Category Archives: कोकण

Mumbai Goa Highway: १७ वर्षे रखडलेल्या महामार्गासाठी ‘जनआक्रोश’; ११ जानेवारीला संगमेश्वरमध्ये रस्ता रोको आंदोलन

   Follow us on        

संगमेश्वर:गेल्या १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामुळे कोकणवासीयांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. या प्रलंबित कामाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती’ आणि समस्त कोकणवासीयांच्या वतीने रविवार, ११ जानेवारी २०२६ रोजी संगमेश्वर येथे भव्य ‘रस्ता रोको’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या १७ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामुळे कोकणवासीयांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून, याच्या निषेधार्थ रविवार, ११ जानेवारी २०२६ रोजी संगमेश्वर येथे भव्य रस्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले आहे. मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती आणि समस्त कोकणवासीयांच्या वतीने आयोजित हे आंदोलन सकाळी १०:०० वाजता संगमेश्वर डेपो जवळ पार पडणार आहे.

​प्रमुख मागण्या:

​जनआक्रोश समितीने या आंदोलनाद्वारे प्रशासनासमोर अनेक महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या आहेत:

१. महामार्गासाठी स्वतंत्र तटस्थ समिती स्थापन करून त्यात समितीचे ४ प्रतिनिधी घ्यावेत.

२. कामातील विलंब आणि हलगर्जीपणासाठी जबाबदार अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी.

३. महामार्गाच्या उर्वरित कामाची अंतिम मुदत जाहीर करून नियमित प्रगती अहवाल सादर करावा.

४. धोकादायक वळणांवर तात्काळ साईनबोर्ड, लाईट्स आणि रिफ्लेक्टर बसवावेत.

५. संगमेश्वर ब्रिजसह सर्व अपूर्ण पुलांची कामे वेळापत्रकानुसार पूर्ण करावीत.

६. महामार्गावर २४x७ आधुनिक ट्रामा केअर सेंटरची उभारणी करावी.

७. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना योग्य भरपाई आणि जखमींना तात्काळ मदत मिळावी.

८. प्रकल्पासाठी तोडलेल्या वृक्षांच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात यावे.

​कोकणवासीयांना एकत्र येण्याचे आवाहन:

​”चला संगमेश्वर!” अशी हाक देत समितीने सर्व कोकणवासीयांना या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. महामार्गाच्या दुर्दशेमुळे दररोज होणारे अपघात आणि प्रवासाचा खोळंबा आता सहनशक्तीच्या पलीकडे गेल्याची भावना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हिवाळी पर्यटन जीवावर बेतले; गुहागरच्या समुद्रात बुडून एकाचा दुर्दैवी मृत्यू; आई आणि मुलाला वाचविण्यात यश

   Follow us on        

गुहागर: नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी कोकणात पर्यटनासाठी आलेल्या एका मुंबईकर कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या एकाच कुटुंबातील तिघेजण समुद्रात बुडू लागले. स्थानिक जीवरक्षक आणि नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे माय-लेकाचे प्राण वाचले असले, तरी कुटुंबप्रमुखाचा मात्र बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

नेमकी घटना काय?

मुंबईतील पवई परिसरात राहणारे अमोल मुथ्या (४२) हे आपल्या कुटुंबासह नाताळच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गुहागर येथे आले होते. शनिवारी (२७ डिसेंबर) दुपारी १२:३० च्या सुमारास अमोल, त्यांची पत्नी आणि १४ वर्षांचा मुलगा समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारत असताना पोहण्याचा मोह न आवरल्याने ते पाण्यात उतरले. मात्र, समुद्रातील पाण्याचा आणि लाटांच्या वेगाचा अंदाज न आल्याने हे तिघेही किनाऱ्यापासून दूर ओढले गेले आणि बुडू लागले.

