Konkan Railway: सणासुदींदरम्यान होणारी गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर एक ‘वन वे स्पेशल’ गाडी चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. येत्या शुक्रवारी ही ‘वन वे स्पेशल’ गाडी मडगाव ते मुंबई सीएसएमटी दरम्यान चालविण्यात येणार आहे. या गाडीची अधिक माहिती खालीलप्रमाणे, गाडी क्र. ०२०५२ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी विशेष
ही गाडी शुक्रवार दिनांक ०१/११/२०२४ रोजी मडगाव जंक्शन येथून सकाळी ०८.०० वाजता सुटेल.ती त्याच दिवशी संध्याकाळी १९.२० वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहचेल. या गाडीचे थांबे: थिवि, सावंतवाडी, कुडाळ, रत्नागिरी, चिपळूण,रोहा आणि ठाणे डब्यांची रचना: एकूण १६ एलएचबी कोच = विस्टा डोम – ०१, एसी चेअर कार – ०३, सेकंड सीटिंग -१०, एसलआर- ०१, जनरेटर कार -०१
रायगड: अलीकडेच भारत सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला आहे. मात्र याच भाषेचा चक्क महाराष्ट्रातच अपमान होण्याचे प्रकार घडताना दिसत आहेत. सार्वजनिक ठिकाणी मराठी भाषा चुकीच्या पद्धतीने वापरून तिची ‘हत्या’ करण्याचे प्रकार होताना दिसत आहेत. असाच एक प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदाराकडून माणगाव रेल्वे स्थानकावर घडल्याचा प्रकार समोर आला आहे.
महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम कोकण रेल्वे मार्गावरील महत्वाच्या स्थानकांचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरु आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव रेल्वे स्थानकावरही हे काम चालू आहे. मात्र या सुशोभीकरणादरम्यान या ठिकाणी वापरण्यात आलेल्या मराठी भाषेमध्ये कंत्राटदाराकडून काही अक्षम्य अशा चुका झाल्या आहेत. “स्वर्ग कोकणाचा मातीवर”, “कोकणाचा निसर्गात वंदे भारत” अशी चुकीची वाक्ये इथे वापरण्यात आली आहेत. तर येथे लावण्यात एका फलकावर काही स्थानकांची नावे मराठीत लिहिण्यात चुका झाल्या आहेत. जसे कि कुडाळच्या जागी “कुंडल”, माणगाव च्या जागी “मांणगाव” इत्यादी
रेल्वे अभ्यासक अक्षय म्हापदी यांनी X च्या माध्यमातून या चुका प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्या असून त्या लवकरात लवकर सुधारण्यात याव्यात अशी मागणी केली आहे.
सिंधुदुर्ग : चिपी-मुंबई विमानसेवा २६ ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. चिपी-मुंबई विमानसेवा तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सुरू करण्यात आली होती. मात्र त्याची मुदत येत्या २६ ऑक्टोबर रोजी संपणार असल्याने हवाई प्रवासाची तिकीट विक्री २६ तारखेपासून बंद होणार आहे.
ही विमानसेवा तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सुरू करण्यात आली होती. त्याची मुदत येत्या 26 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. एअर इंडियाच्या अलायन्स एअर या उपकंपनीमार्फत सिंधुदुर्ग ते मुंबई आणि मुंबई ते सिंधुदुर्ग मार्गावर विमानसेवा सुरू होती. मात्र, आता चिपी-मुंबई विमानसेवा बंद होत आहे. त्यामुळे ऐन दिवाळी आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसणार आहे.
