रत्नागिरी :खेड तालुक्याचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झाला आहे. कदम यांच्या गाडीला डम्परने जोरदार धडक दिली आहे. या धडकेत गाडीच्या मागील बाजूचा पूर्ण चेंदामेंदा झालाय. सुदैवाने यात योगेश कदम सुखरुप आहेत. ते किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र त्यांच्या चालकाला आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीसाला दुखापत झाली आहे.पोलादपूरजवळ कशेडी घाटात चोळई येथे काल (शुक्रवारी) रात्री सव्वादहाच्या सुमारास हा अपघात झाला.
आमदार योगेश कदम हे खेडकडून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूर नजीक चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिली.
यानंतर टँकर पलटी झाला आणि चालक पळून गेला आहे. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांची गाडी त्यांच्या पुढे असलेल्या पोलीस गाडीवर धडकली. यामध्ये आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाले आहे.
हा अपघात म्हणजे एक घातपात असल्याचा संशय आता आमदार कदम यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. आमदार योगेश कदम यांचे निकटवर्तीय व शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी याप्रकरणी सखोल चौकशीची मागणीही केली आहे.या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
MOPA Airport news :उत्तर गोव्यातील बहुप्रतिक्षित मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवारपासून सुरु झाले आहे. गुरुवारी हैद्राबाद-गोवा ही पहिली व्यावसायिक फ्लाईट विमानतळावर उतरली. हैद्राबादवरून 7.40 वाजता निघालेले इंडिगो कंपनीचे 6E6145 हे विमान मोपा येथील मनोहर विमानतळावर 8.40 वाजता पोहोचले. या विमानाने हैद्राबाद ते गोवा अंतर 1 तासांत पूर्ण केले. विमानातील प्रवाशांचे वाजत गाजत मोपा विमानतळावर स्वागत करण्यात आले
उत्तर गोव्यातील मोपा येथे असलेले हे विमानतळ सुरू झाल्याने केवळ गोवाच नव्हे तर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही जिल्ह्यांनाही यामुळे चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या विमानतळावरून विमान कंपनी इंडिगोने देशातील 8 शहरांसाठी उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये देशाची राजधानी दिल्लीचाही समावेश आहे. त्याबरोबरच गो फर्स्ट आणि अकसा एअर ह्या कंपन्यांनी ह्या विमानतळावरून सेवा चालू करण्याचे जाहीर केले आहे. .
इंडिगोने मोपा विमानतळावरून 168 साप्ताहिक उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही उड्डाणे हैदराबाद, दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, पुणे, जयपूर आणि अहमदाबादसाठी असणार आहेत. गुरूवारपासून ही उड्डाणे सुरू झाली.
मुंबई ते गोवा अकसा एअर विमानाचे इकॉनॉमी क्लासचे प्रवासभाडे २३९३ रुपयांपासून सुरू होत आहे. विमान कंपन्या, प्रवासाची तारखेनुसार हे भाडे कमी जास्त आहे. हे विमानतळ सिंधुदुर्ग जिल्हयाच्या जवळ असल्याने जलद आणि आणीबाणीच्या Emergency वेळेस तळकोकणात जाण्यासाठी एक सोयीचा पर्याय ह्या विमानतळाच्या रूपाने निर्माण झाला आहे.
सध्या मुंबई ते गोवा आणि परतीसाठी इंडिगो आणि गो फर्स्ट कंपनीचे प्रत्येकी एक उड्डाण ह्या विमानतळावरून होत आहे. पुढच्या आठवड्यात अकसा एअर कंपनीपण ह्या मार्गावर येथून आपली सेवा चालू करणार आहे.
सिंधुदुर्ग:आचरा येथील श्री निलेश नंदकुमार सरजोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आचरा देवराई परिसरात बुधवार दि. ४ जानेवारी रोजी श्री मारुती च्या भव्य दिव्य मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली आहे. ही भव्य मूर्ती पर्यटकांचे आकर्षण ठरेल अशी येथील ग्रामस्थांची आशा आहे.
