Category Archives: कोकण

Sindhudurg: जिल्ह्यात ४३ गावांत दरडी कोसळण्याचा धोका, कोकण रेल्वे, राज्य, राष्ट्रीय महामार्गावर मार्गावरील ही ठिकाणेही धोकादायक

   Follow us on        
सिंधुदुर्ग : आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरणाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामार्फत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार एकूण ४३ गावांमध्ये दरड कोसळण्याची शक्यता असल्याचे नमूद केले आहे. याशिवाय कोकण रेल्वे मार्ग व राज्य, राष्ट्रीय महामार्गावर ज्या ठिकाणी दरड कोसळते, अशी ठिकाणेही प्रशासनाने निश्चित केली आहे.
यात सावंतवाडी तालुक्यातील गाळेल इन्सुली, आंबोली, मळेवाड, वेत्ये, कणकवली तालुक्यात रांजणगाव, खुर्द, कुंभवडे, फोडा, वैभववाडी तालुक्यात नाध वडे, करुळ-भट्टीवाडी, दिंडवणेवाडी-धनगरवाडी, वेंगुर्ले तालुक्यात तुळस काजरमळी, तुळस रेवटीवाडी, तुळस वाघोसेवाडी, वायंगणी डोमवाडी, म्हापण, कोचरा, मोचेमाड घाट, तुळस, रामघाट रोड, बडखोल, निवती मेढा, देवगड तालुक्यातील मोर्वे, नारिग्रे, दहिबाव, पाळेकरवाडी, पोयरे, मुणगे, खुडी, कुवळे, तोरसोळे, सादशी, गढीताम्हाणे, कुडाळ तालुक्यातील वालावल, कवठी, नेरुर कर्याद नारुर, घोटगे, दुर्गानगर, भरणी, मालवण, वरचीवाडी, गावठणवाडी, खालची गावडेवाडी, अशा एकूण ४३ गावांचा समावेश आहे. सर्वेक्षणानुसार या गावांत दरड कोसळण्याची शक्यता आहे.
राज्य, राष्ट्रीय महामार्गावरील दरड प्रवण ठिकाणे 
देवगड उपविभाग-विजयदुर्ग, पडेल जामसंडे, कुणकेश्वर आचरा-मालवण-रेवस रेवंडी रस्ता (प्रमुख राज्यमार्ग) देवगड निपाणी रस्ता राक्षस घाटी (राज्यमार्ग) वैभववाडी उपविभाग-गगनबावडा, मुईबावडा खारेपाटण रस्ता भुईबावडा घाट (राज्यमार्ग) पडेल वाघोटण तळेरे गगनबावडा कोल्हापूर रस्ता-करुळ घाट (राष्ट्रीय महामार्ग), कणकवली उपविभाग-देवगड निपाणी रस्ता फोंडाघाट पडेल वाघोटन तळेरे रस्ता (राज्यमार्ग) सावंतवाडी उपविभाग वेंगुर्ले-सावंतवाडी-आंबोली बेळगाव-आंबोली घाट (राष्ट्रीय महामार्ग.)
कोकण रेल्वे मार्गावरील दरडग्रस्त ठिकाणे 
वैभववाडी-लाडवाडी अॅप्रोच कटिंग, गोपालवाडी अॅप्रोच डिप कटिंग, चिंचवली डिप कटिंग, बेर्ले टनेल, वैभववाडी आणि देवगड-नापणे कटिंग, देवगड आणि कणकवली-बेळणा, कणकवली आणि कुडाळ-बोर्डवे कटिंग, सावंतवाडी-नेमळे. सद्यस्थितीत या ठिकाणी दरड प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, अति पाऊस झाल्यास या ठिकाणी दरड पडण्याचा धोका संभवत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या विशेष गाडीला मुदतवाढ 

