Mumbai-Goa Vande Bharat Express |वंदे भारत एक्सप्रेसला खेड स्थानकावर थांबा देण्यात यावा यासाठी जल फाऊंडेशन आणि कोकण विकास समितीने कंबर कसली होती. या एक्सप्रेसला खेड तालुक्यात थांबा न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा पण या संघटनांनी दिला होता. त्याचा पाठपुराव्याला यश मिळणार असल्याचे दिसत आहे, कारण वंदे भारत एक्सप्रेसला या स्थानकावर थांबा मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यादृष्टीने मंगळवारी खेड स्थानकावर रंगरंगोटी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
दिनांक ३ जून रोजी या गाडीला हिरवा कंदील दाखविला जाणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेस CSMT हून सुटणार असून ती ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कुडाळ आणि त्यानंतर मडगाव अशी जाणार आहे. सिंधुदुर्गमध्ये जाणाऱ्यांसाठी कुडाळ तर रत्नागिरी आणि चिपळूणला जाणाऱ्यांसाठी रत्नागिरी खेड दोन थांबे आहेत अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत अधिकृत माहिती रेल्वे मंत्रालयाकडून लवकरच देण्यात येईल अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
Mumbai-Goa Vande Bharat : सर्व कोकणवासीयांना उत्सुकता लागून राहिलेल्या मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस च्या उद्घाटनाची नवीन तारीख रेल्वे प्रशासनाने जाहीर केली आहे. शनिवारी दिनांक ३ जून रोजी मडगाव स्थानकावरून या गाडीला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले जाणार आहे.
“आमच्याकडे या आधीच आठ डब्यांचा नवा कोरा रेक चेन्नई वरून आला आहे. उद्घाटनाची सर्व तयारी झाली असून शनिवार दिनांक ३ जून रोजी मडगाव स्थानकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून उदघाटन करतील. या प्रसंगी गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत. मुंबई ते गोवा दरम्यान वंदे भारत गाडी सर्वात जलद गाडी ठरणार आहे. हे अंतर कापण्यास तिला फक्त ७ तास लागणार आहेत. या गाडीचे वेळापत्रक आणि थांबे लवकरच जाहीर होणार असून दिनांक ५ जूनपासून ही गाडी या मार्गावर नियमित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जात आहे.” असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
या आधी २९ मे रोजी वंदे भारत एक्सप्रेस ला हिरवा झेंडा दाखविला जाणार असल्याची माहिती समोर आली होती. दिनांक २८ मे रोजी नवा कोरा रेक मडगाव स्थानकावर दाखल झालाही होता, मात्र काही कारणाने ही तारीख पुढे ढकलण्यात आली असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. मात्र आता पुढे आलेली नवीन तारीख रेल्वेतर्फे पाळली जाईल अशी आशा आहे.
रत्नागिरी : ऐन हंगामात कोणतेही कृषी उत्पादन एकाचवेळी मोठ्या प्रमाणात बाजारात आल्यास दर कोसळतात, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. पैशाची निकड असल्याने कमी बाजारभावात उत्पादन विकून त्याला मोठा होतो. यावर उपाय म्हणून रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती Ratnagiri District Agricultural Produce Market Committee व महाराष्ट्र कृषी पणन मंडळ यांच्या संयुक्तपणे दर वर्षी जिल्ह्यात काजू बी Cashew Nut Mortgage Scheme शेतमाल तारण योजना राबवित असते.
ज्या शेतकऱ्यांना पडलेल्या भावात काजू न विकता तारण ठेवायचे आहेत त्यांना हे काजू तारण ठेवून वार्षिक सहा टक्के व्याजदराने कर्ज बाजारभावाच्या कमाल ७५ टक्के रक्कम तारण कर्ज दिले जाते. यासाठी कालमर्यादा सहा महिने (१८० दिवस) एवढी आहे. शेतमाल तारण योजनेत सहभागी होण्यासाठी पीक नोंदणीचा सातबारा, आधारकार्ड, बँक खात्याचा तपशील जोडणे अनिवार्य आहे. तसेच काजू बीची आर्द्रता ५ टक्के असणे अपेक्षित आहे. या योजनेंतर्गत यावर्षी आतापर्यंत १७.५ टन काजू बी तारण ठेवण्यात आला असून, १३ लाखांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.
