Konkan Railway: योग नगरी ऋषिकेश आणि एर्नाकुलम दरम्यान धावणार ‘स्पेशल एक्सप्रेस’

   Follow us on        

एर्नाकुलम: उत्तर भारत आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने योग नगरी ऋषिकेश – एर्नाकुलम जंक्शन – योग नगरी ऋषिकेश दरम्यान  स्पेशल एक्सप्रेस गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे उत्तराखंड, दिल्ली, महाराष्ट्र, गोवा आणि केरळ या राज्यांमधील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

​गाड्यांचे वेळापत्रक आणि मार्ग

​१. ट्रेन क्र. ०४३६० (योग नगरी ऋषिकेश ते एर्नाकुलम जंक्शन): ही गाडी शुक्रवारी, ३० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ०७:०० वाजता योग नगरी ऋषिकेश येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री २३:३० वाजता एर्नाकुलम जंक्शनला पोहोचेल.

​२. ट्रेन क्र. ०४३५९ (एर्नाकुलम जंक्शन ते योग नगरी ऋषिकेश): परतीच्या प्रवासात ही गाडी मंगळवारी, ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री २३:०० वाजता एर्नाकुलम येथून सुटेल आणि चौथ्या दिवशी दुपारी १६:१५ वाजता योग नगरी ऋषिकेशला पोहोचेल.

योग नगरी ऋषिकेश आणि एर्नाकुलम जंक्शन दरम्यान धावणारी ही विशेष एक्सप्रेस एकूण ३३ स्थानकांवर थांबणार असून, तिचा मार्ग हरिद्वार, मेरठ सिटी, हजरत निजामुद्दीन, मथुरा, कोटा, नागदा, रतलाम, वडोदरा, सुरत, वसई रोड, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम, मडगाव, कारवार, कुमटा, भटकळ, उडुपी, मंगळूर, कासारगोड, कन्नूर, कोझिकोड, तिरुर, कुट्टिपुरम, शोरानूर, थ्रिसूर आणि अलुआ असा आहे.

​कोचची रचना (Coach Composition) या गाडीत प्रवाशांच्या सोयीसाठी विविध श्रेणींचे एकूण १८ डबे असतील:

​१ डबा: प्रथम श्रेणी सह एसी टू टायर (1st Class Cum AC 2 Tier)

​१ डबा: एसी टू टायर (AC 2 Tier)

​३ डबे: एसी थ्री टायर (AC 3 Tier)

​७ डबे: स्लीपर क्लास (Sleeper Class)

​४ डबे: जनरल सेकंड क्लास (General Second Class)

​२ डबे: लगेज कम ब्रेक व्हॅन

​आरक्षणाबाबत माहिती या विशेष गाड्यांचे आगाऊ आरक्षण (Advance Reservation) २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ०८:०० वाजेपासून दक्षिण रेल्वेच्या (Southern Railway) केंद्रांवरून आणि आयआरसीटीसीच्या (IRCTC) संकेतस्थळावर सुरू झाले आहे.

​प्रवाशांनी या विशेष सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावरील तिकीट आरक्षण खिडकीचे अस्तित्व धोक्यात; रेल्वेकडून एक महिन्याची ‘डेडलाईन’

   Follow us on        

सीबीडी बेलापूर: कोंकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यालयात २७ जानेवारी रोजी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ आणि रेल्वे अधिकारी यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सिंधुदुर्ग (ओरस) रेल्वे स्थानकावरील आरक्षण प्रणाली (PRS) केंद्राबाबत रेल्वे प्रशासनाने चिंतेची बाब मांडली आहे. प्रवाशांच्या मागणीखातर सुरू करण्यात आलेल्या या आरक्षण खिडकीला सध्या अत्यंत अल्प प्रतिसाद मिळत असून, दिवसाला सरासरी केवळ ७ तिकिटांचे आरक्षण होत आहे. रेल्वेच्या नियमांनुसार, एखादे आरक्षण केंद्र सुरू ठेवण्यासाठी तिथून दिवसाला किमान २५ तिकिटांची विक्री होणे आवश्यक असते.