   Follow us on        
Konkan Railway: उन्हाळी हंगामासाठी विशेष गाडी म्हणून धावणाऱ्या गाडी  क्रमांक ०७३११/०७३१२ वास्को द गामा – मुझफ्फरपूर – वास्को द गामा  या गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी या आधी धावत असलेल्या वेळापत्रकानुसार आणि डब्यांच्या संरचनेनुसार धावणार आहे.
आठवड्यातून एक दिवस धावणाऱ्या गाडीची मुदत दिनांक ०५ जून २०२५ रोजी संपत होती तिला आता २६ जून  २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
गाडी क्रमांक ०७३११ वास्को द गामा – मुझफ्फरपूर साप्ताहिक विशेष गाडीची मुदत दिनांक ०२/०६/२०२५ पर्यंत होती तिला मुदतवाढ देण्यात आली असून ती दिनांक २३/०६/२०२५ पर्यंत धावणार आहे.
गाडी क्रमांक ०७३१२ मुझफ्फरपूर – वास्को द गामा साप्ताहिक विशेष गाडीची मुदत दिनांक ०५/०६/२०२५ पर्यंत होती तिला मुदतवाढ देण्यात आली असून ती दिनांक २६/०६/२०२५ पर्यंत धावणार आहे.
गाडी क्रमांक ०७३११ वास्को द गामा – मुझफ्फरपूर जंक्शन साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल ०९/०६/२०२५ ते २३/०६/२०२५ पर्यंत दर सोमवारी वास्को द गामा येथून दुपारी ४:०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १२:३० वाजता मुझफ्फरपूर जंक्शनला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०७३१२ मुझफ्फरपूर जंक्शन – वास्को द गामा साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल मुझफ्फरपूर जंक्शन येथून सुटेल. १२/०६/२०२५ ते २६/०६/२०२५ पर्यंत दर गुरुवारी १४:४५ वाजता मुझफ्फरपूर जंक्शन येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १४:५५ वाजता वास्को द गामाला पोहोचेल.
ही गाडी मडगाव जंक्शन, थिविम, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण जंक्शन, मनमाड जंक्शन, भुसावळ जंक्शन, खांडवा जंक्शन, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर जंक्शन, प्रयागराज, छे इथं थांबेल. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर जंक्शन या स्थानकांवर थांबेल
डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच = टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०५ कोच, स्लीपर – १२ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

कोकण रेल्वेचे विलीनीकरण, दुपदरीकरण आणि इतर विषयांसाठी खासदार रवींद्र वायकर यांची रेल्वे मंत्र्यांशी भेट

   Follow us on        
Konkan Railway:कोकण रेल्वेचे विलीनीकरण, दुपदरीकरण आणि इतर विषयांसाठी खासदार रवींद्र वायकर यांनी काल  केंद्रीय रेल्वेमंत्री मा. श्री.अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलून जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ स्टेशन करण्याबाबत तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याबाबत निवेदन दिले.
याचबरोबर त्यांनी अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत गोरेगाव स्थानकाचा विकास करण्यात यावा तसेच कोकण रेल्वे बोर्डाचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याविषयी चर्चा केली.

खासदार रवींद्र वायकर यांनी दिलेली निवेदने

Rajapur: अणूस्कुरा घाटात दरडीचा दगड अचानक रस्त्यावर

   Follow us on        
Rajapur: अणूस्कुरा घाटात सोमवारी एक मध्यम स्वरूपातील दगड रस्त्यावर येऊन पडला होता. स्थानिक ग्रामस्थांनी वाहन चालकांच्या सहकाऱ्याने तो दगड तत्काळ हटविला. मात्र सुदैवाने यादरम्यान तिथून कोणतंही वाहन जात नसल्याने अनर्थ टळला.
अणूस्कुरा घाट वाहतूकीसाठी जरी अनुकूल वाटत असला तरी केव्हा दरड कोसळेल याचा काही नेम नाही, अशी स्थिती असते. गेल्या वर्षी दरड कोसळून मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर येऊन पडला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने तो वेळीच हटवून घाटमार्गे वाहतूक पूर्ववत सुरु केली होती.
अणूस्कुरा घाट (Anuskura Ghat) हा रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा एक घाट आहे. हा घाट रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात आहे. अणुस्कुरा घाट कोकण आणि घाटमाथा यांना जोडतो, कोल्हापूरला जाण्यासाठी हा एक सोपा मार्ग आहे, त्यामुळे हा घाट कोल्हापूर जिल्ह्यासाठी देखील महत्त्वाचा आहे. मात्र पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या शक्यता असल्याने हा मार्ग धोकादायक बनतो.

Konkan Railway Merger: कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाचा अट्टाहास, सामान्य युवकांच्या लढाईला मुख्यमंत्र्यांची साथ..!!

– ‎अवघ्या २० महिन्यात केलेल्या कामांना थेट मुख्यमंत्र्यांकडून पोच.

