Category Archives: कोकण




Ratnagiri: रत्नागिरीतील एका शेताच्या जवळील जंगलात एका मादी बिबट्याने एका पांढर्या रंगाच्या पिल्लाला जन्म दिल्याची अजब घटना घडली आहे. मात्र या पिल्ला सोबत जन्म घेतलेली ईतर पिल्ले मात्र सामान्य रंगाची आहेत.
“चार दिवसांपूर्वी, शेताच्या मालकाने आम्हाला एका पांढऱ्या रंगाच्या बिबट्याच्या पिल्लाबद्दल माहिती दिली, जी दुर्मिळ आहे. मात्र मादी बिबट्याची ईतर पिल्ले सामान्य रंगांची आहेत.” या पिल्लाची आई शेतात पिल्लांसह आहे, परंतु ती तिच्या सध्याच्या ठिकाणी किती काळ राहील हे आम्हाला माहित नाही. अल्बिनिझम किंवा ल्युसिझम – दोन्ही अनुवांशिक स्थितींमुळे – हे पिल्लू पांढरे जन्माला आले आहे की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही.असे रत्नागिरीच्या विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई म्हणाल्यात. वन्यजीव प्रेमी आणि जनतेला शेतात येण्यापासून रोखण्यासाठी देसाई यांनी स्थान उघड केले नाही.
“त्वचा, केस आणि डोळ्यांना रंग देणारे रंगद्रव्य मेलेनिनच्या पूर्ण अनुपस्थितीमुळे अल्बिनिझम होतो. जास्त मेलेनिनमुळे त्वचा गडद आणि काळी होते. ब्लॅक पेंथरचे मूळ हेच आहे. या स्थितीला मेलेनिझम म्हणतात. तर मेलेनिनच नव्हे तर सर्व रंगद्रव्ये कमी झाल्यामुळे किंवा आंशिकपणे नष्ट झाल्यामुळे ल्युसिझम होतो आणि त्यामुळे प्राण्याचा रंग फिकट असू शकतो.” असे महाराष्ट्राचे माजी मुख्य वन्यजीव वॉर्डन सुनील लिमये याबद्दल अधिक माहिती देताना म्हणालेत.




Konkan Railway: संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकातील २०२३-२०२४ चे वार्षिक उत्पन्न हे ५ कोटी ३७ लाख ९७ हजार ७८७ रुपये एवढे होते. १ एप्रिल २०२४- मार्च २०२५ यावर्षीचे उत्पन्न ५ कोटी ८५ लाख १३ हजार ६४६ रुपयांची विक्रमी वाढ झाली. या स्थानकावरून प्रवास करणार्या दररोजच्या प्रवाशांची संख्येत वाढ होत असताना प्रशासनाकडून प्रवाशांच्या सुविधेकडे जाणून बुजून पाठ फिरवली जात असल्याचा आरोप येथील प्रवाशांकडून होत आहे.
संगमेश्वर रेल्वे स्थानकातून काही अंतरावर कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक आहे. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या छावा या हिंदी चित्रपटाने हे स्मारकस्थळ बहुचर्चित झाले आहे. पर्यटकांची झुंबड संगमेश्वर येथे दाखल होते.त्यात रेल्वेचा प्रवास केलेले पर्यटक पुन्हा रेल्वे प्रवास नको! असा नाराजीचा सूर आळवितात.
कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक होणार यासाठी निधी पुरवला जाणार! पर्यटनाला वाव मिळणार! गोवा,केरळ याच धर्तीवर आपल्या संगमेश्वराकडेही पर्यटकआकर्षित होणार! हे खरे असले तरी आताचा कोकण रेल्वेचा प्रवास हा खच्चून भरलेल्या कोंबड्या बकऱ्यांसारखा करावा लागतो आहे. मग या स्थानकांवर मडगाव , जामनगर, पोरबंदर या तीन एक्स्प्रेसला थांबा देऊन हा प्रवाशी भार नक्कीच हलका करता येईल.
गेल्या दिड वर्षात सतत पाठपुरावा करणारी निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुकवरही संघटना, कायम कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्डाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न करत असते. गतवर्षीचे आणि यावर्षीचे वार्षिक उत्पन्न दाखवून ही डोळेझाक का? असा प्रश्न विचारला जातो आहे.