जीवरक्षकांचे शर्थीचे प्रयत्न

तिघेजण समुद्रात बुडत असल्याचे लक्षात येताच समुद्रकिनाऱ्यावर तैनात असलेले गुहागर नगरपंचायतीचे जीवरक्षक आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ समुद्रात उड्या घेतल्या.. जीवरक्षकांनी अत्यंत वेगाने हालचाली करत अमोल यांची पत्नी आणि मुलाला सुखरूप बाहेर काढले. अमोल मुथ्या यांनाही बाहेर काढून त्यांना वाचवण्यासाठी ‘सीपीआर’ (CPR) सारखे प्रथमोपचार देण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

पर्यटकांना खबरदारीचे आवाहन

सध्या वर्षाखेरच्या सुट्ट्यांमुळे कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. समुद्राचा अंदाज न येणे किंवा खोल पाण्यात जाणे जीवावर बेतू शकते. त्यामुळे पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावरील सूचनांचे पालन करावे आणि समुद्राची भरती-ओहोटी पाहूनच पाण्यात उतरावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Konkan Railway: महाराष्ट्राची ‘तुतारी’ गोवा राज्यात पळविण्याचा डाव

   Follow us on        

सावंतवाडी | प्रतिनिधी: गेल्या दहा वर्षांपासून आपल्या हक्काच्या रेल्वे टर्मिनससाठी संघर्ष करणाऱ्या कोकणी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार कोकण रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण करण्याऐवजी, आता चक्क महाराष्ट्राची हक्काची ‘तुतारी एक्सप्रेस’ गोवा राज्यात पळवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रशासनाचा हा आडमुठेपणा म्हणजे कोकणच्या विकासाला खीळ घालण्याचे एक मोठे षडयंत्र असल्याची संतप्त भावना सध्या तळकोकणात उमटत आहे.

​प्रशासनाची ‘टर्मिनस’ टाळण्यासाठी नवी खेळी?

​सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी स्थानिक जनता आणि प्रवासी संघटना गेली अनेक वर्षे लढा देत आहेत. मात्र, रेल्वे प्रशासन प्रत्येक वेळी नवीन तांत्रिक कारणे पुढे करून हे काम रेंगाळत ठेवत आहे. आता तर “टर्मिनस अपूर्ण आहे” असे लंगडे समर्थन देत तुतारी एक्सप्रेस गोव्यापर्यंत नेण्याचा घाट घातला जात आहे. मुळात टर्मिनसचे काम पूर्ण होऊच नये आणि ही गाडी कायमस्वरूपी राज्याबाहेर घालवावी, हीच प्रशासनाची छुपी खेळी असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

​हा केवळ गाडीचा नाही, कोकणच्या अस्मितेचा प्रश्न!

​तुतारी एक्सप्रेस ही केवळ एक गाडी नसून ती कोकणी माणसाची जीवनवाहिनी आणि हक्काची एक्सप्रेस आहे. ही गाडी पुढे नेणे म्हणजे सावंतवाडी टर्मिनसच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणे होय. प्रशासनाचा हा दृष्टिकोन कोकणच्या विकासाला दुय्यम स्थान देणारा असून, स्थानिक जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहणारा आहे.

सरकारी दाखला पाहिजे असेल तर आधी एक झाड लावा; सावंतवाडीतील ग्रामपंचायतीचा ‘सही’ निर्णय

   Follow us on        

सावंतवाडी: पर्यावरण रक्षणासाठी केवळ भाषणे न देता प्रत्यक्षात कृती कशी करावी, याचा आदर्श सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील ​मळेवाड-कोंडूरे ग्रामपंचायतीने घालून दिला आहे. गावात विवाह नोंदणी असो किंवा मृत्यूचा दाखला, यांसारखी महत्त्वाची सरकारी कागदपत्रे मिळवण्यासाठी आता एक वृक्षारोपण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

​काय आहे हा उपक्रम?
गावचे सरपंच श्रीमती मिलन पार्सेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक नावीन्यपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ​ या निर्णयानुसार, गावातील नवीन विवाहित जोडप्याला आपला विवाह नोंदणीचा दाखला हवा असल्यास, त्यांना एक फळझाड किंवा सावली देणारे झाड लावावे लागेल. तसेच कुटुंबातील एखाद्या सदस्याचे निधन झाल्यास, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वारसांना एक झाड लावावे लागेल, तरच मृत्यूचा दाखला दिला जाईल.

हे दाखले मिळविण्यासाठी झाड लावल्यानंतर त्याचा फोटो ग्रामपंचायतीत जमा करावा लागणार आहे. या उपक्रमामुळे गावात मोठ्या प्रमाणावर वृक्षसंपदा वाढण्यास मदत होणार आहे.

वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ (Global Warming) यावर मात करण्यासाठी स्थानिक स्तरावर प्रयत्न करणे अशी ​या निर्णयामागची भूमिका आहे तसेच येणाऱ्या पिढीला शुद्ध हवा आणि हिरवेगार गाव मिळावे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

​मळेवाड-कोंडूरे ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. प्रशासकीय कामाची सांगड पर्यावरणाशी घालणारा हा राज्यातील पहिलाच किंवा अत्यंत दुर्मिळ असा प्रयोग मानला जात आहे. अनेक पर्यावरणप्रेमींनी “इतर ग्रामपंचायतींनीही या मॉडेलचा स्वीकार करावा,” अशी इच्छा व्यक्त केली आहे.

कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या एक्स्प्रेसला कायमस्वरूपी अतिरिक्त कोच जोडण्याचा निर्णय

   Follow us on        

मुंबई: कोकण रेल्वे आणि दक्षिण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेता, तिरुनेलवेली – दादर – तिरुनेलवेली साप्ताहिक एक्स्प्रेसला एक अतिरिक्त डबा (कोच) कायमस्वरूपी जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

​या निर्णयामुळे या गाडीची एकूण क्षमता आता १५ कोचवरून वाढून १६ एलएचबी (LHB) कोच इतकी झाली आहे. नव्या बदलांनुसार गाडीमध्ये आता ‘३ टायर एसी’ (3 Tier AC) चा एक अतिरिक्त डबा वाढवण्यात आला आहे.

​सुधारित कोच रचना खालीलप्रमाणे असेल:

​२ टायर एसी: ०१ कोच

​३ टायर एसी: ०२ कोच (आधी १ होता)

​३ टायर इकॉनॉमी: ०१ कोच

​स्लीपर क्लास: ०६ कोच

​जनरल डबे: ०४ कोच

​जनरेटर कार: ०१

​SLR कोच: ०१

​नवीन बदल कधीपासून लागू होणार?

​रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही नवीन हा बदल खालील तारखांपासून अंमलात आणण्यात येणार आहे.

१. गाडी क्र. २२६२९ (तिरुनेलवेली ते दादर): २४ डिसेंबर २०२५ पासून.

२. गाडी क्र. २२६३० (दादर ते तिरुनेलवेली): २५ डिसेंबर २०२५ पासून.

​दक्षिण रेल्वेच्या या निर्णयामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना, विशेषतः वातानुकूलित श्रेणीतून प्रवास करणाऱ्यांना अधिक जागा उपलब्ध होणार आहे. प्रवाशांनी अधिक माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.enquiry.indianrail.gov.in) भेट द्यावी, असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी केले आहे.

संगमेश्वर रेल्वे स्थानकावर ‘जामनगर’ आणि ‘पोरबंदर’ एक्सप्रेसचे होणार जंगी स्वागत

   Follow us on        

संगमेश्वर: संगमेश्वर रेल्वे स्थानकावर नव्याने थांबे मिळालेल्या दोन गाड्यांचे जंगी स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संगमेश्वर तालुक्यातील जनतेच्या अडीच वर्षांच्या सातत्यपूर्ण संघर्षाला मोठे यश आले आहे. कोकण रेल्वेच्या पोरबंदर एक्स्प्रेस आणि जामनगर एक्स्प्रेस या दोन महत्त्वाच्या गाड्यांना आता संगमेश्वर रोड स्थानकावर अधिकृत थांबा मंजूर करण्यात आला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून, शुक्रवारी आणि शनिवारी या गाड्यांचे जंगी स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

​गुजरातकडे जाण्यासाठी थेट रेल्वे सेवा उपलब्ध झाल्यामुळे स्थानिक व्यापारी, विद्यार्थी आणि चाकरमान्यांची मोठी अडचण दूर झाली आहे. आता थेट प्रवासाची सोय झाल्याने वेळ आणि पैसा दोघांचीही बचत होणार आहे.

