Category Archives: पर्यटन

पर्यटन महामंडळाचा फिलोशिप उपक्रम; पर्यटनात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी संधी, मिळणार ४० हजार रुपये दरमहा!

मुंबई  – महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रातील नवीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्रपर्यटन विकास महामंडळामार्फत फेलोशिप उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत तरुणांना फेलोशिपची संधी उपलब्ध होणार आहे. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली या फेलोशिप उपक्रमाची आखणी करण्यात आली असून पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जाणार आहे.
या फेलोशिप उपक्रमासाठी वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली असून  २१ ते २६ वर्ष वय असलेल्या आणि कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणी प्राप्त पदवीधारक तरुणांना फेलोशिपसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच या फेलोशिप उपक्रमातील विषयात पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. फेलोशिपसाठी उमेदवारांना किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या फेलो उमेदवारांना दरमहा ३५ हजार रुपये छात्रवृत्ती आणि ५ हजार रुपये  प्रवास भत्ता व इतर खर्च असे एकूण ४० हजार रुपये दरमहा देण्यात येणार आहेत. फेलोशिपसाठी इच्छुक तरुणांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक यांच्या [email protected] आणि [email protected] या ईमेल पत्त्यावर सर्व आवश्यक कागदपत्रांसह  १५ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज पाठविण्याचे आवाहन महामंडळाद्वारे करण्यात आले आहे.
एमटीडीसीच्या फेलोशिप उपक्रम २०२३ मध्ये पर्यटन क्षेत्रातील अभ्यास आणि सेवा, संशोधन, पर्यटन आधारित संस्था आणि पुढाकार विकसित करणे, प्रशिक्षण आणि फेलोची वाढ करणे समाविष्ट आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून व्यवसाय विकास, विपणन, रेस्टॉरंट ऑपरेशन्स, जलपर्यटन, विधी, विशिष्ट आणि अनुभवात्मक पर्यटन, टूर पॅकेजेस, प्रशिक्षण, पर्यटन पायाभूत सुविधा, कॉर्पोरेट अकाउंटिंग, पर्यटन नावीन्यपूर्णप्रकल्प, बैठका, परिषद, प्रोत्साहन आणि प्रदर्शन (MICE) यासारख्या एमटीडीसीच्या विविध विभागांमधील तज्ज्ञांच्या आवश्यकतेमधील अंतर कमी करण्यास सहाय्य होणार आहे. समाज माध्यम, निर्मिती-ब्रॅंडींग-डिझाइन, डिजिटल मार्केटिंग-प्रसिद्धी- आंतरराष्ट्रीय संबंध, सामान्य व्यवस्थापन, जबाबदार पर्यटन, महसुली यंत्रणेत सुधारणा आणि उत्पन्न व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातील तरुणांकडून, त्यांची तंत्रज्ञानाची आवड आणि नवीन दृष्टीकोन मिळवणे इत्यादी बाबी या उपक्रमात समाविष्ठ करण्यात आल्या आहे. 

महाराष्ट्रातील सर्वात सुंदर कार्तिकेयाची मूर्ती चिपळुणातील श्रीविंध्यवासिनी मंदिरात