हाच विचार ध्यानात ठेऊन स्थानिक लोकप्रतिनिधींनी, जनसामान्यांनी संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात राजधानी एक्सप्रेस अडवून निषेध नोंदविण्याचा विचार केला. तसे निवेदन कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्डाला दिले. त्या पत्राचीही म्हणावी तशी दखल घेतली नाही.
आमदार शेखर निकम, खासदार नारायण राणे यांच्यासज्ञ काही राजकीय नेत्यांनी आपापली पत्रे कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्डाला दिली. पण अद्याप सुस्त यंत्रणा वेग धरीत नाही.
संगमेश्वर तालुक्यातील जनसामान्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका! केवळ राजकीय पोळी, श्रेय लाटण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांची पोकळ अस्मिता दाखवू नका. खरोखरच संगमेश्वर तालुक्यात जगविख्यात स्मारक उभारायचे असेल तर या मातीचे ऐतिहासिक महत्व ध्यानात घ्यावे. केरळ, गोवा, या राज्यांतील पर्यटनाला गतिमान करण्याच्या नादात संगमेश्वरच्या ऐतिहासिक महत्त्वाला कमी लेखू नका!
-रुपेश मनोहर कदम/सायले




सावंतवाडी: निसर्गरम्य कोकणातील सावंतवाडी शहर हे नेहमीच पर्यटनासाठी ओळखले जाते, येथील गंजिफा, लाकडी खेळणी ही देशातच नाही तर विदेशात ही प्रसिद्ध आहेत. या शहराच्या जवळच असणारे शिरोडा बीच, आंबोली हिलस्टेशन, वेंगुर्ला बंदर ई. तसेच धार्मिक स्थळे ही देशभरात प्रसिद्ध आहेत, म्हणूनच संस्थानकालीन वारसा असणाऱ्या या ऐतिहासिक शहराला कोकण रेल्वे जोडली गेल्याने या शहराची ओळख ही संपूर्ण देशात पसरली.
तळकोकण म्हणजे कोकणातील दक्षिणेकडील भाग त्यात प्रामुख्याने दोडामार्ग, वेंगुर्ला, सावंतवाडी हे प्रमुख तालुके गणले जातात. या भागात रेल्वेने जायचे असल्यास सावंतवाडी रेल्वे स्थानक हे या भागातील प्रमुख स्थानक, जे सावंतवाडी शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर आहे. या स्थानकात २०१५ साली तत्कालीन रेल्वे मंत्री श्री सुरेशजी प्रभू, मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, आमदार श्री दीपकभाई केसरकरजी आदींचा उपस्थितीत रेल्वे टर्मिनस होण्याकरिता भूमिपूजन करण्यात आले. परंतु आजतागायत टर्मिनस प्रती असणारी राजकीय इच्छाशक्ती आणि कोकण रेल्वे महामंडळाची सावंतवाडी प्रति असणारी सापत्निक वागणूक ही परिपूर्ण टर्मिनस न होण्यामागची कारणे असावीत असे सध्याच्या परिस्थिती नुसार दिसत आहे. परंतु असे असताना प्रवासी वर्ग मात्र या स्थानकातून रेल्वे महामंडळाला कोटींच्या घरात उत्पन्न मिळवून देत आहे असे माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झाले आहे.
गेल्यावर्षी म्हणजेच आर्थिक वर्ष २०२३ – २४ मध्ये सावंतवाडी स्थानकाचे वार्षिक उत्पन्न हे १४ कोटी ६८ लाख एवढे होते, आणि या स्थानकातील एकूण प्रवासी संख्या ही ७ लाख ७९ हजार इतकी होती, याचा अर्थ असा की प्रतिदिन सरासरी २१३४ प्रवाशांनी या स्थानकाचा वापर आपल्या प्रवासासाठी केला. यावर्षी म्हणजेच आर्थिक वर्ष २०२४ – २५ मध्ये सावंतवाडी स्थानकाचे उत्पन्न हे १६ कोटी १६ लाख एवढे आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत उत्पन्नात वाढ ही १०.९२ टक्के एवढी आहे. या आर्थिक वर्षी या स्थानकाचा वापर एकूण ७ लाख ९९ हजार ७२७ म्हणजेच जेमतेम ८ लाख प्रवाशांनी केला. मागच्या वर्षीचा तुलनेत ही वाढ ४.५७ टक्के एवढी आहे. एकूण सरासरी प्रवासी संख्या ही प्रतिदिन ५७ ने वाढून २१९१ एवढी झाली आहे.
