Category Archives: मुंबई

Mumbai Local: फुकट्या प्रवाशांची कोणतीच सबब चालली नाही! मुंबईत ‘रॉकस्टार’ टीसीचा नवा विक्रम

   Follow us on        

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य तिकीट तपासनीस (Chief Ticket Inspector) सुधा द्विवेदी यांनी एकाच दिवसात तब्बल २०२ विनातिकीट किंवा अनियमित प्रवाशांना पकडत ५५,२१० रुपयांचा दंड वसूल करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ही उल्लेखनीय कामगिरी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडली असून, मुंबई उपनगरीय रेल्वेच्या इतिहासातील एकल दिवसातील सर्वाधिक दंड वसुलीचा हा विक्रम ठरला आहे.

सुधा द्विवेदी यांनी सकाळी ६.४८ वाजता खारघर स्थानकापासून तिकीट तपासणीस सुरुवात केली आणि दुपारी ३.३० वाजेपर्यंत सुमारे नऊ तास सातत्याने तपासणी केली. या कालावधीत त्यांनी सरासरी दर अडीच मिनिटांनी एक प्रकरण हाताळले. काही ठिकाणी संपूर्ण गट एकत्र आढळल्याने कारवाईची संख्या अधिक वाढली.

यापूर्वीचा विक्रम मध्य रेल्वेच्या रुबिना अकिब इनामदार यांच्या नावावर होता. त्यांनी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी १५० प्रकरणांतून ४५,७०५ रुपयांचा दंड वसूल केला होता. मात्र, सुधा द्विवेदी यांनी हा आकडा मागे टाकत नवा उच्चांक नोंदवला.

मध्य रेल्वे प्रशासनाने या उल्लेखनीय कामगिरीचे अधिकृतपणे कौतुक केले असून, त्यांना ‘रॉकस्टार’ अशी उपाधी देत गौरविण्यात आले आहे. यापूर्वीही त्यांना ‘अति विशिष्ट रेल सेवा पुरस्कार २०२४’ प्रदान करण्यात आला होता.

मुंबई लोकल ही शहराची जीवनरेषा मानली जाते. तरीही, UTS मोबाईल अॅप, UPI पेमेंट सुविधा आणि स्वयंचलित तिकीट विक्री यंत्रणा उपलब्ध असतानाही काही प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. अशा परिस्थितीत सुधा द्विवेदी यांसारख्या अधिकाऱ्यांची कठोर आणि सातत्यपूर्ण तपासणी रेल्वेच्या महसुलात वाढ करण्यासोबतच प्रामाणिक प्रवाशांच्या हक्कांचे संरक्षण करण्यास महत्त्वाची ठरते.

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा: सामान्यांसाठी “चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला”!

   Follow us on        

मुंबई: कोकणच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या राज्यकर्त्यांनी मुंबई ते विजयदुर्ग अशी ‘M2M’ रो-रो सेवा नुकतीच थाटामाटात सुरू केली. मात्र, या सेवेचे भाडेपत्रक पाहिल्यावर सामान्य कोकणी माणसाच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. “चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला” अशी या प्रवासाची अवस्था झाली असून, या भाडेवाढीमुळे कोकणचा सामान्य चाकरमानी पुन्हा एकदा वाऱ्यावर सोडला गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

गणिताचा ‘झोल’: रस्ते प्रवास स्वस्त, जलप्रवास महाग!

कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर यांनी या भाडेवाढीचे वाभाडे काढताना एक बोलके गणित मांडले आहे. जर एखादा मध्यमवर्गीय माणूस स्वतःच्या कारने (४ प्रवाशांसह) मुंबईहून कोकणात गेला, तर त्याचे गणित खालीलप्रमाणे बसते:

प्रवास साधन इंधन (Fuel) टोल (Toll) एकूण खर्च
खाजगी कार (रस्त्याने) ₹ ४,५०० (10kmpl) ₹ १,००० ₹ ५,५००/-

म्हणजेच, रस्त्याने जाण्यापेक्षा जलमार्गाने जाण्यासाठी कोकणी माणसाला तब्बल १०,५०० रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. हा कुठल्या प्रकारचा विकास आहे? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

“सामान्य माणूस केंद्रस्थानी की फक्त श्रीमंत पर्यटक?”

