वैभववाडी:रेल्वेची जोरदार धडक बसल्याने नाधवडे-हेलकरवाडी येथील अमोल प्रकाश खांडेकर (वय ३६) या युवकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही भीषण घटना सकाळी साडेआठच्या सुमारास शुकनदी पुलाजवळ घडली. अमोल खांडेकर हे मुंबईतील चिंचपाडा परिसरात आपल्या आई, पत्नी आणि मुलीसह राहत होते आणि एका नामांकित कंपनीत नोकरीला होते. ते आपल्या मालकीच्या जमिनीत काजू लागवडीची पूर्वतयारी करण्यासाठी गावी आले होते.
रविवारी सकाळी ते कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबईहून वैभववाडी रेल्वे स्थानकावर उतरले आणि तिथून पायीच घराच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, शुकनदी पुलाजवळ पोहोचताच गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या निस्सार एक्सप्रेसची त्यांना जोरदार धडक बसली, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर संबंधित एक्सप्रेस सुमारे तासभर घटनास्थळी थांबवण्यात आली होती, ज्यामुळे रेल्वे वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता.
लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळेच अपघात; ग्रामस्थांचा आरोप
या भीषण अपघातानंतर हेलकरवाडी परिसरातील स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या वाडीत जाण्यासाठी दुसरा कोणताही पर्यायी रस्ता उपलब्ध नाही. रस्त्याअभावी येथील लोकांना जीव मुठीत धरून रेल्वे रुळावरून किंवा पुलावरूनच ये-जा करावी लागते आणि याच मुख्य कारणामुळे हा भीषण अपघात घडला आहे. अनेक वर्षांपासून स्थानिक लोकप्रतिनिधींकडे हक्काच्या पर्यायी रस्त्यासाठी वारंवार तक्रारी व मागण्या करण्यात आल्या आहेत, मात्र लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या याच उदासीनतेमुळे आज एका निष्पाप युवकाला आपला जीव गमवावा लागल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस दलाचे अधिकारी प्रवीण मोरे यांनी वैभववाडी पोलिसांना तात्काळ कल्पना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक मनोज सोनलवलकर, पोलीस हवालदार धनाजी धडे व उद्धव साबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. अपघाताची माहिती मिळताच अमोल खांडेकर यांचे मुंबईतील नातेवाईक गावी रवाना झाले आहेत. त्यांच्या या अचानक जाण्याने हेलकरवाडी परिसरात आणि खांडेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावातून पर्यायी रस्त्याची मागणी आता अधिक आक्रमकपणे केली जात आहे.


