Category Archives: क्राईम

एलसीबीची मुंबई गोवा महामार्गावर मोठी कारवाई; दीड कोटींच्या गोवा बनावटीच्या दारूसह ट्रक जप्त

   Follow us on        

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी):

सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) शनिवारी पहाटे सुमारे १.४५ वाजण्याच्या सुमारास ओरोस येथे एक मोठी धडक कारवाई केली. गोव्याहून मुंबईकडे अवैध रित्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका ‘टाटा सिग्मा’ दहा चाकी ट्रकवर पोलिसांनी छापा टाकला. या ट्रकमधून तब्बल १ कोटी १५ लाख २० हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची विदेशी दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत दारूसह ३५ लाख रुपये किमतीचा ट्रक आणि १० हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण १ कोटी ५० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​या धडक कारवाई दरम्यान पोलिसांनी ट्रकचालक विरेंद्र गोविंद पटेल (वय ४९, रा. लोलावत का मोहल्ला, धर्कदा, उदयपूर, राजस्थान) याला अटक केली आहे. या आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल बस्त्याव डिसोझा, आशिष जामदार, विल्सन डिसोझा तसेच पोलीस कॉन्स्टेबल माहेश्वर समजिसकर आणि ऋषिकेश टोपले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

कुडाळमध्ये बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

   Follow us on        

कुडाळ:

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ बाजारपेठेत वन्यजीवांच्या अवयवांची बेकायदेशीर खरेदी-विक्री आणि तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा वन विभागाने यशस्वी पर्दाफाश केला आहे. येथील प्रसिद्ध ‘मसुरकर जेम्स’ या दुकानावर वन विभागाच्या संयुक्त पथकाने अचानक छापा टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ३० जून २०२६ रोजी सावंतवाडीच्या वनक्षेत्रपालांना या बेकायदेशीर काळ्याबाजाराविषयी गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सावंतवाडी व कुडाळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन पंचांसमक्ष या दुकानाची अचानक झडती घेतली. या कारवाईदरम्यान दुकानातून अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बाबी उघडकीस आल्या.

​दुकानाच्या झडतीमध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या अनुसूची १ अन्वये अत्यंत संरक्षित असलेल्या बिबट्याची शिकार करून तयार केलेले अनेक अवयव हस्तगत करण्यात आले. यामध्ये बिबट्याची ६ अस्सल नखे, वन्यप्राण्यांच्या शिंगांपासून तयार केलेली ६ बनावट नखे, बिबट्यांच्या नखांचे इतर २० अवयव आणि बिबट्याचे २ सुळे (दात) यांचा समावेश आहे. शिकार करून हे अवयव केवळ विक्रीच्या उद्देशाने दुकानात बेकायदेशीरपणे बाळगण्यात आले होते. वनविभागाने हा सर्व मुद्देमाल जागीच जप्त केला आहे.

​या खळबळजनक प्रकरणातील मुख्य संशयित आणि दुकानाचा मालक अजित वसंत मसुरकर याला वन विभागाने तात्काळ अटक केली आहे. आरोपीने बिबट्याची नखे आणि अवयव विक्रीसाठी बाळगल्याचा गुन्हा मान्य केला आहे. त्याला कुडाळच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला २ दिवसांची वनकोठडी (Forest Custody) सुनावली आहे. ही धडक कारवाई सावंतवाडीचे उपवनसंरक्षक मिलीश शर्मा आणि कोल्हापूर दक्षता विभागाचे विभागीय वनाधिकारी संजय वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली, अशी माहिती कुडाळचे वनक्षेत्रपाल चेतन पाटील यांनी दिली.

सिंधुदुर्गात वन्यजीव तस्करीचा पर्दाफाश; ९२ लाखांच्या मुद्देमालासह चौघे गजाआड

   Follow us on        

सिंधुदुर्गनगरी: जिल्ह्यात वन्यजीव तस्करीचे जाळे पुन्हा एकदा उघडकीस आले असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) केलेल्या धडक कारवाईत तब्बल ९२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रानबांबुळी येथील अनावकरवाडी परिसरात पोलिसांनी सापळा रचून ही मोठी कारवाई केली.

दुर्मिळ खवले आणि सांबराची शिंगे जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत दुर्मिळ खवले मांजराची (Pangolin) १.८०० किलो वजनाची खवले, सांबराची दोन शिंगे आणि दोन मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या खवल्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी असल्याचे सांगितले जाते. तसेच सांबराच्या शिंगांचाही अवैध व्यापार केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

चार आरोपींना अटक

या प्रकरणी पोलिसांनी खालील चौघांना ताब्यात घेतले आहे:

१. गणेश प्रदीप शिर्के (वय ३०, रा. पडवे, ता. कुडाळ)

२. विठोबा भगवान बावळेकर (वय ८२, रा. रानबांबुळी)

३. शंकर यशवंत तारापूरे (वय ३१, रा. पडवे)

४. कालिदास दत्तात्रय वारंग (वय ५५, रा. सुकळवड, ता. मालवण)

अशी झाली कारवाई

शुक्रवार, दिनांक २९ मे २०२६ रोजी सकाळी ११.४० वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रानबांबुळी येथील अनावकरवाडी परिसरात सापळा रचला आणि संशयितांना रंगेहात पकडले.

आरोपींविरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत कलम ९, ४४, ४९(ब), ५१ तसेच बी.एन.एस. (BNS) कलम ३(५) अन्वये सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस पथक:

ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलिस उपनिरीक्षक अनिल हडळ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश राठोड, हवालदार डॉमिनिक डिसोजा, राणे, जॅक्सन तसेच पोलीस कर्मचारी कांडर आणि समजिस्कर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

वन्यजीवांची अवैध शिकार आणि तस्करी रोखण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे. या रॅकेटमागे आणखी कोणाचे हात आहेत, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.

नांदेडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत १४ लाखांचा बेकायदेशीर शस्त्रसाठा जप्त!

   Follow us on        

नांदेड:नांदेड जिल्हा पोलिसांनी अवैध शस्त्रविक्री आणि गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ (Operation Crackdown) अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने एक मोठी धडक कारवाई करत तब्बल ७०३ अवैध शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. या संपूर्ण कारवाईत एकूण १४ लाख ४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

​गोपनीय माहितीच्या आधारे पडला छापा

​पोलिसांना मिळालेल्या अत्यंत गोपनीय माहितीनुसार, वजिराबाद परिसरातील एका दुकानामध्ये विनापरवाना व मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर शस्त्रसाठा लपवून ठेवण्यात आला होता. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक अविनाशकुमार यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने त्या ठिकाणी छापा टाकला.

​तलवारी, खंजीर आणि फायटर पंच जप्त

​या छाप्यात पोलिसांना मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांचा साठा आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:

​एकूण शस्त्रे: ७०३ अवैध शस्त्रे

​तलवारी: ४७० तलवारी (ज्याची किंमत सुमारे १२ लाख ३१ हजार रुपये आहे)

​खंजीर: २०९ खंजीर

​फायटर पंच: २४ फायटर पंच

​एकूण मुद्देमाल: १४ लाख ४ हजार ३०० रुपये

​आरोपी फरार, शोध सुरू

​या प्रकरणी संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या आरोपी फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

​”शहरात बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा आणि विक्री करणाऱ्यांच्या मुळापर्यंत जाण्यासाठी ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत ही समूळ कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध शस्त्र विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे,” अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी दिली.

Crime News: तब्बल १.६५ कोटींचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त

   Follow us on        

ठाणे: ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू तस्करी विरोधात एक मोठी कारवाई केली आहे. एका कंटेनरमधून छुप्या पद्धतीने नेला जाणारा तब्बल १ कोटी ६५ लाख रुपये किमतीचा गोवा बनावटीचा मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. विशेष म्हणजे, हा मद्यसाठा नेण्यासाठी तस्करांनी बनावट औषध वाहतुकीचे चलन (Bill) तयार केले होते, जेणेकरून प्रशासनाची दिशाभूल करता येईल. मात्र, उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून हा कंटेनर पकडला आणि त्यातील साठा ताब्यात घेतला.

​या कारवाईबाबत अधिक माहिती देताना ठाणे अधीक्षक प्रवीण तांबे यांनी सांगितले की, हा मद्यसाठा नेमका कुठून आला आणि तो कोणाला वितरित केला जाणार होता, याचा तपास सध्या सुरू आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. गेल्या दीड वर्षात ठाणे उत्पादन शुल्क विभागाने उल्लेखनीय कामगिरी करत आतापर्यंत १५ कोटी रुपयांहून अधिक किमतीची अवैध दारू जप्त केली आहे. राज्यात सध्या एकीकडे इंधनाचा तुटवडा आणि अवैध सिलिंडरवर कारवाया सुरू असतानाच, दारू तस्करीचा हा मोठा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

सावंतवाडीत २०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त; सांगलीतील रॅकेटचा पर्दाफाश

   Follow us on        

सावंतवाडी: सावंतवाडी शहरातील एका राष्ट्रीयीकृत बँकेत भरणा केलेल्या रकमेमध्ये २०० रुपयांच्या आठ बनावट नोटा आढळल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणी बँक व्यवस्थापकांनी दिलेल्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत सांगली कारागृहातून सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे बनावट नोटांचे एक मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, याचे धागेदोरे कोकण आणि गोव्यापर्यंत पसरल्याचा संशय पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

​बँकेत एका ग्राहकाने आपल्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी आणलेल्या २०० रुपयांच्या बंडलमध्ये या बनावट नोटा कॅशियरला आढळल्या. अधिक तपासाअंती, या नोटा सांगली येथे छापण्यात आलेल्या बनावट नोटांच्या कारखान्यातील असल्याचे निष्पन्न झाले. ऑक्टोबर २०२५ मध्ये सांगली पोलिसांनी हा कारखाना उद्ध्वस्त केला होता आणि त्यावेळपासून हे संशयित सांगली कारागृहात होते. पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने सुप्रीत कडप्पा देसाई, राहुल राजाराम जाधव, इब्रार आदम इनामदार, नरेंद्र जगन्नाथ शिंदे, संदीप बाळू कांबळे आणि सिद्धेश जगदीश म्हात्रे या सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे.