विजयदुर्गला पोहोचल्यानंतर तिथून आपल्या मूळ गावी जाण्यासाठी पुन्हा खाजगी वाहन किंवा एसटीचा खर्च वेगळाच. तसेच मुंबईत घरून भाऊच्या धक्क्यापर्यंत पोहोचण्याचा खर्च धरला, तर हे बजेट सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाते. मंत्र्यांनी हे दर ठरवताना नेमका कोणाचा विचार केला? केवळ आलिशान गाड्यांमधून फिरणाऱ्या पर्यटकांचा की घाम गाळून कोकण जिवंत ठेवणाऱ्या चाकरमान्यांचा?

“कोकणवासीयांची परवड कधी थांबणार? विजयदुर्गला उतरल्यावर पुढे घरापर्यंतचा प्रवास खर्च जोडला तर हे आर्थिक गणित कोलमडते. ही सेवा सामान्यांसाठी नसून केवळ श्रीमंतांच्या चोचल्यांसाठी आहे असे वाटते.”सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर, संस्थापक सदस्य, कोकण रेल्वे.

त्यापेक्षा ‘वसई ते सावंतवाडी पॅसेंजर’ सुरू करा

कोकणच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सामान्यांना न परवडणारी ‘रो-रो’ सेवा सुरू करण्यापेक्षा, रेल्वे प्रशासनाने ‘वसई ते सावंतवाडी पॅसेंजर’ सुरू करणे हाच खरा आणि व्यवहार्य तोडगा ठरेल, असे प्रतिपादन सुरेंद्र नेमळेकर यांनी केले आहे. या प्रस्तावानुसार, ही गाडी रात्री १० वाजता वसईवरून सुटावी, ज्यामुळे नोकरी-धंद्यावरून सुटलेला चाकरमानी सुखाने प्रवास करू शकेल. भिवंडी आणि कोपर रोडसह कोकणातील सर्व प्रमुख स्थानकांवर या गाडीला थांबा दिल्यास ठाणे, पालघर आणि मुंबई उपनगरातील प्रवाशांची मोठी सोय होईल. महत्त्वाचे म्हणजे, अवघ्या २२५ रुपयांत प्रवासी सकाळी सावंतवाडीपर्यंत पोहोचू शकतील आणि तिथून एसटीने आपापल्या घरी जाणे त्यांना अत्यंत स्वस्त पडेल. सकाळी तिथूनच ही गाडी परतीच्या प्रवासाला निघून रात्री १० वाजेपर्यंत पुन्हा वसईला पोहोचू शकते. ही साधी पण प्रभावी योजना राबवल्यास कोकणवासीयांची वर्षानुवर्षांची आर्थिक परवड खऱ्या अर्थाने थांबेल.

मुंबई विमानतळांना थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी! मेट्रो-८ साठी ₹२२ हजार कोटींची गुंतवणूक

   Follow us on        

मुंबई : Chhatrapati Shivaji Maharaj International Airport (CSMIA) ते Navi Mumbai International Airport (NMIA) दरम्यान प्रस्तावित मेट्रो मार्ग-८ प्रकल्पाचा सविस्तर आर्थिक आराखडा जाहीर झाला आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत ₹२२,६६२ कोटी इतकी असून मुख्य बांधकामासाठी ₹१९,२७८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावर राबविण्यात येणार आहे.

निधी उभारणीची रचना

प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारकडून व्यवहार्यता अंतर निधी (VGF) स्वरूपात प्रत्येकी ₹३,४५६ कोटी (२०%) देण्यात येणार आहेत. नव्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाकडून ₹५६४ कोटी (सुमारे ३%) तर खासगी विकसकाकडून ₹७,८०३ कोटी (सुमारे ४५%) गुंतवणूक केली जाणार आहे. त्यामुळे सुमारे ४० टक्के हिस्सा हा सार्वजनिक अनुदानाचा असून उर्वरित मोठा वाटा खासगी क्षेत्राकडून उचलला जाणार आहे.

अतिरिक्त खर्चाचाही समावेश

मुख्य प्रकल्प खर्चाव्यतिरिक्त जमीन संपादन व पुनर्वसनासाठी ₹२,३२३ कोटी, विविध कर व शुल्कासाठी ₹१,१३० कोटी तसेच बांधकाम कालावधीतील व्याज (IDC) म्हणून ₹२,९९९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व खर्चांसह प्रकल्पाची एकूण किंमत ₹२२,६६२ कोटींवर पोहोचते.