रत्नागिरी –  कार्तिकेयाची महाराष्ट्रातील सर्वात सुंदर मूर्ती चिपळूणच्या श्रीविंध्यवासिनी मंदिरात आहे असे प्रतिपादन लेखक,अभ्यासक आशुतोष बापट यानी केले. ”सफर चिपळूण गुहागर परिसराची” या त्यांच्या पुस्तकाच्या  प्रकाशन समारंभात (२ एप्रिल) बोलताना त्यांनी हे कौतुकोद्गार काढले.  या वेळी व्यासपिठावर मंदिर स्थापत्य आणि मूर्तीशास्त्राचे अभ्यासक लेखक आशुतोष बापट, ज्येष्ठ दुर्गतज्ञ प्र.के. घाणेकर, स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे, पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिणारे ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे, ज्येष्ठ शिल्पकार प्रकाश राजेशिर्के, ‘लोटिस्मा’चे अध्यक्ष डॉ. यतिन जाधव उपस्थित होते.
मंदिर आणि मूर्ती हे भारतीय संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. (व्यवच्छेदक लक्षण म्हणजे काहीतरी आगळे वेगळे अद्वितीय असे लक्षण) त्याकडे आपण अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपल्या मूर्ती कशाही, भंगलेल्या वगैरे असल्या, तरी त्या आपल्याला काहीतरी सांगून जात असतात. आपल्या संस्कृतीला दोन अंगे आहेत, आधिभौतिक म्हणजे ऐहिक जीवन समृद्ध करणे आणि दुसरी बाजू आधिदैविक अर्थात् तत्त्वज्ञान, अध्यात्म, मंदिर, मूर्ती, कला आदींची असून माणसाचे जीवन समृद्ध होण्याकरता ते आवश्यक आहे. कोकणातील मूर्तीवर लेखन होतेय ही चांगली गोष्ट आहे. कोकण किती समृद्ध आहे ? हे यातून लोकांना कळेल. लोकांचा ओघ कोकणाकडे वाढेल, अशी भावना ज्येष्ठ मूर्तीतज्ञ डॉ. गो. बं. देगलुरकर यांनी व्यक्त केली.
चिपळूणच्या रावतळे परिसरात विंध्यवासिनीचे मंदिर आहे. नंद-यशोदेची ही मुलगी जी कृष्णाच्या ऐवजी वासुदेव–देवकीच्या कोठडीत पोहोचली आणि तिला कंसाने ठार मारण्यासाठी उचलले असता ती त्याच्या हातातून निसटून विंध्यपर्वतावर जाऊन राहिली अशी पुराणकथा आहे
विंध्यवासिनी देवीचे हे मंदिर बहुधा यादवकालीन असून देवी पुरातन काळापासून शाक्तपंथीयांना पूजनिय असावी. परकीयांच्या आक्रमणात येथील मूळ रहिवासी असलेल्या बाराराव या कोळी जमातीने आपल्या कुलदेवतेचं रक्षण करण्यासाठी तिचं संपूर्ण मंदिर डोंगर तोडून व दगड मातीचा ढीग रचून त्यात गाडून टाकलं. कालांतराने छत्रपती संभाजीमहाराजांनी या मंदिराचा जीर्णोध्दार केला. त्याकाळापासून आजापर्यंत देवीची नित्य पूजाअर्चा चालू आहे.
१९७६ साली देवीच्या स्थापनेचा ३०० वा वर्धापनदिन साजरा झाला. देवीची मूर्ती होयसाळ शैलीची असून ती ८०० ते १००० वर्षे जुनी असावी. त्याचप्रमाणे मूर्ती अष्टभूजा असून महिषासुरमर्दिनी या आक्रमक रूपांत उभी आहे. तिच्या आठही हातांत आयुधे असून तिने पायाखाली रेड्याला दाबून धरले आहे. नवरात्रात इथे देवीचा मोठा उत्सव असतो. तिच्या गाभाऱ्यातील मयूर हे वाहन असलेल्या कार्तिकेयाची मूर्तीही अत्यंत देखणी आहे. या दोन्ही मूर्ती अतिशय सुंदर असून त्यावरील सुबकता, कोरीव काम व काळ्या पाषाणाची आजही टिकून असलेली तकाकी पाहून त्या कारागिरांच्या कामगिरीचे कौतुक वाटते.
साभार – FB (Chiplun Cha Balya)






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
   

 

गोव्याप्रमाणे आता कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवरसुद्धा ‘बीच शॅक्स’ दिसणार