या स्थापना सोहळ्याला आचरा गावचे प्रमुख मानकरी श्री विनीत मिराशी, श्री कपिल गुरव, श्री मुकुंद घाडी , श्री दशरथ घाडी , श्री रमेश पुजारे , श्री गावकर , श्री अरविंद सावंत , श्री आशिष सावंत यांसह श्री जगदीश तावडे, श्री पवन पराडकर आदी उपस्थित होते. सर्व मानकरी यांचा पद्धतीप्रमाणे श्रीफळ दक्षिणा देऊन सन्मान करण्यात आला.
सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री विलास मांजरेकर व श्री ओमकार मांजरेकर या पिता पुत्रांनी ही मूर्ती तयार केली. त्यांचा श्री निलेश सरजोशी आणि कुटुंबीय यांच्या हस्ते शाल , श्रीफळ, पुष्पगुच्छ , भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. . सिंधुदुर्गात प्रथमच एवढी महाकाय मूर्ती स्थापन होत असल्याचे श्री मांजरेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.. उपस्थित सर्वांना तीर्थ, प्रसाद वाटप करण्यात आला. . देवराई परिसरात येत्या काही काळातच श्री नवग्रह मंदिर बांधून पूर्ण होणार आहे. . देवराईतील औषधी वनस्पती , देव वृक्ष ,नवग्रह मंदिर आणि साथीला आजची श्रीं ची भव्य आणि दिव्य मूर्ती भविष्यात पर्यटकांना नक्कीच आकर्षण ठरेल असे उद्गार यावेळी प्रत्येकाच्या मुखातून निघत होते.
Mumbai Goa Highway News :मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर ह्या पट्ट्याच्या अर्ध्या भागाचे काम पूर्ण झाल्याचा खोटा दावा करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकार्यांना चुकीची माहिती दिल्याबद्दल उच्च न्यायालयाने चांगलेच सुनावले आहे. मागील 14 वर्षांपासून रखडलेले मुंबई गोवा महामार्गाचे चौपदीकरणाचे तसेच रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) कामाबाबत उच्च न्यायालयाने बुधवारी नाराजी व्यक्त केली.
महामार्गाचे अपुरे काम आणि त्यामुळे लोकांना ये-जा करताना त्रास होऊ नये म्हणून ह्या मार्गावरील निदान खड्डे भरून काढावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका कोकणसुपुत्र अॅड. ओवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयात केली आहे. प्रभारी मुख्य न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली.
न्यायालयात सादर केलेल्या NHAI च्या प्रतिज्ञापत्रामध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर ह्या पट्ट्याच्या अर्ध्या भागाचे पूर्ण काम झाले आहे असे लिहिले आहे. पण जनआक्रोश समितीच्या कार्यकर्त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जमा केलेल्या फोटों आणि व्हीडिओंमध्ये ह्या पट्ट्यातील खड्डे स्पष्ट दिसत होते. हा पुरावा अॅड ओवेस पेचकर यांनी न्यायालयात सादर करून NHAI आणि रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा खोटेपणा सिद्ध केला. न्यायालयाने ह्या सर्व प्रकाराबाबत फटकारले असता आपण दिनांक 25 जानेवारी 2023 पर्यंत ह्या मार्गावरील खड्डे बुजवून देवू आणि 2023 अखेपर्यंत हे महामार्गाचे संपूर्ण काम पूर्ण करू असे NHAI आणि रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्यांनी ह्यावेळी सांगितले आहे.
न्यायालयाने पुढील सुनावणी ३१ जानेवारी रोजी असेल असे जाहीर केले. तत्पूर्वी सविस्तर प्रतिज्ञा पत्र सादर करा असे आदेश NHAI दिले आहेत.
Konkan Railway News 04/01/2023 : कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. कोकणरेल्वेने दक्षिण रेल्वेच्या साहाय्याने कोंकण रेल्वेमार्गावर अहमदाबाद ते मंगुळुरु दरम्यान एक एकेरीमार्गी गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. Train No. 06072 Ahmedabad Jn – Mangaluru Jn. Special हि विशेष गाडी अहमदाबाद जंक्शन येथून शुक्रवारी दिनांक ०६ जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळी ०४:०० वाजता सुटेल ती मंगुळुरु जंक्शन येथे दुसऱ्यादिवशी संध्याकाळी १८:३० वाजता पोहोचेल.
