रत्नागिरी : मंगळुरू ते मडगाव मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला अपेक्षित भारमान मिळत नसल्याने मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराचा घाट घातला जात आहे. या हालचालींना मुंबईपासून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गसह गोव्यातूनही मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला आहे. कोकण विकास समितीने या हालचालींच्या विरोधात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पत्रव्यवहार करून तीव्र विरोध दर्शवत चांगली चालत असलेली गाडी विस्तारित करण्याऐवजी काही चांगले पर्याय देखील सुचवले आहेत.
अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या मंगळूर मडगाव (२०६४५/२०६४६) वंदे भारत एक्सप्रेसला अपेक्षित भारमान मिळत नसल्याच्या कारणामुळे सुरुवातीपासूनच ९८ ते १००% प्रवासी भारमान मिळत असलेली मुंबई सीएसएमटी ते मडगाव ही वंदे भारत एक्सप्रेस(२२२२९/२२२३०) मंगळूरपर्यंत विस्तारित करण्याची मागणी दक्षिण कन्नडाचे खासदार नलीन कुमार कातिल यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार रेल्वे मंत्रालयस्तरावर देखील या दृष्टीने विचार होऊ लागला आहे. मात्र, याला कोकणसह गोव्यातून प्रचंड प्रमाणात विरोध होऊ लागला आहे.
मुंबई ते गोवा दरम्यान चालणाऱ्या (२२२२९/२२२३०) वंदे भारत एक्सप्रेसला सध्या मिळणारा प्रतिसाद पाहता ही गाडी आठ कोच ऐवजी सोळा कोच सहित चालविण्याची आवश्यकता आहे. मात्र हीच गाडी पुढे मंगळूरूपर्यंत चालविल्यास अनेक समस्या निर्माण होतील. त्यापेक्षा मंगळूर मडगाव (२०६४५/२०६४६) वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार मुंबई पर्यंत करून तिला कोकणातील चिपळूण, कुडाळ, सावंतवाडी या स्थानकांवर थांबा देण्यात यावा असा पर्याय कोकण विकास समितीने सुचवला आहे.