Konkan Railway: अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठूरायाची भेट घेण्यासाठी वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरला जातात. मध्य रेल्वेने नागपूर, अमरावती, कोल्हापूर, भुसावळ, लातूर, मिरज अशा महाराष्ट्रातील सर्वच विभागांतून पंढपूरला जाण्यासाठी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.
रेल्वेने आजपर्यंत एकदाही सावंतवाडीतून पंढरपूरला जाणारी गाडी सोडलेली नाही.
कोकणातूनही बरेच भाविक आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीला जातात. या भाविकांमध्ये वयस्कर नागरिक मोठ्या प्रमाणात असतात. कोकणातून पंढरपूर रस्तेमार्गे जवळ असले तरी घाटमार्गावरील प्रवासामुळे वेळ अधिक लागतो त्यांचा प्रवास त्रासदायक होतो. रेल्वेने गेल्यास आरामदायक प्रवास होऊ शकतो.
रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देवून दिनांक १ जुलै, २०२५ ते १० जुलै, २०२५ पर्यंत सावंतवाडी – पंढरपूर मार्गावर विशेष गाड्या सोडाव्यात अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र च्या वतीने समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी केली आहे. ही मागणी करणारे निवेदन ईमेल द्वारे संबधित अधिकारी आणि प्रशासकीय कार्यालयांना पाठविण्यात आले आहे.
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गाच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दुहेरीकरणाच्या कामाला आता गती मिळत असून, भविष्यात या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या दुप्पट होणार आहे. नैसर्गिक अडचणींवर मात करत कोकण रेल्वेने टप्प्याटप्प्याने दुहेरीकरणाचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाने टप्प्याटप्प्याने दुहेरीकरण करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. सपाट मार्गांवर दर किलोमीटर १५ ते २० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, तर बोगद्यांच्या भागात हा खर्च ८० ते १०० कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. यापूर्वी रोहा ते वीर दरम्यानच्या दुहेरीकरणासाठी ५३० कोटी रुपये खर्च झाले होते.
यापुढील टप्पे कोणते?
कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार खालील तीन टप्प्यांत कोकण रेल्वे मार्गाचे दुपारदरीकरण करण्यात येणार आहे. १)खेड–रत्नागिरी, २) कणकवली–सावंतवाडी ३) मडगाव–ठोकुर
या तीन प्रमुख टप्प्यांमध्ये दुहेरीकरणाची योजना आहे. या टप्प्यांचा सविस्तर अहवाल लवकरच रेल्वे मंडळाकडे सादर करण्यात येणार आहे. या योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल आणि निधी मंजूर होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
दुहेरीकरणासोबतच कोकण रेल्वे मार्गावरील ११ स्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुमारे ९९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक सुविधा आणि सोयी-सवलती मिळण्याची शक्यता आहे.
संगमेश्वर: गेल्या अनेक दिवसांपासून निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुपच्या वतीने संगमेश्वर स्थानकात फलाट क्रमांक २ वरील गैरसोयींचा मुद्दा उचलून धरण्यात आला होता. सतत पाठपुरावा आणि वेळोवेळी अधिकारी वर्गाशी केलेल्या चर्चेतून हे सकारात्मक चित्र साकार होत आहे.
फलाट क्रमांक २ वरील गैरसोयींचा पाढा निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुप सतत वाचून दाखवतात. फलाटावरील पेव्हर ब्लॉक, पादचारी पूल, आसनव्यवस्था, स्वच्छ पाणी, पंखे, दिवे , सांडपाण्याची व्यवस्था, तिकीट आरक्षणाची सुविधा, प्रवाशांच्या सोयीसाठी नव्याने तीन एक्स्प्रेसला संगमेश्वर स्थानकात थांबा मिळावा म्हणून निवेदन,आंदोलन असे अनेक विषय हाताशी घेऊन ते सफल करण्यात आले.
हे भगिरथ प्रयत्न करण्यासाठी या संघटनेचे प्रमुख संदेश जिमन आणि त्यांचे सर्व सहकारी आवर्जून झटताना दिसतात.