.
मुंबई :मागील 14 वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश ध्येयपूर्ती समिती स्वाक्षरी मोहीम राबवत आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. मुंबई येथे वास्तव्यास असणाऱ्या समस्त कोकणी बांधवाना ह्या स्वाक्षरी मोहिमेत सामील होण्याचे आवाहन जनआक्रोश समितीने केले आहे.
सिंधुदुर्ग : सावंतवाडी संस्थानच्या ऐतिहासिक राजवाड्यात ५ जानेवारी ते ८ जानेवारी या कालावधीत दशावतार लोककला महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे. लोककलांना राजाश्रय देणाऱ्या पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज तसेच श्रीमंत शिवरामराजे यांचा युवराज लखमराजे सावंत-भोंसले पुढे नेत असून युवराजांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवात जिल्ह्यातील सात पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाचे नाट्यप्रयोग होणार आहेत,त्याची माहिती पुढीलप्रमाणे
दिनांक
वेळ
नाटक कंपनी
नाटकाचे नाव
गुरुवार ५
६.३० ते ८
चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ, चेंदवण
गौरी स्वयंवर
८.३० ते १०
वालावलकर दशावतार नाट्यमंडळ,ओसरगाव
वेध राहुचे ग्रहण चंद्र सूर्याची
शुक्रवार ६
६.३० ते ८
कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुर
कर्ण पिशाच्च अर्थात अर्धसत्य
८.३० ते १०
खानोलकर दशावतार नाट्य मंडळ (खानोली)
पालीचा बल्लाळेश्वर
शनिवार ७
६.३० ते ८
दत माऊली दशावतार नाट्य मंडळ, सिंधुदुर्ग
शेषात्मज गणेश
८.३० ते १०
महापुरुष दशावतार नाट्यमंडळ
प्रलंयकारी गणेश
रविवार ८
६.३० ते ८
नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळ, मोचेमाड
बहुवर्मा पुत्रप्राप्ती
त्यानंतर महोत्सवाचा समारोप होणार आहे. कोकणची लोककला म्हणून ओळख असलेल्या पारंपरिक दशावतार कलेचे जतन व्हावे ही कला वृद्धींगतद्धीं व्हाठी तसेच आजचा तरुण वर्ग या कलेकडे आकर्षित व्हावा, या उद्देशानं सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ, श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या माध्यमातून व सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री पंचम खेमराज महाविद्यालय आणि संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमराजे सावंत-भोंसभों ले यांच्या संकल्पनेतून या दशावतार लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात कलाप्रेमींनी मीं उपस्थित राहून महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री पंचम खेमराज महाविद्यालय प्राचार्य डॉ. भारमल यांनी केले
मुंबई :वर्षअखेर आणि थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी गोवा आणि कोकणात जाणार्या प्रवाशांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या MSRTC वतीने मुंबई ते पणजी दरम्यान शिवशाही बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. ह्या सेवेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि ही सेवा कायमस्वरूपी करण्याची मागणी करण्यात येत होती, त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यात येणारी ही बस सेवा कायमस्वरूपी करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
भविष्यात प्रवाशांचा प्रतिसाद पाहून ह्या गाडीच्या फेऱ्यांमध्ये पण वाढ केली जाईल असे महामंडळाने म्हंटले आहे. महामंडळाच्या ह्या निर्णयाचे कोकण वासियां कडून स्वागत करण्यात आले आहे. भविष्यात कदंबा व्हॉल्वो बस प्रमाणे शिवशाहीची व्हॉल्वो बस ह्या मार्गावर चालविण्यात यावी अशी मागणी पण होत आहे. त्याचप्रमाणे कल्याण, विरार तसेच ईतर उपनगरीय स्थानकावरून अशा बस सोडण्यात याव्यात अशीही मागणी होत आहे.
खाजगी बस मालकांच्या लूटमारीवर अंकुश लागणार.
