सिंधुदुर्ग: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांची आणि ग्राहकांची ‘देवगड हापूस’च्या नावाखाली होणारी मोठी फसवणूक उघडकीस आली आहे. कणकवली तालुक्यातील ओसरगाव टोलनाक्याजवळ काही विक्रेते महामार्गाच्या कडेला स्टॉल लावून कर्नाटकवरून आणलेला आंबा अस्सल देवगड हापूस सांगून विकत होते. विशेष म्हणजे ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी देवगड हापूसचे ब्रँडिंग असलेल्या पेट्यांचा वापर केला जात होता. मात्र, शनिवार २३ मे रोजी संध्याकाळच्या सुमारास स्थानिक आंबा बागायतदार आणि जागरूक नागरिकांनी या स्टॉलवर अचानक धाड टाकत या काळ्या धंद्याचा पर्दाफाश केला.
संशयावरून नागरिकांनी जेव्हा आंब्याच्या बॉक्सची बारकाईने पाहणी केली, तेव्हा त्यामध्ये खाली कर्नाटक (कन्नड) भाषेतील वृत्तपत्रांचे रद्दी कागद अंथरल्याचे उघड झाले. तसेच त्यातील आंबे हे हापूस नसून परराज्यातील असल्याचे स्पष्ट झाले. या लबाडीमुळे संतापलेल्या स्थानिक नागरिकांनी संबंधित विक्रेत्याला चांगलाच जाब विचारला. हा राडा पाहून महामार्गावरील इतर स्टॉलधारकांनीही कारवाईच्या भीतीने आपले आंबे घाईघाईने टेम्पोमध्ये भरून तिथून पळ काढला.
सध्या कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी आधीच विविध नैसर्गिक व आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. त्यातच अशा प्रकारे परराज्यातील स्वस्त आंबे देवगडच्या नावावर खपवले जात असल्याच्या तक्रारी देवगड आंबा-काजू बागायतदार संघटनेकडे सातत्याने येत होत्या. या बनावटगिरीमुळे मूळ देवगड हापूसच्या बाजारपेठेचे आणि नावाचे मोठे नुकसान होत असून, स्थानिक शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसत असल्याची चिंता यावेळी बागायतदारांनी व्यक्त केली.