​जंगी स्वागताची तयारी

​या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी स्थानिकांनी जय्यत तयारी केली आहे. पोरबंदर एक्सप्रेसचे शुक्रवारी तर जामनगर एक्स्प्रेसचे शनिवारी स्वागत करण्यात येणार आहे. ​या दोन्ही दिवशी रेल्वे स्थानकावर घोषणाबाजी, ढोल-ताशांचा गजरात आणि फुलांच्या हारांनी गाड्यांचे स्वागत केले जाणार आहे. या सोहळ्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि रेल्वेप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

​फेसबुक ग्रुपचे जाहीर आवाहन

​’निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे)’ फेसबुक ग्रुपच्या वतीने या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, शुक्रवार दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १:३० वाजता सर्व नागरिकांनी संगमेश्वर रोड स्थानकावर उपस्थित राहून या आनंदोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे

Konkan Railway: कोकण रेल्वेच्या स्थानकांवर आता २४x७ ‘डिजी लॉकर’ सुविधा उपलब्ध

   Follow us on        

मुंबई: ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेला गती देत आणि प्रवाशांच्या सोयीत भर घालत मध्य रेल्वेने आता रत्नागिरी (महाराष्ट्र), थिविम (गोवा) आणि उडुपी (कर्नाटक) स्थानकांवर २४ तास ‘डिजी लॉकर’ (डिजिटल स्मार्ट क्लॉक रूम) सुविधा सुरू केली आहे. सुरक्षित आणि स्वयंचलित असलेल्या या सुविधेमुळे प्रवाशांना आपले सामान रेल्वे स्थानकावर सुरक्षित ठेवणे अधिक सोपे झाले आहे.

​काय आहे ही ‘डिजी लॉकर’ सुविधा?

​मुंबई विभागात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे ही योजना यशस्वी झाल्यानंतर आता तिचा विस्तार करण्यात आला आहे. सध्या मध्य रेल्वेकडे एकूण ५६० डिजी लॉकर आहेत (CSMT-३००, दादर-१६०, LTT-१००).

​सामान ठेवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे:

१. स्क्रीनवर ‘Start-Store’ वर क्लिक करा.

२. आपले नाव, PNR क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका.

३. लॉकरचा आकार आणि बॅगांची संख्या निवडा.

४. प्रति बॅग ३० रुपये याप्रमाणे मशीनमध्ये पैसे जमा करा.

५. लॉकर उघडेल, त्यात सामान ठेवून दरवाजा बंद करा.

​सामान परत मिळवण्यासाठी:

१. स्क्रीनवर ‘Start-Retrieve’ वर क्लिक करा.

२. पावतीवरील बारकोड स्कॅनरला दाखवा.

३. लॉकर उघडेल, आपले सामान घेऊन दरवाजा पुन्हा बंद करा.

​प्रवाशांचा उदंड प्रतिसाद

​ही सुविधा प्रवाशांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहे. एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ च्या माहितीनुसार या काळात डिजी लॉकर्सच्या माध्यमातून रेल्वेला ३१.६ लाख रुपयांचा महसूल मिळाला होता.

पर्यटकांची सोय 

आता ही सुविधा कोकणात सुरू केल्याने येथे पर्यटनास येणार्‍या प्रवाशांची खूप चांगली सोय होईल. जास्त सामान घेऊन फिरणे गैरसोयीचे असल्याने ते डिजी लॉकर मध्ये ठेवता येणार आहे. अशी सुविधा कोकण रेल्वे मार्गावरील ईतर स्थानकावर सुरू करणे गरजचे आहे.

 

Konkan Tourism: तळकोकणात पंचतारांकित ‘ताज’ हॉटेलचा मार्ग मोकळा

सिंधुदुर्ग | बुधवार, २४ डिसेंबर २०२५

​कोकणातील पर्यटन विकासाला नवी दिशा देणारा अत्यंत महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर (तालुका वेंगुर्ला) येथे प्रस्तावित असलेल्या ‘ताज’ (IHCL) या पंचतारांकित लक्झरी हॉटेल प्रकल्पाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात रखडलेला जमिनीच्या मोबदल्याचा पेच अखेर सुटला असून, यामुळे आता या भव्य प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला वेग येणार आहे.

​नेमका विषय काय होता?

​शिरोडा वेळागर येथील समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या जमिनीवर टाटा समूहाचे ‘ताज’ हॉटेल उभारण्याचे नियोजित होते. मात्र, येथील जमिनीच्या मालकी हक्कावरून आणि शासनाकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या (Compensation) रकमेवरून स्थानिक ग्रामस्थांमध्ये असंतोष होता. योग्य मोबदला मिळेपर्यंत प्रकल्पाचे काम सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली होती.

