Category Archives: रत्नागिरी

रत्नागिरीत दोन एसटी बस आणि कारचा विचित्र अपघात; २२ प्रवासी जखमी

   Follow us on        

रत्नागिरी

रत्नागिरी शहराजवळील भाट्ये येथील झरी विनायक मंदिरा जवळील चढाावर शनिवारी सकाळी दोन एसटी बस आणि एका कारचा विचित्र अपघात झाला. रत्नागिरीहून पावसकडे जाणारी आणि पावसकडून रत्नागिरीकडे येणाऱ्या दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या. या अपघातानंतर पाठीमागून वेगाने येणारी कार अनियंत्रित होऊन एसटी बसवर आदळली.

​या विचित्र तिहेरी अपघातात बसमधील तसेच कारमधील मिळून २२ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने घटनास्थलळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

​अपघातामुळे रत्नागिरी-पावस मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूूना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले.

रत्नागिरीतील ३११ गावांचा ‘इको सेन्सिटिव्ह’ क्षेत्रात समावेश

   Follow us on        

रत्नागिरी: पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या हिरव्यागार पट्ट्याचे संवर्धन आणि कोकणातील नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ३११ गावांना पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह एरिया) म्हणून घोषित करण्यात आले आहे. वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे धोक्यात आलेली निसर्गसंपत्ती आणि जैवविविधता टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

​या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये जिल्ह्यातील पाच प्रमुख तालुक्यांतील गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये खेड तालुक्यातील ८५, संगमेश्वरमधील ८१, राजापूरमधील ५१, लांजामधील ५० आणि चिपळूण तालुक्यातील ४४ गावांचा समावेश आहे. या सर्व भागांमधील नाजूक पर्यावरणीय रचना संरक्षित करण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत.

​या नव्या नियमांमुळे सह्याद्रीच्या उतारांवर सुरू असलेल्या अनियंत्रित विकासाला मोठा लगाम बसणार आहे. पर्यावरण आणि निसर्गाला हानी पोहोचवणारे मोठे बांधकाम प्रकल्प, व्यापारी स्वरूपाची जंगलतोड तसेच खाणकाम यांसारख्या उपक्रमांवर कठोर निर्बंध लागू होणार आहेत. यामुळे या प्रदेशातील दुर्मिळ वनस्पती आणि वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास सुरक्षित राहण्यास मदत होईल.

​कोकणात अतिवृष्टीच्या काळात दरडी कोसळणे आणि भूस्खलनासारख्या दुर्घटना वारंवार घडतात. डोंगरउतारांवर होणारी बेसुमार वृक्षतोड आणि अनियंत्रित बांधकामांवर नियंत्रण आल्यामुळे जमिनीची धूप थांबून नैसर्गिक स्थिरता टिकून राहण्यास मदत होईल. तसेच पावसाचे पाणी जमिनीत मुरून भूजलसाठे आणि पाण्याचे नैसर्गिक स्रोत समृद्ध होण्यास यामुळे अनुकूल वातावरण तयार होईल.

​दरम्यान, हा निर्णय घेण्यात आला असला तरी स्थानिकांच्या विकासावर किंवा दैनंदिन जीवनावर सरसकट बंदी आणली गेलेली नाही. स्थानिकांची शेती, त्यांची पारंपरिक उपजीविका आणि आवश्यक घरबांधणी या गोष्टी सुरळीत सुरू राहणार आहेत. निसर्ग आणि शाश्वत विकास यांच्यात योग्य समतोल साधत भविष्यातील पिढ्यांसाठी कोकणातील पर्यावरण सुरक्षित ठेवणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे.

 

फणसाचा राजा थेट मोदींच्या दरबारात!

   Follow us on        

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीमध्ये नुकताच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे आणि जावई सारंग लखाणी यांचा विवाह रिसोप्शन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या उच्च-स्तरीय सोहळ्यामध्ये देश-विदेशातील आणि विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज आणि मोठे राजकीय नेते उपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले.

​या भव्य कार्यक्रमाला सत्ताधारी आणि विरोधक असे दोन्ही बाजूंचे नेते एकाच छताखाली एकत्र आल्याचे दिसून आले. यामध्ये विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका वाड्रा यांसारख्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.

​याच शानदार सोहळ्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, यामध्ये कोकणातील एक तरुण थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधताना दिसत आहे. ‘फणसाचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तरुणने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले असून त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

​व्हिडिओमध्ये झळकणारा हा तरुण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील झोपडे गावचा रहिवासी असून त्याचे नाव मिथिलेश देसाई आहे. त्यांना ‘फणस किंग’ म्हणूनही ओळखले जाते आणि त्यांनी रत्नागिरीमध्ये खास फणसाची एक वेगळी बाग तयार केली आहे.