रत्नागिरी –आता गोव्यातील समुद्र किनाऱ्याप्रमाणे कोकणातील  समुद्रकिनाऱ्यांवर ‘बीच शॅक्स’ अर्थात चौपाटी कुटी दिसणार आहेत. पर्यटन वाढविण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर ‘बीच शॅक्स’ उभारण्यासंदर्भातील धोरणास बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. तात्पुरत्या हंगामी स्वरुपाच्या असलेल्या या कुट्या पहिल्या टप्प्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड येथील समुद्र किनाऱ्यांवर उभारल्या जातील.
सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, आरेवारे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, तारकर्ली, रायगड जिल्ह्यातील वर्सोली, दिवेआगार आणि पालघर जिल्ह्यातील केळवा व बोर्डी या आठ किनाऱ्यांवर बीच शॅक्स उभारण्यात येतील. पुढील वर्षीपासून इतर चौपाट्यांवर देखील या धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होईल. महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधीकरणाच्या सहमतीने पर्यटन संचालनालयाने निश्चित केलेल्या जागेवरच तात्पुरती चौपाटी कुटी उभी करण्यासाठी परवाना देण्यात येईल.
चौपाटी कुटी चालविण्यासंदर्भात पर्यटन विभागाचे पुढील नियम असतील 
  • या चौपाटी कुटीस सकाळी ७ ते सायंकाळी ७ अशा वेळेत सुरू ठेवता येईल. 
  • तसेच संगीताचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. 
  • प्रत्येक कुटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरादेखील असेल.
  • एका चौपाटीवर कमाल १० कुट्या उभारता येतील.
  • यातून निर्माण होणाऱ्या रोजगारामध्ये स्थानिक व्यक्तींसाठी ८० टक्के जागा राखीव असतील.
  • कालावधी – या कुट्यांचे तीन वर्षांकरिता वाटप करण्यात येईल.
  • आकार – त्यांचा आकार १५ फूट लांबी, १५ फूट रुंद आणि १२ फूट उंच असेल
  • बैठक –  गाळ्याच्या समोर बैठक व्यवस्थेसाठी २० फूट लांब आणि १५ फूट रुंद छत टाकता येईल.
  • परवाना मूल्य – कुटी मिळणाऱ्या व्यक्तीला परवान्यासाठी १५ हजार रुपये अर्जाचे ना परतावा मूल्य असेल.
  • वार्षिक शुल्क – या कुटीसाठी पहिल्या वर्षी ४५ हजार, दुसऱ्या वर्षी ५० हजार, तिसऱ्या वर्षी ५५ हजार रुपये वार्षिक शुल्क राहील.
  • अनामत रक्कम – याशिवाय ३० हजार रुपये सुरक्षा अनामत जमा करावी लागेल, जी तीन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर परत केली जाईल.

पर्यटनासाठी गोव्यात जात असाल तर ही बातमी वाचा; पणजीत एक महिन्यांचा लॉकडाऊन जाहीर..

गोवा वार्ता – एप्रिल महिन्यात गोवा राज्याला भेट देणार असाल तर तुमच्या साठी एक महत्त्वाची बातमी आहे. गोवा विधानसभेचे अधिवेशन संपल्याच्या रात्रीच विशेष मंत्रिमंडळ बैठकीत गोवा सरकारने एका महिन्याचा पणजी बंद लॉकडाऊन आज जाहीर केला आहे. त्याची कार्यवाही 1 एप्रिलच्या पहाटेपासून सुरू केली जाईल.

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या बेदरकारपणे चाललेल्या बांधकामांमुळे मेटाकुटीस आलेल्या राजधानीतील नागरिकांना दिलासा देण्यासाठी गोवा सरकारने हा लॉकडाऊन लावला आहे. 

शनिवारी सर्व वाहने पणजीमध्ये येण्यापासून रोखून ठेवली जातील. शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहनांना दुपारी एकपर्यंत मुभा राहील. केवळ अग्निशामक व रुग्णवाहिका यांना शहरात फिरण्यास अनुमती आहे.

एक वाजल्यानंतर मात्र लॉकडाऊनची कठोर कारवाई सुरू होणार आहे. त्यात मच्छी व भाजी मार्केट बंद ठेवण्याचाही निर्णय समाविष्ट आहे.

‘पोलिस खात्‍याच्‍या वरिष्‍ठ अधिकाऱ्यांना शहराचे शेरीफ म्हणून एका महिन्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. त्यांना लॉकडाऊनची कडक कार्यवाही करण्याचा आदेश देण्यात आला आहे,’ अशी माहिती एका अधिसूचनेद्वारे राज्य सरकारने रात्री उशिरा जाहीर केली.







