पुणे: मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि सतर्क करणारी बातमी आहे. पुणे-मिरज रेल्वे मार्ग दुपदरीकरण (Doubling Project) प्रकल्पांतर्गत ‘निरा यार्डाच्या’ नूतनीकरणाचे काम आणि इतर अत्यंत आवश्यक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मध्य रेल्वेने तब्बल २१ दिवसांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक जाहीर केला आहे. हा ‘प्री-नॉन्-इंटरलॉकिंग’ आणि ‘नॉन्-इंटरलॉकिंग’ ब्लॉक ५ जून ते २५ जून २०२६ या कालावधीत घेतला जात आहे. रेल्वे सुरक्षा आणि आधुनिकीकरणाच्या या कामांमुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
या ब्लॉकचा सर्वाधिक फटका हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेसला बसणार आहे. १९ जून रोजी धावणारी हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस केवळ सातारा स्टेशनपर्यंतच चालवली जाईल. या दिवशी सातारा ते पुणे दरम्यानची वंदे भारतची सेवा पूर्णपणे रद्द राहणार आहे. याशिवाय, २४ जून रोजी सुटणारी हजरत निजामुद्दीन-वास्को एक्सप्रेस तिच्या नियमित मार्गावरून न धावता, मनमाड-दौंड-कुर्डूवाडी-मिरज या बदललेल्या मार्गाने चालवली जाणार आहे.
या २१ दिवसांच्या कालावधीत अनेक गाड्या विलंबाने धावणार आहेत. यामध्ये बेंगळुरू-एलटीटी मुंबई एक्सप्रेस आणि मैसूर-अजमेर एक्सप्रेस यांसह अनेक प्रमुख ट्रेनचा समावेश आहे, ज्यांना वेगवेगळ्या तारखांना विलंबाचा (Delays) सामना करावा लागेल. या काळात प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मध्य रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून, प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी अधिकृत रेल्वे माध्यमांवरून आणि चॅनेल्सवरून अद्ययावत माहिती घ्यावी, असे आवाहन केले आहे.


