आरक्षित डब्यांतील वाढत्या गर्दीमुळे रेल्वेचं मोठं पाऊल.
Waiting list passenger not allowed: रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांतून प्रतीक्षायादीतील Waiting List तिकिटांवर रेल्वे प्रवाशांना आता प्रवास करता येणार नाही. आरक्षित डब्यातील गर्दी कमी करण्यासाठी विनातिकीट आणि प्रतीक्षायादीतील प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करून प्रवासादरम्यान कोणत्याही स्थानकांवर उतरवण्याची कारवाई सुरू केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दीत होत आहे. गर्दीमुळे तिकीटधारक प्रवाशांना मेल-एक्स्प्रेसमध्ये प्रवेश करता येत नाही. डब्यात प्रवेश केल्यानंतर आरक्षित आसनापर्यंत जाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. प्रतीक्षायादीतील प्रवाशांमुळे होणार्या गर्दीच्या सोशल मीडियावर व्हायरल होणार्या व्हिडीओंची व्हिडीओची गंभीर दखल रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आली आहे.
तिकीट खिडक्यांवर काढलेले तिकीट रद्द प्रवाशांना रद्द करावे लागणार.
ऑनलाईन प्रतीक्षायादीतील तिकीट कन्फर्म झाले नाही तर ते रद्द होऊन त्याचा परतावा प्रवाशांच्या थेट बँक खात्यात जमा होतो. तिकीट खिडकीवरील कन्फर्म नसलेले तिकीट प्रवाशांना रद्द करावे लागणार आहे. रेल्वेगाडीचा चार्ट साधारण चारतास आधी तयार होतो. त्याचवेळी तिकीट कन्फर्म झाले की नाही, याची माहिती प्रवाशांना समजते. गाडी सुटण्याच्या अर्धा तास आधी प्रतीक्षायादीतील तिकीट प्रवाशांनी रद्द केल्यास त्याचा पूर्ण परतावा प्रवाशांना मिळणार आहे. गाडी गेल्यानंतर तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना कोणताही परतावा मिळणार नाही.
प्रतीक्षायादीतील तिकीट असलेले प्रवासी आरक्षित डब्यांतून प्रवास करताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई न करता त्यांना पुढील स्टेशन आल्यावर त्या डब्यातून उतरविण्यात येत आहे. .‘गाडी क्रमांक ११०५९ लोकमान्य टिळक टर्मिनस ते छपरा एक्स्प्रेसमधून सर्वाधिक २८२ प्रवाशांना स्थानकांवर उतरवण्यात आले.(११०६१) जयानगर एक्स्प्रेसमधून २०० प्रवाशांना उतरवण्यात आले आहे. मुंबईतून सुटणाऱ्या ३१ मेल-एक्स्प्रेसची तपासणी केल्यानंतर सुमारे १,६०० प्रवाशांना विविध स्थानकात उतरवण्यात आले आहे’, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले. रेल्वे प्रशासनाने याबाबत कोणतीही अधिसूचना GR प्रसिद्ध केली नसल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र मुंबई उपनगरीय स्थानकावर याबाबत अनॉसमेंट होत आहे.
वाचकांचा प्रतिसाद
अशी कारवाई करणे पूर्णपणे चुकीचे आहे. कित्येकदा आरक्षित तिकीट भेटत नसल्याने नाईलाजाने वेटिंग तिकीट काढून प्रवास करावा लागतो. गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने त्या त्या गाडीच्या वेटिंग तिकिटांच्या संख्येवर मर्यादा घातल्या पाहिजेत.-प्राजक्ता परब, भांडुप
जनरल डब्यांची परिस्थिती अजून बिकट होईल. आपल्याकडे जनरल डब्यांची खूपच खराब आहे. डब्यांच्या क्षमतेपेक्षा दुप्पट तिप्पट प्रवासी या डब्यांतून प्रवास करतात. हा त्रास काही प्रमाणात वाचविण्यासाठी प्रवासी प्रतीक्षा यादीतील तिकिटांवरुन प्रवास करतात. आता सुद्धा पर्याय नाहीसा झाल्याने प्रवाशांकडे जनरल कोचमधून प्रवास करण्याचा पर्याय राहिल्याने जनरल डब्यांची परिस्थिती अजून बिकट होईल.-राजेश धुरी, विरार




मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या अटल सेतुचे उद्घाटन करण्यात आले त्या रस्त्याला अवघ्या तीन महिन्यातच भेगा पडल्या आहेत. नवी मुंबईकडील एका भागात अर्धा किलोमीटरपर्यंत रस्ता एक फुट खाली खचला आहे. महायुती सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर अटल सेतुची पाहणी करून रस्त्याला भेगा पडल्याचे निदर्शनास आणून दिले. शिवडी न्हावा शेवा प्रकल्पावर राज्य सरकारने १८ हजार कोटी रुपये खर्च केला असून यासाठी बँकेकडून कर्ज काढले आहे. हा काही विकास नाही तर भ्रष्टाचार असून सरकार स्वतःची घरे भरत आहे आणि जनतेच्या जीवाशी खेळत आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव या प्रकल्पाला दिले आहे, त्यांच्या नावाने भ्रष्टाचार करणे हे दुर्भाग्यपूर्ण आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले, उद्घाटनाआधी त्यांनी या प्रकल्पाची व्यवस्थित पाहणी तरी करायला हवी होती. पण नरेंद्र मोदी हेच देशातील भ्रष्टाचाराचे सरदार आहे. सर्व भ्रष्टाचाऱ्यांना ईडी, सीबीआयचा धाक दाखवून भाजपात घेऊन मंत्री बनवतात, असा आरोप पटोले यांनी केला आहे.
भाजपाचे म्हणणे काय?
नाना पटोले यांच्या आरोपांना भाजपच्या वतीने देखील प्रत्युत्तर देण्यात आले असून हा रस्ता अटल सेतू नसून त्याला जोडणारा मार्ग असल्याचे भाजपने म्हटले आहे. तसेच पडलेल्या भेगा या तांत्रिक त्रूटीमुळे पडलेल्या नसल्याचेही भाजपने म्हटले आहे.




Konkan Railway News : दिवसेंदिवस वाढणारी प्रवासीसंख्या पाहता कोकण रेल्वे मार्गावर नवीन गाड्या चालविण्यात याव्यात यासाठी मोठी मागणी होत आहे. मात्र सिंगल रेल्वे रूळामुळे सध्या या मार्गावर गाड्या वाढवणे शक्य होत नाही. त्यामुळे याा मार्गाच्या दुहेेरीकरणाचा प्रस्ताव आला होता. परंतू या मार्गावर नैसर्गिक मर्यादा असल्याने आता ‘पॅच डबलिंग’ करण्याचा निर्णय कोकण रेल्वे महामंडळाने घेतला आहे. तसा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवला असल्याची माहिती कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
पॅच डबलिंग म्हणजे काय?
पॅच डबलिंग म्हणजे संपूर्ण मार्ग दुपदरीकरण न करता ज्या भागात शक्य आहे त्या भागांत दुहेरीकरण करणे. कोकण रेल्वे मार्ग कित्येक बोगद्यातून आणि पुलांवरून जात आहे. हे बोगदे आणि पुले सिंगल रूळांसाठी बांधण्यात आली आहेत. मार्गाचे दुपदरीकरण करताना या मार्गावर पुन्हा बोगदे पाडावे लागतील किंवा शक्य आहे तिथे रुंदीकरण करावे लागेल. नवीन पुले उभारावी लागतील. या गोष्टी खर्चिक आहेत. सपाट भागात मार्गाला दर किमी मागे 15 ते 20 कोटी तर डोंगराळ भागात दर किमीला 80 ते 100 कोटी इतका दुपदरीकरणाचा खर्च आहे. भविष्यात या गोष्टी कराव्याच लागतील मात्र सध्या ‘पॅच डबलिंग’ करून चांगल्या प्रमाणात कोकण रेल्वे मार्गावरील ताण कमी करणे शक्य होईल.
पॅचेसच्या स्वरुपात दुपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सपाट आणि बोगदे नसलेल्या अशा 350 किमी मार्गापैकी काही पॅचेसवर दुपदरीकरण करण्याची योजना आहे.
कोकण रेल्वे मार्गावर गाड्या वाढविण्यासाठी अनेक मागण्या होत आहेत. मात्र कोकण रेल्वे आपल्या पूर्ण क्षमतेने चालविण्यात येत असून नवीन गाडी चालवणे शक्य नसल्याचे असे रेल्वे कडून उत्तर येत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या मार्गावरील बहुतेक गाड्या खासकरुन कमी पल्ल्याच्या गाड्या आपले वेळापत्रक पाळत नाही आहेत. पॅच डबलिंग या समस्या सुटणार आहेत. त्याचबरोबर नवीन गाड्या चालविणे शक्य होणार आहे.