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
   

 

गोव्याच्या पर्यटनमंत्र्यांनी घेतली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाची धास्ती….

सिंधुदुर्ग – गोवा ही देशाची पर्यटन राजधानी मानली जाते. परंतु गोव्याच्या पर्यटनाला आता एका नवीन चिंतेने ग्रासले आहे. पण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन दृष्टीने पाहता गोवा राज्याची ही चिंता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनास नवा हुरूप देणारी ठरणार आहे. 

गोव्यातील समुद्रकिनारे आणि किनाऱ्यांवर वॉटरस्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी देशभरातून पर्यटक गोव्याकडे धाव घेत असतात. तथापि, गोव्यातील वॉटरस्पोर्ट्ससमोर महाराष्ट्रातील मालवणचे मोठे आव्हान उभे राहिले आहे, अशी चिंता पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केली. गोवा विधानसभा अधिवेशनात ते बोलत होते.

मंत्री खंवटे म्हणाले की, गोव्यताील वॉटरस्पोर्ट्समध्ये दलालच बहुतांश वाटा घेऊन जातात आणि खुद्द वॉटरस्पोर्ट्स ऑपरेटर्सना मात्र कमी पैसे मिळत आहेत. जर यावर नियमन असणारी यंत्रणा लवकरात लवकर आणली नाही तर हा प्रश्च चिघळेल. पर्यटन क्षेत्रासमोर गंभीर समस्या उभी राहिल. शेजारीच महाराष्ट्रातील मालवण येथे वॉटरस्पोर्ट्स आहेत. ते राज्यातील वॉटरस्पोर्ट्ससमोर मोठे आव्हान आहे, असे खंवटे म्हणाले.

हेही वाचा – मुंबई ते गोवा रेल्वेने प्रवास करताय? कोकण रेल्वे मार्गाव्यतिरिक्त रेल्वेचा ‘हा’ पर्याय सुद्धा जाणून घ्या…

पर्यटन मंत्री यांची चिंता रास्त आहे. गोवा राज्यात पर्यटन क्षेत्रात दलालांचा सुळसुळाट आहे. त्यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात लूट होताना दिसते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चित्र वेगळे आहे आणि समुद्र किनाऱ्यावर गर्दी कमी असते, तसेच गोव्यात जे वॉटर स्पोर्ट्स आहेत त्यातील जवळ जवळ सर्व प्रकार ईथे अनुभवता येत आहेत. त्यामुळे एक स्वस्त पर्याय म्हणुन पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनार्‍यांना प्राधान्य देताना दिसत आहे.

<h3>Related posts:</h3>

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन विकसित होत आहे कि नाही या प्रश्नाचे उत्तर काहीही असो, गोवा राज्याच्या पर्यटन उद्योगाने येथील पर्यटनाच्या विकासाची धास्ती घेतली हे नक्की. 

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

झाडी तोडून साफ करताच कोकणात पहिल्यांदाच सापडली अश्मयुगकालीन उभ्या दगडावरची कातळशिल्पे

