रायगड: गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई-गोवा ४ पदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्यापही अपूर्णच आहे. असे असतानाच या महामार्गावर टोलवसुली सुरू करण्यात आल्यामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येत्या जून महिन्यापर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती दिली असली, तरी प्रत्यक्षात नागोठाणे आणि कोलाड येथील उड्डाणपूल, सुकेली घाट, माणगाव आणि इंदापूर जवळील रस्त्यांची कामे अद्यापही अपूर्ण आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दररोज भीषण वाहतूक कोंडी आणि धुळीचा सामना करावा लागत आहे. या दुरवस्थेमुळे आणि रखडलेल्या कामांमुळे नागरिकांमध्ये आधीच तीव्र असंतोष आहे.
तीन ठिकाणी टोलनाक्यांचे नियोजन आणि स्थानिक विरोध
अपूर्ण कामांच्या पार्श्वभूमीवर, रायगड जिल्ह्यात खारपाडा, खांब आणि पोलादपूरजवळील लोहारे अशा तीन ठिकाणी टोलवसुली करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यापैकी खारपाडा येथे प्रत्यक्ष टोलवसुली सुरू झाली असून, या टोलनाक्याचे कंत्राट तीन महिन्यांचे आहे. नागरिकांकडून याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत असतानाच, खांब येथेही टोलनाका उभारण्यात आला आहे. खारपाडा येथील टोलनाक्यावरून मिळणाऱ्या प्रतिसादाचा अंदाज घेऊन खांब येथे टोलवसुली सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे आणि त्यानंतर लोहारे येथेही टोलनाका सुरू केला जाईल. या लागोपाठच्या टोलनाक्यांमुळे मुंबई-गोवा प्रवास अधिक खर्चिक होणार असून, याचा थेट परिणाम सर्वसामान्य कोकणवासीयांसह वाहतूक क्षेत्रावर होणार आहे. वाहतूक खर्च वाढल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंबरोबरच बाजारपेठेतील इतर वस्तूही महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लोकप्रतिनिधींचे मौन आंदोलनाचा इशारा
खारपाडा टोल सुरू झाल्यावर स्थानिक नागरिकांना यातून वगळण्यात येईल, असे तोंडी सांगण्यात आले असले तरी सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, सत्ताधारी घटक पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी या संवेदनशील विषयावर पूर्णपणे मौन बाळगल्याने त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. पूर्वी खारघर टोलनाक्याविरुद्ध जशी ठोस आणि आक्रमक भूमिका घेण्यात आली होती, तशी भूमिका या टोलबाबत घेतली जात नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. दरम्यान, जोपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होऊन त्याचे अधिकृत उद्घाटन होत नाही, तोपर्यंत खारपाडा येथील टोलवसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणी रायगड प्रेस क्लबने केली आहे. तसेच, या अन्यायाविरोधात २१ मे रोजी खारपाडा टोलनाक्यावर ‘ठिय्या आंदोलन’ करण्याचा इशाराही रायगड प्रेस क्लबने प्रशासनाला दिला आहे.


