Category Archives: सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हय़ातील एसटी सेवेबाबत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी नितेश राणे यांची परिवहन मंत्र्यासोबत बैठक संपन्न

   Follow us on        

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिवहन महामंडळाची बस स्थानके व बसगाडयांच्या विविध अडचणीबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जी यांच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज बैठक घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग डोंगराळ, दुर्गम जिल्हा असून एस टी बस हा एकमेव आधार आहे. त्यामुळे बस सेवा सुरळीतपणे चालू रहावी व प्रवाशांची गैरसोय टाळून सुलभ रित्या त्यांना एसटी बसची सेवा मिळावी, अशी मागणी यावेळी नितेश राणे यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली. या मागणीला परिवहन मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती नितीश राणे यांनी दिली, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बस स्थानक व बस गाड्यांच्या विविध अडचणीबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले

Kudal: डंपर खाली सापडून शाळकरी विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

कुडाळ:वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर खाली सापडून शाळकरी विद्यार्थिनी मनस्वी सुरेश मेथर (15, रा. निवती) जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास पाट तिठा (माऊली मंदिर नजीक) येथे घडली. मोटारसायकलस्वार युवकाला किरकोळ दुखापत झाली. मनस्वी मोटारसायकलच्या मागे बसून जात होती. वाळू वाहतूक करणारा डंपर परुळे – पाट मार्गे कुडाळच्या दिशेने येत होता. मोटारसायकल व डंपरची धडक बसून झालेल्या अपघातात मनस्वी डंपरच्या चाकाखाली सापडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच निवती पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. जखमी मोटारसायकलस्वाराला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान निवती व पाट पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत, निवती पोलिस ठाण्यात धडक देत, अपघाताला कारणीभूत ठरणा-यांवर तातडीने गुन्हे दाखल करून कारवाई करावी, तसेच बेदरकार डंपर वाहतुकीला आळा घालावा अशी मागणी लावून ठरली. या अपघाताची खबर योगेश उल्हास मेतर (रा. निवती मेढा) यांनी निवती पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार या अपघातप्रकरणी सोळा वर्षीय मोटारसायकलस्वार मुलगा, गाडी चालविण्याचा परवाना नसतानाही त्याला गाडी चालविण्यास दिल्याने त्याचे वडील वैभव मांजरेकर (रा.हुमरमळा करमळीवाडी) आणि डंपर चालक शैलेश कुमार सिंग अशा तिघांवर निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती सहाय्यक पोलिस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी दिली.

“….तर कोल्हापूर ते मोपा विमानतळ हे अंतर एका तासावर येईल.”

   Follow us on        
मुंबई: नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला सांगलीआणि कोल्हापुरातील शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे. अधिवेशन सुरु असताना महामार्गाला विरोध करणारे शेतकरी आझाद मैदान येथे आंदोलन करत आहेत. याबाबत विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला असता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महामार्ग का गरजेचा आहे याची माहिती दिली.
हा महामार्ग सरकारचा अट्टाहास नाहीये तर, महाराष्ट्राच्या विकासाठी महत्वाचा महामार्ग आहे, समृद्धी महामार्गाप्रमाणे शक्तिपीठ महामार्ग देखील विकासासाठी महत्वाचा मार्ग ठरेल असे फडणवीसम्हणाले. कोल्हापुरातून पाऊण ते एक तासांत मोपा विमानतळावर जाता येईल, यामुळे वाणिज्य क्षेत्रातलाभ होणार नाही का? परिवर्तन होणार नाही का? असे प्रश्न त्यांनी विचारलेत.  महामार्गा विरोधात निघणाऱ्या मोर्चा सारखा महामार्गाला समर्थन देणारा मोर्चा शेतकरी काढणार आहेत, असे फडणवीस म्हणालेत.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन देखील फडणवीस यांनी यावेळी दिले. नागपूर रत्नागिरी महामार्ग असताना तसेच, त्याला जोडणारे इतर मार्ग असताना शक्तीपीठ कशासाठी? असा सवाल सतेज पाटील यांनी उपस्थित केला. शिवाय मोपाला जाण्यासाठी आजरामार्ग चौपदरीकरण झाल्याने दोन ते अडीच तासांत जाता येते असेही पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. आणि आंदोलन शेतकऱ्यांशी चर्चा करावी, अशी विनंती पाटील यांनी केली.