सिंधुदुर्ग –  देवगड तालुक्यात साळशी येथे उभ्या दगडात कोरलेली दोन कातळशिल्पे (पेट्रोग्लिफ्स) आढळली आहेत. जमिनीलगत सपाट कातळावर कोरलेली कातळचित्रे अनेक ठिकाणी आढळतात. मात्र, उभ्या दगडात कोरलेली कातळचित्रे कोकणात प्रथमच सापडली असल्याचा दावा देवगड तालुका इतिहास संशोधन मंडळाने केला आहे.
झाडी तोडून साफ करताच उभ्या दगडावरची कातळशिल्पे सापडली. 
तालुक्यातील साळशी येथील नैसर्गिक ओहोळालगतच एक प्राचीन पुष्करणी आहे. या भागात नुकताच सिमेंट काँक्रिटचा बंधारा बांधण्यात आला. तेव्हा या भागातील वाढलेली झाडी तोडून साफसफाई करण्यात आली. बंधाऱ्यालगतच सुमारे दहा-पंधरा फूट उंचीचा मोठा दगड आहे. या दगडावर काहीतरी लिपी कोरलेली असल्याचे वाटल्याने साळशी येथील मुकुंद भटसाळस्कर यांनी इतिहास संशोधन मंडळाच्या योगेश धुपकर यांना याबाबत माहिती दिली. कोणता तरी शिलालेख सापडल्याचे कळताच तातडीने मंडळातर्फे साळशी मोहीम आखण्यात आली. या वेळी अभ्यासकांना दोन पेट्रोग्लिफ्स म्हणजेच कातळचित्रे सापडली. या नैसर्गिक भव्य दगडावर एका बाजूस दगड तासून सपाट केला असून, त्यावर दोन प्राणी कोरलेले आहेत.
 गेल्या काही वर्षांत रत्नागिरीपासून कुडाळ, वेंगुर्लेपर्यंत दीड हजाराहून अधिक कातळचित्रे अनेक संशोधकांच्या व हौशी अभ्यासकांच्या प्रयत्नांतून उजेडात आली. ही सर्वच कातळचित्रे जमिनीलगत सपाट कातळावर कोरलेली आहेत. जमिनीलगत सपाट कातळावर कोरलेली कातळचित्रे हे कोकणचे वैशिष्ट्य आहे; मात्र, साळशी येथे उभ्या दगडात कोरलेले कातळचित्र आढळले आहे. या कातळचित्रांचा शोध घेण्याच्या मोहिमेत पुरातत्त्व अभ्यासक रणजित हिर्लेकर यांच्याबरोबर योगेश धुपकर व अजित टाककर सहभागी झाले. 

चिपळूणच्या वस्तूसंग्रहालयात दाखल झाली शिवपूर्वकालिन पुरातन मूर्ती…

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वस्तूसंग्रहालयात एक मोलाची भर पडली आहे. सुमारे चारशे वर्षांपूर्वीची श्रीलक्ष्मीनारायणची मूर्ती संग्रहालयासाठी मिळाली आहे. ही मूर्ती ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील सुभाष अनंत काळे यांच्या अनेक पिढया पूजेत होती. मनुष्यरूपी गरुडावर आरूढ असलेल्या चतुर्भुज भगवान श्रीविष्णू आणि वामांगी बसलेली लक्ष्मी अशा प्रतिमेला ‘लक्ष्मीनारायण’ अशी संज्ञा आहे

काळे यांनी ही मूर्ती वाचनालयाच्या वस्तूसंग्रहालयाला देण्याची इच्छा व्यक्त केली होती. लोटिस्माचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे आणि मार्गदर्शक प्रकाश देशपांडे यांनी बदलापूरला जाऊन काळे कुटुंबीयाची भेट घेतली. धनंजय चितळे यांनी मूर्तीची पंचोपचारे उत्तरपूजा करून ही मूर्ती स्वीकारली. चारशे वर्षांपूर्वीची गंडकी शिळेतील ही मूर्ती ५५ सेंटीमीटर उंच आणि ३५ सेंटीमीटर रुंद आहे. गरूडावर बसलेल्या विष्णूच्या डाव्या बाजूला लक्ष्मी असून दोन्ही हात जोडलेल्या गरूडाच्या चेहऱ्यावर अत्यंत विनम्र भाव आहेत. गरुडाच्या जोडलेल्या हातात गदा व दंडाभोवती सर्पवेढा आहे. श्रीविष्णू व लक्ष्मी सालंकृत आहे. भगवान श्रीविष्णू सायुध सिद्ध आहे. मूर्तीच्या मागे प्रभावळ आहे.

 या श्रीलक्ष्मीनारायण मूर्तीमुळे संग्रहालयात आलेल्या समृध्दी वाढली असल्याच्या भावना संस्थेचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी व्यक्त केल्या आहेत.