​प्रवासी महासंघाच्या विनंतीचा मान राखून रेल्वे अधिकाऱ्यांनी हे केंद्र सुरू ठेवण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. जर या काळात प्रतिसादात सुधारणा झाली नाही, तर हे केंद्र कायमचे बंद केले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख अभिजित धुरत यांनी ओरस, कुडाळ आणि परिसरातील नागरिकांना कळकळीचे आवाहन केले आहे की, त्यांनी मोबाईल ॲपऐवजी प्रत्यक्ष रेल्वे खिडकीवर जाऊन आरक्षण करावे. अपेक्षित २५ किंवा त्याहून अधिक आरक्षणे नोंदवून हे केंद्र वाचवण्यासाठी सहकार्य करावे, अन्यथा हे केंद्र बंद झाल्यास महासंघ जबाबदार राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Facebook Comments Box

mAadhaar App: आता घरबसल्या आधार कार्डवरील नाव आणि पत्ता बदलणे शक्य

   Follow us on        

नवी दिल्ली: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार कार्ड धारकांच्या सोयीसाठी एक नवीन आणि प्रगत मोबाईल अ‍ॅप लाँच केले आहे. या अ‍ॅपमुळे नागरिकांना आता आधारशी संबंधित कामांसाठी आधार सेवा केंद्रांवर जाण्याची गरज उरणार नाही. या नवीन प्लॅटफॉर्मवरून युजर्स आपले नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर यांसारखी वैयक्तिक माहिती अत्यंत सोप्या पद्धतीने स्वतः अपडेट करू शकतील. याशिवाय, आधारची सुरक्षितता वाढवण्यासाठी यामध्ये ‘ऑफलाईन व्हेरिफिकेशन’ आणि ‘सिलेक्टिव्ह शेअरिंग’ यांसारखी प्रगत फीचर्स देण्यात आली आहेत, ज्याद्वारे युजर्स आपली माहिती सुरक्षितपणे शेअर करू शकतील.

​महत्त्वाची बाब म्हणजे, या अ‍ॅपमध्ये एकाच वेळी अनेक प्रोफाईल्स आणि कॉन्टॅक्ट कार्ड्स व्यवस्थापित करण्याची सुविधा देण्यात आली आहे, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आधार सांभाळणे अधिक सोपे होणार आहे. डिजिटल इंडियाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात असून, यामुळे आधार केंद्रांवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. नागरिकांनी हे अधिकृत अ‍ॅप डाउनलोड करून या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

दुःखद बातमी: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचे आज, २८ जानेवारी २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली असून, राज्य सरकारने अधिकृतपणे दुखवटा जाहीर केला आहे.

​सामान्य प्रशासन विभागाने (प्रोटोकॉल विभाग) जारी केलेल्या परिपत्रकानुसार खालील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत:

​तीन दिवसांचा राज्य दुखवटा: दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात २८ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत तीन दिवसांचा शासकीय दुखवटा पाळला जाईल.

​राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरणार: या तीन दिवसांच्या काळात ज्या शासकीय इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जातो, तिथे तो अर्ध्यावर उतरवण्यात (Half Mast) येईल.

​आज शासकीय सुट्टी: उपमुख्यमंत्र्यांच्या निधनाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आज, बुधवार २८ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

​अधिकृत कार्यक्रम रद्द: दुखवटा कालावधीत कोणताही अधिकृत शासकीय करमणुकीचा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही.

​शासनाच्या वतीने अंडर सेक्रेटरी एच. पी. बाविस्कर यांनी हे आदेश जारी केले असून, सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि विभागीय आयुक्तांना याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Facebook Comments Box

धक्कादायक! बारामतीत लँडिंगदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा अपघात

   Follow us on        

बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाला आज सकाळी बारामतीमध्ये लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज सकाळी मुंबईहून बारामतीला चार जाहीर सभांना संबोधित करण्यासाठी निघाले होते. मात्र, बारामती विमानतळावर उतरत असताना त्यांचे विमान धावपट्टीवरून घसरले आणि बाजूला जाऊन कोसळले. या विमानात अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा कर्मचारीही उपस्थित होते.

​बारामती विमानतळाचे व्यवस्थापक शिवाजी तावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘Lear Jet 45’ (VT SSK) या भाड्याने घेतलेल्या विमानाने लँडिंगचा प्रयत्न केला असता, ते धावपट्टीच्या कडेला जाऊन आदळले आणि त्यानंतर विमानाचा स्फोट झाला. या भीषण अपघातानंतर उपमुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. प्रशासनाकडून सध्या बचावकार्य सुरू असून संपूर्ण महाराष्ट्र या घटनेमुळे हादरला आहे. या प्रकरणाचे अधिक तपशील येणे अद्याप बाकी आहे.

Facebook Comments Box

शक्तीपीठ महामार्गाचा नवा आराखडा तयार; आता १३ जिल्ह्यांतील ३९५ गावांतून जाणार महामार्ग, लांबीही वाढली

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित संरेखनाचा (Revised Alignment) प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. या नवीन आराखड्यानुसार महामार्गाची लांबी वाढली असून, आता हा मार्ग १२ ऐवजी १३ जिल्ह्यांमधून जाणार आहे.