   Follow us on        

‎सुरुवात ऑगस्ट २०२३, ज्या प्रकारे सावंतवाडी टर्मिनस संदर्भात सावंतवाडीतील काही तरुणांनी आवाज उठवायला सुरुवात केली होती त्याच वेळी कोकणातील इतर ठिकाणी ही कोकण रेल्वेत असणाऱ्या गैरसुविधांबद्दल दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती, कारण होते तिकिटांचा काळाबाजार, गाड्यांना होणारा ३ ते ४ तासाचा विलंब आणि गणेशोत्सव काळात उडणारा रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार, कोकणात टर्मिनस नसल्याने बाप्पा जरी कोकणात येत असला तरी गाड्या मात्र उत्तरेत गुजरातला आणि दक्षिणेत मंगलोर पर्यंत सोडल्या जात होत्या आणि आहेत. कोकणी चाकरमानी रेल्वेने आपल्या गावी येताना असंख्य त्रासाला सामोरे जायचा.कोकणी माणसाने या प्रकल्पासाठी आपली जमीन कवडीमोलाने दिली खरी परंतु त्याचा बदलीला मिळाले काय तर फक्त शेळ्या मेंढरा सारखा प्रवास..

‎जसा टर्मिनस संदर्भातील आवाज वाढत गेला तसा टर्मिनस उभारण्याकरिता कोकण रेल्वे कडे निधी नाही ही वास्तविकता समोर आली, फक्त टर्मिनसच नाही तर काही ठिकाणी दोन प्लॅटफॉर्म जोडणारे ब्रीज (FOB) नाहीत, तर काही ठिकाणी निवारा शेडच नाही, छोट्या स्थानकांवर तर प्लॅटफॉर्म देखील नाहीत. दरवर्षी रेल्वे करिता हजारो कोटींचा निधी अर्थसंकल्पात जाहीर होत असताना कोकणात ह्या साध्या साध्या परंतु आवश्यक असणाऱ्या गोष्टींकडे रेल्वे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष कोकणी माणसाला पचनी पडत नव्हते, यावेळी मात्र मुंबईतील व कोकणातील काही युवकांकडून सोशल मीडियावर प्रशासनाला विचारणा करण्यात आली, परंतु याचे खरे कारण काही कळत नव्हते.पुढे माहितीच्या अधिकाराचा वापर करून या युवकांनी याबाबतची पुरेपूर माहिती गोळा केली,व थेट कोकण रेल्वेच्या जन्मापर्यंत येऊन पोचले. तेच म्हणजे “बांधा वापरा आणि हस्तांतरित करा”.

कोकण रेल्वे मार्गावर असणाऱ्या या असुविधांबद्दल एक ठोस कारण निघाले ते म्हणजे कोकण रेल्वे महामंडळ. संपूर्ण देशात असणारी रेल्वे आणि कोकणात असणारी रेल्वे ह्या दोन वेगळ्या बाबी आहेत हे प्रथमदर्शनी लक्षात आले,संपूर्ण देशात धावणारी रेल्वे ही भारतीय रेल्वेचा भाग असून कोकणातील रेल्वे ही ४ राज्ये आणि रेल्वे मंत्रालयाने मिळून बनविलेल्या महामंडळाच्या अधिकाराने चालते हे समजले, त्यात अती महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशाच्या अर्थसंकल्पात कोकण रेल्वे महामंडळाला निधीची थेट तरतूद होत नाही हे स्पष्ट झाले.सबब त्याचा परिणाम कोकणातील रेल्वे संदर्भातील विकासकामांवर पडला, त्याच कारणाने सावंतवाडी टर्मिनस तब्बल १० वर्षे अर्धवट स्थितीत रखडले आहे.खरे कारण कळल्यावर हे महामंडळ कोकण विकासाच्या उरावर तर बसले नाही ना असा सवाल कोकणी जनतेला पडू लागला. त्यातच केंद्राने अमृत भारत स्थानक योजना जाहीर केली.परंतु कोकणवासीयांचे दुर्दैव असे की कोकणातील एकाही स्थानकाचा समावेश या योजनेत केला गेला नाही.कारण होते हे महामंडळ, आणि त्याचा कारभार.