लोक प्रतिनिधींच्या गाठीभेटी, त्यांच्या शिफारशी यांच्या जोरावर कित्येक किचकट विषय मार्गी लावण्यात संघटनेला यश आले आहे. फलाट क्रमांक २ वरील पेव्हर ब्लॉक, सुशोभीकरण या कामात आमदार शेखर निकम यांनी मौलिक सहकार्य केले आहे. जातीने या गंभीर विषयावर लक्ष केंद्रित करुन सर्वतोपरी सहाय्य केले. या कामासाठी २३ लाख ३६ हजार ५५४ रुपये इतका भरघोस निधी उपलब्ध याबद्दल निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुप आणि तमाम संगमेश्वर तालुक्यातील रेल्वे प्रवाशी, सामान्य जनता यांच्यावतीने आमदार महोदयांना धन्यवाद देण्यात येत आहेत.
संगमेश्वर तालुक्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करीत इथे पर्यटनाची संधी निर्माण व्हावी. केरळ गोवा यांच्या धर्तीवर कोकणातील गाव खेड्यातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा. इथल्या कोकणी माणसाचे जीवन समृद्ध व्हावे यासाठी कायमच निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुप प्रयत्नशील असतों.
तळकोकणातील एक महत्वाचे स्थानक म्हणून ओळखले जाणाऱ्या सावंतवाडी टर्मिनस या स्थानकावर गाडी क्रमांक १२१३३/३४ मंगलोर एक्सप्रेसला थांबा देण्यासाठी कल्याण पूर्व क्षेत्रातील आमदार सुलभा गायकवाड पुढे सरसावल्या आहेत. या गाडीला सावंतवाडी टर्मिनस या स्थानकावर थांबा मिळवून देणे आणि कोरोना काळात ZBBT च्या नावाने या स्थानकावरील काढून घेतलेले गाड्यांचे थांबे पूर्ववत करावेत या मागण्यांसाठी त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन पाठवले आहे.
मंगलोर एक्सप्रेसच्या कणकवली थांब्यानंतर महत्त्वाच्या स्थानकांदरम्यान या गाडीच्या नॉन-स्टॉप ऑपरेशनमुळे सावंतवाडीहून आणि सावंतवाडीला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. या गाडीला सावंतवाडी टर्मिनसवर थांबा दिल्यास अनेक प्रवाशांना फायदा होईल, ज्यामुळे प्रवास सुलभ होईल आणि रेल्वे सेवेची सुलभता वाढेल. तसेच सावंतवाडी टर्मिनस स्थानकावरील कोरोना काळात ZBBT च्या नावाखाली काढून घेतलेले थांबे पूर्ववत करण्यात यावेत, तसे केल्याने या प्रदेशातील प्रवाशांना अधिक सुरळीत प्रवास करता येईल. मी विनंती करते की संबंधित अधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या सोयी आणि कल्याणाचा विचार करून लवकरात लवकर हा थांबा जोडण्याचा आणि कोरोना काळात काढून घेतलेले तांबे पूर्ववत करण्याचा विचार करावा. असे त्यांनी या निवेदनात लिहिले आहे.
दोडामार्गः तालुक्यातील तळकट भटवाडी परिसरात शुक्रवारी (६ जून) दुपारच्या सुमारास १४ फूट लांबीचा भला मोठा किंग कोब्रा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. भरवस्तीत आढळलेल्या या विषारी सापामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
गावातील रहिवासी अभिजीत देसाई यांना हा किंग कोब्रा त्यांच्या घरासमोरच्या परिसरात दिसला. त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ गावातील नागरिकांना आणि वनविभागाला याबाबत माहिती दिली. झोळंबे येथील अनुभवी सर्पमित्र विठ्ठल गवस यांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलं.
