सावंतवाडी | सागर तळवडेकर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची गेल्याच आठवडय़ात दिल्लीत भेट घेत कोकण रेल्वे संदर्भातील मागण्यांबाबत चर्चा केल्यानंतर नांदगाव रेल्वे स्थानकावर तुतारी एक्सप्रेसला थांबा देण्यात आला आहे. अवघ्या 24 तासांत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली आहे. दरम्यान, गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्नासह स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा म्हणून आवाज उठवणाऱ्या सावंतवाडीकरांच्या मागण्यांच काय झालं ? हा प्रश्न तसाच आहे. की सावंतवाडीकरांना कुणी वाली उरलं नाही ? असा सवाल उपस्थित होत आहे.
पर्यटन जिल्हा सिंधुदुर्गसह महाराष्ट्राच शेवटच रेल्वे स्थानक हे सावंतवाडी आहे. परंतु सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचं रखडलेलं काम पूर्णत्वास यावं तसंच मोजक्याच गाड्यांना थांबा असल्यानं अधिकच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा. या प्रवासी संघटनांच्या मागण्यांना रेल्वे प्रशासनकडून आजवर केवळ केराची टोपलीच दाखवली गेली आहे. सावंतवाडी स्थानक हे शहराबाहेर असूनही उत्पन्नाच्या बाबतीत अग्र क्रमांकावर आहे. मात्र, तरीही केवळ ९ रेल्वे गाड्यांना इथे थांबा दिला गेलाय. तर सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच फेज-वन च काम होऊन फेज-टू चं काम अद्याप पूर्ण झालेल नाही आहे. ते कधी पूर्णत्वास येईल याबाबत अवाक्षरही कुणी काढत नाही. टर्मिनस तर लांबची गोष्ट रेल्वे गाड्यांना थांबे सुद्धा मिळत नाहीत. रेल्वेनं ये-जा करायला सावंतवाडीकरांना कुडाळवारी करावी लागत आहे. शहरातील नागरिकांना नाहक अर्धा तास यासाठी बायरोड प्रवासात घालवावा लागत आहे. तालुक्यातील इतर गावांतील प्रवाशांबद्दल न बोलेल चांगलं. जर स्वतःची चारचाकी किंवा दुचाकी असेल तर ठीक अन्यथा सरकारी वाहनांचा विचार केला तर प्रवाशांचे होणारे हाल ? ‘अतिथी देवो भव’ म्हणून पाहुण्या चाकरमान्यांना स्थानकापर्यंत सोडायला जाणाऱ्या तासनतास स्थानकावर बसून राहणाऱ्या कोकणीमाणसाचा विचार आमचे लोकप्रतिनिधी, स्थानिक आमदार दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायण राणे कधी करणार ? हा एक यक्षप्रश्न बनून राहिला आहे.
कोंकण रेल्वे प्रशासनाला इथल्या स्थानिक जनतेबद्दल, चाकरमानी, तसेच प्रवाशांबद्दल आस्था आहे का ? सावंतवाडी स्थानक हे शहराबाहेर असून ही या स्थानकाचे उत्पन्न हे १३.४ करोड व प्रवासी संख्या ही ३.५ लाख एवढी आहे. उत्पन्नाच्या बाबतीत १० व्या क्रमांकावर असताना येथे ५ दैनिक व ४ साप्ताहिक अशा एकूण ९ रेल्वे गाड्या थांबतात. सावंतवाडी स्थानकावर असा अन्याय का ? उत्पन्न , प्रवासी संख्या असून ही कमी थांबे का ? वारंवार सावंतवाडीवर हा अन्याय कशासाठी? की सावंतवाडीकरांना कुणी वाली राहीलेला नाही ?