‎जेव्हा हे कळून चुकले की महामंडळ हे आपण तोट्यात आहे हे कारण दाखवून आपल्या जबाबदारीला टाळत आहे, या महामंडळावर ६ हजार कोटींचे कर्ज आहे हे समजल्यावर मात्र या युवकांनी अनेक प्रवासी संघटनांना जागे केले, सावंतवाडीतून कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे मिहिर मठकर, सागर तळवडेकर, भूषण बांदिवडेकर,मुंबईतून कोकण विकास समितीचे अक्षय महापदी, कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे राजू कांबळे, महामार्ग जनआक्रोश चे संजय सावंत, कृती समितीचे मनोज सावंत,अखिल कोकणचे तानाजी परब, निसर्गरम्य संगमेश्वर चे संदेश जिमन आदी युवकांनी अनेक संघटनांना एकत्र करून अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची स्थापना केली.

‎सावंतवाडी प्रवासी संघटनेकडून तत्कालीन शिक्षण मंत्री व आमदार श्री दीपक केसरकर यांची २६ डिसेंबर २०२३ रोजी भेट घेण्यात आली, त्याला प्रतिसाद म्हणून लगेच शिक्षणमंत्र्यांनी ही बाब रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेउन कानावर टाकली आणि विलीनीकरणाला वाचा फोडली, त्याच जोडीला तत्कालीन केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा खासदार श्री नारायण राणे साहेबांनी देखील ०३ जानेवारी २०२४ रोजी माध्यमांशी बोलताना हे महामंडळ कर्जाच्या खाईत आहे त्यामुळे कोकणातील रेल्वे विकास या महामंडळाकडून होऊ शकत नाही असे स्पष्ट केले, व याचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण व्हायला हवे अशी भूमिका जाहीर केली. त्यानंतर तत्कालीन खासदार श्री विनायक राऊत यांनी २०२४ सालच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावे अशी मागणी संसदेच्या प्रश्नोत्तराच्या तासात केली. हीच ती वेळ जेव्हा कोकणातील तत्कालीन मंत्री, आमदार, खासदारांनी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावे अशी स्पष्ट भूमिका जाहीर केली होती. दरम्यान ०९ सप्टेंबर २०२३ व ३० नोव्हेंबर २०२३ रोजी मुंबईस्थित कोकण विकास समितीचे श्री अक्षय महापदी यांनी विलीनीकरण संदर्भात आवश्यक आणि अभ्यासपूर्ण असे निवेदन तयार करून ते रेल्वेमंत्री, वित्तमंत्री, मुख्यमंत्री आदींना पाठवले होते. २६ जानेवारी २०२४ रोजी सावंतवाडी संघटनेकडून सावंतवाडी स्थानकावर हजारो लोकांचा उपस्थितीत परिपूर्ण सावंतवाडी टर्मिनस आणि कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण व्हावे यासाठी आंदोलन करण्यात आले, या आंदोलनाला कोकण रेल्वेचे विलिनीकरण व्हावे या मुद्द्यावर रेल्वे एम्प्लॉयीज युनियनच्या श्री उमेश गाळवणकर यांनी पाठिंबा दर्शविला.या आंदोलनाने कोकण रेल्वेचे विलीनीकरण का आवश्यक आहे हे कोकणवासीयांना समजले गेले.

‎यानंतर झालेली लोकसभा निवडणूक, पदवीधर निवडणुकीत देखील या युवकांनी सोशल मिडिया, वृत्तपत्रे, इतर प्रसार माध्यमांचा पुरेपूर वापर करून जनजागृती केली. त्यातच कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे श्री राजू कांबळे यांनी ठाणे येथे कोकण पदवीधर निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान तत्कालीन उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कोकणासाठी विलीनीकरण का महत्त्वाचे आहे हे पटवून दिले. त्यानंतर नवनियुक्त कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार श्री निरंजन डावखरे तसेच खासदार श्री रवींद्र वाईकर यांची अखिल कोकणच्या तानाजी परब यांनी भेट घेऊन विलीनीकरण हा विषय मार्गी लावा असे निवेदन दिले. दरम्यान महामार्ग जन आक्रोशच्या राजाराम कुंडेकर यांनी आमदार श्री फातर्पेकर यांची भेट घेऊन हा विषय त्यांचा समोर मांडला.
‎१२ जुलै २०२४ रोजी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मार्फत भव्य मेल मोहीम आयोजित करण्यात आली, त्यात परिपूर्ण सावंतवाडी टर्मिनस व कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण व्हावे हे दोन प्रमुख मुद्दे कोकणवासीयांचा मोबाईल मधून सर्व संबंधित मंत्री, खासदार, आमदार व शासकीय विभागांना मेल द्वारे पाठवण्यात आले.या मेल मोहिमेला एकूण ४५०० कोकणवासीयांनी प्रतिसाद दिला. तंत्रज्ञानाचा वापर करून त्याला सोशल मिडियाची जोड देऊन अक्षय महापदी, सागर तळवडेकर, व मिहिर मठकर यांनी कोकणवासीयांमध्ये कोकण रेल्वे महामंडळाचे विलिनीकरण का महत्त्वाचे आहे हे पटवून दिले.