कोकणमार्गे जाणार्या खाजगी बस मालकांकडून हंगामात अतिरिक्त प्रवासभाडे वसूल करण्यात आल्याचा अनेक तक्रारी येत असतात. शिवशाही बससेवेमुळे त्यावर आता चांगल्या प्रमाणात अंकुश लावता येणार आहे. पण त्यासाठी हंगामात शिवशाही बसेस च्या जास्त फेर्या चालवल्या गेल्या पाहिजेत. भविष्यात शिवशाही बस च्या फेर्या वाढल्या तर ही लूटमार पूर्णपणे बंद होईल अशी प्रवाशांना आशा आहे.
मुंबई – पणजी शिवशाही बसचे आपल्या स्थानकापर्यंतचे भाडे आणि अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करून त्यासंबधीत बातमी वाचा..
सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील तरुण पिढीसाठी एक खुशखबर आहे. जिल्हय़ातील तरुणांना रोजगार देण्यासाठी ‘ॲडमिशन’, ‘व्हॅरेनियम क्लाउड’ आणि ‘सिक्योर क्रेडेंशियल्स’ या कंपन्यांनी संयुक्तरित्या गुरुवार, ५ जानेवारी २०२३ रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा रोजगार मेळावा सावंतवाडीतील जिमखाना मैदान येथे दुपारी ३ ते संध्याकाळी ६ या वेळेत होईल. या रोजगार मेळाव्यात ‘आजच मुलाखत; आजच निवड’ या संकल्पनेनुसार एकाच दिवसात तब्बल ७०० हून अधिक जणांना नोकरीची संधी मिळेल. तसेच यावेळी त्वरित जॉइनिंग लेटरही देण्यात येईल.
या रोजगार मेळाव्यात पुणे, गोवा आणि कोल्हापूर येथील खालील कंपन्या सहभागी होणार आहेत.
एअरटेल, अमित इलेक्ट्रिक वर्क्स, ऑटो क्राफ्ट, भगीरथ इंटरप्राइजेस, दीप प्लम्बिंग वर्क, युरेका फोर्ब्स, होम रिवाईज एज्युकेशन, हॉटेल नीलम कंट्रीसाईड, हॉटेल स्पाइस कोकण, हॉटेल अप्पर डेक, इनफ्रीपी आयटी सर्व्हिसेस, जैतापकर ऑटोमोबाईल, मार्कसन फार्मा, माया एचआर सोल्युशन, नेक्स्ट स्टॉप टेक्नोलॉजी, वन रिअलअर सिव्हिल, पेटीएम, क्वेस कॉर्पोरेशन, साई प्लम्बिंग वर्क, साई ट्रेडर्स, सिक्योर क्रेडेंशियल्स, टेरमेरिक लाईफ स्टाइल, व्हॅरेनियम क्लाउड, उन्मेष फॅब्रिकेशन, वृषाली ऑटो केअर या पुणे, गोवा, कोल्हापूर येथील प्रमुख कंपन्या तसेच स्थानिक कंपन्या सामील झाल्या आहेत.
या मेळाव्यात बॅक ऑफिस, सॉफ्टवेअर डेव्हलपर, मेकॅनिक्स, डाटा ऑपरेटर, सेल्स एक्सिक्युटीव्ह, आयटी, एज्युकेशन, टेक्निशियन, हॉटेल सर्व्हिसेस या क्षेत्रात नोकरीच्या ससंधी उपलब्ध होतील. त्यामुळे सिंधुदुर्गातील अधिकाधिक युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
Konkan Railway News :मुंबई कन्याकुमारी नव्या गाडीच्या निमित्ताने महाराष्ट्रावर अन्यायाची रेल्वेची परंपरा कायम, महाराष्ट्रीय प्रवाशांच्या जखमेवर मीठ
गेली अनेक वर्षे कोकणवासी रेल्वेकडे मुंबई चिपळूण, मुंबई रत्नागिरी, वसई सावंतवाडी, कल्याण सावंतवाडी गाड्यांची मागणी करत आहे. परंतु रेल्वे प्रशासन प्रत्येक वेळी मुंबईतील क्षमता, कोकण रेल्वेचा एकेरी मार्ग, मार्गाचा १४०% वापर, डब्यांची उपलब्धता किंवा रेल्वे बोर्ड अशी एक ना अनेक कारणं देऊन नकारच देत असते. मुंबई विभागात नवीन गाडी सुरु करण्यासाठी क्षमताच नसल्यामुळे मुंबईहून चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडीसाठी नवीन गाडी सुरु करता येणार नाही असे उत्तर मध्य रेल्वेने कोंकण विकास समितीला हल्लीच दिले होते. परंतु त्याच मुंबई विभागाकडे कन्याकुमारी गाडी सुरु करण्याची क्षमता आहे हे विशेष.
