IRCTC Fake App : भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने आपल्या सर्व वापरकर्त्यांना बनावट मोबाइल अॅप आणि वेबसाइटबद्दल चेतावणी दिली आहे. बनावट मोबाइल अॅप आणि वेबसाइट मूळ आयआरसीटीसी अॅप आणि वेबसाइटशी जवळून साम्य दाखवतात, ज्यामुळे वापरकर्त्यांना या दोघांमधील फरक ओळखणे कठीण होते. प्रवाशांकडून संवेदनशील माहिती चोरून त्याचा दुरुपयोग करायचा स्कॅमर्सचा हेतू असून प्रवाशांनी हे अॅप आणि वेबसाईट वापरू नये असे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.
बनावट IRCTC अॅप ‘irctcconnect.apk’ नावाचे आहे आणि ते WhatsApp आणि Telegram सारख्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मद्वारे प्रसारित केले जात आहे. स्कॅमर बनावट वेबसाइट किंवा बनावट अँप्लिकेशन च्या एपीके फाइलच्या लिंकसह संदेश पाठवत आहेत की IRCTC वरून रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी हीच खरी वेबसाइट किंवा अॅप आहे.
फसवणूक करणारे खोटे अँप्लिकेशन आणि वेबसाइट वापरून संवेदनशील नेट बँकिंग माहिती मिळवत आहेत, ज्यात UPI तपशील आणि संशयास्पद पीडितांकडून क्रेडिट/डेबिट कार्ड माहिती समाविष्ट आहे. IRCTC ने आपल्या वापरकर्त्यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे आणि कोणतेही संशयास्पद अॅप डाउनलोड करू नका किंवा कोणत्याही संशयास्पद वेबसाइटला भेट देऊ नका. प्रवाशांनी Google Play Store किंवा Apple App Store वरील IRCTC चे अधिकृत Rail Connect Mobile Apps वापरावेत आणि IRCTC च्या अधिकृत वेबसाइट https://irctc.co.in या वेबसाईटवरच आपले तिकीट आरक्षण करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Alert: It has been reported that a malicious and fake mobile app campaign is in circulation where some fraudsters are sending phishing links at a mass level and insisting users download fake ‘IRCTC Rail Connect’ mobile app to trick common citizens into fraudulent activities.…
रत्नागिरी :दापोली पालगडमध्ये एका व्यक्तीकडे 20 गावठी बॉम्ब पोलिसांना सापडले आहेत. याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.
याप्रकरणी मिळालेल्या अतिरिक्त माहितीनुसार, पोलीस उपविभागीय अधिकारी खेड राजेंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केतकर, पोलीस कॉन्स्टेबल पाटील, घाडगे, बांगर, एएसआय मिलिंद चव्हाण, विकास पवार यांचा समावेश असलेल्या पथकाने सापळा रचून गावठी बॉम्ब घेऊन निघण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयित आरोपीला ताब्यात घेतले. या आरोपीचे नाव रमेश पवार असून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. दरम्यान पोलिसांनी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी बॉम्ब शोध पथकाला पाचारण केले आहे.
बॉम्ब बनविण्याचे रॅकेट सक्रिय?
या आधी दापोली तालुक्यातील विसापूर येथील सोवेली दरम्यानच्या रस्त्यालगत पाच जिवंत बॉम्ब सापडले होते त्यामुळे तालुक्यात गावठी बॉम्ब बनवणारे रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी केलेल्या आजच्या कारवाईमुळे हे बॉम्ब तयार करणारे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याशी याचे काही धागेदोरे असल्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.
मुंबई : पश्चिम रेल्वेच्यारेल्वे सुरक्षा दलाने मे महिन्यात ७१ तिकीट दलालांना पकडले आहे. त्यांच्याकडून २६ लाखांची तिकिटे जप्त केली आहेत. अनधिकृत दलालांकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात आरक्षण केले जाते. त्यामुळे सामान्य प्रवाशांना तिकीट उपलब्ध होत नाही.
ई-तिकीट आणि खिडकी तिकिटांच्या विरोधात विशेष मोहिमेत अंधेरी येथे एका दलालाला अटक केली. तसेच साकी नाका परिसरात रेल्वे तिकिटांची अवैध विक्री होत असल्याची माहिती आरपीएफला मिळाली. १५ मे रोजी आरपीएफ आणि दक्षता विभागाचे संयुक्त पथक तयार केले. या पथकाने अलीम खान याच्याकडून १ लाख ३ हजार ९८५ किमतीची १४ जर्नी कम रिझर्व्हेशन तिकिटे ताब्यात घेऊन अंधेरी आरपीएफ ठाण्यात गुन्हा दाखल केला. अधिक चौकशी केली असता अलीम खानने सोबत अफजल नफीस खान काम करीत असल्याचे सांगितले. अफजल नफीस खान खास २२ मे रोजी आरपीएफने ताब्यात घेतल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.
६३ गुन्हे दाखल
दलालांमुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होते. हीच बाब निदर्शनास आल्याने १ ते २७ मेदरम्यान आरपीएफने ७१ तिकीट दलालांवर ६३ गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून २६ लाख ६१ हजार ३१० रुपयांची ई-तिकिटे जप्त केली.
Warishe Murder Case | पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 11सदस्यीय एसआयटी लावण्यात आली आहे. या प्रकरणासाठी चार्जशीट दाखल करण्यात आली असून त्यात अनेक खुलाशे करण्यात आले आहेत.
या प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांच्या हाती एक कॉल रेकॉर्डिंग लागली आहे. या कॉल रेकॉर्डिंग मध्ये आपण वारीशे याला संपवणार आहे असे आरोपी पंढरीनाथ आंबेरकर समोरच्याला म्हणाला आहे. ही कॉल रेकॉर्डिंग आरोपीच्या जप्त केलेल्या मोबाईल फोन मध्ये पोलिसांना मिळाली आहे.