‎१५ ऑगस्टला सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेकडून सावंतवाडी स्थानकावर घंटानाद करण्यात आला, त्याआधी १४ तारखेला पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण यांचा जनता दरबारात देखील विलीनीकरणचा मुद्दा उपस्थित केला गेला. दोन्ही वेळी हा विषय नक्कीच कॅबिनेट मध्ये घेतला जाईल असे तत्कालीन पालकमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.पुढे ५ सप्टेंबर २०२४ रोजी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर तत्कालीन शिक्षणमंत्री श्री दीपक केसरकर यांचा अध्यक्षेखाली प्रवासी संघटना सावंतवाडी आणि कोकण रेल्वे अधिकाऱ्यांसोबत टर्मिनस संदर्भात बैठक झाली या बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोकण रेल्वेवर ६ हजार कोटींचे कर्ज आहे, त्यामुळे हे महामंडळ टर्मिनस परिपूर्ण करू शकत नाही असे मंत्री केसरकर यांचा समोर स्पष्ट केले आणि हा विषय महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मधे घ्यावा अशी विनंती करण्यात आली. पुन्हा २७ सप्टेंबर २०२४ रोजी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आयोजित पालकमंत्र्यांचा जनता दरबारात देखील कोकण रेल्वेचे विलीनीकरण आणि सावंतवाडी टर्मिनस संदर्भात तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार दीपक केसरकर यांचे लक्ष वेधण्यात आले.

‎कोकण रेल्वेचे विलिनीकरण व्हावे ही मागणी ज्या प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत होती त्याच प्रमाणे मुंबईत आणि संपूर्ण कोकणात देखील वाढावी ह्या हेतूने अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती महाराष्ट्र या २२ संघटनाच्या शिखर समितीच्या माध्यमातून श्री अक्षय महापदी, श्री राजू कांबळे, श्री सागर तळवडेकर यांचा मेहनतीने १ ऑक्टोंबर २०२४ रोजी मुंबई प्रेस क्लब मध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली.या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित पत्रकारांना आणि कोकणी जनतेला कोकण रेल्वे महामंडळ भारतीय रेल्वेत का विलीन व्हावे आणि त्याचे फायदे आणि तोटे समजवण्यात आले.कोकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, उंच फलाट, शेड, सावंतवाडी टर्मिनस,आवश्यक तेथे पिट लाइन्स आदींसाठी फक्त निधीची आवश्यकता आहे आणि सद्यस्थितीत महामंडळ हे तोट्यात असल्याने हे फक्त अशक्य आहे हे उपस्थितांना समितीच्या वतीने पटवून देण्यात आले.या पत्रकार परिषदेतून महाराष्ट्र राज्याचात वाट्यातील २२ टक्के (३९६ कोटींची) हिस्सेदारी केंद्राला हस्तांतरित करावायू किंवा महाराष्ट्र हद्दीतील रेल्वेला आवश्यक असणारी कामे आपण करावी अशी विनंती महाराष्ट्र राज्य शासनाला करण्यात आली. याला जोड म्हणून १४ ऑक्टोबर २०२४ रोजी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती महाराष्ट्रच्या माध्यमातून कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून कोलाड ते मडूरे (रत्नागिरी विभाग) हा मध्य रेल्वेला हस्तांतरित करण्यासाठी भव्य ईमेल मोहीम राबवण्यात आली.या ईमेल मोहिमेचा प्रभाव एवढा पडला की ०२ डिसेंबर २०२४ रोजी हिवाळी अधिवेशनात खासदार श्री धैर्यशील पाटलांनी हा विषय राज्यसभेत मांडला.तसेच ०४ डिसेंबर रोजी वायव्य मुंबईचे खासदार श्री रवींद्र वाईकरांनी हा विषय लोकसभेत मांडला, याच बरोबर २९ मार्च २०२५ ला ठाण्याचे खासदार श्री नरेश म्हस्के यांनी देखील लोकसभेत विलीनीकरणाची मागणी केली.