विमानतळांना थेट मेट्रो जोडणी

हा मेट्रो मार्ग मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही आंतरराष्ट्रीय विमानतळांना थेट जोडणार असल्याने प्रवाशांसाठी मोठी सोय निर्माण होणार आहे. तसेच मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी कमी करण्यास आणि सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यास या प्रकल्पाची महत्त्वाची भूमिका राहणार आहे.

विजयदुर्ग–मुंबई M2M रो-रो परतीचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण!

   Follow us on        

मुंबई: मुंबई आणि कोकणाला समुद्रमार्गे जोडणाऱ्या ऐतिहासिक M2M Princess रो-रो फेरीचा परतीचा प्रवास आज (२ मार्च २०२६) यशस्वीरित्या पूर्ण झाला. १ मार्च रोजी मुंबईच्या भाऊचा धक्का येथून रवाना झालेली ही आशियातील सर्वात जलद रो-पॅक्स सेवा, विजयदुर्गहून परत येताना संध्याकाळी भाऊचा धक्का येथे सुखरूप पोहोचली.

या सेवेमुळे मुंबई ते विजयदुर्ग (सिंधुदुर्ग) दरम्यानचा प्रवास आता फक्त ६-७ तासांत होऊ शकतो, जे रस्त्याने १०-१२ तासांपेक्षा खूप कमी आहे. फेरीमध्ये ६२६ प्रवासी आणि कार, दुचाकी यांसारखी वाहने नेण्याची क्षमता आहे. या प्रकल्पामुळे कोकणातील पर्यटन, व्यापार आणि सांस्कृतिक संबंधांना नवे बळ मिळणार आहे.महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आदरणीय नितेश राणे यांनी या यशस्वी परतीच्या प्रवासाबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी म्हटले आहे की, हा केवळ प्रवास नव्हता तर मुंबई-कोकण नात्याला लाटांवरून नव्याने जोडणारा भावनिक सेतू होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र मरीटाइम बोर्ड आणि M2M Ferries यांनी हे स्वप्न साकार केले.

रात्रीच्या वेळी भाऊचा धक्का येथे उतरलेले प्रवासी, त्यांच्या सूटकेसेस आणि वाहनांसह दिसलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या ब्लू इकॉनॉमीला चालना देणारा ठरणार असून, होळी आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांसाठी हा उत्तम पर्याय ठरला आहे.

 

 

 

Mumbai Local: गोंधळलेल्या प्रवाशांचा आधारवड: दादरचा स्थानकावरील ‘चालता-फिरता इंडिकेटर’

   Follow us on        
मुंबई: मुंबईच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक जण स्वतःच्या नादात असताना, दादर रेल्वे स्थानकावर एक अशी व्यक्ती पाहायला मिळते जी केवळ परोपकारासाठी आपला अमूल्य वेळ खर्च करत आहे. नरेंद्र पाटील असे या अवलियाचे नाव असून, प्रवाशांमध्ये ते ‘चालता-फिरता इंडिकेटर’ म्हणून लोकप्रिय झाले आहेत.
निस्वार्थ सेवेचा अनोखा प्रवास
दादरमधील फूल मार्केटसमोरील नवीन रेल्वे पुलावर अनेकदा प्रवाशांचा गोंधळ उडतो. पुलावर पुरेशा फलकांचा (इंडिकेटर) अभाव असल्याने, गाडी नक्की कोणत्या प्लॅटफॉर्मवर येईल हे शोधणे प्रवाशांसाठी कसरतीचे ठरते. हीच अडचण ओळखून नरेंद्र पाटील गेल्या चार वर्षांपासून येथे विनामूल्य मार्गदर्शन करत आहेत.
नरेंद्र पाटील हे स्वतः एका खासगी कंपनीत नोकरीला असूनही सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून प्रवाशांसाठी आपला वेळ देतात. दररोज सकाळी ९:३० ते ११:३० या दोन तासांच्या वेळेत ते दादर स्थानकावरील फूल मार्केटजवळील नवीन रेल्वे पुलावर उपस्थित असतात. या ठिकाणी इंडिकेटर्सचा अभाव असल्याने गोंधळणाऱ्या प्रवाशांना ते प्लॅटफॉर्म क्रमांक, रेल्वेचे वेळापत्रक आणि योग्य मार्गांविषयी अचूक मार्गदर्शन करतात. दोन तास ही निस्वार्थ सेवा दिल्यानंतर, ते दुपारी १२ वाजता आपल्या नियमित कामावर रुजू होतात.
“नवीन पूल झाल्यानंतर अनेक प्रवासी, विशेषतः ग्रामीण भागातून परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी गोंधळून जायचे. त्यांना वेळेत योग्य गाडी मिळावी, हाच माझा यामागचा उद्देश आहे.”
— नरेंद्र पाटील
सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण
सकाळी दोन तास प्रवाशांना मदत केल्यानंतर पाटील दुपारी १२ वाजता आपल्या कामावर रुजू होतात. रेल्वे प्रशासनाचा कर्मचारी नसतानाही, केवळ प्रवाशांचा त्रास कमी व्हावा या भावनेतून ते ही सेवा देत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे हजारो प्रवाशांचा प्रवास सुखकर होत असून, सोशल मीडियावरही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांची ‘लेट लतीफी’ संपेना! होळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