दरम्यान, चिपी-मुंबई या विमानसेवेला प्रवासी वर्गाचा सकारात्मक प्रतिसाद होता. मात्र आता ऐन निवडणुकीच्या काळात ही विमानसेवा बंद होत आहे. सामान्य जनता या विमान सेवेच्या लाभापासून वंचित राहणार असल्यामुळे अनेक नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Konkan Railway: कोकणात गावी जाण्यासाठी दिवा-सावंतवाडी-दिवा या गाडीला पसंदी देणार्या कोकणकरांसाठी या गाडीच्या वेळापत्रका संदर्भात एक बातमी रेल्वे प्रशासनाकडून आली आहे. या गाडीच्या दरवर्षीच्या बिगर पावसाळी Non Mansoon वेळापत्रकात काहीसा बदल करण्यात आला आहे. या गाडीच्या काही स्थानकांवरील आगमनाच्या आणि निर्गमनाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
नविन बदल खालील प्रमाणे
गाडी क्रमांक १०१०५ – दिवा सावंतवाडी एक्सप्रेस
स्थानकाचे नाव
पूर्वीची वेळ
सुधारित वेळ
RATNAGIRI
14:25
14:05
NIVASAR
14:50
14:26
ADAVALI
15:01
14:41
VERAVALI (H)
15:12
14:52
VILAVADE
15:23
15:08
SAUNDAL
15:33
15:19
गाडी क्रमांक १०१०६ – सावंतवाडी दिवा एक्सप्रेस
स्थानकाचे नाव
पूर्वीची वेळ
सुधारित वेळ
ACHIRNE
9:43
9:41
VAIBHAVWADI RD
9:54
9:53
KHAREPATAN ROAD
10:05
10:02
RAJAPUR ROAD
10:16
10:12
SAUNDAL
10:26
10:21
VILAVADE
10:39
10:31
VERAVALI (H)
10:47
10:45
SANGMESHWAR
13:00
13:01
ARAVALI ROAD
13:12
13:13
SAVARDA
13:24
13:25
KHED
14:10
14:11
VINHERE
14:34
14:35
वरील दिलेल्या स्थानकां व्यतिरिक्त या गाडीच्या ईतर स्थानकांवरील वेळापत्रकात कोणताही बदल केला गेला नाही आहे.
दापोली: दि.बुध्दिस्ट सोसायटी ऑफ् इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रत्नागिरी व तालुका शाखा दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाई राष्ट्रीय स्मारक वणंद दापोली येथे रविवार दि.२७.१०.२०२४ ते मंगळवार दि.०५.११.२०२४ पर्यंत बौद्धाचार्य,श्रामणेर शिबीर आयु.विजय जाधव जिल्हा उपाध्यक्ष संस्कार विभाग यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात ४० प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग नोंदविला आहे.
भिक्षू संघाचे संघनायक पुज्य भन्ते बोधी रत्न यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर संपन्न होईल.शिबीराचे उद्घाटन आद.अनंत सावंत जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरी यांच्या हस्ते होईल.प्रमुख मार्गदर्शक आयु.एन.बी.कदम जिल्हा महासचिव,आयु.प्रदिप जाधव जिल्हा कोषाध्यक्ष हे असतील.
शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून आद.अनंत सावंत वरिष्ठ केंद्रीय शिक्षक आद.एन.बी.कदम केंद्रीय शिक्षक आदी.विजय जाधव केंद्रीय शिक्षक आद.विकास पवार केंद्रीय शिक्षक आद.अल्पेश सकपाळ केंद्रीय शिक्षक आद.संजय कांबळे केंद्रीय शिक्षक हे मार्गदर्शन करतील.या
कार्यक्रमाला विशेष उपस्थिती जिल्हा पदाधिकारी आयु.आयु.विजय कांबळे, आयु.जनार्दन मोहिते,आयु.शरणपाल कदम,आयु.सुनिल पवार,आयु.सुनिल धोत्रे, आयु.संदिप धोत्रे,आयु.महेंद्र झकदम.आयु.तानाजी कांबळे, तालुका पदाधिकारी आयु.अनिल घाडगे अध्यक्ष दापोली,आयु.राहूल मोहिते अध्यक्ष संगमेश्वर, आयु.विजय मोहिते अध्यक्ष रत्नागिरी, आयु.आर.बी.कांबळे अध्यक्ष लांजा, आयु.सत्यवान जाधव अध्यक्ष राजापूर,आयु.जयरत्न कदम अध्यक्ष चिपळूण,आयु.विद्याधर कदम अध्यक्ष गुहागर, आयु.अ.के मोरे अध्यक्ष खेड, आयु.हर्षद जाधव अध्यक्ष मंडणगड आयु.दिपक धोत्रे अध्यक्ष वणंद ग्राम शाखा हे उपस्थित राहणार आहेत.
