मुंबई गोवा महामार्गाबाबत सह्याद्री अतिथीगृहात कोकणातील लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत आज बांधकाममंत्री रविन्द्र चव्हाण यांनी आज एक बैठक आयोजित केली होती.
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा रस्तेमार्ग प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी कोकणातील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावीत. पूर्ण ताकदीने आणि युद्धपातळीवर काम करा, अशा सूचना बांधकाममंत्री रविन्द्र चव्हाण यांनी या बैठकीत दिल्या.
प्रत्येक जिल्ह्यात रस्ते दुरुस्तीचे काम करणाऱ्या एजन्सीज वाढवून येत्या आठवड्यात प्रामुख्याने खड्डे भरण्याचे काम पूर्ण करणार तसेच याबाबत कोकणातल्या लोकप्रतिनिधींना घेऊनच ते स्वतः सदर कामाच्या प्रगतीचा आढावा प्रत्यक्ष स्थळावर जाऊनच घेणार असे ते बोलले.
याच बरोबर संपूर्ण महामार्गावर वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी जास्तीत जास्त ट्रॅफिक वॉर्डन तैनात करून वाहतुक व्यवस्थापन सुरळीत ठेवण्याचे आदेशही या बैठकी दरम्यान वाहतूक विभागाला दिले आहेत असे त्यांनी पुढे सांगितले.
या बैठकीत शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर, खासदार सुनील तटकरे, खासदार विनायक राऊत, आमदार प्रवीण दरेकर, भरत गोगवले, नितेश राणे, वैभव नाईक,आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) एस. एस. साळुंखे, सचिव (बांधकाम) पी. डी. नवघरे, मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) संतोष शेलार, कोकण विभागाचे मुख्य अभियंता एस. एन. राजभोग, रायगडच्या वरिष्ठ अभियंता श्रीमती सुषमा गायकवाड, रत्नागिरीच्या वरिष्ठ अभियंता श्रीमती नाईक, रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) श्री. जाधव आदी उपस्थित होते.
कालच माध्यमांवर सर्वत्र मुंबई गोवा महामार्गाच्या काही भागाचा खड्ड्यांमुळे झालेल्या अवस्थेचा विडिओ व्हायरल झाला होता. पुढच्याच आठवडय़ात गणेशोत्सवासाठी ह्या मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात रहदारी होणार आहे. ह्या सर्व पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आल्याचे समजते.
Related कोकणात गणेशोत्सवासाठी गावी जाणार्या चाकरमान्यांचे हाल… मुंबई – गोवा महामार्गावर अक्षरशः खड्ड्यांची रांगोळी….