रत्नागिरी : या आर्थिक वर्षात तिकीट तपासणीसाठी तब्बल 21 कोटी 17 लाख 80 हजार 741 रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेले काही काळ कोकण रेल्वेच्या मार्गावर अवैध आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्या मंडळीविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत कोकण रेल्वेच्या मार्गावर काम करणाऱ्या तिकीट तपासणीसांनी उत्कृष्ट कामगिरी करत 78,115 कारवाया केल्या. यातून 21 कोटी 17 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या आर्थिक वर्षात मार्गावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व तिकीट तपासणीसांना कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. संतोष कुमार झा यांनी गेल्या आर्थिक वर्षात तिकीट तपासणीसांनी केल्या कामगिरीचे कौतुक केले आहे.




मुंबई : लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातनिवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी विजय मिळवला. मात्र, नारायण राणेंची खासदारकी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी व त्यांच्यावर 5 वर्ष निवडणुक लढविण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी लादण्यात यावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाते नेते विनायक राऊत यांनी केली आहे. याबाबत, अॅड. असीम सरोदे, अॅड. किशोर वरक ,अॅड. श्रीया आवले यांच्यामार्फत कायदेशीर नोटिसही विनायक राऊत यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेली आहे.
निवडणूक प्रचार कालावधी 5 मे 2024 रोजी संपलेला असतांनाही भाजप कार्यकर्ते 6 मे रोजी देखील नारायण राणे यांचा प्रचार करीत होते, नारायण राणे समर्थक प्रचार संपलेला असतांनाही ई.व्ही.एम.मशीन दाखवून राणे साहेबांनाच मत द्या, असे सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाल्याचे या नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे. नारायण राणे यांचे पुत्र आमदार नीतेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावले, “जर राणे साहेबांना मतदान केले नाही, त्यांना लीड मिळाली नाही तर आमच्याचकडेच निधी मागायला यायचं आहे. त्यामुळे तेव्हा लीड मिळाली नाही तर तुम्हाला निधी सुद्धा मिळणार नाही अशी धमकी 13 एप्रिल रोजी झालेल्या सभेत नितीश राणे यांनी दिली, त्याचाही उल्लेख या नोटिसमध्ये करण्यात आलेला आहे.
निवडणूक आचार संहितेचा नारायण राणे, नितेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी भंग केलेला आहे. त्यामुळे लोकशाहीची फसवणूक करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या विजयाची निवडणूक आयोगने चौकशी करावी, अशी विनंती विनायक राऊत यांनी या कायदेशीर नोटिसमधून केलेली आहे.
केंद्रीय निवडणुक आयोगाने 07 दिवसात या नोटिसवर उत्तर द्यावे अशी अपेक्षा आहे. तसेच भ्रष्टाचाराचा वापर करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या निवडून येण्याला उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करून आव्हान करण्यात येईल, असेही माजी खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. अनेक ठिकाणी मोकळ्या व पारदर्शक वातावरणात मतदान व मतमोजणी झाली नाही. निवडक पद्धतीने भ्रष्टाचार करू देणे, भाजपच्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार व बेकायदेशीरतेकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार काही निवडणुक निर्णय अधिकार्यांच्या मदतीने करण्यात आलेत हे वास्तव लोकशाही यंत्रणेचा गैरवापर दाखविणारे आहेत व त्याबाबत नागरिक म्हणून भारतावर प्रेम करणार्या प्रत्येकाने चिंता व्यक्त करावी अशी परिस्थिती असल्याचे अॅड. असीम सरोदे यांनी म्हटले म्हणाले.




मालवण: तालुक्यातील बांदिवडे ते त्रिंबक रस्त्याची अवस्था खूपच वाईट झाली आहे. येथील ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागत आहे. पाऊस अजून सुरू झाला नसताना रस्त्याची ही अवस्था असेल तर पुढील दोन महिन्यांत रस्ता खूपच धोकादायक बनणार आहे. त्यामुळे प्रशासनाने याची त्वरित दखल घेण्याची विनंती बांदिवडे ग्रामस्थांनी केली आहे.
बांदिवडे गावातील शाळेतील मुलांना तसेच ग्रामस्थांना रस्ता खराब असल्याने त्याचा खुपच त्रास सहन करावा लागत आहे. आजारी व्यक्तिंना आचरा किंवा मालवण येथे जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी व लोक नेत्यांनी लक्ष द्यावे अशी विनंती येथील बांदिवडे, पालयेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते श्री. रमाकांत घाडीगावकर यांनी केली आहे.