सध्या ९० रुपये दर सुरू आहे. पावसाळा तोंडावर असल्याने भाव आणखी गडगडण्याची शक्यता आहे. अशावेळी शेतमाल तारण योजना फायदेशीर ठरते. हंगामाच्या प्रारंभी काजूला चांगला दर मिळतो; मात्र जसजशी आवक वाढते, तसेतसे भाव गडगडतात. आता तर हंगाम संपत आला आहे. त्यामुळे दरात घसरण सुरू झाली आहे. आधीच उत्पादन कमी आहे. त्यातच काजू कमी किमतीत विकणे परवडणारे नाही. त्याऐवजी तारण ठेवणे शक्यआहे
मुंबई – गणेशोत्सवानिमित्त मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावर 350 जादा गाड्या सोडण्याची मागणी काल शिवसेनेच्या (उबाठा) शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन केली आहे.
गणेशोत्सव काळात मुंबई, ठाणे या ठिकाणावरून चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात गावी जातात, मात्र अनेक भाविकांच्या हाती रेल्वेचे तिकीट लागले नाही आहे. अनेकांची प्रतीक्षा यादी मध्ये आरक्षण केले नाही आहे अशा प्रवाशांच्या सोयीसाठी ३५० जादा गाड्या सोडून मध्ये सध्या प्रतीक्षा यादीत असलेल्या प्रवाशांना कन्फर्म तिकीट द्या अशी मागणी या शिष्टमंडळाने यावेळी केली. शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांची भेट घेत चाकरमान्यांना रेल्वेचे तिकीट काढताना येणाऱ्या आडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आणले. तसेच दलालांच्या रॅकेटमुळे गाडीचे बुकिंग सुरू होताच फुल होत असल्याची बाब निदर्शनास आणत कारवाईची मागणी केली.
सिंधुदुर्ग | सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे मुंबई – गोवा वंदे भारत एक्सप्रेसला थांबा मिळावा तसेच सावंतवाडी टर्मिनसच्या रखडलेल्या कामात लक्ष घालण्याची मागणी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस कोकण महिलाध्यक्ष अर्चना घारे यांनी केली आहे.
सीएसएमटी ते मडगाव या मार्गावर नव्याने वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत आहे. कोकण रेल्वेच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या या वंदे भारत एक्सप्रेसमुळे मुंबई ते गोवा हा प्रवास अवघ्या ७ तासात पूर्ण करता येणार आहे. या वंदे भारत एक्सप्रेसला ठाणे,चिपळूण ,रत्नागिरी व कुडाळ हेच थांबे देण्यात आले आहेत. मात्र सावंतवाडी सारख्या तळकोकणातील महत्त्वाच्या स्थानकावर मात्र या गाडीला थांबा देण्यात आलेला नाही.आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ही बाब आदरणीय रेल्वेमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिल्यास सावंतवाडी परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय टळणार आहे.तसेच सावंतवाडी हे या रेल्वे मार्गातील प्रमुख स्टेशन असून, परिसरातील पर्यटन स्थळाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे.परंतु सावंतवाडी येथील रेल्वे टर्मिनसचे काम गेल्या ५-६ वर्षांपासून प्रलंबित आहे.तसेच टर्मिनस 2 चे विस्तारीकरणाचे काम देखील प्रलंबित आहे.परिणामी या मार्गावर धावणाऱ्या २५-३० रेल्वे गाड्यांपैकी अवघ्या ९-१० गाड्या सध्या येथे थांबत आहे यामुळे लांबच्या प्रवाशांची संख्या कमी होत असून यामुळे स्थानकाचा दर्जा देखील कमी होण्याची भीती आहे.तरी संबंधित प्रश्नाबाबत आपण सन्माननीय रेल्वे मंत्र्यांना समवेत चर्चा केल्यास सावंतवाडी रेल्वे स्टेशनचे काम पुन्हा पूर्ववत सुरू होऊ शकेल व सावंतवाडी परिसरातील नागरिकांची, पर्यटकांची मोठी गैरसोय दूर होईल , अशी मागणी देखील केली आहे.
यावेळी बोलताना आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,” सावंतवाडी रेल्वे स्टेशनचे टर्मिनल दुरुस्तीचे काम तसेच वंदे भारत एक्सप्रेसला थांबा मिळण्याची मागणी हे दोन्ही अत्यंत आवश्यक व तातडीचे कामे आहेत. याबाबत आपण स्वतः सन्माननीय रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असून लवकरच सावंतवाडी परिसरातील नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे”.