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर सुरवातीपासून धावणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस येत्या फेब्रुवारीपासून एलएचबी कोचसहित धावणार असल्याची माहिती दक्षिण रेल्वेने प्रसिद्ध केली आहे. अलीकडेच या गाडीच्या छताचा भाग कोसळल्याची धक्कादायक घटना घडली होती त्यामुळे या गाडीचे जुने डबे बदलून नवीन स्वरूपाचे एलएचबी कोच जोडण्यात यावेत अशी मागणी प्रवासी संघटनेनंकडून होत होती.
दक्षिण रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक १२६२०/१२६१९ मंगुळुरु – एलटीटी – मंगुळुरु मत्स्यगंधा एक्सप्रेस दिनांक १७ फेब्रुवारीपासून एलएचबी कोचसहित धावणार आहे.
डब्यांच्या संरचनेत बदल
ही गाडी सध्या २३ आयआरएस कोच सहित धावत असून सुधारित डब्यांच्या संरचनेनुसार २२ एलएचबी डब्यांसह चालविण्यात येणार आहे.
सध्याची संरचना – एसी टू टियर – ०२, एसी थ्री टियर – ०४, सलीपर – ११, जनरल – ०४, एसएलआर – ०२ असे मिळून एकूण २३ आयआरएस डबे
सुधारित संरचना – एसी टू टियर – ०२, एसी थ्री टियर – ०४, एसी थ्री टियर इकॉनॉमी – ०२, सलीपर – ०८, जनरल – ०४, दिव्यांगनासाठी – ०१, ब्रेकव्हॅन – ०१ असे मिळून एकूण २२ एलएचबी डबे
सुधारित संरचनेत या गाडीच्या जनरल डब्यांत कपात करण्यात आली असून त्यांची संख्या ११ वरुन ८ वर आणण्यात आली आहे. तर एसी थ्री टियर इकॉनॉमीचे २ जोडण्यात येणार आहेत.
देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील प्रवासी, पर्यटक आणि व्यापाऱ्यांसाठी मे १९९८ रोजी मत्स्यगंधा एक्स्प्रेस सुरू करण्यात आली होती. मात्र गेल्या २६ वर्षांत या रेल्वेगाडीत कोणतेही बदल करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे या रेल्वेगाडीचे डबे खराब झाले असून, मोडकळीस आले होते. गेल्या पाच वर्षांपासून प्रवासी संघटनाकडून या रेल्वेगाडीला लिंके हॉफमन बुश (एलएचबी) डबे जोडण्याची मागणी रेल्वे मंत्रालय, रेल्वे मंडळ आणि दक्षिण रेल्वेकडे करण्यात येत होती. तर, जुलै २०२४ रोजी उडुपी – चिकमंगलुरू येथील खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी रेल्वेमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान मत्स्यगंधा एक्स्प्रेससाठी एलएचबी डबे जोडण्याची मागणीही केली होती. अलीकडेच या गाडीच्या छताचा काही भाग कोसळल्याचा विडिओ एका प्रवाशाने X या समाज माध्यमावर पोस्ट केला होता.