​मुख्य बदल आणि वैशिष्ट्ये:

​१. लांबीत वाढ: सुरुवातीला हा महामार्ग ८०३ किमीचा प्रस्तावित होता. मात्र, स्थानिक विरोध आणि भौगोलिक बदलांमुळे आता तो ८५६ किमी लांबीचा असेल.

२. सातारा जिल्ह्याचा समावेश: यापूर्वी हा मार्ग १२ जिल्ह्यांमधून जाणार होता. आता यात सातारा जिल्ह्याचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.

३. बाधित जिल्हे: वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या १३ जिल्ह्यांतून हा महामार्ग जाणार आहे.

४. गावांची संख्या: महामार्ग आता एकूण ३९५ गावांतून जाणार आहे. यापूर्वी ही संख्या ३५० च्या आसपास होती.

​विरोधामुळे आराखड्यात बदल:

​कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला आणि भूसंपादनाला तीव्र विरोध दर्शवला होता. आंदोलने आणि जनआक्रोश लक्षात घेऊन राज्य सरकारने एमएसआरडीसीला जिथे विरोध आहे, तिथे पर्यायी मार्ग शोधण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, ज्या ठिकाणी जास्त विरोध होता, तिथून महामार्गाला ‘वळसा’ देण्यात आला आहे. या बदलामुळे काही महत्त्वाची शक्तीपीठे महामार्गापासून काहीशी दूर गेली असली, तरी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

​या सुधारित आराखड्यामुळे भूसंपादनाच्या क्षेत्रातही वाढ झाली असून, आता एकूण ८,५०० हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. जिथे शेतकऱ्यांचा विरोध जास्त होता, तिथे महामार्गाला वळसा देण्यात आला आहे, ज्यामुळे काही धार्मिक स्थळे किंवा शक्तीपीठे महामार्गापासून काही अंतरावर गेली आहेत. दरम्यान, ज्या ठिकाणी विरोध नाही अशा १४६ गावांमध्ये जमिनीची मोजणी आधीच पूर्ण झाली असून, उर्वरित गावांमध्ये सरकारची मंजुरी मिळताच कामाला सुरुवात केली जाईल. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर बांधण्यात येणारा हा प्रकल्प दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Facebook Comments Box

सावंतवाडी टर्मिनससाठी आपल्या कडे निधी नाही; कोकण रेल्वे प्रशासनाची स्पष्टोक्ती, आता चेंडू रेल्वे मंत्रालयाच्या कोर्टात!

   Follow us on        

बेलापूर: सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे टर्मिनसमध्ये रूपांतर करण्याच्या मागणीसाठी कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य सुरेंद्र नेमळेकर यांनी पुकारलेले उपोषण स्थगित केल्यानंतर, आज बेलापूर येथील कोकण रेल्वेच्या मुख्य कार्यालयात एक महत्त्वाची सभा पार पडली. या सभेत बोलताना कोकण रेल्वेच्या (KRCL) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सावंतवाडी टर्मिनसबाबत प्रशासकीय अडथळे स्पष्ट करत तूर्त या प्रकल्पाबाबत असमर्थता दर्शविली आहे. ‘वर्तमान परिस्थितीत सावंतवाडी येथे टर्मिनस उभारणे कोकण रेल्वेसाठी निधी अभावी शक्य नाही’ असे स्पष्ट मत मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (CCM) श्री. आशुतोष श्रीवास्तव आणि सिव्हिल विभागाचे श्री. एल. प्रकाश यांनी यावेळी व्यक्त केले.

​या प्रकल्पासाठी लागणारा निधी हा अत्यंत मोठा असून, रेल्वेच्या सध्याच्या बजेटमध्ये हे शक्य नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. सावंतवाडी स्टेशनचे पूर्ण क्षमतेच्या टर्मिनसमध्ये रूपांतर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद (Huge Finance) आवश्यक आहे. हा निधी उभारणे कोकण रेल्वेच्या मर्यादेबाहेर असल्याने, या विषयावर आता थेट केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करणे हाच एकमेव मार्ग असल्याचे अधिकाऱ्यांनी सुचवले आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाचा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात गेला असून, मंत्रालयाकडून विशेष निधी मिळाल्याशिवाय टर्मिनसचे काम पुढे सरकणे कठीण दिसत आहे.

​या गंभीर परिस्थितीनंतर आता कोकणातील लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांच्या हितासाठी विद्यमान खासदार नारायण राणे आणि खासदार सुनील तटकरे यांनी हा प्रश्न लोकसभेत लावून धरणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, मुंबई आणि ठाणे परिसरातील अनेक मतदारसंघांत कोकणी मतदारांचे मोठे प्राबल्य असल्याने, तेथील खासदारांनीही या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन रेल्वे मंत्रालयावर दबाव निर्माण करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एकूणच, प्रशासकीय पातळीवरून हा प्रश्न आता राजकीय इच्छाशक्तीच्या वळणावर येऊन थांबला आहे.

