Konkan Railway News :मुंबई कन्याकुमारी नव्या गाडीच्या निमित्ताने महाराष्ट्रावर अन्यायाची रेल्वेची परंपरा कायम, महाराष्ट्रीय प्रवाशांच्या जखमेवर मीठ
गेली अनेक वर्षे कोकणवासी रेल्वेकडे मुंबई चिपळूण, मुंबई रत्नागिरी, वसई सावंतवाडी, कल्याण सावंतवाडी गाड्यांची मागणी करत आहे. परंतु रेल्वे प्रशासन प्रत्येक वेळी मुंबईतील क्षमता, कोकण रेल्वेचा एकेरी मार्ग, मार्गाचा १४०% वापर, डब्यांची उपलब्धता किंवा रेल्वे बोर्ड अशी एक ना अनेक कारणं देऊन नकारच देत असते. मुंबई विभागात नवीन गाडी सुरु करण्यासाठी क्षमताच नसल्यामुळे मुंबईहून चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडीसाठी नवीन गाडी सुरु करता येणार नाही असे उत्तर मध्य रेल्वेने कोंकण विकास समितीला हल्लीच दिले होते. परंतु त्याच मुंबई विभागाकडे कन्याकुमारी गाडी सुरु करण्याची क्षमता आहे हे विशेष.
(Also Read>आजपासून ऑगस्टपर्यंत पर्ससीन मासेमारी राहणार बंद…मच्छीमारांच्या चिंतेत वाढ)
कोकण रेल्वेच्या उभारणीत भारतीय रेल्वे ५१%, महाराष्ट्र राज्य शासन २२%, कर्नाटक राज्य शासन १५% तर गोवा आणि केरळ राज्य शासन प्रत्येकी ६% इतका आर्थिक सहभाग आहे. परंतु गाडीचे दक्षिणेकडील शेवटचे स्थानक विचारात घेतल्यास महाराष्ट्राला ३, गोवा, कर्नाटक आणि केरळला प्रत्येकी ५ ते ६ आणि तामिळनाडूला १ इतक्या सरासरी प्रतिदिन गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. यातून महाराष्ट्रातील प्रवासी कसे प्रवास करत असतील आणि कोकण रेल्वेच्या निमित्ताने महाराष्ट्राला काय मिळाले याची कल्पना येते.
सावंतवाडीच्या पुढे गोव्याला जाणाऱ्या नियमित किंवा विशेष गाड्या महाड, लांजा तालुक्यात न थांबता तर मडगावच्या पुढे जाणाऱ्या गाड्या माणगाव, महाड, संगमेश्वर, लांजा, राजापूर, वैभववाडी तालुक्यांना वगळून पुढे जातात. मंगळुरूच्या पुढे जाताना तर प्रत्येक जिल्ह्यात एकच थांबा मिळतो. एक एक टप्पा सोडून पुढे जाणाऱ्या प्रत्येक गाडीसाठी महाराष्ट्रातील थांब्यांचा बळी दिला जातो. सध्या चालणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव, मंगळुरु विशेष गाड्यांचे थांबे बघितल्यास त्याचीच प्रचिती येते.
नवीन गाड्या मिळणे दूरच आहेत त्या गाड्यांना महाराष्ट्रात वाढीव थांबे मिळणेही कठीणच आहे. प्रवाशांनी आंदोलन केल्याशिवाय कोणताही वाढीव थांबा मिळालेला नाही. सध्या जनशताब्दी, मंगला, लोकमान्य टिळक करमळी, कोचुवेली एक्सप्रेसला खेड, नेत्रावती, मत्स्यगंधाला संगमेश्वर, लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव आणि नागपूर मडगाव एक्सप्रेसला वैभववाडी, तेजस एक्सप्रेसला कणकवली, मुंबई मंगळुरु आणि नागपूर मडगाव एक्सप्रेसला सावंतवाडी थांब्यांची प्रतीक्षा आहे. त्यासाठीही मागणी, निवेदन, आंदोलनाचं सत्र सुरूच आहे.
(Also Read :पहा कोकणात निर्माण केलेली, ओले काजूगर बी सोलायची जगातील पहिली मशीन…विडिओ पाहण्यासाठी ईथे क्लिक करा)
महाराष्ट्रात गाड्यांची कमतरता असतानाही त्यावर कहर म्हणून गोव्यातून सुटून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना कोकण रेल्वेने रत्नागिरी आणि रत्नागिरीच्या उत्तरेकडे केवळ १८-२०% आरक्षण कोटा दिलेला आहे. उर्वरित ८०% जागा रत्नागिरीच्या दक्षिणेकडच्या स्थानकांनाच उपलब्ध होतात. हे वाटपही समान ठेवण्याची मागणी प्रवासी करत आहेत. परंतु त्याकडे लक्ष दिले जात नाही. पुरेशा गाड्या नाहीतच परंतु ज्या आहेत त्यात आरक्षण कोटाही देणार नाही अशी रेल्वेची भूमिका आहे.