सिंधुदुर्ग | सिंधुनगरीत काल रविवारी सायंकाळी प्रशासकीय संकुलानजीक असलेल्या बीएसएनएलच्या टॉवरला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत टॉवरवरील केबल व दूरसंचार विभागाचे स्क्रॅप मटेरियल जळून खाक झाले.
टॉवरच्या खाली वाढलेल्या गवतामुळे टॉवरला आग.
प्रशासकीय संकुलानजीकच बीएसएनएलचा टॉवर व कार्यालयीन इमारत तसेच निवासस्थाने आहेत. सध्या बीएसएनएल विभागाने ही मालमत्ता दुर्लक्षित केल्यामुळे वाढलेल्या गवतास रविवारी (दि. २८) सायंकाळी सव्वा ७ च्या दरम्यान लागलेली आग बीएसएनएलच्या टॉवरपर्यंत पोहोचली. या आगीने रौद्ररूप धारण केले. दरम्यान कुडाळ एमआयडीसीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. त्यानंतर कुडाळ नगरपंचायतीचे अग्निशमन दल पोहचले. या आगीत बीएसएनएलच्या स्क्रॅप मटेरियलचे हे फार मोठे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे बीएसएनएल विभागाच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा निदर्शनास आला आहे. या टॉवरच्या खाली वाढलेले गवत आधीच साफ केले असते तर ही आग टॉवरपर्यंत पोहोचली नसती.
Warishe Murder Case | पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 11सदस्यीय एसआयटी लावण्यात आली आहे. या प्रकरणासाठी चार्जशीट दाखल करण्यात आली असून त्यात अनेक खुलाशे करण्यात आले आहेत.
या प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांच्या हाती एक कॉल रेकॉर्डिंग लागली आहे. या कॉल रेकॉर्डिंग मध्ये आपण वारीशे याला संपवणार आहे असे आरोपी पंढरीनाथ आंबेरकर समोरच्याला म्हणाला आहे. ही कॉल रेकॉर्डिंग आरोपीच्या जप्त केलेल्या मोबाईल फोन मध्ये पोलिसांना मिळाली आहे.
कॉल रेकॉर्डिंग अशी होती
“एकाच काम करायच आहे ….आज करणार त्याचं…..झोप नाही लागणार त्याशिवाय….बातमी वाचली?……वाचली बातमी?…….थांब पाठवतो…. “
या रेकॉर्डिंगतील मजकुरामुळे वारीशे यांची हत्या पूर्वनियोजित असल्याचे चार्जेशीट मध्ये नमूद केले गेले आहे. या चार्जशीट नुसार आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याने या आधीही अनेकदा पत्रकार वारीशे यांना त्यांच्या रिफायनरी विरोधी आणि आपल्या विरोधी लिखाणावरून धमक्या दिल्या होत्या. आंबेरकर याने याआधीही रिफायनरीला विरोध करणाऱ्या एका सरपंचाच्या २१ वर्षीय मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याने आरोपीची गुन्हेगारी प्रवृत्ती दिसून येत आहे असेही चार्जशीटमध्ये नमूद केले गेले आहे. एका अग्रगण्य इंग्रजी वृत्तपत्राने ही चार्जशीट मिळवली आहे.
नक्की काय घडले होते?
सोमवारी सकाळी म्हणजे 6 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजून 3 मिनिटांनी पत्रकार शशिकांत वारिसे यांनी वॉट्सअपवरील रिफायनरी ग्रुपवर एका बातमीची पोस्ट पाठवली होती.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असलेल्या बॅनरवर त्यांच्यासोबत गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो’ अशा आशयाच्या बातमीचे कात्रण शशिकांत वारिसे यांनी त्या वॉट्सअप ग्रुपवर पाठवले होते.
कोकणातील रिफायनरीचे समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या जाहिरातींसंदर्भात ही बातमी होती. यानंतर दुपारी 1 वाजून 15 मिनिटांच्या आसपास शशिकांत वारिसे राजापूर-कोदवली या परिसरातून आपल्या दुचाकी वाहनावरून जात होते. त्याचवेळी तिथे असलेल्या पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगाने समोरून ‘थार’ गाडी आली. या गाडीने शशिकांत वारिसे यांच्या दुचाकीला धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कोल्हापूरला हलवण्यात आलं. परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी 7 फेब्रुवारीला सकाळी त्यांचं निधन झालं. चौकशीअंती ती गाडी रिफायनरीचे समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांची असल्याचे आणि ते चालवत असल्याचे समोर आले होते. या प्रकरणाची सीआयटी चौकशी लावावी अशी मागणी करण्यात आली होती.