कोकण रेल्वेच्या उभारणीत भारतीय रेल्वे ५१%, महाराष्ट्र राज्य शासन २२%, कर्नाटक राज्य शासन १५% तर गोवा आणि केरळ राज्य शासन प्रत्येकी ६% इतका आर्थिक सहभाग आहे. परंतु गाडीचे दक्षिणेकडील शेवटचे स्थानक विचारात घेतल्यास महाराष्ट्राला ३, गोवा, कर्नाटक आणि केरळला प्रत्येकी ५ ते ६ आणि तामिळनाडूला १ इतक्या सरासरी प्रतिदिन गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. यातून महाराष्ट्रातील प्रवासी कसे प्रवास करत असतील आणि कोकण रेल्वेच्या निमित्ताने महाराष्ट्राला काय मिळाले याची कल्पना येते.
सावंतवाडीच्या पुढे गोव्याला जाणाऱ्या नियमित किंवा विशेष गाड्या महाड, लांजा तालुक्यात न थांबता तर मडगावच्या पुढे जाणाऱ्या गाड्या माणगाव, महाड, संगमेश्वर, लांजा, राजापूर, वैभववाडी तालुक्यांना वगळून पुढे जातात. मंगळुरूच्या पुढे जाताना तर प्रत्येक जिल्ह्यात एकच थांबा मिळतो. एक एक टप्पा सोडून पुढे जाणाऱ्या प्रत्येक गाडीसाठी महाराष्ट्रातील थांब्यांचा बळी दिला जातो. सध्या चालणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव, मंगळुरु विशेष गाड्यांचे थांबे बघितल्यास त्याचीच प्रचिती येते.
नवीन गाड्या मिळणे दूरच आहेत त्या गाड्यांना महाराष्ट्रात वाढीव थांबे मिळणेही कठीणच आहे. प्रवाशांनी आंदोलन केल्याशिवाय कोणताही वाढीव थांबा मिळालेला नाही. सध्या जनशताब्दी, मंगला, लोकमान्य टिळक करमळी, कोचुवेली एक्सप्रेसला खेड, नेत्रावती, मत्स्यगंधाला संगमेश्वर, लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव आणि नागपूर मडगाव एक्सप्रेसला वैभववाडी, तेजस एक्सप्रेसला कणकवली, मुंबई मंगळुरु आणि नागपूर मडगाव एक्सप्रेसला सावंतवाडी थांब्यांची प्रतीक्षा आहे. त्यासाठीही मागणी, निवेदन, आंदोलनाचं सत्र सुरूच आहे.
महाराष्ट्रात गाड्यांची कमतरता असतानाही त्यावर कहर म्हणून गोव्यातून सुटून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना कोकण रेल्वेने रत्नागिरी आणि रत्नागिरीच्या उत्तरेकडे केवळ १८-२०% आरक्षण कोटा दिलेला आहे. उर्वरित ८०% जागा रत्नागिरीच्या दक्षिणेकडच्या स्थानकांनाच उपलब्ध होतात. हे वाटपही समान ठेवण्याची मागणी प्रवासी करत आहेत. परंतु त्याकडे लक्ष दिले जात नाही. पुरेशा गाड्या नाहीतच परंतु ज्या आहेत त्यात आरक्षण कोटाही देणार नाही अशी रेल्वेची भूमिका आहे.