सिंधुदुर्ग: समाज माध्यमांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास आपला संदेश संबंधित यंत्रणेकडे पोहोचवून इच्छित परिणाम साधता येतो. कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसताना केवळ फेसबुकच्या माध्यमातून जनजागरण करून संगमेश्वर या रेल्वे स्थानकावर गाडयांना थांबे मिळवून देऊन पत्रकार संदेश जिमन यांनी ही गोष्ट दाखवून दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी स्थानकावरील प्रश्नांसाठी सुद्धा ओंकार लाड या नावाच्या तरुणाने नेहमीच आवाज उठवला आहे. सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करून त्याने या स्थानकावरील गैरसोयींवर यंत्रणेचे लक्ष वेधले आहे. वैभववाडी स्थानकावर पुरेशी प्रवासी संख्या असताना सुद्धा पादचारी नाही होता. याकडे ओंकार ने वेळोवेळी X च्या माध्यमातून इथे पादचारी पूल व्हावा अशी मागणी केली होती. त्याचा या प्रयत्नाला अखेर यश आले असून येथे एक पादचारी मंजूर करण्यात आला असून कालच आमदार नितेश राणे यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
मूळ गाव वैभववाडी-नापणे असलेला ओंकार सध्या मुंबईमध्ये आपले एमबीएचे शिक्षण पूर्ण करत आहे. तसेच शिक्षण पूर्ण करता करता तो नामांकित बिग ४ मध्ये नोकरी सुद्धा करत आहे. मुंबईमध्ये सध्या तो आई बाबा समवेत वास्तव्यास आहे. कोकण रेल्वे असो व मुंबई लोकल, ज्या ज्या गोष्टी त्याला खटकतात त्या त्या गोष्टी तो X च्या माध्यमातून शासनासमोर आणि जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करतो. वैभववाडी रेल्वे स्थानकावर पादचारी पूल नसल्याने प्रवाशांना प्लॅटफॉर्म वरून खाली उतरून रूळ ओलांडावे लागत आहे. यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींचे खूप हाल होतात. पुरेशी प्रवासी संख्या असूनही प्रशासन इथे साधा एक पादचारी पूल का बांधत नाही हा प्रश्न त्याने उठवायला सुरवात केली. येथील आमदार नितेश राणे यांच्या x वरील पोस्ट वर कंमेंट करून किंवा संबंधित यंत्रणेला टॅग करून त्याने जनजागरण केले. अखेर त्याचा प्रयत्नांना यश आले असून येथे एक पादचारी पूल मंजूर झाला आहे.
वैभववाडी स्थानकावर या पुलाव्यतिरिक्त अजून कित्येक प्रश्न आहेत. या स्थानकावर अजून गाडयांना थांबा मिळणे आवश्यक आहे. तसेच येथे PRS तिकीट बुकिंग सुविधा सुरु करणे आवश्यक आहे. या गोष्टींसाठी मी माझे प्रयत्न नेहमीच चालू ठेवीन असे ओंकार आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाला
Special Appreciation Post 🙌🏻🎉@NiteshNRane – We are really grateful and thankful for this gesture😊 It wouldn’t have been possible without your efforts! Humble thanks for whatever you have done & doing. Looking forward to PRS counter and halt to Netravati Exp!
सिंधुदुर्ग: सावंतवाडीकरांसाठी एक अभिमान वाटेल अशी बातमी समोर आली आहे. सावंतवाडी तालुक्यातील कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभाग व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोलगाव सावंतवाडीस, ज्येष्ठ समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, सिंधुदुर्गातील कामगार चळवळीचे प्रणेते माजी आमदार स्वर्गीय जयानंद शिवराम मठकर यांचे नाव देण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील 108 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नावात बदल करून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती तसेच समाजसुधारकांची नावे देण्याचा शासन निर्णय जाहीर केला असून माजी आमदार ज्येष्ठ पत्रकार जयानंद मठकर यांनी कोकण रेल्वेसाठी लढा दिला. कोकणातील सामाजिक आणि विकासात्मक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. त्यांचे नाव आज सावंतवाडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस दिल्याने ही समस्त सावंतवाडीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
मठकर यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९२९ रोजी मुंबईत झाला. त्यांचे शिक्षणही मुंबईत झाले. मालवणच्या टोपीवाला स्मारक शाळेतही ते काही काळ शिक्षणासाठी होते. त्यांनी १९४२ मध्ये समाजवादी पक्षाच्या विचाराने प्रभावित होऊन सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उडी घेतली.
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कामगार आणि गरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी वेचले. त्यासाठी आंदोलने, संघर्ष केले. ज्येष्ठ समाजवादी नेते बॅ. नाथ पै, मधु दंडवते, ना. ग. गोरे, मृणाल गोरे, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या ज्येष्ठ समाजवादी नेत्यांच्या बरोबर त्यांनी काम केले.
मठकर यांनी राजकीय, सामाजिक, ग्रंथालय, सहकार, कामगार, पत्रकारिता, साहित्य अशा विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला. कामगार आणि ग्रंथालय चळवळीत विशेष कार्य केले. पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, वनखात्यातील रोजंदारी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले.
