत्या पर्यटनामुळे स्थानिक पातळीवर फायदा होण्याऐवजी मनस्ताप आणि धोकेच अधिक वाढताना दिसत आहेत.

सासोलीतून वानोशीला जाताना तिराळी नदीवरील मधल्या बंधाऱ्यावर तसेच इतर भागात रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी होत असते. या गर्दीत मद्यपी पर्यटकांचे प्रमाण लक्षणीय असल्याने परिसरातील वातावरण बिघडत आहे. मद्यधुंद अवस्थेत होणारी हुल्लडबाजी, आरडाओरड आणि अनुशासनहीन वर्तनामुळे या भागातील शांतता धोक्यात आली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अनेक पर्यटकांना नदीच्या पाण्याचा वेग, खोली किंवा धोकादायक ठिकाणांची पुरेशी माहिती नसतानाही ते थेट पाण्यात उतरतात. सासोली व वानोशी येथील पूल सध्या आकर्षणाचे केंद्र बनला असून, येथे फोटोसेशन करणे, पुलावरून उड्या मारणे आणि पोहणे असे धाडसी प्रकार मोठ्या प्रमाणात चालतात. परिणामी, बुडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, माहितीअभावी काही पर्यटकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.

या वाढत्या धोक्यांकडे लक्ष वेधत स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. संबंधित ठिकाणी कोणतीही सुरक्षा यंत्रणा, जीवनरक्षक कर्मचारी किंवा साधे सूचना फलकही नसल्याने अपघातांची शक्यता अधिक बळावली आहे. त्यामुळे हुल्लडबाजी रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवावा, मद्यपान करून येणाऱ्यांवर कारवाई करावी आणि धोकादायक ठिकाणी पाण्यात उतरण्यास बंदी घालावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Photo Credit – AI

Facebook Comments Box

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस व थांब्यांसाठी चाकरमान्यांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना साकडे

   Follow us on        

ठाणे:​ कल्याण-उल्हासनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केलेल्या “खासदार आपल्या भेटीला” या उपक्रमाला कोकणी चाकरमान्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी सावंतवाडी रेल्वे स्थानकातील प्रलंबित प्रश्न आणि टर्मिनसच्या कामासाठी उल्हासनगर आणि डोंबिवलीतील कोकणवासीयांनी खासदारांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

​प्रमुख मागण्या आणि निवेदन

​कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने मुंबई समन्वयक श्री. दर्शन विठ्ठल नाईक (उल्हासनगर) यांनी खासदारांशी संवाद साधला. तसेच डोंबिवली येथील कार्यक्रमात ऍड. विनायक राणे यांनी देखील रेल्वे प्रश्नांकडे खासदारांचे लक्ष वेधले. निवेदनातील मुख्य मागण्या खालीलप्रमाणे आहेत:

​मंगलोर एक्सप्रेस: सावंतवाडी स्थानकात या गाडीला अधिकृत थांबा देण्यात यावा.

​थांब्यांची पुनर्स्थापना: कोविड-१९ काळात बंद करण्यात आलेल्या गरीब रथ आणि राजधानी एक्सप्रेसचे सावंतवाडी येथील थांबे पुन्हा सुरू करावेत.

​टर्मिनसचे काम: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसची अपूर्ण असलेली कामे तातडीने पूर्ण करून ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे.

​खासदारांचे आश्वासन

​खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सर्व मागण्या अत्यंत सकारात्मकतेने जाणून घेतल्या. “या विषयांचे गांभीर्य लक्षात घेऊन मी स्वतः रेल्वेमंत्री मा. श्री. अश्विनी वैष्णव यांची भेट घेईन. कोकणी चाकरमान्यांची गैरसोय दूर करण्यासाठी आणि सावंतवाडीकरांना न्याय देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

​”कोकणवासीयांच्या रेल्वे प्रवासातील अडचणी सोडवणे ही आमची प्राथमिकता आहे. लवकरच या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न राहील.”

— डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार.

​सहकार्य आणि आभार

​उल्हासनगर लोकसभा संपर्क कार्यालयात श्री. अरुण तांबे यांनी हे निवेदन सादर करण्यासाठी विशेष सहकार्य केले. त्यांच्या या पुढाकाराबद्दल कोकण रेल्वे प्रवासी संघटना आणि सावंतवाडी मुंबई विभागाच्या वतीने त्यांचे जाहीर आभार मानण्यात आले. या उपक्रमामुळे सावंतवाडीच्या रेल्वे प्रश्नांना आता गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

Facebook Comments Box

रेल्वेच्या नव्या ‘रेलवन’ ॲपचा फज्जा; तांत्रिक अडचणींमुळे प्रवासी हैराण

   Follow us on        

​नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी सुरू केलेले नवीन ‘रेलवन’ ॲप सध्या तांत्रिक बिघाडांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. १ मार्चपासून जुने लोकप्रिय ‘यूटीएस’ (UTS) ॲप टप्प्याटप्प्याने बंद करून ‘रेलवन’ ॲप अनिवार्य करण्यात आले, मात्र तेव्हापासून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जिथे यूटीएस ॲपचे पाच कोटींहून अधिक वापरकर्ते होते, तिथे तांत्रिक गोंधळामुळे रेलवन ॲप वापरणाऱ्यांची संख्या केवळ एक कोटीच्या आसपास राहिली आहे. म्हणजेच सुमारे चार कोटी प्रवाशांनी डिजिटल प्लॅटफॉर्मकडे पाठ फिरवली आहे.

​प्रवाशांच्या तक्रारीनुसार, या नवीन ॲपमध्ये लॉग-इन करताना वारंवार अडचणी येत आहेत. अनेकदा वॉलेटमधून पैसे वजा होतात, मात्र तिकीट जनरेट होत नाही. अशा वेळी स्थानकांवर मदत करण्यासाठी कोणतेही ‘प्रवासी दूत’ किंवा मदत कक्ष उपलब्ध नसल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दहिसर आणि मुलुंड येथील प्रवाशांनी आपली नाराजी व्यक्त करताना सांगितले की, सर्व चाचण्या पूर्ण न करताच हे ॲप अनिवार्य केल्यामुळे प्रवाशांना पुन्हा तिकीट खिडकीवरील लांब रांगेत उभे राहावे लागत आहे.

​या ॲपमध्ये खरं तर उपनगरीय रेल्वेसह मेल-एक्सप्रेसचे तिकीट काढणे, पीएनआर तपासणे, डब्यांची रचना पाहणे आणि रेल्वे प्रवासात जेवण ऑर्डर करणे अशा विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच तक्रारीचा मागोवा घेण्याची (Tracking) सोयही यात आहे. मात्र, ‘सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम्स’ (क्रिस) कडून विकसित करण्यात आलेल्या या ॲपमधील तांत्रिक त्रुटींमुळे या सर्व सुविधा प्रवाशांसाठी कुचकामी ठरत आहेत. यासंदर्भात रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडे लेखी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, परंतु अद्याप प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद मिळालेला नाही.

Facebook Comments Box

राज्यांतर्गत ​रेल्वेगाड्यांना ‘ब्रेक’, उत्तर भारतासाठी मात्र ‘ग्रीन सिग्नल’!

   Follow us on        

मुंबई : रेल्वे विभागाच्या शून्य-आधारित वेळापत्रक धोरणामुळे राज्यातील अनेक महत्त्वाच्या रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या असून काही गाड्यांचे मार्गही रद्द करण्यात आले आहेत. राज्यांतर्गत सेवा कमी केल्या जात असताना उत्तर भारतासाठी मात्र मुंबईहून अधिक रेल्वेगाड्या सोडल्या जात असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

रेल्वे प्रशासनाने कमी प्रवासीसंख्या आणि समांतर मार्गावरील गाड्या यांचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. कोरोना काळानंतर अनेक गाड्या पूर्ववत सुरू झाल्या नसून काही सेवा कायमस्वरूपी बंद करण्यात आल्या आहेत. विशेषतः दादर–रत्नागिरी पॅसेंजर बंद करून त्याच स्लॉटमध्ये दादर–गोरखपूर एक्सप्रेस कायम करण्यात आल्याने कोकणातील प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.