कॉल रेकॉर्डिंग अशी होती
“एकाच काम करायच आहे ….आज करणार त्याचं…..झोप नाही लागणार त्याशिवाय….बातमी वाचली?……वाचली बातमी?…….थांब पाठवतो…. “
या रेकॉर्डिंगतील मजकुरामुळे वारीशे यांची हत्या पूर्वनियोजित असल्याचे चार्जेशीट मध्ये नमूद केले गेले आहे. या चार्जशीट नुसार आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याने या आधीही अनेकदा पत्रकार वारीशे यांना त्यांच्या रिफायनरी विरोधी आणि आपल्या विरोधी लिखाणावरून धमक्या दिल्या होत्या. आंबेरकर याने याआधीही रिफायनरीला विरोध करणाऱ्या एका सरपंचाच्या २१ वर्षीय मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याने आरोपीची गुन्हेगारी प्रवृत्ती दिसून येत आहे असेही चार्जशीटमध्ये नमूद केले गेले आहे. एका अग्रगण्य इंग्रजी वृत्तपत्राने ही चार्जशीट मिळवली आहे.
नक्की काय घडले होते?
सोमवारी सकाळी म्हणजे 6 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजून 3 मिनिटांनी पत्रकार शशिकांत वारिसे यांनी वॉट्सअपवरील रिफायनरी ग्रुपवर एका बातमीची पोस्ट पाठवली होती.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असलेल्या बॅनरवर त्यांच्यासोबत गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो’ अशा आशयाच्या बातमीचे कात्रण शशिकांत वारिसे यांनी त्या वॉट्सअप ग्रुपवर पाठवले होते.
कोकणातील रिफायनरीचे समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या जाहिरातींसंदर्भात ही बातमी होती. यानंतर दुपारी 1 वाजून 15 मिनिटांच्या आसपास शशिकांत वारिसे राजापूर-कोदवली या परिसरातून आपल्या दुचाकी वाहनावरून जात होते. त्याचवेळी तिथे असलेल्या पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगाने समोरून ‘थार’ गाडी आली. या गाडीने शशिकांत वारिसे यांच्या दुचाकीला धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कोल्हापूरला हलवण्यात आलं. परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी 7 फेब्रुवारीला सकाळी त्यांचं निधन झालं. चौकशीअंती ती गाडी रिफायनरीचे समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांची असल्याचे आणि ते चालवत असल्याचे समोर आले होते. या प्रकरणाची सीआयटी चौकशी लावावी अशी मागणी करण्यात आली होती.
गोवा – गोव्याहून मुंबईच्या दिशेने ट्रक मधून बेकायदा होणाऱ्या दारू वाहतुकीवर गोवा अबकारी खात्याच्या पथकाने पत्रादेवी तपासणी नाक्यावर कारवाई करत २२ लाख रुपये किमतीच्या दारुसह एकूण ३७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या बद्दल सविस्तर वृत्त असे की काल सायंकाळी उशिरा पत्रादेवी तपासणी नाक्यावर गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला (एमएच ११ बीएल ९८८४) तपासणीसाठी थांबविण्यात आला. कागदपत्रे तपासताना वैयक्तिक चौकशीवेळी चालक गांगरला. ते पाहून ट्रकची प्रत्यक्ष तपासणी करण्याचे ठरवून अधिकारी बाहेर आले. तेवढ्यात चालकाने तेथून पळ काढला.
या ट्रकची तपासणी करताना या ट्रक च्या पाठीमागील हौद्यात सिमेंटचे ब्लॉक आढळून आलेत. या कारवाईत पेडणे अबकारी निरीक्षक कमलेश माजीक, विभूती शेट्ये यांच्यासह विनोद सांगडेकर, नितेश नाईक, दिनकर गवस, रामचंद्र आचार्य, रामनाथ गावस, सत्यवान नाईक, नितेश मळेवाडकर, विठोबा नाईक, स्वप्नेश नाईक, चालक दीपक परुळेकर यांनी सहभाग घेतला.
सिमेंट लाद्यांखाली दारूचे बॉक्स
ट्रकच्या बाहेरील भागात सिमेंट काँक्रीटच्या लाद्या रचून ठेवल्या होत्या. अबकारी कर्मचाऱ्यांनी त्या खाली उतरवल्या असता त्यात दारूचे लपवलेले बॉक्स आढळले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कर्मचाऱ्यांनी कळविले.सर्व बॉक्सचा पंचनामा करून ट्र्क ताब्यात घेतला यात आँरेंज ,ग्रीन ॲपल,रॉयल ब्ल्यू ,किंग फिशर बीअर , डारवेज व्हीस्की, बाँम्बे कस्क या प्रकारचे बॉक्स मिळाले. सदर गाडी फोंड्याहून मुंबईला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
रत्नागिरी – कोकण रेल्वेमार्गावर प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला शितपेयातून गुंगीचे औषध देऊन त्याची लूट करण्याचा प्रकार रत्नागिरी स्थानकावर घडला आहे. याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना शुक्रवारी दिनांक ०७ एप्रिल रोजी घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री ही गाडी रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे थांबली असता दोन अनोळखी प्रवाशांनी ओळख वाढवून या प्रवाशाला शितपेय पिण्यास दिले. या शीतपेयांमध्ये गुंगीचे औषध मिसळले होते. त्यामुळे त्या प्रवाशालागुंगी आली. याचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या पाकिटातील रोख रक्कम व गळ्यातील सोन्याची चेन पळवली. याप्रकरणी प्रवाशाने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत. ग्रामीण पोलिसांनी संशयित आरोपींविरोधात भादवि कलम ३२८,३६९ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.