सावंतवाडी: कलंबिस्त येथे युवकाची गळफास घेत आत्महत्या

   Follow us on        

सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त गणशेळवाडी येथील 26 वर्षीय निलेश न्हानु सावंत या युवकाने घराच्या अंगणातील लोखंडी छप्पराला गळफास लावत आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. या घटनेने कलंबिस्त गावात हळहळ व्यक्त होत आहे. मयत निलेश सावंत याचे काका राजन सावंत यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, पोलीस हवालदार प्रसाद कदम, लक्ष्मण काळे यांनी जाऊन पंचनामा केला. निलेश हा शांत व मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याचा मित्रपरिवार ही मोठा होता. निलेश याच्या पश्चात आई, भाऊ, बहीण, काका असा मोठा परिवार आहे.

Video: लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ; फिरत्या विक्रेत्याच्या कुल्फीमध्ये आढळल्या अळ्या

   Follow us on        

सावंतवाडी: सावंतवाडीतील कलंबीस्त गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे आलेल्या एका फिरत्या विक्रेत्याच्या कुल्फीमध्ये किडे सापडले आहेत. हा प्रकार समजल्यानंतर येथील जागृत ग्रामस्थांनी त्या विक्रेत्याला धारेवर धरले आहे.

याबद्दल जाब विचारल्यानंतर विक्रेत्याने यात आपली काही चूक नसून या खाद्यपदार्थांची मी फक्त विक्री करत आहे असे सांगितले. त्याने जेथून हे खाद्यपदार्थ विकत घेतो त्या व्यावसायिकाचे नावही सांगितले.

या प्रकारामुळे या विक्रेत्यांकडून हे पदार्थ विकत घेणार्‍या लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे पदार्थ बनवताना योग्य ती स्वच्छता राखली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा व्यावसायिकांवर योग्य वेळी कारवाई केली गेली नाही तर पुढे या निष्काळजीपणामुळे जीव गमावण्यांची शक्यता नाकारता येत नाही. केंद्र सरकारने अन्नसुरक्षेसाठी FSSAI या संस्थेची नियुक्ती स्थापना केली आहे. या संस्थेने या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

….अन्यथा महाराष्ट्रदिनी सावंतवाडी स्थानकावर पुन्हा ‘रेल रोको’…प्रवासी संघटनेचा इशारा