​मिथिलेश देसाई यांनी आपल्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल बोलायचे तर, त्यांनी राहूरी कृषी विद्यापीठातून BTech ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग या विषयात पदवी प्राप्त केली आहे. दिल्लीच्या या खास सोहळ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आपल्या फणसाच्या कार्याविषयी आणि प्रकल्पाविषयी थेट पंतप्रधानांना सविस्तर माहिती दिली.

गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस; गट आरक्षण या तारखेपासून सुरू

   Follow us on        

मुंबई:गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मोठी वाहतूक व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा ७ ते २५ सप्टेंबरदरम्यान कोकणातील विविध मार्गांवर एसटीच्या तब्बल ५,२२० जादा बसेस धावणार असल्याची माहिती परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली.

गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण असून मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जातात. प्रवाशांची गैरसोय होऊ नये तसेच गर्दीच्या काळात पुरेशी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध व्हावी, यासाठी एसटी महामंडळाने यंदा मोठ्या प्रमाणात अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे.

जादा बससेवेचे आरक्षण १० ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. किमान ४० प्रवाशांच्या गटासाठी १० ऑगस्टपासून गट आरक्षणाची सुविधा उपलब्ध असेल. तसेच गट आरक्षणामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत, तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के भाडेसवलत लागू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

प्रवाशांना आगाऊ आरक्षणाची सुविधा एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच MSRTC Bus Reservation या अधिकृत मोबाइल ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजन आधीच करता येणार असून बसस्थानकांवरील गर्दी आणि तिकीट मिळविण्यासाठी होणारी धावपळ कमी होण्यास मदत होणार आहे.

गेल्या वर्षीच्या अनुभवाचा विचार करून यंदा गणेशोत्सवासाठी अधिक प्रमाणात जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कोकणाकडे जाणाऱ्या भाविक व चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार असून, उत्सवाच्या काळात प्रवाशांना सुरक्षित आणि सुलभ सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न आहे.

भाजप पक्षातर्फे चाकरमान्यांसाठी ‘गणपती स्पेशल’ गाडीची घोषणा

   Follow us on        

मुंबई: गणेशोत्सवाचा सण आनंदात जावा आणि मुंबईतील चाकरमान्यांचा कोकण प्रवास सुकर व्हावा, यासाठी भारतीय जनता पार्टी मुंबईच्या वतीने एक  पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष उपक्रम राबवला जात असून, याद्वारे प्रवाशांना कोणत्याही शुल्काशिवाय प्रवास करण्याची पर्वणी मिळणार आहे.

​ही विशेष मोफत रेल्वे गाडी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून कोकणातील प्रवाशांना घेऊन मार्गस्थ होईल. नियोजित वेळापत्रकानुसार ही ट्रेन शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १०:०० वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहे.

​प्रवाशांच्या सुविधेचा सखोल विचार करून या गाडीचे  प्रमुख स्थानकांवर थांबण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ही रेल्वे खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे.

​या मोफत रेल्वे सेवेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १० ते १६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पार पाडली जाईल. नागरिकांनी या मुदतीत दररोज दुपारी १ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भाजप कोकण विकास आघाडीच्या मुंबई कार्यालयात जाऊन आपला आरक्षण फॉर्म जमा करणे अनिवार्य आहे.

​अर्ज करताना प्रशासनाकडून नियमांची पूर्तता स्पष्ट सांगण्यात आली असून, प्रत्येक अर्जदाराने आपल्या अर्जासोबत आधार कार्डची प्रत जोडणे बंधनकारक आहे.

कोकण आयुक्तांचे न्यायालय रत्नागिरी किंवा सिंधुदुर्गात व्हावे!

   Follow us on        

सिंधुदुर्ग: देवगड येथे अधिवक्ता परिषद, कोकण प्रांत, सिंधुदुर्ग जिल्हतर्फे कोकण आयुक्तांकडे प्रलंबित असलेल्या महसूल न्यायप्रकरणांच्या सुनावणीसाठी रत्नागिरी अथवा सिंधुदुर्ग येथे नियमितपणे कोकण आयुक्तांचे न्यायालय भरविण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर करण्यात आले.

​या प्रसंगी ज्येष्ठ अधिवक्ता व माजी आमदार अजित गोगटे, अधिवक्ता परिषद प्रांत उपाध्यक्ष अभिषेक गोगटे, अधिवक्ता राहुल तांबोलकर, अधिवक्ता स्वप्नील सावंत, अधिवक्ता अग्निवेश तावडे, अधिवक्ता प्रतिमा सातवसे आदी मान्यवर उपस्थित होते.