कामगार क्षेत्राबरोबरच तयांनी ग्रंथालय चळवळीसाठीही कार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनातून जिल्ह्यात अनेक ग्रंथालये उभी राहिली. गोवामुक्ती संग्रामातही त्यांचा सक्रीय सहभाग होता. तेरेखोल किल्ल्यावर पाठवण्यात आलेल्या सत्याग्रहींच्या एका तुकडीचे नेतृत्वही त्यांनी केले होते.
पत्रकारितेतील त्यांचे योगदानही मोठे होते. १९५३ पासून ते १९७४ पर्यंत त्यांनी नवशक्ती, लोकमान्य, केसरी आदी वृत्तपत्रांत वार्ताहर म्हणून काम केले होते.
Konkan Railway: कोकण रेल्वेमध्ये मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनेसाठी झालेल्या निवडणुकीत नॅशनल रेल्वे मजदुर युनियनने NRMU पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ३४२ मतांनी त्यांचा विजय झाला. नॅशनल रेल्वे मजदुर युनियन व कोकण रेल्वे कॉर्पोरेशन एम्प्लॉईज युनियन अशा २ प्रमुख संघटनांमध्ये ही निवडणूक गुप्त मतदान पध्दतीने बुधवारी झाली होती. याची मतमोजणी मडगाव येथे गुरुवारी झाली. कॉम्रेड नेते संघटनेचे महामंत्री कॉ.वेणू पी नायर यांच्या नेतृत्वाखाली एनआरएमयुने ही निवडणूक लढवली होती. विजयानंतर लाल सलाम च्या घोषणांनी कोकण रेल्वेच्या सर्व स्थानंकावर जल्लोष सुरु होता.
लाल बावटा प्रणीत नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने आपला लाल झेंडा फडकवत केआरसी तसेच संलग्न अन्य संघटनांचा पराभव केला.कोकण रेल्वे ज्या राज्यातून जाते त्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा येथील कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी या निवडणुकीत मतदान केले. या निवडणुकीत ५ हजार २४९ कर्मचाऱ्यांपैकी ४ हजार ७९६ कर्मचाऱ्यांनी मतदान केले. त्यापैकी एनआरएमयूला २ हजार ५५३ मते मिळाली तर केआरसी एम्पा्लॉईज युनियनने २ हजार २११ मते मिळवता आली. यामुळे ३४२ मतांनी एनआरएमयुने विजय मिळवला आहे.या विजयाचा जल्लोष सर्वच रेल्वे स्थानकांवर एनआरएमयुच्या वतीने कर्मचारी करत होते.
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात आज झालेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले. या अवकाळी पावसाने आणि पावसाच्या सुसाट वाऱ्याने रत्नागिरी रेल्वे स्थानकालाही झोडपले. धक्कादायक गोष्ट म्हणजे पावसामुळे स्थानकावरील सुशोभीकरणाच्या काही भागातील पीव्हीसी शीट निघून लोबकळण्याचा प्रकार घडला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकाचे देखील कोटयावधी रुपये खर्चून सुशोभीकरण करण्यात येत आहे. मात्र आज झालेल्या घटनेमुळे या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोकण रेल्वेच्या सुशोभणीकरणाचे काम सर्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने करण्यात येत आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी या कामी पुढाकार घेतला असून यामुळे या रेल्वे स्थानकांना कार्पोरेट लूक येणार आहे. मात्र हे करताना कोकणातील पाऊस आणि वादळाचा विचार केले असल्याचे दिसत नाही कारण उद्घाटना आधीच या सुशोभीकरणाचा बोऱ्या वाजला आहे. आजच्या पावसात या स्थानकावरील छताला लावलेले पीव्हीसी शीट खाली निघाल्या, काही शीट लोम्बकळण्याच्या अवस्थेत दिसत होत्या.
रत्नागिरी शहरात परतीचा पाऊस झाला प्रचंड विजांच्या कडकडाट सह वादळी वारे सुटले असून त्याचा फटका कोकण रेल्वेच्या सुशोभीकरणाला बसला आहे मात्र हा प्रकार घडला त्यावेळी त्या ठिकाणी प्रवासी उभे नसल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही यामुळे कोकण रेल्वेच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.