   Follow us on        
सावंतवाडी: कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी स्थानक हे तळकोकणातील महत्त्वाचे स्थानक असून या ठिकाणी कोकणवासी आणि पर्यटकांची नेहमी रेलचेल असते. येथील स्थानक टर्मिनस घोषित होऊन तब्बल दहा वर्षे उलटली परंतु हे काम देखील गेली अनेक वर्षे रखडले आहे. ह्या स्थानकातून कोरोना काळात एकूण सहा गाड्या काढून घेण्यात आल्या होत्या. या संदर्भात कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी या संघटनेने या बद्दल अनेक वेळा आवाज उठवला असून या ठिकाणी तब्बल तीन वेळा आंदोलन देखील केले होते, आताच २६ जानेवारी २०२६ रोजी केलेल्या रेल रोको आंदोलनाची दखल महाराष्ट्रातील जनतेने घेतली होती. तरी देखील कोकण रेल्वे प्रशासनाकडून याची योग्य दखल घेण्यात आली नाही असेच या वरून दिसते.
सावंतवाडी स्थानकाचे उत्पन्न आणि प्रवासी संख्या ह्या रेल्वे बोर्डाच्या मानकापेक्षा अधिक असून देखील येथे थांबे न देण्यामागे कोकण रेल्वे प्रशासनाचे काय हित आहे हे मात्र अनुत्तरित आहे.या वर्षात आधी रोहा आणि आता कुमठा येथे नवीन थांबे मंजूर झाले परंतु सावंतवाडी स्थानकात काढून घेण्यात आलेले थांबे पुन्हा देण्यात रेल्वे प्रशासन एवढा आखडता हात का घेत आहे हा प्रश्न सामान्य कोकणकर जनतेला पडला आहे.
कोरोना काळात काढून घेण्यात आलेल्या १२२३१ /३२ त्रिवेंद्रम – निजामुद्दीन – त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेस, १२२०/०२ एल टी टी – कोचुवेली – एल टी टी गरीब रथ एक्सप्रेस या गडांचा थांबा अजूनही पूर्ववत केला गेला आहे. त्याबरोचर मुंबई सीएसएमटी  – मंगलोर या गाडीला सावंतवाडी येथे थांबा देण्यात यावा या मागणीलाही वारंवार केराची टोपली दाखवली जात आहे. मुंबई – गोवा वंदे भारत एक्सप्रेस या गाडीला सावंतवाडी येथे थांबा मिळणे अपेक्षित होते. मात्र तिथेही या स्थानकाला डावलले गेले आहे.  कोकण रेल्वे प्रशासन जर असेच करणार असेल तर पुन्हा महाराष्ट्र दिनी भव्य रेल रोको करू असा इशारा कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी  ने दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हातील रेल्वे स्थानकांवरील समस्या मार्गी लावणार – मंत्री नितेश राणे

   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वेच्या सहा स्टेशन वरील अडीअडचणी व समस्या मार्गी लावण्याबरोबरच आवश्यक सुविधा शासनाच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील. कोकण रेल्वे वरिष्ठ अधिकारी, सीएमडी आणि प्रवासी समन्वय समिती यांचा येत्या काही दिवसांत स्टेशन पाहणी दौरा करू, तसेच रेल्वेच्या विविध जलद गाड्या आणि सिंधुदुर्ग व वैभववाडी स्थानकातील पीआरएस सिस्टीम बाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढला जाईल.
सिंधुदुगनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री कक्ष उद्घाटनानंतर कोकण रेल्वे प्रवासी समिती अध्यक्ष प्रकाश पावसकर व जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांनी मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन कोकण रेल्वेच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. सा. बां. विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड तसेच रेल्वे प्रवासी संघटनेचे साई आंबेरकर, शुभम परब, संजय वालावलकर, स्वप्निल गावडे आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग: असनिये गावात पट्टेरी वाघाचा वावर?

   Follow us on        
सिंधुदुर्ग: असनिये गावात कणेवाडी येथे शुक्रवारी रात्री एका घराच्या आवारात कुत्र्याचा जंगली प्राण्याने फडशा पडला असल्याची घटना समोर आली आहे. हा जंगली प्राणी पट्टेरी वाघ असल्याचे ग्रामास्थांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे असनिये परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
कणेवाडी येथील दिनेश सावंत यांच्या घरातील कुत्रा रात्री अचानक गायब झाला. त्यानंतर त्याचा माग काढला असता त्याला घराच्या आवारात पटेरी वाघाच्या पायाचे अनेक ठसे मिळाले. या परिसरात पट्टेरी वाघ अनेक वेळा ग्रामस्थांना दृष्टीस पडत असून हा बिबट्या नसून पटेरी वाघच असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी या पट्टेरी वाघाच्या पायाचे ठसे ही टिपले. पट्टेरी वाघाच्या या दहशतीमुळे बागायतीमध्ये काजू गोळा करण्यासाठी आणि लाकडांसाठी जंगलात जाणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण असून वनखात्याने याची तात्काळ दखल घेऊन या पट्टेरी वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

पट्टेरी वाघ कि बिबट्या?