बेलापूर येथील आजच्या सभेत कोंकण रेल्वेचे अधिकारी आशुतोष श्रीवास्तव (कमर्शियल डिपार्टमेंट मॅनेजर),एल. प्रकाश (मेंटेनन्स आणि कन्स्ट्रक्शन डिपार्टमेंट),राजेंद्र कुमार शर्मा (यातायात विभाग),जुबेर पठाण (कोंकण रेल्वे सुरक्षा आयुक्त),राजेंद्र दिनकर घोलप (तक्रार निवारण अधिकारी), राजेश ठोंबल (ट्रॅफिक परिचालन),बाळासाहेब निकम (चिफ पर्सनल ऑफिसर).पी. जी. नायर ( डेप्यूटी चीफ इंजिनीअर )यांच्याशी बैठकीत चर्चा झाली

या वेळी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी  महासंघाचे अध्यक्ष आणि ZRUCC कमिटी सदस्य अभिजीत धुरत, सल्लागार व कोंकण रेल्वे संस्थापक सदस्य सुरेंद्र नेमळेकर, गणेश परब , अमित नार्वेकर, शक्तीप्रसाद शिरोडकर, सचिन धाडवे, वासुदेव गुरव, पवन पांचाळ, विक्रम येलवे, विनायक राणे, संतोष पालकर, रमण सावंत, सुनील उतेकर, तानाजी परब, अमित दुखंडे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली. यावेळी कोकण रेल्वे संबधित इतरही महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल सकारात्मक चर्चा करण्यात आली.

सावंतवाडी टर्मिनसची गरज

सावंतवाडी स्टेशनचे ‘टर्मिनस’मध्ये रूपांतर होणे हे केवळ तांत्रिक बदल नसून, संपूर्ण दक्षिण कोकणच्या दळणवळणासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी तो एक क्रांतीकारक टप्पा ठरणार आहे. टर्मिनसचे सर्वात मोठे महत्त्व म्हणजे यामुळे सावंतवाडी हे गाड्यांचे ‘उगमस्थान’ (Originating point) बनेल, ज्यामुळे कोकणातील प्रवाशांना आरक्षणासाठी स्वतंत्र कोटा उपलब्ध होऊन ‘कन्फर्म सीट’ मिळणे सोपे होईल. सध्या अनेक गाड्या गोव्याहून भरून येत असल्याने कोकणातील प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागतो, ही समस्या टर्मिनसमुळे कायमची सुटू शकते. तसेच, टर्मिनसमध्ये गाड्यांच्या देखभालीसाठी लागणारी ‘पिट लाईन’ आणि साफसफाईची यंत्रणा उपलब्ध असल्याने, मुंबई किंवा पुण्याहून येणाऱ्या गाड्या मडगावपर्यंत न नेता थेट सावंतवाडीत थांबवता येतील, ज्यामुळे मडगाव स्थानकावरील अतिरिक्त ताण कमी होईल.

 

Facebook Comments Box

सावंतवाडी: अजब लाच, गजब अधिकारी! गरिबाकडून रेशनकार्डसाठी मागितले ‘चुलीवर भाजलेले काजू’ आणि ‘बकरीचे दुध’


   Follow us on        

सिंधुदुर्ग: प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्याचे दावे केले जात असतानाच, सावंतवाडी तहसील कार्यालयातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवीन रेशनकार्ड बनवून देण्यासाठी एका महिला पुरवठा निरीक्षकाने चक्क चुलीवर भाजलेले काजू, साजूक तूप, गोड पपई आणि बकरीच्या दुधाची मागणी केल्याची तक्रार एका गरीब महिलेने केली आहे. या विचित्र मागणीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

​नेमकी घटना काय?

​सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथील रहिवासी असलेल्या शालू जानू कोकरे या महिलेने ही तक्रार केली आहे. शालू कोकरे या धनगर समाजातील असून बकरी पालन आणि मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. काही दिवसांपूर्वी त्या नवीन रेशनकार्ड काढण्यासाठी सावंतवाडी तहसील कार्यालयात गेल्या होत्या.

​तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, तेथील पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती दिपाली सचितानंद गोटे/वाघमारे यांनी रेशनकार्डसाठी त्यांच्याकडे १०,००० रुपयांची मागणी केली.