चिपळूण : कोकण आणि घाटमाथ्याला जोडणाऱ्या गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुंभार्ली घाटात शनिवारी पहाटे संरक्षक भिंत कोसळली असून या भागातील लोखंडी रेलिंगही निखळले आहे. घाटात खोल दरीच्या बाजूने असलेली ही भिंत कोसळल्याने रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पोलिसांकडून खचलेल्या ठिकाणी दगड, पिंप उभे करून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे.
या घाटात गेल्या 2 वर्षात कोट्यावधीचा निधी खर्च करण्यात आला आहे. यामध्ये संरक्षक भिंतीसह रस्ता दुरुस्तीचा समावेश आहे. मात्र कितीही कोटी या घाटातील दुरुस्तीवर, सुरक्षेच्या उपाययोजनांवर खर्च केले तरीही पावसाळ्यात दरवर्षी हा घाट धोकादायक बनत आला आहे. दरड कोसळणे, केलेली बांधकामे ढासळणे हे नित्याचेच झाले आहे.
शनिवारी कोसळलेल्या संरक्षक भिंतीमुळे यावर्षीचा पावसाळा कसा जाणार, याचीच चिंता वाहनचालकांना लागून राहिली आहे. या घाटातून दररोज शेकडो वाहने जात-येत असतात. सध्या घाटात तीन ठिकाणी रस्ता खचण्याचे व संरक्षक भिंत कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. सद्यस्थितीत खचलेल्या रस्ता ठिकाणी वाहने जाऊ नयेत म्हणून तेथे फक्त दगड आणि काही ठिकाणी पिंप उभी करून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली आहे.
पावसाळ्यात हा रस्ता खचल्यास घाटातील वाहतूक बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातच पावसाळ्यात अवजड वाहतूक असणाऱ्या घाट परिसरात आधीच दृश्यमानता कमी झाल्याने अवजड वाहनांसह मोठी वाहतूक कोंडी होते. त्यात आता रस्त्याच्या बाजूने असणाऱ्या संरक्षक भिंतीसह रेलींगही निखळल्याने अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान, प्रशासनाने अद्याप कोणतीही मोठी यंत्रसामुग्री पाठवली नसल्याने स्थानिकांनी उच्च आणि जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
मुंबई: तत्कालीन रेल्वेमंत्री श्री. नितीश कुमार यांनी रेल्वे अर्थसंकल्पात सांगितल्यानुसार १ जुलै, १९९९ पासून मुंबई आणि मडगाव दरम्यान इंटरसिटी एक्सप्रेस सुरु झाली. मुंबई गोवा मार्गावर दिवसाची सेवा देणारी ही पहिलीच एक्सप्रेस होती. तत्पूर्वी सुरु असणारी कोकणकन्या एक्सप्रेस रात्रीची सेवा देत होती तर दिवा सावंतवाडी पॅसेंजर संथ गतीने जात असल्यामुळे लांबच्या प्रवाशांना अडचणी येत होत्या. कोकणवासीयांना दिवसाच्या जलद प्रवासाची सवय याच इंटरसिटी एक्सप्रेसने लावली.
गेज बदलण्यापूर्वी मिरज वास्को दरम्यान मांडवी एक्सप्रेस धावत असे. परंतु ब्रॉडगेज मार्ग झाल्यावर ती बंद करण्यात आली व मुंबई मडगाव दरम्यानच्या इंटरसिटी एक्सप्रेसचे नामकरण मांडवी एक्सप्रेस म्हणून करण्यात आले. तसेच पूर्वी केवळ आसनी डबे असणाऱ्या गाडीचे रेक नंतर कोकणकन्या एक्सप्रेस सोबत एकत्रित करण्यात आल्यामुळे मांडवी एक्सप्रेसला स्लीपर डबे मिळाले. पुढे १० जून, २०१९ पासून या दोन्ही गाड्यांना आधुनिक एलएचबी डबे देण्यात आले. १ फेब्रुवारी,२०२४ पासून मांडवी एक्सप्रेसला दोन अद्ययावत एसी थ्री टायर इकॉनॉमी डबे जोडण्यात आले. अशाप्रकारे वेगवेगळी स्थित्यंतरं पाहत मांडवी एक्सप्रेस गेली २६ वर्षे कोकणवासीयांची अविरत सेवा करत आहे.