​या निवेदनातून मागणी करताना, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल न्याय प्रकरणांच्या सुनावणीसाठी पक्षकार, वकील आणि संबंधित नागरिकांना प्रत्येकवेळी मुंबईला जावे लागत असल्याने त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

​रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग येथे कोकण आयुक्तांचे न्यायालय नियमितपणे भरविल्यास दोन्ही जिल्ह्यातील प्रलंबित महसूल प्रकरणांचा जलद निपटारा होण्यास मदत होईल आणि पक्षकार, वकील तसेच नागरिकांच्या प्रवासाचा खर्च, वेळ व श्रम यांची मोठी बचत होऊन न्यायप्रवेश सुलभ होईल.

​या मागणीची शासनाने सकारात्मक दखल घेऊन रत्नागिरी अथवा सिंधुदुर्ग येथे ठराविक कालावधीनंतर नियमितपणे कोकण आयुक्तांचे न्यायालय भरविण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी अधिवक्ता परिषद, कोकण प्रांत, सिंधुदुर्ग जिल्हा यांच्यातर्फे करण्यात आली आहे.

भगवती बंदर येथे क्रूझ टर्मिनल उभारणीला वेग; कोकणातील पर्यटनाला मिळणार नवी दिशा

   Follow us on        

रत्नागिरी:

​रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर येथे अत्याधुनिक क्रूझ टर्मिनल विकसित करण्याच्या प्रकल्पाला गती देण्यात येणार आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पाळुळे कोकणातील सागरी पर्यटन, स्थानिक रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा ठाम विश्वास मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

​या प्रकल्पाबाबत मंत्रालयात एका विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये मंत्री नितेश राणे बोलत होते. या बैठकीला महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

​मंत्री नितेश राणे यांनी बैठकीत सांगितले की, कोकण किनारपट्टीची नैसर्गिक संपन्नता, ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन क्षमता लक्षात घेता भगवती बंदर येथे होणारे क्रूझ टर्मिनल राज्याच्या सागरी पर्यटन क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

​या प्रकल्पाची अंमलबजावणी झाल्यास देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होऊ शकतील. यामुळे रत्नागिरी पर्यटन जागतिक नकाशावर अधिक ठळकपणे झळकण्यास मोठी मदत होईल.

​मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन कोकणातील बंदर विकास आणि सागरी पर्यटनाला सर्वोच प्राधान्य देत आहे, असेही मंत्री नितेश राणे यांनी शेवटी सांगितले.

कोकणात केली थायलंडच्या ‘जास्मिन राइस’ची यशस्वी लागवड

   Follow us on        

रायगड: पावसाचा लहरीपणा, अतिवृष्टी आणि नैसर्गिक अडचणींवर यशस्वी मात करत पनवेल तालुक्यातील गुळसुंदे येथील प्रयोगशील ‘कृषी भूषण’ शेतकरी मिनेश गाडगीळ यांनी जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या थायलंडच्या ‘जस्मिन राइस’ची यंदा यशस्वी लागवड केली आहे. पूर्णपणे स्व-संशोधित सेंद्रिय द्रव्यांच्या जिरावर घेतलेला हा प्रयोग रायगडच्या कृषी क्षेत्रात विशेष चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे.

​गेल्या वर्षी गाडगीळ यांनी थायलंडमधून जस्मिन राइसचे बियाणे मागवले होते. पहिल्या वर्षी विविध नैसर्गिक अडचणींचा सामना करत सुमारे दोन किलो भाताचे उत्पन्न मिळाले. यंदा याच धान्यापासून पुनरुत्पादन करण्याचे नियोजन त्यांनी केले. मात्र, यंदा मुळातच मान्सून लांबल्याने पेरणी वेळेत करता आली नाही. त्यानंतर सुरू झालेल्या धोधाम पावसामुळे रायगड जिल्ह्यात हाहाकार माजवला. नद्या, नाले आणि शेते तुडूंब भरल्याने अनेकांची पेरलेली धान्ये उगवली नाहीत, तर कमी प्रमाणात उगवली रोपे कुजून गेली.

​या काळात योग्य संधी साधत मिनेश गाडगीळ यांनी २२ जून रोजी पेरणी केली आणि सुरुवातीला बोरवेलच्या साहाय्याने पाणी दिले. अवघ्या चार ते पाच दिवसांत धान्य व्यवस्थित उगवून आले आणि त्यानंतर सुरू झालेल्या पावसाचा रोपांना मोठा फायदा झाला. सध्या भाताची नर्सरी अत्यंत उत्तम स्थितीत असून याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

​सुगंधी आणि आरोग्यदायी तांदूळ:

जस्मिन राइस हा जगातील सर्वाधिक सुगंधी तांदळांपैकी एक मानला जातो. हा तांदूळ पूर्णपणे झिरो ग्लुटन (Zero Gluten) असून त्यात फॅट्सचे प्रमाण अत्यंत अल्प असते. याशिवाय यामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्बोहायड्रेट्स, आयरन (लोह), मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-९ (फॉलिक एसिड) आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात.