वरील माहितीद्वारे एवढे नक्की आहे की सावंतवाडी रोड रेल्वे स्थानक हे उत्पन्नाचा बाबतीत सरस आहे. असे असून देखील कोकण रेल्वे महामंडळ या ठिकाणी प्रवाश्यांना हव्या त्या सुविधा देण्यास टाळाटाळ का करत आहे असा प्रश्न येथील प्रवाशांना नक्की पडत आहे,
म्हणूनच कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी या प्रवासी संघटनेने गेल्या वर्षभरात अनेक आंदोलने केली, भेटी गाठी घेतल्या, पाठपुरावा केला त्याचे फलित म्हणून या स्थानकात वांद्रे – मडगाव द्विसाप्ताहिक एक्सप्रेस चा थांबा आणि नागपूर – मडगाव एक्सप्रेस चा थांबा पूर्ववत केला गेला, याठिकाणी पीआरएस सुविधा पूर्णवेळ करून घेतली. टर्मिनस करिता लागणारा अप्रोच रोड आता पूर्ण रूप घेत आहे. वर्षभरात येथील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून एवढी कामे मंजूर करून घेतल्यानंतर देखील संघटनेने कोकण रेल्वेच्या १७ मार्च २०२५ च्या बैठकीत सावंतवाडी स्थानकात लिफ्ट, प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर १७० मीटर लांबीची निवारा शेड, एक्झिक्युटिव लाँन्ज आणि प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्म वर डिजिटल इंडिकेटर बसवण्यासाठी परिपूर्ण चर्चा केली गेली आणि ही कामे त्याच दिवशी रेल्वे अधिकाऱ्यांनी मंजूर केली गेली. काही कामांचे टेंडर देखील निघाले आहे.
नवीन थांबे नाहीच..
सावंतवाडी स्थानकातून कोरोना काळात काढून घेण्यात आलेले राजधानी एक्सप्रेस आणि गरीबरथ एक्सप्रेसचे थांबे अजून पूर्वरत न होणे हे या ठिकाणच्या प्रवाशांवर अन्याय नाही का असा सवाल उपस्थित होतोय. कोकण रेल्वेच्या १२ जुलै च्या पत्रानुसार या ठिकाणी काही गाड्यांचे थांबे हे कोकण रेल्वेने सावंतवाडी स्थानकासाठी मंजूर केले होते आणि तसा प्रस्ताव केंद्रातील रेल्वे बोर्डाकडे पाठवला देखील होता, परंतु रेल्वे बोर्डाने तो प्रस्ताव लालफितीत का गुंडाळला हे कोडे अजून ही सुटत नाही. कोकण रेल्वे मार्गावर इतर ठिकाणी थांबे मिळत असताना सावंतवाडी स्थानक मात्र उपेक्षितच राहिले. परंतु वरील उत्पन्न आणि प्रवासी संख्या पाहता आतातरी कोकण रेल्वे महामंडळ आणि रेल्वे बोर्ड सावंतवाडीला न्याय देईल का अशी भाबडी आशा येथील जनतेत निर्माण झालीय.
– सागर तळवडेकर
उपाध्यक्ष – कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी.




Konkan Railway: सद्यस्थितीत सण-उत्सव किंवा सुट्ट्यांदरम्यान चालविण्यात येणाऱ्या विशेष गाड्या प्रामुख्याने गोवा व सिंधुदुर्ग भागासाठी सोडल्या आहेत. त्यामुळे रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, महाड, माणगाव, रोहा, पेण व अन्य स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जागा मिळवणे अत्यंत कठीण होते, कारण या गाड्या आधीच भरलेल्या असतात. अनेकदा आरक्षण असणाऱ्या प्रवाशांनाही गाडीत चढता येत नाही. मोठ्या कष्टाने चढायला मिळालेच तर आपल्या जागेपर्यंत पोहोचता येत नाही. यामुळे अबालवृद्धांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. तिकीट तपासनीस, रेल्वे सुरक्षा बल यांचीही मदत वेळेवर मिळत नाही. कोकण रेल्वे व मध्य रेल्वेच्या हद्दीच्या वादात बऱ्याचदा चिपळूण/खेडला तक्रार केली तरी थेट पनवेलला तिकीट तपासनीस व पोलीस येतात. तोपर्यंत अर्धे प्रवासी उतरलेले असतात. त्यामुळे खेड, महाड, माणगाव येथील प्रवाशांमध्ये आरक्षण करूनही काही उपयोग होत नाही अशी भावना वाढीस लागली आहे.