रेल्वेप्रेमी व नियमित प्रवाशांमध्ये खाद्य राणी (फूड क्वीन) म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेसच्या २६ व्या वर्षपूर्तीचा सोहळा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे शनिवार दि. ७ जून, २०२५ सकाळी ६ पासून रेल्वेप्रेमींनी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला.
सर्वप्रथम रेल्वेप्रेमींनी रात्रभर जागून गाडीचे इंजिन सजवले. त्यानंतर पहाटे ५:४५ ला मडगावहून कोकणकन्या एक्सप्रेस मुंबईत दाखल झाल्यानंतर गाडीचे काही डबेही सजवण्यात आले. चिन्मय कोले यांनी नारळ वाढवून पुढील कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने ढोल ताशा व तुतारीच्या गजरात गाडीचे इंजिन जोडण्यात आले. गाडीचे चालक (लोको पायलट व सहाय्यक लोको पायलट), तिकीट तपासनीस, पॅन्ट्री कार कर्मचारी यांचा सत्कार करून त्यांच्याच हस्ते केक कापून हा कार्यक्रम साजरा झाला.
यासाठी चिन्मय कोले, साहिल कोसिरेड्डी, अमित फाटक, राहुल नायर, जिनेश सावंत, शुभम नागपुरे, अभय आभाळे, अनुष जाधव, यश राणे, ओमकार फाटक, आदित्य कांबळी आणि अक्षय महापदी यांनी विशेष मेहनत घेतली. यातील काही रेल्वेप्रेमी केवळ या कामासाठी रात्री पुण्याहून मुंबईला येऊन सकाळी पुन्हा पुण्याला गेले.याचसोबत श्रेयश हुले, मंदार सहस्त्रबुद्धे, पौरव शहा, दीपक नागमोती, सुमन घोष, जोशुआ मेंडोसा, प्रथमेश प्रभू, सुनीत चव्हाण, निलेश परुळेकर, परम, इंद्रजित रावराणे, रोहित नायर, अभिषेक असोलकर, तमिळ सेल्व्हन, पवन, प्रणित शिवलकर, निलय काटदरे, जयशंकर, कमल, जेसन कोएल्हो, मिहीर मठकर, सौरभ सावंत, धनुष चंदन, कुणाल जाधव, तेजस भिवंडे, हिमांशू शर्मा, टायरोन डिसूझा, चिंतन नाईक यांनीही सहकार्य केले.
Thane: गणेशोत्सवानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेच्या तिकीटासाठी दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू होणार आहे. या खिडक्यांची संख्या वाढल्याने गणेशभक्तांची वेळ आणि रांगेत उभे राहण्याची दमछाक कमी होणार आहे.
कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने ठाणे रेल्वे स्थानकात आरक्षण तिकीट खिडक्या वाढवण्याची मागणी गेले 4 वर्ष लावून धरली होती. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर संघटनेने ही मागणी नरेश म्हस्के यांच्याकडे करताच अवघ्या काही दिवसांतच हा प्रश्न मार्गी लागला आहे.
खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेकडे 7 मे रोजी या संदर्भात पत्रव्यवहार केला. या पत्राची तातडीने दखल घेत 2 जून रोजी मध्य रेल्वेचे अप्पर मंडल रेल प्रबंधक तरुण कुमार यांनी पत्राद्वारे 2 अतिरिक्त आरक्षण तिकीट खिडक्या ठाणे रेल्वे स्थानकात सुरू करत असल्याची माहिती दिली आहे. 20 जून ते 5 जुलै 2025 या दरम्यान या दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू राहणार आहेत.