दरम्यान, दादर ते गोरखपूर, दादर ते बलिया, एलटीटी ते सहारसा अमृत भारत, पनवेल ते अलीपुरद्वार अशा उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्या वाढवण्यात आल्या आहेत. तसेच होळी व उन्हाळी हंगामासाठी विशेष गाड्यांची संख्या वाढवण्यावरही भर देण्यात आला आहे.

तज्ज्ञांच्या मते, राज्यांतर्गत रेल्वेगाड्या या सर्वसामान्य प्रवाशांसाठी महत्त्वाच्या असून शैक्षणिक, व्यावसायिक आणि धार्मिक कारणांसाठी त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. अशा गाड्या बंद करून प्रवाशांना अडचणीत टाकले जात असल्याची टीका होत आहे.

Facebook Comments Box

मुंबई विमानतळावर ६४ कोटींचे ड्रग्ज जप्त; चार जणांना अटक

   Follow us on        

मुंबई: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (AIU) ड्रग्ज तस्करीच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. बँकॉकमधून आणलेले सुमारे ६४ कोटी ३९४ लाख रुपये मूल्याचे ‘हायड्रोपोनिक कॅनाबिस’ (उच्च दर्जाचा गांजा) जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी एका परदेशी नागरिकासह तीन भारतीय अशा एकूण चार प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, बँकॉकमधून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची खात्रीलायक माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, विमानतळ प्रशासनाने मंगळवारी एक विशेष शोध मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत बँकॉकमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आणि त्यांच्या सामानाची कसून तपासणी करण्यात आली. याच दरम्यान संशयास्पद हालचालींवरून चार प्रवाशांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

​तपास अधिकाऱ्यांनी या चारही आरोपींच्या सामानाची झडती घेतली असता, त्यात ६४ किलो ३९४ ग्रॅम हायड्रोपोनिक कॅनाबिस लपवून ठेवल्याचे आढळले. चौकशीत असे समोर आले की, आरोपींनी हे अमली पदार्थ बँकॉकमध्ये मिळवले होते आणि ते मुंबईतील त्यांच्या साथीदारांपर्यंत पोहोचवणार होते. या कामाच्या बदल्यात त्यांना विमानाची तिकिटे आणि ठराविक कमिशनचे आमिष दाखवण्यात आले होते. मात्र, विमानतळाच्या आवारातून बाहेर पडण्यापूर्वीच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

​या कारवाईनंतर चारही प्रवाशांविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या (NDPS Act) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींना बुधवारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने त्यांची गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Facebook Comments Box

किरण बेदी यांचा कोकण रेल्वेच्या ‘मॅनेजमेंट इनसाइट’ कार्यक्रमात सहभाग

   Follow us on        

नवी मुंबई: पहिल्या महिला आयपीएस (IPS) अधिकारी तसेच पुद्दुचेरीच्या माजी उपराज्यपाल किरण बेदी यांनी शुक्रवारी नवी मुंबईतील कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) च्या कॉर्पोरेट कार्यालयात आयोजित ‘मॅनेजमेंट इनसाइट प्रोग्राम’मध्ये सहभाग घेतला. या विशेष सत्रात त्यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

​आपल्या प्रशासकीय अनुभवाचा आणि नेतृत्व प्रवासाचा संदर्भ देत किरण बेदी यांनी ‘प्रेरणा’ (Motivation) या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात शिस्त, सचोटी आणि उद्देशाची जाणीव असणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच, एक सक्षम संस्था उभी करण्यासाठी नैतिक नेतृत्व, उत्तरदायित्व आणि सतत स्वतःमध्ये सुधारणा करणे किती महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी विशेष भर दिला.

