नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभागात रेल्वे रुळांवर लोखंडी सामान, लाकूड किंवा दगड ठेवणे आणि धावत्या रेल्वे गाड्यांवर दगडफेक करण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. खेळण्याच्या उत्सुकतेपोटी किंवा कुतूहलामुळे हे प्रकार होत असल्याचे आरपीएफच्या तपासात समोर आले आहे. यामुळे मोठ्या रेल्वे अपघाताचा धोका निर्माण होत असून, प्रवाशांच्या जीवितास आणि रेल्वे मालमत्तेला मोठे नुकसान होऊ शकते.
रुळाजवळील शाळा, गावे आणि वस्त्यांतील मुलांमध्ये हे प्रकार अधिक प्रमाणात आढळून येत आहेत, ज्यांना याची गंभीरता कळत नाही.दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे आरपीएफ सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेतली आहे. तपासणीतून उघडकीस आले की, बहुतेक घटनांमागे स्थानिक मुलांचा सहभाग असतो आणि त्यांना रेल्वे रुळांवर खेळणे किंवा दगड फेकण्याचे परिणाम समजत नाहीत. यामुळे आरपीएफने विशेष जनजागृती मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
या मोहिमेत आरपीएफचे अधिकारी आणि कर्मचारी सक्रिय सहभाग घेत आहेत.‘कम्युनिटी पोलिसिंग आऊटरीच’ या कार्यक्रमांतर्गत नागपूर विभागातील आरपीएफ निरीक्षक आणि प्रभारी अधिकारी रेल्वे रुळांलगतच्या शाळा, गावे आणि वस्त्यांमध्ये नियमित भेटी देत आहेत. विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी, पालकांशी आणि ग्रामप्रमुखांशी थेट संवाद साधून रेल्वे रुळांवर खेळणे, दगड ठेवणे किंवा फेकण्याच्या धोक्यांबाबत जागरूकता निर्माण केली जात आहे. यातून मुलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षित रेल्वे वातावरणाची महत्त्वता समजावून सांगितली जाते.
या जनजागृती मोहिमेमुळे रेल्वे सुरक्षा वाढवणे आणि अपघात टाळणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. आरपीएफने यापूर्वीही अशा प्रकारच्या घटनांमध्ये मुलांना सावध केले आहे, परंतु सध्याच्या वाढत्या प्रमाणामुळे ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. अधिकारी आणि कर्मचारी यांना याबाबत प्रशिक्षण देऊन जबाबदारीने काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