   Follow us on        

ठाणे: कोकणातील लाडक्या ‘शिमगा’ म्हणजेच होळीच्या सणासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास यंदा अत्यंत खडतर ठरला. रविवारी सकाळी मुंबई सीएसएमटी स्थानकातून सुटणारी तेजस एक्स्प्रेस तब्बल सात तास उशिराने धावल्यामुळे मुंबई, ठाणे आणि पनवेल रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी रखडपट्टी झाली. सकाळी ५:४० वाजता सुटणारी ही गाडी प्रत्यक्षात दुपारी १२ वाजून ५८ मिनिटांनी सुटली.

रेल्वे प्रशासनाकडून गाडी उशिरा असल्याची पूर्वसूचना वेळेवर न मिळाल्याने, अनेक प्रवासी पहाटेच स्थानकावर पोहोचले होते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांचे प्रचंड हाल झाले. विशेषतः ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ५ वर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती, मात्र तिथे स्वच्छतागृहे किंवा विश्रांतीगृहांची कोणतीही सोय नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

​या विलंबाबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती वेळेत देण्यात आली नाही. सुरुवातीला गाडी १०:५० ला सुटेल असे सांगण्यात आले, पण प्रत्यक्षात तिला सात तास उशीर झाला. कोकण रेल्वेच्या मार्गावरील दुहेरीकरणाच्या कामामुळे हा उशीर झाल्याची चर्चा प्रवाशांमध्ये होती.

तेजस, जनशताब्दी आणि मांडवी यांसारख्या गाड्यांना होणारा उशीर आता नित्याचीच बाब झाली असून, सण-उत्सवाच्या काळात रेल्वेच्या या ढिसाळ नियोजनामुळे संतप्त प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या नावाने अक्षरशः ‘शिमगा’ केला. एका दिवसाच्या या खोळंब्याचा परिणाम परतीच्या प्रवासावरही होण्याची भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, कोकणातील रेल्वे समस्यांकडे राज्य सरकारनेही लक्ष देण्याची मागणी होत आहे. अलीकडेच बोट सेवेचा शुभारंभ करताना कोकणाच्या विकासाचा उल्लेख झाला असला, तरी रेल्वे प्रवासातील अडचणींचाही गांभीर्याने विचार करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समस्यांची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाला सुधारणा करण्यास भाग पाडावे, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

Video: मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी सेवेचा शुभारंभ! पहिली बोट कोकणच्या दिशेने रवाना

   Follow us on        

मुंबई: मुंबई ते कोकणातील विजयदुर्ग दरम्यान M2M फेरीज ची रो-रो (Ro-Ro) सेवा आज, १ मार्च २०२६ पासून सुरू झाली आहे. मुंबईतील भाऊचा धक्का येथे सकाळी ८ वाजता मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सेवेचा  उद्घाटन सोहळा पार पडला.

रो-पॅक्स सेवेमुळे मुंबई ते विजयदुर्गचा प्रवास रस्त्याने १०-१२ तासांऐवजी केवळ ५ ते ७ तासांत पूर्ण होऊ शकतो. ही सेवा शिमगा (होळी) सणाच्या पार्श्वभूमीवर सुरू झाली असून, कोकणवासीयांना रस्त्यावरील वाहतूक कोंडीपासून मुक्ती मिळाली आहे. M2M Princess ही उच्च गतीची फेरी वापरली जात असून, यात प्रवासींसह दुचाकी आणि चारचाकी वाहनेही नेण्याची सुविधा उपलब्ध आहे.