​लाचेत मागितले ‘खाद्यपदार्थ’

​जेव्हा शालू कोकरे यांनी आपली आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे सांगितले आणि आपण पैसे देऊ शकत नाही असे स्पष्ट केले, तेव्हा संबंधित महिला अधिकाऱ्याने पैशांऐवजी पदार्थांची यादीच समोर ठेवली. तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार, अधिकाऱ्याने खालील वस्तूंची मागणी केली:

​पेजेचे तांदूळ, चुलीवर भाजलेले काजूगर, साजूक तूप​, मोठ्या आकाराची गोड पपई​, बकरीचे दूध

​इतकेच नाही तर, हे सामान कार्यालयात न आणता बाजूच्या कॅन्टीनमध्ये ठेवण्यास आणि दूध फ्रिजमध्ये ठेवण्यास बजावले. ‘हे सामान दिले तर कागदपत्रे नसली तरी एका तासात रेशनकार्ड बनवून देईन’ असे आश्वासनही संबंधित अधिकाऱ्याने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

​अपमानास्पद वागणूक

​शालू कोकरे यांनी या वस्तू देण्यासही असमर्थता दर्शवली असता, संबंधित महिला अधिकाऱ्याने त्यांना “एकही वस्तू देता येत नसेल तर इथून चालती हो, माझा वेळ घालवू नको” अशा शब्दांत अपमानित करून कार्यालयातून हाकलून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

​कठोर कारवाईची मागणी

​याप्रकरणी पीडित महिलेने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेश राणे, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांकडे लेखी तक्रार केली आहे. एका गरीब आणि गरजू महिलेला अशा प्रकारे वेठीस धरणाऱ्या भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Facebook Comments Box

प्रेरणा संस्थेची वार्षिक सत्यनारायण महापूजा जल्लोषात संपन्न

   Follow us on        

मुंबई:- भूखंड क्रमांक १५६, प्रेरणा संस्था (रजि.) चारकोप सेक्टर एकच्या वतीने आयोजित केलेल्या ३६ व्या सत्यनारायण महापूजे निमित्त हळदी कुंकू, महाप्रसाद, कला, क्रीडा सांस्कृतिक व श्री प्रवीण सावंत, झाली कृपा साईंची समूहाचे सुस्वर सुगम भजन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम संस्थेतील बाळ-गोपाळ, महिला मंडळ व रहिवाश्यांनी जल्लोषात व उत्साहात साजरे केले. उत्सवा दरम्यान प्रेरणा संस्था विद्युत रोषणाईने झगमगली होती.

वरील संस्थेत सादर करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचे चारकोप परिसरात विशेष कौतुक होत आहे. सध्याच्या अशाश्वत सांस्कृतिक बदल आणि पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करू पाहणाऱ्या मंडळाच्या गर्दीत ‘युवा प्रेरणा मंडळ’ आणि ‘प्रेरणा संस्था पूजा समिती’ यांचे अभिजात मराठी संस्कृतीचा साधेपणा जपणारे आयोजन पाहून मन भारावून गेले. सध्या सर्रास दिसून येणाऱ्या अशाश्वत कार्यक्रमांपेक्षा प्रतीवर्षी अशाच अभिजात सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य देण्यास आग्रही असल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय साईल व पूजा समिती प्रमुख श्री नितीन शिगवण व युवा मित्र मंडळाच्या सर्व सभासदांनी प्रतिपादन केले. प्रेरणा संस्थेतील रहिवाशांनीही या कार्यक्रमास उदंड प्रतिसाद दर्शवून संस्कृतीच्या संवर्धनाच्या या महत्कार्यात आपले मोलाचे योगदान दिले.

संस्थेतील श्री प्रशांत संभाजी जाधव हे सनदी लेखापाल (सी. ए.) परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल व कुमारी अद्विका अभिजित पालांडे हिने इंटरनॅशनल स्केटिंग स्पर्धांमधून अनेक सुवर्ण पदके प्राप्त केल्याबद्दल तसेच विविध स्पर्धेत सहभागी झालेले बाळ गोपाळ, महिला यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

नवनिर्वाचित नगरसेविका दक्षता कवठणकर, मा. नगरसेवक व सल्लागार सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मक मंडळ श्री श्रीकांत कवठणकर, सर्वश्री योगेश पडवळ सचिव उत्तर मुंबई भाजपा, निखिल गुढेकर शिवसेना शाखाप्रमुख, प्रमोद गुजर मा. वॉर्ड अध्यक्ष भाजपा, मनीष साळुंखे वॉर्ड अध्यक्ष भाजपा, श्री शशांक चौकीदार अध्यक्ष प्रबोधनकार ठाकरे नगर युनियन चारकोप, सौ मनाली चौकीदार महिला विभाग प्रमुख शिवसेना, सौ. विशाखा मोरये महिला विभाग प्रमुख शिवसेना, सर्वश्री राजेंद्र (राजू मामा) खंकाळ समाजसेवक, भूषण विचारे आपला माणूस, उदय कोंडविलकर शाखा अध्यक्ष मनसे, श्री संतोष गवळी शाखा प्रमुख शिवसेना व इतर अनेक मान्यवरांनी श्रीचे दर्शन घेतले आणि आयोजकांस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक श्री संदीप गोसावी, श्री स्वप्नील शिंदे, सौ प्रणाली राऊळ व सौ. स्नेहल निनाद पवार यांनी केले.

