संगमेश्वर:मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथील ‘ड्राईव्ह-इन’ हॉटेलसमोरील रस्ता सध्या प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. गेल्या अवघ्या ४८ तासांत या ठिकाणी सहा ते सात भीषण अपघात घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. महामार्गावर करण्यात आलेल्या डायव्हर्शनच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने हे अपघात होत असल्याचे समोर आले असून, ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
या ठिकाणी डायव्हर्शन देण्यात आले असले तरी, तिथे आवश्यक मार्गदर्शन फलक किंवा रात्रीच्या वेळी दिसतील असे रिफ्लेक्टर्स लावण्यात आलेले नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे, योग्य बॅरिकेड्स लावण्याऐवजी रस्त्यावर थेट मातीचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी वेगाने येणाऱ्या वाहनचालकांना हे अडथळे वेळेत दिसत नाहीत, त्यामुळे वाहने थेट मातीच्या ढिगाऱ्यावर आदळून अपघात होत आहेत.
गुरुवारी रात्री पुण्यातील एका प्रवाशाची कार अशाच प्रकारे मातीच्या ढिगाऱ्यावर आदळली, ज्यामध्ये गाडीचे प्रचंड नुकसान झाले. मात्र, सुदैवाने एअरबॅग उघडल्याने मोठी जीवितहानी टळली. याच दरम्यान दोन दुचाकीस्वारही जखमी झाले. या घटनांनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. परिणामी, शुक्रवारी रात्री पुन्हा अपघातांची मालिका सुरूच राहिली. यामध्ये एक इनोव्हा कार, रुग्णवाहिका आणि दोन-तीन दुचाकी या सापळ्यात अडकल्या. आरवली ते कांते दरम्यान सातत्याने होणाऱ्या या अपघातांमुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून, याकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन सुरक्षितता वाढवावी, अशी मागणी जोर धरत आहे.