‎८ नोव्हेंबर २०२४ रोजी दादर येथे संगमेश्वरचे संदेश जिमन आणि सावंतवाडीच्या विनोद नाईकांनी रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली, स्थानिक विषयांसोबत कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती वजा मागणी करण्यात आली. यानंतर श्री विनोद नाईक यांनी कोकण रेल्वेचे विलीनीकरण आणि सावंतवाडी टर्मिनस संदर्भात कल्याण पूर्व च्या आमदार श्रीमती सुलभा गायकवाड यांची भेट घेतली, त्याच दिवशी नवनियुक्त पालकमंत्री सिंधुदुर्ग श्री नितेश राणे यांची देखील भेट घेण्यात आली.आणि हा विषय त्यांचा देखील कानावर घालण्यात आला.

‎१४ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी कडून आपले सरकार या महाराष्ट्र शासनाच्या तक्रार निवारण प्रणाली वर सावंतवाडी टर्मिनस आणि कोकण रेल्वेच्या विलिणीकरणासंदर्भात असंख्य तक्रारी दाखल करण्यात आल्या.त्यालाच अनुसरून ११ मार्च २०२५ रोजी विधानपरिषदेचे आमदार श्री प्रवीण दरेकर यांनी कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करावे ही मागणी विधानपरिषदेत केली.त्याला प्रत्युत्तर म्हणून १९ मार्च रोजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मंजुरी असल्याची घोषणा विधानपरिषदेत केली. मुख्यमंत्री फक्त घोषणा करून थांबले नाहीत तर त्यांनी ११ एप्रिल रोजी रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांचा समवेत झालेल्या पत्रकार परिषदेत याचा पुनरुच्चार केला. आणि तश्या आशयाचे पत्र पाठवून त्यावर शिक्कामोर्तब देखील केला.

‎जजो पर्यंत कोकण रेल्वेचे विलीनीकरण होत नाही तो पर्यंत कोकणात रेल्वेच्या माध्यमातून विकास होणार नाही, केंद्राचा रेल्वे विषयक योजना याठिकाणी येणार नाहीत, दुपदरीकरण, सावंतवाडी टर्मिनस आदींसारखे महत्त्वाचे विषय मार्गी लागणार नाहीत हे सत्य आहे.आणि हेच मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी हेरले आणि त्यावर लगेच कार्यवाही देखील केली, यासाठी कोकणवासियांतर्फे मुख्यमंत्र्याचे आभार.

Mumbai Goa Highway Accident: खाजगी बसला डंपरची धडक बसल्याने अपघात

   Follow us on        
Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर अपघाताची मालिका संपताना दिसत नाही आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महमार्गावर तुरळ येथे खासगी आराम बस आणि डंपरची धडक बसल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या अपघतात जीवितहानी झाली नाही आहे.
गणपतीपुळे येथून कोपरखैरणेकडे निघालेल्या आराम बसची तुरळ फाटा येथे डंपरला मागून धडक बसल्याने बसचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर डंपर चालक पसार झाला. कडवईत जाणारा डंपर (एमएच १२ डब्ल्यू जे ४७५१) तुरळ फाटा येथून वळत असताना मागून आलेली ट्रॅव्हल बस (एमएच ४३ सीइ ४२९३) धडकल्याने बसचे मोठे नुकसान झाले. यात चालकासह बसमधील काही प्रवासी जखमी झाले. जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. अपघात झाल्यानंतर डंपर चालक पसार झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.

Konkan Railway: चाकरमान्यांचा परतीचा प्रवास ‘खडतर’

   Follow us on        

Konkan Railway: कोकणात उन्हाळी सुट्टीसाठी गावी गेलेले चाकरमानी आता परतीच्या मार्गाला लागले आहेत. मात्र अचानक पाऊस सुरू झाल्याने रेल्वेच्या बिघडलेल्या वेळापत्रकामुळे त्यांना हा प्रवास खडतर आणि त्रासदायक ठरत आहे.