 

Facebook Comments Box

प्रजासत्ताक दिनी पद्म पुरस्कारांची मोठी घोषणा; १३१ जणांचा गौरव, संपूर्ण यादी ईथे वाचा

   Follow us on        

नवी दिल्ली | २५ जानेवारी २०२६

देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांची घोषणा केंद्रीय गृह मंत्रालयाकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली आहे. हे पुरस्कार पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री अशा तीन श्रेणींमध्ये प्रदान केले जातात.

कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक जीवन, विज्ञान व अभियांत्रिकी, व्यापार व उद्योग, वैद्यक, साहित्य व शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा आदी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय व अतुलनीय योगदानासाठी हे पुरस्कार दिले जातात.

पद्म पुरस्कारांचे महत्त्व

पद्म विभूषण : अपवादात्मक व अतिशय विशिष्ट सेवेसाठी

पद्म भूषण : उच्च दर्जाच्या विशिष्ट सेवेसाठी

पद्मश्री : कोणत्याही क्षेत्रातील उल्लेखनीय सेवेसाठी

दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या पुरस्कारांची घोषणा केली जाते. पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते साधारणतः मार्च-एप्रिल महिन्यात राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात केले जाते.

२०२६ साठी १३१ पद्म पुरस्कारांना मंजुरी

२०२६ साठी राष्ट्रपतींनी एकूण १३१ पद्म पुरस्कारांना मंजुरी दिली आहे. यामध्ये २ ‘ड्युओ’ प्रकरणे (ज्यात दोन व्यक्तींना मिळणारा एकच पुरस्कार) समाविष्ट आहेत.

पुरस्कारांचे वर्गीकरण

पद्म विभूषण : ५

पद्म भूषण : १३

पद्मश्री : ११३

या यादीत:

१९ महिला पुरस्कारार्थी

६ परदेशी / NRI / PIO / OCI श्रेणीतील व्यक्ती

१६ मरणोत्तर पुरस्कार यांचा समावेश आहे.

 

सर्व पुरस्कारार्थींची नावे – क्षेत्र (Field) आणि राज्य / देशासह मराठीत, पुरस्कारनिहाय दिली आहेत. (सरकारी प्रेस नोटनुसार)


🏅 पद्म विभूषण (५)

  1. स्व. धर्मेंद्र सिंह देओल – कला – महाराष्ट्र
  2. के. टी. थॉमस – सार्वजनिक जीवन – केरळ
  3. एन. राजम – कला – उत्तर प्रदेश
  4. पी. नारायणन – साहित्य व शिक्षण – केरळ
  5. स्व. व्ही. एस. अच्युतानंदन – सार्वजनिक जीवन – केरळ

🏅 पद्म भूषण (१३)

  1. अल्का याज्ञिक – कला – महाराष्ट्र
  2. भगतसिंग कोश्यारी – सार्वजनिक जीवन – उत्तराखंड
  3. कल्लीपट्टी रामास्वामी पलानीस्वामी – वैद्यक – तामिळनाडू
  4. ममूटी – कला – केरळ
  5. डॉ. नोरी दत्तात्रेयुडू – वैद्यक – अमेरिका
  6. स्व. पियुष पांडे – कला – महाराष्ट्र
  7. एस. के. एम. मैलानंदन – सामाजिक कार्य – तामिळनाडू
  8. शतावधानी आर. गणेश – कला – कर्नाटक
  9. स्व. शिबू सोरेन – सार्वजनिक जीवन – झारखंड
  10. उदय कोटक – व्यापार व उद्योग – महाराष्ट्र
  11. स्व. व्ही. के. मल्होत्रा – सार्वजनिक जीवन – दिल्ली
  12. वेल्लापल्ली नटेसन – सार्वजनिक जीवन – केरळ
  13. विजय अमृतराज – क्रीडा – अमेरिका

🏅 पद्मश्री (११३)

(नाव – क्षेत्र – राज्य / देश)