 

आता कोकणातही बॅकवॉटर आणि हाऊसबोट चा अनुभव घेता येईल; कोकणातील तरुणाचे पर्यटन व्यवसायात एक पाऊल पुढे…

रत्नागिरी : कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक खुशखबर आहे. आता तुम्हाला केरळ राज्याप्रमाणे  प्रमाणे कोकणात सुद्धा हाऊसबोट आणि बॅकवॉटर टुरिझम चा अनुभव घेता येणार आहे.
कोकणातील दाभोळ येथील एक तरुण सत्यवान दरदेकर हा तरूण कोकणात खऱ्या अर्थाने बॅकवॉटर टुरिझम ची सुरुवात करत आहे. कोकणातील तरुणांने बनवलेली पहिली हाऊसबोट गुहागर पराचुरी येथील निदानसुंदर बॅकवॉटर मध्ये सुरू होत आहे. दोन खोल्यांची ही अतिशय सुंदर हाऊसबोर्ड सत्यवानने बनवली आहे. थोड्याच दिवसात दाभोळच्या बॅकवॉटर मध्ये परचुरी गावात आपल्याला बॅकवॉटरमध्ये जाऊन प्रत्यक्ष राहता येईल. 
आजोळ हे अतिशय देखणे ग्रामीण व निसर्ग पर्यटनाचा केंद्र सत्यवान चालवतो. तो त्याची पत्नी त्याची आई सर्वजण मिळून कोकणात खऱ्या अर्थाने सांस्कृतिक आणि ग्रामीण पर्यटनाचा समृद्ध अनुभव आणि आनंद देतात.  बॅकवॉटर टुरिझम ची ही त्याची एक नवी सुरवात आहे, नक्कीच हा उपक्रम प्रचंड यशस्वी होईल अशी त्याला आशा आहे.
बुकिंग साठी
>सत्यवान दरदेकर.
9881383228
9209705194

देवगड येथे सापडले आगळे वेगळे आणि विलक्षण मानवाकृती कातळशिल्प

सिंधुदुर्ग | देवगड तालुक्यातील बापर्डे रेडेटाका येथे एक मोठे विलक्षण मानवाकृती कातळशिल्प सापडले आहे. चार दिवसांपूर्वी या परिसरातील इतर कातळचित्राचा अभ्यास करण्यासाठी  कातळशिल्पे अभ्यासकांना दाखवण्यासाठी रणजित हिर्लेकर व अजित टाककर हे या भागात गेले असता त्यांना श्री. श्रीकांत नाईकधुरे यांच्या कलमाच्या बागेत हे कातळशिल्प सापडले आहे.

या सापडलेल्या कातळशिल्पाची वैशिष्ट्ये
रणजित हिर्लेकर व अजित टाककर यांच्या माहितीनुसार…

  • कोकणातील कातळचित्राच्या दुनियेत हे कातळचित्र अतिशय वेगळे आहे.
  • मानवाकृती कातळचित्र हे आता पर्यंत सापडलेल्या सर्व मानवाकृतींमधे अतिशय विलक्षण व अलंकार तोरणांनी अलंकृत आहे.
  •  जवळपास विस ते पंचविस कातळचित्रांचा एकत्रित समुह आहे.
  • यातील मानवाकृती कातळचित्र हे आता पर्यंत सापडलेल्या सर्व मानवाकृतींमधे अतिशय विलक्षण व अलंकार तोरणांनी अलंकृत आहे.
  • जवळपास पंधरा ते सहा फुट रुंदीच्या आयाताकृती चौरसात सर्व जागा व्यापेल अशी ही मानवाकृती आहे.
  • आतापर्यंत देवगड तालुक्यात सापडलेल्या मानवाकृती कातळचित्रात ही सर्वात मोठी मानवाकृती आहे.
  • ही संपुर्ण फेम विविध प्रकारे सजवली नटवली आहे.
  • पहाताक्षणी मानवी मनाला धक्का बसेल व ही भव्याकृती पाहुन तो त्यापुढे नम्र होईल, इतकी विलक्षण मोठी ही आकृती आहे.
  • आजवरच्या कातळचित्रां विषयीच्या संशोधनाला धक्का देईल, इतके वेगळेपण या आकृतीत पहायला मिळते.
  • जवळ पास चाळीस ते पन्नास चौरस फुटात ही विविध कातळचित्रे कोरलेली आहेत.
  • ही सर्वच कातळचित्रे आतापर्यंत दिसणाऱ्या कातळचित्रांपेक्षा वेगळी आहेत.