​दैनंदिन कामकाजात आव्हाने स्वीकारून उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले. त्यांच्या या सत्राने उपस्थितांमध्ये नवा उत्साह निर्माण केला. याच कार्यक्रमात कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनीही आपले विचार मांडले. संस्थेच्या प्रगतीत महिलांच्या योगदानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाला कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Facebook Comments Box

Railway Updates: ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’साठी रेलवन अ‍ॅपमध्ये ‘भारत टॅक्सी’ ची जोड मिळणार

   Follow us on        

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून RailOne अ‍ॅपमध्ये Bharat Taxi सेवा एकत्रित करण्याची योजना आखली आहे. रेलटेलच्या सहकार्याने विकसित होणारा हा उपक्रम सुरवातीला नवी दिल्ली रेल्वे स्थानकाबाहेरील गोंधळ कमी करण्यासाठी प्रवाशांना शेवटच्या टप्प्यातील (last-mile) प्रवासासाठी विश्वासार्ह पर्याय उपलब्ध देण्यासाठी राबवला जाणार आहे. R

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, RailOne अ‍ॅप हे एक ‘सुपर अ‍ॅप’ असून यामध्ये आरक्षित, अनारक्षित तसेच प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंगसह विविध सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. आता Bharat Taxi ची जोड मिळाल्याने रेल्वेने प्रवास केल्यानंतर लगेचच टॅक्सी सेवा बुक करण्याची सोय प्रवाशांना मिळणार आहे.

Bharat Taxi ही देशातील पहिली सहकारी तत्वावर आधारित टॅक्सी सेवा असून ती पारदर्शक व किफायतशीर सेवा देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. ५ फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन झाले होते.

दरम्यान, RailOne अ‍ॅपला मोठा प्रतिसाद मिळत असून १५ मार्च २०२६ पर्यंत या अ‍ॅपचे २.५७ कोटी डाउनलोड झाले आहेत. दररोज सुमारे ७.६४ लाख तिकिटांची बुकिंग या अ‍ॅपद्वारे केली जात आहे. यामध्ये लाईव्ह ट्रेन स्टेटस, पीएनआर तपासणी, कोच पोझिशन, प्लॅटफॉर्म माहिती, तसेच ‘फूड ऑन ट्रॅक’सारख्या सेवाही उपलब्ध आहेत.

नवी दिल्ली येथे यश आल्यानंतर देशातील ईतर स्थानकावर हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

Facebook Comments Box

भाविकांसाठी खुशखबर! मालवण – पंढरपुर – अक्कलकोट बससेवा सुरू

   Follow us on        

मालवण: भाविकांची आणि प्रवाशांची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण झाली असून, मालवण-आचरा-अक्कलकोट या नवीन बस फेरीचा बुधवारी सायंकाळी मालवण येथून मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. ही बस आचरा मार्गे जाणार असल्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांना जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग प्रवाशांसाठी खुला झाला आहे.

​मालवणहून सुटलेली बस आचरा येथे पोहोचताच स्थानिक ग्रामस्थांनी आणि लोकप्रतिनिधींनी बसचे जल्लोषात स्वागत केले. आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते नारळ वाढवून या बस फेरीचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया’ आणि ‘स्वामी समर्थांच्या’ जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

​वेळापत्रक आणि मार्ग

​आचरा बस नियंत्रक दिनेश साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बस फेरीचे नियोजन खालीलप्रमाणे असेल:

​मालवणहून सुटण्याची वेळ: दुपारी ३:४५ वाजता.

​आचरा येथून सुटण्याची वेळ: सायंकाळी ४:३० वाजता.

​प्रवास मार्ग: कणकवली, गगनबावडा, कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर मार्गे अक्कलकोट.

