Category Archives: देश
चांद्रयान ३: भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी, सर्वात अभिमानाची आणि सर्वात मोठ्या गौरवाची बातमी आहे. इस्रोच्या (ISRO) चांद्रयान-3 (Chandrayaan-3 Mission) चं चंद्रावर यशस्वी लँडिंग झालं आहे. इस्रोचं चांद्रयान-3 आज 23 ऑगस्ट रोजी 06 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं आहे. भारतातील 140 कोटी जनतेची मान आज अभिमानाने वर गेली आहे.
भारत चंद्रावर पोहोचला भारताच्या यशाचा सूर्य थेट चंद्रावर उगवला आहे. भारतासह जगातील प्रत्येकाच्या नजरा या ऐतिहासिक घटनेकडे लागल्या होत्या. जसजसा लँडिंगचा क्षण जवळ येत होता, तसतशी धाकधूक वाढत गेली, श्वास रोखले गेले, हात जोडले गेले आणि डोळे मिटले गेले आणि बातमी आली. चांद्रयान-3 मोहीम फत्ते झाली. प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले आणि मनात आनंदाचे धबधधबे फुलून गेले. आपल्याच घरातलं कुणीतरी परीक्षेत फर्स्ट क्लासने उत्तीर्ण झाल्याची भावना निर्माण झाली. भारताच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासात, जिथं जगातलं कुणीच गेलेलं नाही, अशा दक्षिण ध्रुवाच्या उंबरठ्याला भारताने गवसणी घातली आहे.
लडाख : लेहमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. भारतीय सैन्याच्या एका ट्रकचा भीषण अपघात झालाय. या ट्रकमध्ये 2 ज्युनियर कमिशन ऑफिसर आणि 7 जवान होते. क्यारी शहरापासून 7 किमी अंतरावर अपघाताची दुर्घटना घडली. भारतीय सैन्याचं ट्रक थेट दरीत कोसळलं. या दुर्घटनेत गाडीतील सर्व 9 जवानांचा मृत्यू झाला. हे सर्व जवान कारु गॅरीसन येथून लेहच्या क्यारी शहाराच्या दिशेला जात होते. यादरम्यान ही दुर्घटना घडली.
भारतीय सैन्याची एक रुग्णवाहिका आणि आणखी काही वाहनं क्यारी शहाराच्या दिशेला जात होती. या दरम्यान एका ट्रकचा भीषण अपघात झाला. ट्रक थेट दरीत कोसळला. या अपघातात ट्रकमधील सर्व 9 जवान शहीद झाले. एकूण 34 जवान क्यारी शहराच्या दिशेला जात होती. त्यापैकी 9 जणांचा दुर्देवी अपघातात मृत्यू झालाय.
भारतीय सैन्याचा ताफा लेहच्या न्योमा येथून क्यारीच्या दिशेला जात होता. या दरम्यान घाटात संध्याकाळी पावणे सहा ते सहा वाजेच्या दरम्यान अपघाताची घटना घडली. सैन्याच्या ताफ्यातील एक ट्रक थेट दरीत कोसळलं. या ट्रकमध्ये 10 जण होते. त्यापैकी 9 जणांचा मृत्यू झालाय.
Vande Bharat Express News :वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास महाग, ती फक्त श्रीमंतासाठी बनवण्यात आली आहे अशी टीका नेहमीच वंदे भारत ट्रेन विरोधात केली जात आहे. या टीकेला सरकारने गांभीर्याने घेतले असून वंदे भारत एक्सप्रेसची सेवा सर्वसामान्य नागरिकांना पण घेता येईल या दिशेने प्रयत्न चालू केले आहेत. याचाच एक भाग म्हणुन रेल्वे प्रशासन येत्या ऑक्टोबर महिन्यापासून नॉन एसी वंदे भारत ट्रेन चालू करणार आहे. यामुळे अगदी स्वस्तात आरामदायी प्रवास आता करणं शक्य होणार आहे. या वर्षात दोन नॉन-एसी वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा मानस असल्याचं सांगण्यात येत आहे. ICF चेन्नईकडून वंदे भारत नव्या स्वरुपात आणण्याची योजना आखण्यात येत आहे. दरम्यान, वेगाने, आरामदायी आणि अगदी वाजवी दरात प्रवाशांना प्रवास करता येण्यासाठी ही नॉन एसी वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात येणार असल्याचं रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
आता धावत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसपेक्षा नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेसची बाह्य रचना ही थोडी वेगळी असणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पण यामध्ये आरामदायी प्रवासामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नसल्याचं रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. तसेच यामध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा देखील उपलब्ध असणार आहे. या गाड्यांमध्ये फायर अलार्म सिस्टीम, इमर्जन्सी अलार्म या सुविधा असणार आहे. तर या ट्रेनमधील टॉयलेट देखील वंदे भारत एक्सप्रेस सारखेच असणार आहेत. दोन डब्यांमध्ये जर्क-फ्री प्रवास करण्यासाठी सुधारित कपलर देखील असणार आहे. या ट्रेनला एलएचबी कोच असणार आहेत.
एसी वंदे भारत पेक्षा वेग कमी
एसी वंदे भारतपेक्षा नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेसचा वेग कमी असणार आहे. नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेसचा ताशी वेग हा 130 किमी असणार आहे. सध्या वंदे भारत एक्सप्रेसचा वेग हा ताशी 160 किमी इतका आहे. यावर बोलतांना रेल्वे मंत्रालयाने म्हटलं की, रेल्वेच्या खिडक्या उघड्या असताना जास्त वेगाने रेल्वे चालवणे हे धोकादायक ठरु शकते. त्यामुळे या रेल्वेचा वेग एसी वंदे भारत एक्सप्रेसपेक्षा कमी ठेवण्यात आला आहे.
सध्या वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर सामान्य लोकांच्या खिशाला परवडत नसल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून रेल्वे मंत्रालयाकडून सामान्य लोकांसाठी ही नॉन एसी वंदे भारत रेल्वे सुरु करण्यात येणार आहे. तिकिटांचे दर किती असतिल हे जाहीर केले नसले तरी सध्या चालविण्यात येणार्या वंदे भारत एक्सप्रेस च्या तिकिट दरापेक्षा निम्मे किंवा त्याच्या आसपास असण्याचा अंदाज आहे. यामध्ये स्लिपर कोचची देखील सुविधा देण्यात येणार आहे.