उद्घाटन फेरीच्या पहिल्याच दिवशी बुकिंगला जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून, अनेक प्रवासी या नव्या समुद्री मार्गाचा आनंद घेण्यासाठी उत्सुक आहेत. ही सेवा कोकणातील पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ही १६ दिवसांच्या पायलट टप्प्यातील सेवा असून, भविष्यात नियमित आणि विस्तारित स्वरूपात चालवली जाणार आहे.

 

 

 

Mumbai Local: अतिरिक्‍त महसुलाच्या लोभापायी एसी लोकलच्या खिडक्या जाहिरातींनी झाकल्या; प्रवाशांची मोठी गैरसोय

   Follow us on        

मुंबई: मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या मध्य रेल्वेच्या एसी लोकल (AC EMU) सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आणि वादात सापडल्या आहेत. रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यासाठी एसी लोकलच्या डब्यांच्या बाहेरील भागावर करण्यात आलेल्या जाहिरातींमुळे प्रवाशांच्या त्रासात भर पडली आहे. विशेषतः ‘अरुण आईस्क्रीम’ (Arun Icecreams) च्या जाहिरातीसाठी वापरण्यात आलेल्या जाहिरातींच्या विनाइल रॅपिंगमुळे प्रवाशांना डब्यातून बाहेरचे काहीच दिसत नसल्याच्या तक्रारी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

​नेमका प्रकार काय?

​प्रसिद्ध पत्रकार आणि रेल्वे प्रवासी राजेंद्र बी. अकलेकर यांनी ट्विटरवर (X) काही फोटो शेअर करत हा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, सीएसएमटीहून सुटणाऱ्या रात्री २०:०० वाजताच्या कल्याण एसी लोकलच्या खिडक्यांवर इतक्या जाड थराचे विनाइल रॅपिंग करण्यात आले आहे की, खिडक्या पूर्णपणे अपारदर्शक (Opaque) झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांना येणारे स्थानक किंवा प्लॅटफॉर्म ओळखणे कठीण होत आहे.

​रेल्वे प्रशासनाचे स्पष्टीकरण आणि प्रवाशांचा संताप

​या तक्रारीला उत्तर देताना DRM मुंबई (मध्य रेल्वे) यांनी सांगितले की, “एसी लोकलच्या डब्यांवर खिडक्यांसह विनाइल रॅपिंग करण्याची परवानगी आहे, मात्र आतून ८०% दृश्यमानता (Visibility) राखणे बंधनकारक आहे. जर दृश्यमानतेत काही अडथळा येत असेल, तर त्याची तपासणी करून दुरुस्ती केली जाईल.”

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या या तांत्रिक स्पष्टीकरणानंतर प्रवाशांमधील संताप कमी होण्याऐवजी अधिकच वाढला आहे. प्रवाशांच्या मते, रात्रीच्या वेळी परिस्थिती अत्यंत बिकट होते; दिवसा तरी प्रकाशाच्या जोरावर थोडीफार दृश्यमानता मिळते, परंतु रात्रीच्या काळोखात डब्यातून बाहेरचे स्थानक किंवा प्लॅटफॉर्म ओळखणे अशक्य होते. रेल्वेने ८० टक्के दृश्यमानतेचा जो दावा केला आहे, तो केवळ कागदावरच असून प्रत्यक्षात प्रवाशांना शून्याच्या बरोबरीने दिसत असल्याची टीका होत आहे. केवळ महसूल मिळवण्याच्या ‘लोभी’ वृत्तीपोटी प्रवाशांच्या सुरक्षिततेशी आणि सोयींशी तडजोड केली जात असल्याचा गंभीर आरोप करत, रेल्वेला प्रवाशांच्या हितापेक्षा जाहिरातींचे उत्पन्नच अधिक महत्त्वाचे वाटते का, असा सवाल संतप्त मुंबईकरांनी उपस्थित केला आहे.