Konkan Railway News | मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस बद्दल एक महत्त्वाची बातमी आहे. चेन्नई येथील कोच फॅक्टरी मधून आठ डब्यांचा वंदे भारतचा नवा कोरा रेक आज मडगाव रेल्वे स्थानकावर दाखल होणार आहे. हा नवा रेक काल 27 मे ला रात्री साडेदहा वाजता उडपी स्थानक सोडून मडगाव रेल्वे स्थानकाकडे रवाना झाला होता.
मुंबई गोवा रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसची यशस्वी चाचणी झाल्याने या मार्गावर ही एक्सप्रेस चालू होणार आहे हे निश्चित झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मडगाव स्थानकावर या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करणार आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत या सोहोळ्याला उपस्थितीत राहणार आहेत. कोकण रेल्वे मार्ग धावणारी पहिली वंदे भारत एक्सप्रेस ही उद्घाटनाच्या फेरीवेळी केवळ निमंत्रितांना घेऊन धावणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
या आधी रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या गाडीचे उद्घाटन मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात होणार आहे असे सांगण्यात आले होते. मात्र सद्यस्थिती पाहता हे उद्घाटन जून महिन्यात होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी – बारसू येथील रिफायनरीला होणारा विरोध काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाही आहेत. हल्लीच येथे जमिनीचा सर्व्हे करताना विरोधकांचा खूप मोठा विरोध पाहावयास मिळाला. त्यानंतर आंदोलने, उपोषण मोर्चा या मार्गाने कमी अधिक प्रमाणात विरोध होत होता. मात्र आता विरोधकांनी विरोध करण्यासाठी एका वेगळ्याच प्रकारचा अवलंब केला आहे.
ज्याठिकाणी मातीपरीक्षण करण्यासाठी खोदले होते नेमक्या त्याच ठिकाणी ग्रामस्थांनी सरकारचे श्राद्ध मांडले होते. त्यासाठी ग्रामस्थांनी चक्क मुंडण करून सरकारच्या नावाने बोंब मारली आहे.
सरकारने येथे जी दडपशाही चालवली आहे त्याविरोधात आम्ही सरकारचे श्राद्ध मांडून पिंडदान केले आहे. सरकारची दडपशाही अशीच चालू राहिली तर एकेदिवशी सरकारचे खरे श्राद्ध घातल्याशिवाय येथील शेतकरी स्वस्थ बसणार नाही असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी सरकारला दिला आहे.
Konkan Railway News |कोकण रेल्वेमार्गाचे १००% विद्युतीकरण झाले असून जवळपास सर्व गाड्या विद्युत इंजिनसह धावत आहेत. मात्र विद्युत इंजिनाचा तुटवडा निर्माण झाल्याने या मार्गावरील तिन गाड्या डिझेल लोको जोडून चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाला घ्यावा लागला आहे.
कोकण रेल्वे मार्गावर इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवर चालवल्या जाणाऱ्या मुंबई सीएसएमटी ते मडगाव (10103/20104) मांडवी एक्सप्रेस तसेच दिवा सावंतवाडी एक्सप्रेस (10105/10106) तसेच 50107/50108) सावंतवाडी- मडगाव -सावंतवाडी या तीन गाड्या दिनांक 27 मे रोजी च्या फेरीपासून इलेक्ट्रिक ऐवजी डिझेल लोको जोडून चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. इलेक्ट्रिक लोकोचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे रेल्वेवर ही वेळ आली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्या आता पुन्हा एकदा डिझेल इंजिनसह धावणार आहेत. रेल्वेने हा निर्णय पुढील सूचना मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात घेतला आहे.
कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या 741 किलोमीटर मार्गांवर विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. विद्युतीकरण झाल्यामुलळे इंधनाची बचत होत असून प्रवाशांना वेगवान आणि प्रदूषणमुक्त वातावरणात प्रवास करणे शक्य होत आहे.