  1. ए. ई. मुत्थुनायगम – विज्ञान व अभियांत्रिकी – केरळ
  2. अनिल कुमार रस्तोगी – कला – उत्तर प्रदेश
  3. अंके गौडा एम. – सामाजिक कार्य – कर्नाटक
  4. आर्मिडा फर्नांडिस – वैद्यक – महाराष्ट्र
  5. अरविंद वैद्य – कला – गुजरात
  6. अशोक खाडे – व्यापार व उद्योग – महाराष्ट्र
  7. अशोक कुमार सिंह – विज्ञान व अभियांत्रिकी – उत्तर प्रदेश
  8. अशोक कुमार हलदार – साहित्य व शिक्षण – पश्चिम बंगाल
  9. बलदेव सिंह – क्रीडा – पंजाब
  10. भगवंदास रायकर – क्रीडा – मध्य प्रदेश
  11. भरत सिंह भारती – कला – बिहार
  12. भिकल्या लडक्या धिंडा – कला – महाराष्ट्र
  13. स्व. विश्व बंधू – कला – बिहार
  14. बृज लाल भट – सामाजिक कार्य – जम्मू-काश्मीर
  15. बुद्ध रश्मी मणी – पुरातत्त्व – उत्तर प्रदेश
  16. डॉ. बुध्री ताती – सामाजिक कार्य – छत्तीसगड
  17. चंद्रमौली गड्डामानुगु – विज्ञान व अभियांत्रिकी – तेलंगणा
  18. चरण हेंब्रम – साहित्य व शिक्षण – ओडिशा
  19. चिरंजी लाल यादव – कला – उत्तर प्रदेश
  20. दीपिका रेड्डी – कला – तेलंगणा
  21. धार्मिकलाल पंड्या – कला – गुजरात
  22. गड्डे बाबू राजेंद्र प्रसाद – कला – आंध्र प्रदेश
  23. गफरुद्दीन मेवाती जोगी – कला – राजस्थान
  24. गंभीर सिंह योंझोन – साहित्य व शिक्षण – पश्चिम बंगाल
  25. स्व. गरिमेल्ला बालकृष्ण प्रसाद – कला – आंध्र प्रदेश
  26. गायत्री व रंजनी बालसुब्रमण्यम (ड्युओ) – कला – तामिळनाडू
  27. गोपालजी त्रिवेदी – विज्ञान व अभियांत्रिकी – बिहार
  28. गुडुरू वेंकट राव – वैद्यक – तेलंगणा
  29. एच. व्ही. हांडे – वैद्यक – तामिळनाडू
  30. हॅली वार – सामाजिक कार्य – मेघालय
  31. स्व. हरी माधव मुखोपाध्याय – कला – पश्चिम बंगाल
  32. हरिचरण सैकिया – कला – आसाम
  33. हरमनप्रीत कौर भुल्लर – क्रीडा – पंजाब
  34. इंदरजीत सिंह सिद्धू – सामाजिक कार्य – चंदीगड
  35. जनार्दन बापुराव बोथे – सामाजिक कार्य – महाराष्ट्र
  36. जोगेश देऊरी – शेती – आसाम
  37. जुझर वासी – विज्ञान व अभियांत्रिकी – महाराष्ट्र
  38. ज्योतिष देबनाथ – कला – पश्चिम बंगाल
  39. के. पाजनिवेल – क्रीडा – पुद्दुचेरी
  40. के. रामास्वामी – विज्ञान व अभियांत्रिकी – तामिळनाडू
  41. के. विजय कुमार – नागरी सेवा – तामिळनाडू
  42. स्व. कबिंद्र पुरकायस्थ – सार्वजनिक जीवन – आसाम
  43. कैलाश चंद्र पंत – साहित्य व शिक्षण – मध्य प्रदेश
  44. कलामंडलम विमला मेनन – कला – केरळ
  45. केवाल कृष्ण ठाक्राल – वैद्यक – उत्तर प्रदेश
  46. खेमराज सुंद्रियाल – कला – हरियाणा
  47. कोल्लकल देवकी अम्मा – सामाजिक कार्य – केरळ
  48. कृष्णमूर्ती बालसुब्रमण्यम – विज्ञान व अभियांत्रिकी – तेलंगणा
  49. कुमार बोस – कला – पश्चिम बंगाल
  50. कुमारस्वामी थंगराज – विज्ञान व अभियांत्रिकी – तेलंगणा
  51. प्रो. लार्स-क्रिश्चन कोच – कला – जर्मनी
  52. लिउडमिला खोखलोव्हा – साहित्य व शिक्षण – रशिया
  53. माधवन रंगनाथन – कला – महाराष्ट्र
  54. मगंती मुरली मोहन – कला – आंध्र प्रदेश
  55. महेंद्र कुमार मिश्रा – साहित्य व शिक्षण – ओडिशा
  56. महेंद्र नाथ रॉय – साहित्य व शिक्षण – पश्चिम बंगाल
  57. मामिडाला जगदीश कुमार – साहित्य व शिक्षण – दिल्ली