अवकाळी पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला असून बर्‍याच गाड्या आपले वेळापत्रक सोडून धावत आहेत. त्यामुळे 9 ते 10 तासांचा प्रवास 13-14 किंवा त्यापेक्षा जास्त तासांवर आला आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या कोकण कन्या एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस सुमारे दोन ते तीन तास उशिराने तर आठवड्यातुन चार दिवस धावणारी  मडगाव – एलटीटी एक्सप्रेस उशीरा धावण्याचे आपलेच विक्रम मोडत आहे. मागच्या आठवड्यात तर दोन वेळा ही गाडी 8 ते 10 तास उशिराने (चालत?) धावत होती. या गाड्यांसाठी एकच रेक असल्याने, पेअरींग ट्रेन उशिरा आल्यास आरंभ स्थानकावरून गाड्या उशिराने सुटत आहेत. पुढे लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य देवून या गाड्या अजून रखवडल्या जातात.

प्लॅटफॉर्म वर शेड नसल्याने त्रास

अनेक स्थानकांवर प्लॅटफॉर्मवर शेड नसल्याने प्रवाशांना पावसात भिजत गाडी पकडावी लागत आहे. गाडीची घोषणा झाल्यानंतर ती गाडी येईपर्यंत प्लॅटफॉर्म वर सामान सांभाळत गाडीची वाट पहावी लागत आहे. मुसळधार पावसात दोन्ही हातात सामान घेऊन भिजत भिजत गाडी पकडावी लागत आहे. कोकणातील स्थानकांना विमानतळांसारखे स्वरूप देण्यात आले पण प्लॅटफॉर्म शेड सारख्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याकडे मात्र दुर्लक्ष केले गेल्याने प्रवासी वर्ग नाराज आहे.

प्रवास ‘वेटिंग’ वरच
कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या गाड्यांचे कन्फर्म तिकीट भेटणे म्हणजे एक दिव्यच मानावे लागेल अशी परिस्थिती सध्या आहे. कोटा कमी, त्यात दलालांचा सुळसुळाट त्यामुळे सामान्य प्रवाशांना सहजासहजी आरक्षित तिकीट उपलब्ध होत नाही. त्यामुळे हा परतीचा प्रवास त्यांना सामान्य कोच मध्येच करावा लागत आहे.

‘कोकणी रानमाणूस’ प्रसाद गावडे यास यूआरएल फाऊंडेशनचा सामाजिक गौरव पुरस्कार जाहीर

   Follow us on    

 

 

कोकणातील शाश्वत जीवन शैलीचे महत्व देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या, तळकोकणातील ‘रानमाणूस’ म्हणून ओळखला जाणाऱ्या प्रसाद गावडे यास यूआरएल फाऊंडेशनचा यावर्षीचा सामाजिक गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
सावंतवाडी तालुक्यातील, सांगेली गावातील जायपेवाडीत राहणाऱ्या प्रसाद गावडेने आज कोकणी रानमाणूस म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोकणातील पर्यटन, इथली खाद्यसंस्कृती, जीवनशैली, शेती याबद्दलची माहिती प्रसाद आपल्या कोकणी रानमाणूस या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. चांगल्या पगाराची नोकरी सोडून या इंजिनिअर तरुणाने इकोटूरिझमच्या माध्यमातून स्वंयरोजगाराची वाट धरली. कोकणाच्या शाश्वत विकासाबद्दल बोलताना प्रसाद तितक्याच परखडपणे स्थानिक प्रश्नही प्रशासनासमोर मांडतो म्हणूनच तो असामान्य ठरत आहे. त्याच्या या कार्याची दखल घेण्यात आली असून त्याला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
रोख रक्कम रुपये एक लाख आणि सन्मानचिन्ह असे या  पुरस्काराचे स्वरूप आहे. दिनांक २९ मे रोजी यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा मुंबई येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
युआरएल फाउंडेशनबाबत 
उदयदादा लाड यांनी स्थापना केलेल्या युआरएल (उदयदादा राजारामशेठ लाड) फाउंडेशनतर्फे  मुख्यत्वेकरून समाजातील साहित्य आणि सामाजिक कार्य करणाऱ्या निस्वार्थी व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक निधीतून हे पुरस्कार दरवर्षी वितरित केले जातात. महाराष्ट्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या पात्र सामाजिक कार्यकर्त्यांना आणि स्वयंसेवी संस्थांना ‘१,००,००० (एक लाख)’ बक्षीस देण्याचा वारसा यूआरएल फाउंडेशनने सुरू ठेवला आहे.