​परतीचा प्रवास: दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६:३० वाजता अक्कलकोट येथून ही बस पुन्हा मालवणच्या दिशेने रवाना होईल.

​या उद्घाटन प्रसंगी माजी सरपंच चंदन पांगे, संतोष मिराशी, अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर, पंकज आचरेकर, अशोक कांबळी, अशोक बागवे, दिलीप कावले, प्रवीण आचरेकर, निवृत्ती आचरेकर उपस्थित होते. तसेच बसचे चालक ए. एन. गव्हाणे, वाहक एस. डी. कांबळे आणि आचरा कंट्रोलर दिनेश साळकर यांचाही सत्कार करण्यात आला.

​ही बस सेवा सुरू करण्यासाठी माजी सरपंच चंदन पांगे यांनी विशेष पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना निवृत्ती आचरेकर, प्रवीण आचरेकर, महेंद्र मांजरेकर, नरेश तारकर, विजय पांगे आणि परिसरातील सर्व ग्रामपंचायतींनी मोलाचे सहकार्य केले.

​या नवीन बस सेवेमुळे आता मालवण आणि आचरा परिसरातील भाविकांना पंढरपूर आणि अक्कलकोट दर्शनासाठी थेट प्रवास करणे सोयीचे होणार आहे.

Facebook Comments Box

Mumbai Water Metro: १० जलमार्ग, २१ स्थानके आणि २२१ किमी लांबी.. मुंबईची ‘वॉटर मेट्रो’ अशी असेल

   Follow us on        

मुंबई: कोची वॉटर मेट्रोच्या जागतिक यशानंतर आता मुंबई महानगर क्षेत्रातही (MMR) जलवाहतुकीचे मोठे जाळे निर्माण होणार आहे. मुंबईच्या अथांग किनारपट्टीचा आणि खाड्यांचा वापर करून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकारने ‘वॉटर मेट्रो’ प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) स्वीकारला असून, या कामाला आता वेग आला आहे. बंदरे मंत्री नितेश राणे यांनी नुकत्याच झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या प्रकल्पाची माहिती दिली. हा प्रकल्प सुमारे २,४०० कोटी रुपयांचा असून, यामुळे मुंबईकरांना रेल्वे आणि रस्त्यांव्यतिरिक्त एक वेगवान, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

 

​या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत संपूर्ण मुंबई आणि उपनगरांना जोडणारे १० जलमार्ग (Routes) विकसित केले जाणार आहेत. या जलमार्गांचे एकूण जाळे सुमारे २१५ किलोमीटर लांबीचे असेल. प्रवाशांच्या सोयीसाठी एकूण २१ आधुनिक टर्मिनल्स (स्थानके) उभारली जाणार असून, ७० पेक्षा जास्त बोटींचा ताफा या मार्गांवर धावणार आहे. यामध्ये वसई-मीरा भाईंदर-ठाणे-वाशी-नवी मुंबई विमानतळ, बोरीवली-मार्वे-वर्सोवा-वांद्रे आणि गेटवे ऑफ इंडिया ते नवी मुंबई यांसारख्या महत्त्वाच्या दुव्यांचा समावेश आहे. तसेच दक्षिण मुंबईला जोडण्यासाठी वांद्रे-वरळी-नरिमन पॉईंट असा जलमार्गही प्रस्तावित आहे.

​या प्रकल्पामुळे मुंबईतील रस्ते आणि लोकल ट्रेनवरील ताण लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे. प्रस्तावित २१ स्थानकांमध्ये वसई, मीरा भाईंदर, गायमुख (ठाणे), कोलशेत, मुंब्रा, कल्याण (गणेश घाट), ऐरोली, वाशी, बेलापूर, गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट, वांद्रे, वरळी आणि वर्सोवा यांसारख्या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला असून, हे काम जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. जर या प्रकल्पाची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली, तर मुंबईची किनारपट्टी ही शहराच्या वाहतुकीची नवीन ‘लाईफलाईन’ ठरू शकते.

 

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search