मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा: सामान्यांसाठी “चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला”!

   Follow us on        

मुंबई: कोकणच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या राज्यकर्त्यांनी मुंबई ते विजयदुर्ग अशी ‘M2M’ रो-रो सेवा नुकतीच थाटामाटात सुरू केली. मात्र, या सेवेचे भाडेपत्रक पाहिल्यावर सामान्य कोकणी माणसाच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. “चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला” अशी या प्रवासाची अवस्था झाली असून, या भाडेवाढीमुळे कोकणचा सामान्य चाकरमानी पुन्हा एकदा वाऱ्यावर सोडला गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

गणिताचा ‘झोल’: रस्ते प्रवास स्वस्त, जलप्रवास महाग!

कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर यांनी या भाडेवाढीचे वाभाडे काढताना एक बोलके गणित मांडले आहे. जर एखादा मध्यमवर्गीय माणूस स्वतःच्या कारने (४ प्रवाशांसह) मुंबईहून कोकणात गेला, तर त्याचे गणित खालीलप्रमाणे बसते:

प्रवास साधन इंधन (Fuel) टोल (Toll) एकूण खर्च
खाजगी कार (रस्त्याने) ₹ ४,५०० (10kmpl) ₹ १,००० ₹ ५,५००/-

म्हणजेच, रस्त्याने जाण्यापेक्षा जलमार्गाने जाण्यासाठी कोकणी माणसाला तब्बल १०,५०० रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. हा कुठल्या प्रकारचा विकास आहे? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

“सामान्य माणूस केंद्रस्थानी की फक्त श्रीमंत पर्यटक?”

विजयदुर्गला पोहोचल्यानंतर तिथून आपल्या मूळ गावी जाण्यासाठी पुन्हा खाजगी वाहन किंवा एसटीचा खर्च वेगळाच. तसेच मुंबईत घरून भाऊच्या धक्क्यापर्यंत पोहोचण्याचा खर्च धरला, तर हे बजेट सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाते. मंत्र्यांनी हे दर ठरवताना नेमका कोणाचा विचार केला? केवळ आलिशान गाड्यांमधून फिरणाऱ्या पर्यटकांचा की घाम गाळून कोकण जिवंत ठेवणाऱ्या चाकरमान्यांचा?

“कोकणवासीयांची परवड कधी थांबणार? विजयदुर्गला उतरल्यावर पुढे घरापर्यंतचा प्रवास खर्च जोडला तर हे आर्थिक गणित कोलमडते. ही सेवा सामान्यांसाठी नसून केवळ श्रीमंतांच्या चोचल्यांसाठी आहे असे वाटते.”सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर, संस्थापक सदस्य, कोकण रेल्वे.

त्यापेक्षा ‘वसई ते सावंतवाडी पॅसेंजर’ सुरू करा

कोकणच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सामान्यांना न परवडणारी ‘रो-रो’ सेवा सुरू करण्यापेक्षा, रेल्वे प्रशासनाने ‘वसई ते सावंतवाडी पॅसेंजर’ सुरू करणे हाच खरा आणि व्यवहार्य तोडगा ठरेल, असे प्रतिपादन सुरेंद्र नेमळेकर यांनी केले आहे. या प्रस्तावानुसार, ही गाडी रात्री १० वाजता वसईवरून सुटावी, ज्यामुळे नोकरी-धंद्यावरून सुटलेला चाकरमानी सुखाने प्रवास करू शकेल. भिवंडी आणि कोपर रोडसह कोकणातील सर्व प्रमुख स्थानकांवर या गाडीला थांबा दिल्यास ठाणे, पालघर आणि मुंबई उपनगरातील प्रवाशांची मोठी सोय होईल. महत्त्वाचे म्हणजे, अवघ्या २२५ रुपयांत प्रवासी सकाळी सावंतवाडीपर्यंत पोहोचू शकतील आणि तिथून एसटीने आपापल्या घरी जाणे त्यांना अत्यंत स्वस्त पडेल. सकाळी तिथूनच ही गाडी परतीच्या प्रवासाला निघून रात्री १० वाजेपर्यंत पुन्हा वसईला पोहोचू शकते. ही साधी पण प्रभावी योजना राबवल्यास कोकणवासीयांची वर्षानुवर्षांची आर्थिक परवड खऱ्या अर्थाने थांबेल.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search