रत्नागिरी – सह्याद्री रँडोनिअर्स व खेड सायकलिंग क्लबच्या सहकार्याने खेड येथे बीआरएम सायकल स्पर्धा रंगणार आहे. दि. ०६ मे रोजी संध्याकाळी ५:३० वाजता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या शनिवार दिनांक ६ मे रोजी विजय उपहारगृह, खेड येथून मान्यवरांच्या हस्ते झेंडा फडकवून सायकलिंगला सुरुवात होणार असून सर्व सायकलस्वार कोलाड येथे पोचून लगेचच परतीचा प्रवास सुरु करतील व साडेतेरा तासाच्या आत म्हणजेच सकाळी सातच्या आत सायकलने दोनशे किमी अंतर कापून खेड येथे पोचतील. या इव्हेंटसाठी पंचवीसहून अधिक रायडर्स सहभागी झाले असून वेळेत अंतर कापणा-या रायडर्सना ऑडाक्स इंडिया रँडोनिअर्स क्लबतर्फे फिनिशर मेडलसह गौरवण्यात येईल. तरी या नवीन क्रीडा प्रकाराच्या शुभारंभावेळी सायकलप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन खेड सायकलिंग क्लबतर्फे करण्यात येत आहे.
बीआरएम Brevets de Randonneurs Modiaux सायकल स्पर्धा प्रकार म्हणजे काय?
सायकल स्पर्धा विश्वातील एक वेगळा क्रीडाप्रकार म्हणजे बीआरएम. कोणाशीही स्पर्धा न करता दिलेल्या वेळेत अंतर कापणं हेच यातील महत्वाचं वैशिष्ट्य. या स्पर्धेत जिंकणे किंवा हरणे याकडे न पाहता दिलेल्या वेळात स्पर्धा पूर्ण करणे याला महत्व दिले जाते मात्र या स्पर्धेचे काही नियम असतात त्याचे पालन करणे आवश्यक आहे.. ही स्पर्धा २०० ते १२०० किलोमीटर साठी घेण्यात येते. हे अंतर पूर्ण करण्याची वेळ सर्व ठिकाणी निश्चित ठरवून देण्यात येते. ऑडाक्स क्लब पर्शियन या एका फ्रेंच सायकलिस्ट टुअरिंग क्लबने या प्रकारची सायकल स्पर्धा उदयास आणली. काही अवधीत लोकप्रिय झालेला सायकल स्पर्धेचा हा प्रकार पूर्ण जगभरात लोकप्रिय झाला. भारतात ऑडाक्स इंडिया रँडोनिअर्स क्लब ही स्पर्धा आयोजित करते. स्पर्धेत यशस्वी झालेल्या स्पर्धकांना मेडल तसेच एकआंतराष्ट्रीय दर्जाचे सर्टिफिकेट बहाल करते.