लगेचच या कातळचित्रांची साफसफाई व डाँक्युमेंटेशन करण्यासाठी नाईकधुरे यांच्याशी बोलुन टाककर व हिर्लेकर यांनी नव्या मोहीमेची योजना केली. सोमवार दि.१३ फेब्रुवारी रोजी सकाळीच या जागी पोहोचुन त्याची साफसफाई करण्यात आली. या कामी साक्षी राणे, गौरव सोमले व निना हिर्लेकर या देवगड काँलेजच्या विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

हेही वाचा – रत्नागिरी येथे मानवी वस्तीत आढळले खवले मांजर

देवगड इतिहास संशोधन मंडळाने केलेल्या कातळचित्र संशोधन व संवर्धनाच्या कामा बाबत माहीती देताना श्री. अजित टाककर म्हणाले, “गेल्या वर्षभरात आम्हाला तिस ते चाळीस नविन कातळचित्रे सापडली आहेत. आता देवगड तालुक्यात सोळा- सतरा ठिकाणी साठ पासष्टहुन अधिक कातळचित्रांची नोंद आम्ही घेतली आहे. या विषयीचा रिपोर्ट व संशोधन लेख येत्या १७ फेब्रुवारी रोजी ठाणे येथील ज्ञानसाधना महाविद्यालयात भरणाऱ्या कोकण इतिहास परीषदेच्या बाराव्या राष्ट्रीय अधिवेशनात सादर केला जाणार आहे.

 

वेंगुर्ला येथे साकारलेला कोकणातील पहिला झुलता पूल ठरतो आहे पर्यटकांसाठी आकर्षण….

सिंधुदुर्ग :कोकणातील पहिला झुलता पूल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे समुद्रकिनारा आणि मांडवी खाडी यांच्या संगमावर बांधण्यात आलेला आहे. या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. मात्र आतापासूनच  हे झुलते पूल (Sea Link ) पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. पर्यटक येथे सेल्फि, फोटोग्राफी आणि प्रि-वेडींग फोटोशूट साठी मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत.

या पुलामुळे समुद्र किनार्‍यावर जाणे सोपे होणार आहे. याआधी ईथे जाण्यासाठी 3 ते 4 किलोमीटर वळसा घालावा लागत होता. पुलामुळे आता अवघ्या 5 मिनिटांत समुद्रकिनारी जाणे आता शक्य होणार आहे.

तत्कालीन पालकमंत्री व आताचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सुमारे पाच ते सहा वर्षांपूर्वी या झुलत्या पुलासाठी निधी मंजूर केला. पर्यटन विषयक काही मुख्य प्रकल्पांपैकी केसरकर यांच्या ‘समृद्ध कोकण’ या व्हीजनमधील वेंगुर्ल्यातील हा झुलता पूल होता; मात्र काही तांत्रिक कारणांमुळे याचे काम बरीच वर्षे रखडले होते. त्यावरून अनेकांनी तत्कालीन पालकमंत्री केसरकर यांच्यावर वारंवार टीकाही केली होती. दरम्यान, आता राज्याचे मंत्री शालेय मंत्री झाल्यानंतर केसरकर यांनी पुलाच्या कामाला अधिक गती आणून हा पूल पूर्णत्वास नेला आहे. अरबी समुद्र व मांडवी खाडीच्या संगमावर हा झुलते पूल असून याकडे पर्यटक आकर्षित होत आहे. सध्या पर्यटनाचा हंगाम जोरदार सुरू असल्याने शांत व सुरक्षित पर्यटनासाठी अनेक पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. वेंगुर्ल्यात आल्यानंतर झुलत्या पुलावर जाऊन फोटो आणि व्हिडीओ काढण्याचा मोह पर्यटकांना होत आहे. सध्या वेंगुर्ल्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने गतिमान विकास होत असून यात हा पूल मैलाचा दगड ठरेल, यात शंका नाही.

 

(Also Read>आंगणेवाडी जत्रा; भाविकांच्या मोबाईल्सना मिळणार फुल्ल नेटवर्क…)

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search