Panvel: पनवेल स्थानकावरून जाणार्‍या गाड्यांची वाहतुक जलद करण्यासाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

   Follow us on    

 

 

पनवेल: मुंबईत रेल्वेची क्षमता वाढवणे आणि रेल्वे वाहतूक सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने, रेल्वे मंत्रालयाने पनवेल-सोमाटणे आणि पनवेल-चिखलीदरम्यान एकूण ७.५४ किमी लांबीच्या पनवेल कॉर्ड लाइन्स बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यासाठी ४४४.६४ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प मध्य रेल्वेकडून राबविला जाईल. पनवेल हे मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर मार्गावरील एक महत्त्वाचे टर्मिनल आहे. उत्तरेकडे दिवा, दक्षिणेकडे रोहा, पश्चिमेकडे जेएनपीटी आणि पूर्वेकडे कर्जत महत्त्वाचे जंक्शन आहे. सध्या, ग्रेड सेपरेटेड क्रॉसिंग नसल्यामुळे इंजिन रिव्हर्सने वाहतुकीसाठी विलंब होतो. यावर मात करण्यासाठी, दोन कॉर्ड लाइन्स प्रस्तावित केल्या होत्या. आता त्यांना मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे पनवेल स्थानकाहून होणारी वाहतूक जलदगतीने होणार आहे.
खालील दोन कॉर्ड लाइन्सना मान्यता देण्यात आली आहे. 
१)जेएनपीटी ते कर्जत कॉरिडॉरवर दिवा-पनवेल लाइन फ्लायओव्हर मार्गे कॉर्ड लाइन
२) काळटुंरीगाव केबिन आणि सोमाटणे स्थानकादरम्यान कॉर्ड लाइन

Remote control lifebuoy: पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविणाऱ्या यंत्राचे नवबाग येथे प्रात्यक्षिक

   Follow us on    

 

 

सिंधुदुर्ग: समुद्र किनारपट्टीवर पाण्याचा अंदाज न आल्याने नागरिक बुडण्याच्या घटना घडत असतात. अशा बुडणाऱ्या व्यक्तींना मनुष्याचा सहभाग न घेता रिमोट द्वारे वाचविण्याचे यंत्र पुणे येथील एका कंपनी द्वारे बनवण्यात आले आहे. समुद्रात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविणारे “रिमोट कार्स्ट फॉर लाइफ सेव्हिंग युनिट” (दूरनियंत्रित जीवन रक्षक यंत्र) रिमोट द्वारे नियंत्रित करून बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवते.  पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार वेंगुर्ले नवाबाग समुद्र किनारी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत समुद्रात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविणारे “रिमोट कार्स्ट फॉर लाइफ सेव्हिंग युनिट” (दूरनियंत्रित जीवन रक्षक यंत्र) या यंत्राचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आले.
स्वतः जिल्हाधिकारी यांनीही रिमोट द्वारे या यंत्राची माहिती घेऊन कृतीद्वारे अनुभव प्रात्यक्षिक अनुभवले. कंपनीचे पुणे येथील भूषण चिंचोले यांनी वेंगुर्ले नवाबाग समुद्रात या यंत्राचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी यांना करून दाखविले. यावेळी रिमोट वर चालणाऱ्या या यंत्राचे प्रात्यक्षिक बघितल्या नंतर जिल्हाधिकारी यांनी त्याच स्वतः वापरून प्रात्यक्षिक केले आणि सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनीष दळवी, तहसीलदार ओंकार ओतारी, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, मंडळ अधिकारी विनायक कोदे, तलाठी सायली आदुर्लेकर, भाजप वेंगुर्ले तालुका अध्यक्ष पप्पू परब, मच्छीमार नेते वसंत तांडेल, तसेच पोलीस पाटील, कोतवाल, नागरिक उपस्थित होते.
हे यंत्र समुद्रात दीड किलो मीटर पर्यंत बुडणाऱ्या व्यक्ती पर्यंत जाऊ शकते. एका वेळी तीन व्यक्तींना समुद्राच्या पाण्यावर आपल्या सोबत तरंगत ठेऊ शकते. तसेच एक व्यक्ती बुडत असेल तर त्या व्यक्तीला तरंगत पकडून किनाऱ्यापर्यंत आणू शकते.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search