सध्या 4 आरक्षण खिडक्या कार्यरत असून 2 अतिरिक्त खिडक्या सुरू होणार आहेत. 6 आरक्षण खिडक्यांमुळे आता कोकणवासियांची वेळ वाचणार असून रांगेत जास्त वेळ ताटकळत रहावे लागणार नसल्याने प्रवासी संघटनेने आनंद व्यक्त केला आहे. आपल्या खासदारकीच्या पाहिल्याच टर्ममध्ये खासदार नरेश म्हस्के यांनी अनेक रेल्वे विषयक प्रश्न मार्गी लावले असल्याबद्दल प्रवासी संघटनेने समाधान व्यक्त केले आहे.
Konkan Railway: कोकणचे पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य प्रवाशांना अनुभवता यावे यासाठी कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासनाने एक एकेरी विशेष गाडीची घोषणा केली आहे. कोकण रेल्वे मार्गावर दिनांक १४/०६/२०२५ रोजी रेल्वे प्रशासनाने एक एकेरी One Way ही विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. चेअर कार, सेकंड सीटिंग या डब्यांसोबत निसर्गसौदर्य पाहण्यासाठी या गाडीला एक विस्टाडोम कोचही जोडण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक ०११७१ मुंबई सीएसएमटी – मडगाव जंक्शन एकेरी विशेष गाडी दिनांक १४/०६/२०२५ रोजी सकाळी ७:३५ वाजता मुंबई सीएसएमटीहून सुटेल त्याच दिवशी रात्री १२:३० वाजता मडगाव जंक्शनला पोहोचतील.
Car RoRo Serviice on Konkan Railway: कोकण मार्गावर कारसाठी रोरो सेवा चालू करण्याचा आपला प्रयत्न असून या उपक्रमाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभल्यास ही सेवा यांच्या गणेश चतुर्थीला चालू करण्यात येणार असल्याची माहिती कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे चेअरमेन आणि व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी मंगळवारी बेलापूर येथील कोकण रेल्वेच्या प्रधान कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. एका फेरीत किमान ४० गाड्यांची वाहतूक करण्यासाठी बुकिंग केल्यास ही सेवा चालू करता येईल असे ते पुढे म्हणालेत.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणवासीय मोठ्या संख्येने चारचाकी वाहनांसह गावाकडे जातात, पण खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. कोकण रेल्वे आता प्रवासी गाड्यांबरोबर हलक्या वाहनांसाठी रो-रो सेवा सुरू करण्याचा विचार करत आहे. यामुळे कोकणवासीयांच्या कार आणि इतर हलकी वाहने रेल्वे मार्गे गावापर्यंत पोहोचवता येतील. कोकण रेल्वेला ट्रकच्या रो-रो आणि मालवाहतूक सेवेतून सर्वाधिक उत्पन्न मिळते. आता हलक्या वाहनांसाठी ही सेवा सुरू झाल्यास प्रवाशांना मोठा फायदा होईल.
मुंबई ते कोकण रस्त्याची स्थिती गेल्या अनेक दशकांपासून सुधारलेली नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात वाहतूक कोंडी ही मोठी समस्या बनते. रो-रो सेवेमुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होऊन प्रवास सुलभ होईल. मुंबईतील कोकणी व्यक्ती रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे रेल्वेला प्राधान्य देतात आणि आता रो-रो सेवेमुळे गाड्या असणाऱ्यांना अधिक सोय मिळेल. कोकण रेल्वेचे व्यवस्थापक संतोष कुमार झा यांनी सांगितले की, रो-रो सेवेचा आराखडा पूर्ण झाल्यानंतर किती वाहने वाहून नेली जाऊ शकतील, याबाबत स्पष्टता येईल.
कोकण रेल्वेला प्रवासी सेवेपेक्षा मालवाहतूक आणि रो-रो सेवेतून अधिक उत्पन्न मिळते. हलक्या वाहनांसाठी ही सेवा सुरू झाल्यास प्रवाशांना आणि रेल्वेला दोघांनाही फायदा होईल. ही सेवा विशेषतः सणांच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी बनवेल. रो-रो सेवेमुळे रस्त्यावरील ताण कमी होईल आणि कोकणवासीयांना त्यांच्या गावी जाण्यासाठी एक नवीन, सोयीस्कर पर्याय उपलब्ध होईल.