संगमेश्वर : कोकण रेल्वे मार्गावर संगमेश्वर ते रत्नागिरी सेक्शन(रत्नागिरी स्थानक वगळून) दरम्यान मार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी मंगळवार दि. ८ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ७.३० ते १०.३० असा तीन तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ‘मेगा ब्लॉकच्या कालावधीत या मार्गावरुन धावणाऱ्या दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
1) तिरुनेलवेली- जामनगर (१९५७७) या दि. ७ ऑगस्ट रोजी प्रवास सुरु होणाऱ्या एक्स्प्रेसला ठोकूर ते रत्नागिरी दरम्यान सुमारे अडीच तास रोखून ठेवले जाणार आहे.
2) तिरुअनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी नेत्रावती एक्स्प्रेस (१६३४६) ही ठोकूर ते रत्नागिरी स्थानकादरम्यान १ तास थांबवून ठेवली जाणार आहे.
संपादकीय : एकीकडे फुल्ल झालेले रेल्वे आरक्षण तर दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गाची झालेली दयनीय स्थिती यामुळे यंदा गणेशचतुर्थी सणाला गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची चिंता वाढली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्याला मोठी कसरत करून गाव गाठावे लागणार हे उघड झाले आहे. हंगामात कोकणात गावी जाणे हे एक त्याच्यासाठी प्रकारचे दिव्यच झाले आहे.
कोकणात जाण्यासाठी दोन महत्त्वाचे पर्याय उपलब्ध आहेत. एक म्हणजे रेल्वे आणि दुसरा म्हणजे मुंबई गोवा महामार्ग. रेल्वेच्या बाबतीत बोलायचे झाले तर मध्य आणि पश्चिम रेल्वे मिळून कोकण रेल्वे मार्गावर सुमारे 300 विशेष फेर्या चालविणार आहे. अगदी शेवटी घोषित झालेल्या गाड्यांचे आरक्षण पाहिल्या 1/2 मिनिटांत फुल्ल झाले असल्याने आजून किती प्रवाशांना तिकीटे भेटली नसतील याचा अंदाज येतो. रेल्वे या मार्गावर अजून अतिरिक्त गाड्या चालवू शकणार नाही. कारण कोकण रेल्वे अजून ‘डबल ट्रॅक’ वर आणली गेली नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या मार्गावर सोडण्यात आलेल्या 300 गाड्यांमुळे येथील यंत्रणेवर मोठा ताण येणार आहे. सर्व गाड्यांचे वेळापत्रक बिघडून उशिरा धावणार आहेत. याचा मोठा त्रास प्रवाशांना होणार आहे.
कोकणात जाण्याचा दुसरा पर्याय आहे मुंबई गोवा महामार्ग. गेली 14 वर्षे रखडलेला मुंबई गोवा महामार्गा अजूनही पूर्णत्वाच्या प्रतिक्षेत आहे. अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा Traffic तर होणारच पण अपघात होण्याच्या शक्यता आहेत. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका आहे. सर्व परिस्थिती वरून यंदाही चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी गावी जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार यात काही शंका नाही.
कोकण रेल्वे मार्ग फक्त कोकणासाठी मर्यादीत नाही आहे तर दक्षिणेकडील राज्यांतील गाड्या पण याच मार्गावरून जातात. पावसाळ्यातील एक दोन महिने सोडले तर या मार्गावरील गाड्यांचे आरक्षण मिळवणे तर एक प्रकारचे दिव्यच झाले आहे. जनरल आणि स्लीपर डब्यांची स्थिती मुंबईच्या लोकल डब्यांच्या गर्दी सारखी होत आहे.एवढी बिकट परिस्थिती असताना येथे गेली कोकण रेल्वे चालू झाल्यानंतर गेली 25 वर्षे डबल ट्रॅक साठी का प्रयत्न केले जात नाही आहेत हा एक मोठा प्रश्न आहे.