रेल्वे प्रशासनातर्फे चिपळूण गाडी सोडताना पनवेलहून सोडली जाते. परंतु, मुंबईतील लालबाग, गिरगाव, परळ, माहीम, वरळी, अंधेरी, सांताक्रूझ, बोरिवली तर पुढे घाटकोपर, भांडुप, ठाणे, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, विरार, वसई, नालासोपारा येथील प्रवाशांना पनवेल स्थानक अजिबात सोयीचे नाही. तसेच, लहान मुले, वृद्ध नागरिक यांना आणि बरेचसे सामान सोबत घेऊन दोन-तीन गाड्या बदलत प्रवास करण्यास सांगणे म्हणजे एकप्रकारची क्रूरता आहे असे आम्ही मानतो. म्हणूनच, खेड/चिपळूण सारख्या मुंबईपासून तुलनेने कमी अंतरावर असणाऱ्या स्थानकांवर जाणाऱ्या गाडीला दादर आणि ठाणे हे थांबे आवश्यकच आहेत. मुंबईपासून कमाल २०० किलोमीटरच्या प्रवासासाठी ६० किलोमीटरवर पनवेलला गाडी बदलण्यास प्रवासी उत्सुक नसतात. तसेच परंपरेनुसार या पनवेल चिपळूण गाडीला एकही आरक्षित डबा नसल्यामुळे वेळेत प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांना गाडीत जागा मिळण्याबाबत अनिश्चितता असते.
याकरिता, खालील स्थानकांवर थांबा असलेली आणि चिपळूणपर्यंत धावणारी विशेष गाडी सुरू करण्याची विनंती कोकण विकास समिती तर्फे संस्थापक अध्यक्ष जयवंत शंकरराव दरेकर यांनी ईमेलद्वारे रेल्वे प्रशासनाला केली आहे.
या गाडीसाठी सुचविलेला मार्ग आणि थांबे:
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/ दादर – ठाणे – पनवेल – पेण – नागोठणे – रोहा – कोलाड – इंदापूर – माणगाव – गोरेगाव रोड – वीर – सापे वामने – करंजाडी – विन्हेरे – दिवाणखवटी – कळंबणी बुद्रुक – खेड – अंजनी – चिपळूण
सुचविलेले वेळापत्रक:
प्रस्थान: पहाटे ४:५० किंवा सकाळी ७:५०/८ वाजता मुंबईहून
परतीचा प्रवास: दुपारी चिपळूणहून
डब्यांची रचना:
सामान्य द्वितीय श्रेणी (अनारक्षित)
द्वितीय श्रेणी आरक्षित (सिटिंग)वा
तानुकूलित चेअर कार (AC Chair Car)
ही गाडी विशेषतः खालील प्रवाशांसाठी उपयुक्त ठरेल:
रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातून मुंबईकडे येणारे विद्यार्थी, नोकरदार व पर्यटक
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आपल्या गावी जाणारे व परत येणारे नागरिक




सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चीपी विमानतळा बाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कोकणातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या चिपी विमानतळाच्या विकासास आता गती मिळण्याची शक्यता आहे. पुढील चार महिन्यांत चिपी विमानतळावर नाइट लँडिंगसाठी परवानगी मिळणार असून, या विमानतळावरून मुंबई सेवाही अखंडित सुरू ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत.
नुकतीच मंत्रालयात चिपी विमानतळासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत, विमानतळ विकासासाठी आवश्यक उपाययोजना आणि सुविधांच्या उभारणीबाबत सखोल चर्चा करण्यात आली. विमानतळाच्या सुशोभीकरणासाठी DPDC (District Planning and Development Council) मार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, “मुंबई ते चिपी दरम्यानची सेवा कुठल्याही परिस्थितीत खंडित होता कामा नये. विमानतळाच्या सर्व सुविधा तातडीने पूर्ण कराव्यात. खास करून रात्री लँडिंगला अनुमती मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया वेगाने राबवावी”
चिपी विमानतळासंदर्भात लवकरच विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेणार
तसेच, विमानसेवा अधिक सुलभ आणि नियमित करण्यासाठी नवीन मार्ग आणि कंपन्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्नही लवकरच होणार आहे. या अनुषंगाने विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांची लवकरच भेट घेण्यात येणार असल्याची माहितीही राणे यांनी यावेळी दिली.