दरम्यान याबाबत निवृत्त विभागीय वन अधिकारी सुभाष पुराणिक तसेच बांदा वनपाल प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, ग्रामस्थांनी टिपलेले हे ठसे पट्टेरी वाघाचे नसून ते बिबट्याचे आहेत. तसेच वाघ जंगलातून भर वस्तीत येऊन शिकार करण्याची शक्यता नाही. त्यामुळे हा बिबट्या असल्याचे सांगितले.

ब्राझील दौऱ्यात काजू शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवणारा करार- आ. दीपक केसरकर

   Follow us on        
काजू बोंड संदर्भात झालेल्या ब्राझील दौऱ्यात नॉन डिस्क्लोझर करार करण्यात आला आहे. लवकरच त्या कंपनीचे एमडी व टीम भारतात येणार आहेत. येथील काजूची ते पहाणी करणार असून त्यानंतर काजू बोंडावर प्रकिया सुरु केल्यावर चांगला दर काजू बागायतदारांना मिळणार आहे. काजू शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडेल असा विश्वास माजी मंत्री, सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. सावंतवाडी येथे ते आज बोलत होते.
2 लाख हेक्टर जमिनीवर काजूची लागवड होते. यातील काजू गरावर प्रक्रिया होते. मात्र, काजू बोंड फुकट जात. 3 हजार 200 कोटीचे काजू बोंड वाया जाते. ब्राझिल देशात यावर विशेष संशोधन झाले असून या बोंडापासून विविध प्रकारची पेये, काजूचा जूस, मिट आदिंसारखे पदार्थ बनवले जातात, असे केसरकर म्हणाले.
तसेच ब्राझील येथे भारतील गाईंचे संवर्धन केले आहे. यामध्ये संकरीत जाती देखील करण्यात आल्या आहेत. आपल्याकडील कोकण कपिला गाईंच्या दुग्ध उत्पादन वाढ व्हावी यादृष्टीने देखील यावेळी चर्चा झाली. त्या पद्धतीचे तंत्रज्ञान प्राप्त झाल्यानंतर व दुग्ध उत्पादन वाढ झाल्यावर कोकण कपिलाचा एटू मिल्क म्हणून वापर करता येईल असे केसरकर यांनी सांगितले. सावंतवाडीत महाराष्ट्रातील सर्वात मोठा म्युझिकल फाऊंटन उभा राहत आहे. महिला, युवक यांच्यासाठी सिंधुरत्न योजनेतून पर्यटन प्रकल्प साकार होत आहेत. हाऊस बोटच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळणार आहे. तसेच ताज गृपच्या माध्यमातून माय बंगलो सारखा उपक्रम राबविण्यात येणार असुन उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पर्यटनासाठीच्या मिनी बसेसचा शुभारंभ लवकरच होणार आहे अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.

Fact Check: कोकणातील परुळे गावात सिंहाचा वावर? नेमके सत्य काय?

   Follow us on        
Fact Check: पाट-परुळे रोडवर पेट्रोल पंपाच्या ठिकाणी सिंह आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. मात्र हा व्हिडिओ कोकणातील परुळे गावातील नसून तो व्हिडिओ गुजरात मधील केर गावातील जुना व्हिडिओ असल्याचे समोर आले आहे.
पाट-परुळे रोडवर पेट्रोल पंपाच्या ठिकाणी सिंह आला असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हा व्हिडिओ जुना असून सोशल मीडियावर विविध ठिकाणच्या नावाने व्हायरल होत आहे. सिंहाचा हा व्हिडिओ गुजरात येथील किर गावातील असल्याची माहीती परुळे येथील वेतोबा पेट्रोल पंपाचे मालक निलेश सामंत यांनी दिली आहे.हा व्हिडिओ जुना आहे.तसेच इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ गुजरात मधील केर गावातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सिंहाच्या व्हिडिओवर कुणीही परूळे गावासह जिल्ह्यातील लोकांनी विश्वास ठेवू नये.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search