  58. मंगला कपूर – साहित्य व शिक्षण – उत्तर प्रदेश
  59. मीर हाजीभाई कसंबाई – कला – गुजरात
  60. मोहन नगर – सामाजिक कार्य – मध्य प्रदेश
  61. नारायण व्यास – पुरातत्त्व – मध्य प्रदेश
  62. नरेश चंद्र देव वर्मा – साहित्य व शिक्षण – त्रिपुरा
  63. निलेश मंडळेवाला – सामाजिक कार्य – गुजरात
  64. नुरुद्दीन अहमद – कला – आसाम
  65. ओथुवार थिरुथनी स्वामिनाथन – कला – तामिळनाडू
  66. डॉ. पद्मा गुरमेट – वैद्यक – लडाख
  67. पालकोंडा विजय आनंद रेड्डी – वैद्यक – तेलंगणा
  68. पोखिला लेखथेपी – कला – आसाम
  69. डॉ. प्रभाकर कोरे – साहित्य व शिक्षण – कर्नाटक
  70. प्रतीक शर्मा – वैद्यक – अमेरिका
  71. प्रवीण कुमार – क्रीडा – उत्तर प्रदेश
  72. प्रेमलाल गौतम – विज्ञान व अभियांत्रिकी – हिमाचल प्रदेश
  73. प्रसेनजित चॅटर्जी – कला – पश्चिम बंगाल
  74. डॉ. पुन्नियामूर्ती नटेसन – वैद्यक – तामिळनाडू
  75. स्व. आर. कृष्णन – कला – तामिळनाडू
  76. आर. व्ही. एस. मणी – नागरी सेवा – दिल्ली
  77. रबीलाल टुडू – साहित्य व शिक्षण – पश्चिम बंगाल
  78. स्व. रघुपत सिंह – शेती – उत्तर प्रदेश
  79. रघुवीर तुकाराम खेडकर – कला – महाराष्ट्र
  80. राजस्थपती कलियप्पा गौंडर – कला – तामिळनाडू
  81. राजेंद्र प्रसाद – वैद्यक – उत्तर प्रदेश
  82. स्व. रामा रेड्डी मामिडी – पशुपालन – तेलंगणा
  83. राममूर्ती श्रीधर – रेडिओ प्रसारण – दिल्ली
  84. रामचंद्र व सुनीता गोडबोले (ड्युओ) – वैद्यक – छत्तीसगड
  85. रतीलाल बोरीसागर – साहित्य व शिक्षण – गुजरात
  86. रोहित शर्मा – क्रीडा – महाराष्ट्र
  87. एस. जी. सुशीलम्मा – सामाजिक कार्य – कर्नाटक
  88. सांग्युसांग एस. पोन्गेनर – कला – नागालँड
  89. संत निरंजन दास – अध्यात्म – पंजाब
  90. शरत कुमार पात्र – कला – ओडिशा
  91. सरोज मंडल – वैद्यक – पश्चिम बंगाल
  92. स्व. सतीश शहा – कला – महाराष्ट्र
  93. सत्यनारायण नुवाल – व्यापार व उद्योग – महाराष्ट्र
  94. सविता पुनिया – क्रीडा – हरियाणा
  95. प्रो. शफी शौक – साहित्य व शिक्षण – जम्मू-काश्मीर
  96. शशी शेखर वेम्पती – साहित्य व शिक्षण – कर्नाटक
  97. श्रीरंग देवबा लाड – शेती – महाराष्ट्र
  98. शुभा वेंकटेश अय्यंगार – विज्ञान व अभियांत्रिकी – कर्नाटक
  99. श्याम सुंदर – वैद्यक – उत्तर प्रदेश
  100. सिमांचल पात्र – कला – ओडिशा
  101. शिवशंकरि – साहित्य व शिक्षण – तामिळनाडू
  102. डॉ. सुरेश हनगावडी – वैद्यक – कर्नाटक
  103. स्वामी ब्रह्मदेवजी महाराज – सामाजिक कार्य – राजस्थान
  104. स्व. टी. टी. जगन्नाथन – व्यापार व उद्योग – कर्नाटक
  105. टागा राम भिल – कला – राजस्थान
  106. तरुण भट्टाचार्य – कला – पश्चिम बंगाल
  107. टेची गुबिन – सामाजिक कार्य – अरुणाचल प्रदेश
  108. थिरुवारूर भक्तवत्सलम – कला – तामिळनाडू
  109. त्रिप्ती मुखर्जी – कला – पश्चिम बंगाल
  110. विझिनाथन कामकोटी – विज्ञान व अभियांत्रिकी – तामिळनाडू
  111. वेंपटी कुटुंब शास्त्री – साहित्य व शिक्षण – आंध्र प्रदेश
  112. स्व. व्ह्लादिमेर मेस्तविरिश्विली – क्रीडा – जॉर्जिया
  113. स्व. युमनाम जात्रा सिंह – कला – मणिपूर

 

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search