कोरोना संकटाचा फायदा घेऊन रेल्वेने शून्य आधारित वेळापत्रक लागू करताना पॅसेंजर गाड्यांचे थांबे कमी करून एक्सप्रेसमध्ये रूपांतर केले. वक्तशीरपणा सुधारण्यासाठी मध्य रेल्वेने रत्नागिरी दादर पॅसेंजरची वाट दिव्यापर्यंतच अडवली खरी परंतु त्याचा किती फायदा झाला हा संशोधनाचा विषय ठरेल. सप्टेंबर २०२१ पासून ५०१०३ दिवा रत्नागिरी पॅसेंजर तर जानेवारी २०२२ पासून ५०१०४ रत्नागिरी दिवा पॅसेंजर वेळेत आपल्या गंतव्यस्थानी पोहोचलेल्या नाहीत. मध्य रेल्वेवर ५-१० थांबे कमी करूनही रत्नागिरी दिवा आणि सावंतवाडी दिवा गाड्यांच्या प्रवास वेळेत अपेक्षित घट झालेली नाही. रत्नागिरी दादरची रत्नागिरी दिवा केल्यावर त्याच वेळेत दादरवरून बलिया/गोरखपूर गाडी सुरू झालेली आहे. यावरून रत्नागिरी दादर दिव्याला का ठेवली याची कल्पना येते.
इतके गंभीर प्रश्न असतानाही आता नवीन मुंबई कन्याकुमारी गाडी चालवण्यात येत आहे. तिला सुपरफास्ट म्हटले आहे परंतु थांबे पाहिल्यास ती केवळ कोकण रेल्वेवरच सुपरफास्ट असल्याचे दिसते. महाराष्ट्रातील दोन थांब्यांमधील सरासरी अंतर ५५ किलोमीटर तर कोकण रेल्वेच्या बाहेर सरासरी ४० किलोमीटरवर थांबे आहेत. रोहा ते चिपळूण १२८ किलोमीटर आणि रत्नागिरी ते कणकवली १११ किलोमीटरमध्ये एकही थांबा नाही. खेडसारख्या महत्वाच्या स्थानकावर सध्या धावणाऱ्या गाड्यांना थांबे देण्याची मागणी असताना या नव्या गाडीलाही खेड येथे थांबा दिलेला नाही. रविवारी रत्नागिरी किंवा चिपळूणमधून मुंबईकडे जाणाऱ्या नवीन गाडीची नितांत गरज असताना त्याच दिवशी ही कन्याकुमारी गाडी परत येणार आहे. म्हणजे पुन्हा स्थानिक प्रवाशांच्या पदरी निराशाच आहे कारण गाडी असली तरी तिला पुरेसा कोटा मिळणार नाही, तिला महाराष्ट्रात मोजके तीन चार थांबे आहेत आणि इतक्या लांबून येणाऱ्या गाडीत चढायला मिळणे अशक्यप्राय गोष्ट असेल.
पूर्वी मुंबई कन्याकुमारी दरम्यान चालणारी जयंती जनता एक्सप्रेस पुणे ते मुंबई दरम्यान प्रवासी नसल्याचे कारण देऊन पुण्याला शॉर्ट टर्मिनेट केली गेली आणि आता नवीन मुंबई कन्याकुमारी गाडी देण्यात येत आहे. मग आधी सुरु असलेली गाडी पुण्याला नेलीच कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतो. यातून नेमकं काय साध्य झालं? त्याहीपेक्षा महाराष्ट्रात गाड्या सुरु करताना क्षमता नाही परंतु इतर राज्यात गाड्या सहज सुरु होऊ शकतात हा महाराष्ट्रातील नागरिकांना डिवचण्याचा प्रकार आहे.
तरी, कोकण रेल्वे, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने इतर राज्यातील प्रवाशांची सोय करण्याआधी स्वतःच्या हद्दीतील विभागातील प्रवाशांचा उद्रेक होण्याआधी त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात. कारण, ते तुमचंच उत्तरदायित्व आहे. महाराष्ट्रातील स्थानिक प्रवासी आपल्या मागण्या घेऊन दक्षिण रेल्वेकडे जाऊ शकत नाहीत. मध्य रेल्वे, कोकण रेल्वे, पश्चिम रेल्वेचे मुख्यालय महाराष्ट्रात असूनही आम्हाला किमान सोयींसाठी संघर्ष करावा लागतो हे आमचं दुर्दैव. आता महाराष्ट्रातील नागरिकांनीच एकत्र येऊन याचा विरोध करावा.