​योग्य नियोजन, चिकाटी आणि सेंद्रिय शेतीची जोड दिली तर प्रतिकूल हवामानातही परदेशी व उच्च दर्जाची पिके यशस्वीरीत्या घेता येतात, हे मिनेश गाडगीळ यांनी आपल्या या प्रयोगातून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

या प्रयोगाबद्दल बोलताना मिनेश गाडगीळ म्हणाले, “कोणतेही रासायनिक खत न वापरता, केवळ मी स्वतः संशोधन केलेल्या सेंद्रिय द्रव्यांची फवारणी या पिकावर केली आहे. आता पुढे निसर्गाची अनुकूल साथ लाभल्यास यातून सुमारे १०० किलोपर्यंत शुद्ध बियाणे उपलब्ध होईल.”

कुटगिरी येथे लोखंडी पूल कोसळल्याची दुर्घटना: एका बैलाचा मृत्यू, ६ जनावरे गंभीर जखमी

   Follow us on        

गुहागर शहर : तालुक्यातील कुटगिरी गावठाणवाडी परिसरातील नदीवरील लोखंडी पूल सोमवारी सायंकाळी ७:३० वाजता अचानक कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली. पूल कोसळत असताना त्यावरून जात असलेली सुमारे १० ते १२ जनावरे पुलाखाली अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. या दुर्घटनेमध्ये दिलीप गुरव यांच्या मालकीच्या एका बैलाचा मृत्यू झाला असून, अन्य ६ जनावरे गंभीर जखमी झाल्याची माहिती गुहागर आपत्ती विभागाकडून प्राप्त झाली आहे.

​घटना घडताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, नदीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने तसेच पुलाचे जड लोखंडी साहित्य जनावरांवर कोसळल्यामुळे बचावकार्य करताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. काही ग्रामस्थ नदीत उतरून जनावरे वाचवण्याचा प्रयत्न करत असले तरी, लोखंडी रचना हटवल्याशिवाय अनेक जनावरांना बाहेर काढणे शक्य होत नव्हते.

​घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच, जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता व पशुवैद्यकीय अधिकारी यांना घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना गुहागर आपत्ती विभागाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर स्थानिक नागरिक व प्रशासनाच्या मदतीने दुर्घटनेत मृत झालेल्या बैलासह सर्व जखमी ६ जनावरांना अखेर सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

दापोलीत डोंगराला २ किमीच्या भेगा; भूस्खलनाच्या भीतीने मळे-सुतारवाडीतील ग्रामस्थांचे स्थलांतर

   Follow us on        

दापोली तालुक्यातील मळे-सुतारवाडी परिसरात मुसळधार पावसामुळे निसर्गाचा मोठा प्रकोप पाहायला मिळत आहे. येथील स्थानिक डोंगराला अचानक मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याची घटना समोर आली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने भूस्खलनाचा गंभीर धोका निर्माण झाला असून, यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे.

​प्रशासनाने केलेल्या प्राथमिक पाहणीत या भेगांची तीव्रता अत्यंत चिंताजनक असल्याचे स्पष्ट झाले आहे. डोंगराला तब्बल दोन किलोमीटर अंतरापर्यंत आणि सुमारे दोन ते चार फूट खोल भेगा पडल्याचे निदर्शनास आले आहे. पावसाच्या पाण्यामुळे डोंगर खचण्याची शक्यता अधिक वाढल्याने स्थानिक सुतारवाडी गावाला थेट धोका निर्माण झाला आहे.

​डोंगराला भेगा पडल्याची माहिती मिळताच दाभोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आणि नायब तहसीलदार यांनी आपल्या टीमसह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसराची सखोल पाहणी करून पंचनामा केला असून, या संपूर्ण घटनेचा सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आला आहे.

​संभाव्य आपत्ती लक्षात घेता महसूल प्रशासनाने सुतारवाडीतील ग्रामस्थांचे तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या कुटुंबांमध्ये भीतीचे सावट असून, भूस्खलनाच्या धास्तीने नागरिक रात्र जागून काढत आहेत. प्रशासनाने ग्रामस्थांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आणि सरकारी सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

​घटनेचे गांभीर्य ओळखून डोंगराच्या स्थैर्याची तपासणी करण्यासाठी भूवैज्ञानिक तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. हे पथक डोंगराच्या भेगांची खोली आणि त्याच्या संरचनेची सखोल तपासणी करेल. तज्ज्ञांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या भागातील सुरक्षेच्या दृष्टीने पुढील कायमस्वरूपी उपाययोजना आणि धोरण निश्चित केले जाणार आहे

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search