राजकिय इच्छाशक्तीचा अभाव
कोकणरेल्वेचे शिल्पकार मा. मधु दंडवते आणि मा. जॉर्ज फर्नाडिस यांनी कोकण रेल्वे साकारताना दाखवलेल्या इच्छाशक्तिचा अभाव आज प्रकर्षाने जाणवत असल्याचे दिसत आहे. मुंबई गोवा महामार्ग चौदा वर्षातही पूर्ण होत नाही, कोकण रेल्वे २५ वर्षानंतरही सिंगल ट्रॅक वर आहे हे कोकणातील नेत्यांचे खूप मोठे अपयश आहे. मोठे प्रकल्प नको तर आधी आम्हाला या मूलभूत सुविधा उपलब्ध तरी करून द्या असे आकांताने कोकणवासी सांगत आहे. पण त्याची हाक ऐकणारा कोणी दिसत नाही आहे.
Alert: It has been reported that a malicious and fake mobile app campaign is in circulation where some fraudsters are sending phishing links at a mass level and insisting users download fake ‘IRCTC Rail Connect’ mobile app to trick common citizens into fraudulent activities.…
— IRCTC (@IRCTCofficial) August 4, 2023
रत्नागिरी: हातखंबा येथे डंपरने ट्रकला धडक दिल्याने एक जण जखमी झाला आहे .हातखंबा येथील ईश्वर धाब्यासमोर शुक्रवारी दिनांक ४ रोजी सकाळी ११ च्या सुमारास मागून येणाऱ्या डंपरने पुढे असणाऱ्या ट्रकला धडक देत अपघात केला. यात एकजण जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
निवळीहुन हातखंब्याच्या दिशेने दोन्ही वाहने मार्गक्रमण करीत असताना ईश्वर धांब्यासमोर ट्रक (गाडी क्रमांक MH 14 BJ 4731) आला असता मागून येणारा डंपरने (क्रमांक-MH10CR-8970) धडक दिली. या अपघातात धडक देणाऱ्या डंपर चालक गणेश दिलीप मयेकर (वय 36 राहणार- पोमेंडी रत्नागिरी) हा स्वतः जखमी झाला. डंपरमधील जखमी चालकाला उपचारांसाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Mumbai Goa Highway: सर्व कोकणवासीयांना खरोखरच शरम वाटावी, प्रशासनबद्दल चीड निर्माण व्हावी अशी एक रील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही रील मुंबई गोवा महामार्गाच्या दयनीय अवस्थेसंबधी आहे.
कोकणकरांनो तुम्हाला Hatsoff आहे🙏
मी फक्त 20 Km गाडी या मुंबई गोवा हायवेवर चालवली तरी माझी ही हालत झाली. तुम्ही इतके वर्ष कसे काय सहन करत आहात हे खरंच समजण्या पलीकडे आहे🤦♂️😣 Nexon सारख्या दणकट गाडीची ही हालत होत असेल तर किती वाईट अवस्था असेल या हायवे ची…#jkv #mumbaigoa #kokan pic.twitter.com/Y4CKKaTs4R— मराठी युट्युबर (Travel Vlogger) (@JeevanKadamVlog) August 3, 2023
Mumbai Goa Highway Accident :मुंबई गोवा महामार्गावर भोस्ते घाटामध्ये महामार्गाच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात काल गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दोन ट्रक कोसळून भीषण अपघात झाला.
महामार्गाच्या डाव्या बाजूला सुमारे पस्तीस फूट खोल हे दोन्ही ट्रक कोसळले होते. त्यातील एका ट्रकमध्ये तीन लोक अडकले होते. या घटनेत दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तसेच एक जण गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माशांचे जाळे घेऊन जाणारा एक आयशर ट्रक आणि कंटेनर यांच्यात हा अपघात झाला आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला ट्रकने मागून धडक दिल्याने ही दोन्ही वाहने दरीत कोसळली. या घटनेचे वृत्त कळताच पोलीस ग्रामस्थ आणि खेड येथील मदत ग्रुपचे जवान घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा हे रेस्क्यू ऑपरेशन संपले. येथील एका जखमीला खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची नोंद रात्री उशिरापर्यंत खेड पोलीस ठाण्यात करण्याचे काम सुरू होते. खेडचे पोलीस निरीक्षक भोयर आणि सहाय्यक निरीक्षक चव्हाण हे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.