​प्रशासकीय मध्यस्थीला यश

​नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत आणि प्रशासकीय वाटाघाटींनंतर, ग्रामस्थांना त्यांच्या हक्काचा वाढीव मोबदला देण्याचे मान्य करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने जमिनीचे पुनर्मूल्यांकन करून आणि स्थानिकांना विश्वासात घेऊन हा तिढा सोडवला आहे. यामुळे प्रकल्पाच्या विरोधात असलेले अडथळे आता दूर झाले आहेत.

​प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये:

​आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन: टाटा समूहाचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंधुदुर्ग जिल्हा जागतिक पर्यटनाच्या नकाशावर ‘लक्झरी डेस्टिनेशन’ म्हणून ओळखला जाईल.

​रोजगार निर्मिती: या हॉटेलमुळे स्थानिक तरुणांना आदरातिथ्य (Hospitality) क्षेत्रात थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

​स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ: पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे आजूबाजूच्या होमस्टे, टॅक्सी व्यावसायिक, मच्छिमार आणि हस्तकला उद्योगाला मोठी चालना मिळेल.

​शाश्वत विकास: ताज समूहाकडून हा प्रकल्प पर्यावरणपूरक पद्धतीने राबवला जाणार असून, समुद्रकिनाऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य जपण्यावर भर दिला जाईल.

Konkan Railway: कोकणकन्या, तुतारी गाड्यांच्या आरक्षणासाठी आता आधार OTP अनिवार्य

   Follow us on        

मुंबई:

रेल्वे प्रशासनाने तिकीट प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. २३ डिसेंबर २०२५ पासून निवडक १०० गाड्यांच्या तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ तिकिटांसाठी आधार OTP (Aadhaar OTP) पडताळणी बंधनकारक करण्यात आली आहे. या यादीमध्ये कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे.

​पत्रात दिलेल्या माहितीनुसार, कोकण मार्गावरील खालील गाड्यांसाठी हा नियम लागू झाला आहे:

​कोकण कन्या एक्सप्रेस (२०१११): मुंबई ते मडगाव दरम्यान धावणारी ही अत्यंत लोकप्रिय गाडी आता आधार OTP प्रणालीच्या कक्षेत आली आहे.

​तुतारी एक्सप्रेस (११००३): दादर ते सावंतवाडी रोड दरम्यान धावणाऱ्या या गाडीसाठीही प्रवाशांना आता ओटीपी पडताळणी करावी लागेल.

​मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस (१२६१८): हजरत निजामुद्दीन ते एर्नाकुलम या लांब पल्ल्याच्या आणि कोकण मार्गावरून जाणाऱ्या गाडीचाही या यादीत समावेश आहे.

​प्रवाशांना आवाहन:

ज्या प्रवाशांना या गाड्यांचे तत्काळ तिकीट काढायचे आहे, त्यांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असल्याची खात्री करावी. यामुळे तिकीट आरक्षणाच्या वेळी होणारी गैरसोय टाळता येईल.

Mumbai Goa Highway: महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा; राजू भाटलेकर यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची भेट

   Follow us on        

रत्नागिरी:

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कोकणातील पर्यटन व्यवसायावर होणारे विपरीत परिणाम आणि वाढते अपघातांचे प्रमाण लक्षात घेता, भाजपा रत्नागिरी जिल्हा सचिव श्री. राजू भाटलेकर यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीत महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, या मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले.

​सध्या मुंबई-गोवा महामार्ग अपूर्ण अवस्थेत असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामार्गाच्या दयनीय स्थितीमुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.​रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे पर्यटक नाराज असून याचा थेट परिणाम कोकणातील पर्यटन व्यवसायावर होत आहे.​अनेक स्थानिक पर्यटन व्यावसायिक सध्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत त्यामुळे या महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे असे या निवेदनात नमूद केले आहे.

​मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

​महामार्गाचे काम तातडीने पूर्ण झाल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल आणि पर्यटन व्यवसायाला पुन्हा उभारी मिळेल, अशी स्पष्ट भूमिका श्री. भाटलेकर यांनी मांडली. यावर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search