​प्रवाशांची मागणी

​सोशल मीडियावर अनेक प्रवाशांनी “DRM साहेबांनी स्वतःच्या केबिनमधून बाहेर पडून प्रत्यक्ष पाहणी करावी,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जाहिरात लावणाऱ्या कंपन्यांच्या निकृष्ट कामामुळे (Poor Workmanship) सामान्य प्रवाशांना हा त्रास सहन करावा लागत आहे. ही समस्या तात्काळ सोडवून खिडक्यांवरील अडथळे दूर करावेत, अशी मागणी आता जोर धरत आहे.

मुंबईतील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी!

   Follow us on        

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी BEST बसने मोफत प्रवासाची सुविधा जाहीर केली आहे. हा निर्णय विशेषतः गणवेशधारी विद्यार्थ्यांसाठी असून, त्यांच्या घरापासून शाळेपर्यंतचा प्रवास आता पूर्णपणे मोफत होणार आहे.

या योजनेअंतर्गत ‘चलो कार्ड’ (Chalo Card) चा वापर करून विद्यार्थी मोफत प्रवास करू शकतात. गेल्या वर्षी (२०२५-२६) या योजनेचा लाभ ९,६२७ विद्यार्थ्यांना मिळाला होता, ज्यात प्राथमिक शाळेतील ६,०१८ आणि माध्यमिक शाळेतील ३,६०९ विद्यार्थी समाविष्ट होते.शिक्षण विभागासाठी एकूण ४,२४८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे, जो मागील वर्षीच्या तुलनेत १५% ने जास्त आहे.

या योजनेसाठी सुमारे ८.७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ज्या भागांमध्ये नियमित BEST बस सेवा उपलब्ध नाही, तिथे विशेष बस सेवा सुरू करण्यात येणार आहे.पालकांवरील आर्थिक भार कमी होण्याबरोबरच विद्यार्थ्यांचा शाळेकडे जाण्याचा प्रवास सुरक्षित आणि सुलभ होईल, ज्यामुळे उपस्थिती वाढण्यास आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल.हे पाऊल मुंबईतील सार्वजनिक वाहतूक वाढवण्याबरोबरच शिक्षणाला प्रोत्साहन देणारे ठरेल!

 

 

मुंबई–विजयदुर्ग रो-रो जलवाहतूक सेवा १ मार्चपासून सुरू; पर्यटन, रोजगार व कृषी क्षेत्राला चालना- मंत्री नितेश राणे

   Follow us on        

मुंबई, दि. २५: मुंबई आणि कोकणाला जलमार्गाने जोडण्याच्या उद्देशाने रो-रो (Roll-on/Roll-off) जलवाहतूक सेवा सुरू करण्याची संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असून, या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी १ मार्चपासून सुरू होणार आहे. भाऊचा धक्का (मुंबई) ते विजयदुर्ग हा पहिला टप्पा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्य व बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी विधिमंडळातील पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री राणे म्हणाले की, मुंबई–विजयदुर्ग हा पहिला जलमार्ग असला तरी येत्या काळात मुंबई–रत्नागिरी, मुंबई–महाड आदी विविध मार्गांवरही रो-रो सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. या बोट सेवेची सविस्तर माहिती आणि तिकीट दर अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून तिकीट बुकिंगला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

कोकणात लवकरच शिमगोत्सव सुरू होत असल्याने सिंधुदुर्गसह कोकणातील नागरिकांकडून या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे मुंबई–कोकण जोडणी मजबूत होण्याबरोबरच पर्यटन, रोजगार आणि कृषी क्षेत्राला चालना मिळणार आहे.

जलमार्गामुळे साडेचार ते पाच तासांत कोकणात पोहोचता येणार असून प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचेल. तसेच आंबा, काजू आणि मच्छीमारी व्यवसायालाही मोठा फायदा होणार आहे. सुरक्षिततेच्या सर्व परवानग्या मिळाल्यानंतर आवश्यक चाचण्या पूर्ण करूनच सेवा सुरू केली जात असून, १ मार्चपासून प्रवासी प्रवास करू शकतील. समुद्र प्रवासादरम्यान अस्वस्थता जाणवणाऱ्या प्रवाशांसाठी बोटीवर डॉक्टरांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.

पर्यावरणपूरक विकास हा राज्य सरकारचा मुख्य उद्देश असून जलवाहतुकीच्या माध्यमातून शाश्वत प्रगती साधण्याचा प्रयत्न असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search