कोरोना संकटाचा फायदा घेऊन रेल्वेने शून्य आधारित वेळापत्रक लागू करताना पॅसेंजर गाड्यांचे थांबे कमी करून एक्सप्रेसमध्ये रूपांतर केले. वक्तशीरपणा सुधारण्यासाठी मध्य रेल्वेने रत्नागिरी दादर पॅसेंजरची वाट दिव्यापर्यंतच अडवली खरी परंतु त्याचा किती फायदा झाला हा संशोधनाचा विषय ठरेल. सप्टेंबर २०२१ पासून ५०१०३ दिवा रत्नागिरी पॅसेंजर तर जानेवारी २०२२ पासून ५०१०४ रत्नागिरी दिवा पॅसेंजर वेळेत आपल्या गंतव्यस्थानी पोहोचलेल्या नाहीत. मध्य रेल्वेवर ५-१० थांबे कमी करूनही रत्नागिरी दिवा आणि सावंतवाडी दिवा गाड्यांच्या प्रवास वेळेत अपेक्षित घट झालेली नाही. रत्नागिरी दादरची रत्नागिरी दिवा केल्यावर त्याच वेळेत दादरवरून बलिया/गोरखपूर गाडी सुरू झालेली आहे. यावरून रत्नागिरी दादर दिव्याला का ठेवली याची कल्पना येते.
इतके गंभीर प्रश्न असतानाही आता नवीन मुंबई कन्याकुमारी गाडी चालवण्यात येत आहे. तिला सुपरफास्ट म्हटले आहे परंतु थांबे पाहिल्यास ती केवळ कोकण रेल्वेवरच सुपरफास्ट असल्याचे दिसते. महाराष्ट्रातील दोन थांब्यांमधील सरासरी अंतर ५५ किलोमीटर तर कोकण रेल्वेच्या बाहेर सरासरी ४० किलोमीटरवर थांबे आहेत. रोहा ते चिपळूण १२८ किलोमीटर आणि रत्नागिरी ते कणकवली १११ किलोमीटरमध्ये एकही थांबा नाही. खेडसारख्या महत्वाच्या स्थानकावर सध्या धावणाऱ्या गाड्यांना थांबे देण्याची मागणी असताना या नव्या गाडीलाही खेड येथे थांबा दिलेला नाही. रविवारी रत्नागिरी किंवा चिपळूणमधून मुंबईकडे जाणाऱ्या नवीन गाडीची नितांत गरज असताना त्याच दिवशी ही कन्याकुमारी गाडी परत येणार आहे. म्हणजे पुन्हा स्थानिक प्रवाशांच्या पदरी निराशाच आहे कारण गाडी असली तरी तिला पुरेसा कोटा मिळणार नाही, तिला महाराष्ट्रात मोजके तीन चार थांबे आहेत आणि इतक्या लांबून येणाऱ्या गाडीत चढायला मिळणे अशक्यप्राय गोष्ट असेल.
पूर्वी मुंबई कन्याकुमारी दरम्यान चालणारी जयंती जनता एक्सप्रेस पुणे ते मुंबई दरम्यान प्रवासी नसल्याचे कारण देऊन पुण्याला शॉर्ट टर्मिनेट केली गेली आणि आता नवीन मुंबई कन्याकुमारी गाडी देण्यात येत आहे. मग आधी सुरु असलेली गाडी पुण्याला नेलीच कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतो. यातून नेमकं काय साध्य झालं? त्याहीपेक्षा महाराष्ट्रात गाड्या सुरु करताना क्षमता नाही परंतु इतर राज्यात गाड्या सहज सुरु होऊ शकतात हा महाराष्ट्रातील नागरिकांना डिवचण्याचा प्रकार आहे.
तरी, कोकण रेल्वे, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने इतर राज्यातील प्रवाशांची सोय करण्याआधी स्वतःच्या हद्दीतील विभागातील प्रवाशांचा उद्रेक होण्याआधी त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात. कारण, ते तुमचंच उत्तरदायित्व आहे. महाराष्ट्रातील स्थानिक प्रवासी आपल्या मागण्या घेऊन दक्षिण रेल्वेकडे जाऊ शकत नाहीत. मध्य रेल्वे, कोकण रेल्वे, पश्चिम रेल्वेचे मुख्यालय महाराष्ट्रात असूनही आम्हाला किमान सोयींसाठी संघर्ष करावा लागतो हे आमचं दुर्दैव. आता महाराष्ट्रातील नागरिकांनीच एकत्र येऊन याचा विरोध करावा.
अक्षय मधुकर महापदी