​या अटकेमुळे बनावट नोटांच्या व्यापाराचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता आहे. हे सर्व आरोपी कोल्हापूर आणि मुंबई परिसरातील असून, त्यांनी चलनात आणलेल्या बनावट नोटांची व्याप्ती मोठी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथक करत असून, या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.

Photo Credit – RBI

कुडाळमध्ये अवैध बंदूक निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई

   Follow us on        

कुडाळ: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील निरुखे – सुतारवाडी येथे अत्यंत गोपनीय पद्धतीने आणि बेकायदेशीरपणे चालविल्या जाणाऱ्या बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी हा कारखाना पूर्णपणे उद्ध्वस्त केला असून, घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात अवैध अग्निशस्त्रांचा साठा आणि साहित्य जप्त केले आहे. या कारवाईने संपूर्ण निरुखे पंचक्रोशीत मोठी खळबळ उडाली आहे.

​जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’ अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला निरुखे – सुतारवाडी येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैध शस्त्रांची निर्मिती होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास नियोजित पद्धतीने छापा टाकला. अंधाराचा फायदा घेत सुरू असलेला हा काळा धंदा पोलिसांनी उघडकीस आणला.

​या छाप्यात पोलिसांनी १ लाख १४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ३ तयार बंदुका, ६ लोखंडी बॅरल, बंदुकीचे ४ लाकडी बट आणि शस्त्रे तयार करण्यासाठी लागणारे वेल्डिंग मशीन, ग्राइंडर व इतर तांत्रिक साहित्याचा समावेश आहे. ही सर्व हत्यारे आणि साहित्य पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले असून, हा साठा पुढील तपासासाठी जप्त करण्यात आला आहे.

​याप्रकरणी संशयित जगन्नाथ शंकर मेस्त्री (६५, रा. निरुखे – सुतारवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ३, ५ आणि २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या थेट सूचनेनुसार ही यशस्वी कारवाई करण्यात आली. या पथकात उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सुधीर सावंत यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

​दरम्यान, अटक करण्यात आलेल्या मेस्त्री याने यापूर्वी अशा प्रकारे किती बंदुका तयार केल्या आणि त्या कोणाकोणाला विकल्या, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या कारखान्यातून यापूर्वी अनेक बंदुकांची विक्री झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध शस्त्रे बनविणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, या प्रकरणाचे धागेदोरे कोठपर्यंत पसरले आहेत, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये मोठी कारवाई; १९१ दारूच्या बाटल्यांसह दोन जणांना अटक

   Follow us on        

रत्नागिरी: रत्नागिरी रेल्वे स्थानकावर कोकण रेल्वे पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई केली आहे. मडगाव ते मुंबई सीएसएमटी दरम्यान धावणाऱ्या १२०५२ जनशताब्दी एक्सप्रेसची नियमित तपासणी सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला. या कारवाईमुळे रेल्वेने प्रवास करून छुप्या पद्धतीने दारूची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

​रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि सी अँड आय स्टाफच्या संयुक्त पथकाने ही मोहीम राबवली. गाडी रत्नागिरी स्थानकावर उभी असताना संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन व्यक्तींची झडती घेण्यात आली. त्यांच्याकडे असलेल्या साहित्याची तपासणी केली असता, त्यात एकूण १९१ दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या सर्व बाटल्या पोलिसांनी तातडीने जप्त केल्या आहेत.

​कोकण रेल्वेच्या अधिकृत माहितीनुसार, गोव्याहून महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या या मार्गावर सध्या दारूविरोधी कायद्यांची अत्यंत कडक अंमलबजावणी केली जात आहे. या दोन्ही आरोपींना प्रतिबंधित वस्तूंसह प्रवास करताना रंगेहात पकडण्यात आले असून, त्यांच्यावर रेल्वे कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येत आहे.

​प्रशासनाने या निमित्ताने सर्व प्रवाशांना कडक सूचना दिल्या आहेत. प्रवाशांनी प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारच्या प्रतिबंधित वस्तूंची ने-आण करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वेचा प्रवास सुरक्षित, निर्विघ्न आणि सुरळीत पार पडावा यासाठी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, अशी विनंतीही यावेळी करण्यात आली आहे.

Konkan Railway: कुडाळ स्थानकावर बेकायदा तिकीट विक्री करणाऱ्या दलालाला अटक

   Follow us on        

कुडाळ: कोकण रेल्वेच्या रत्नागिरी आरपीएफ (रेल्वे सुरक्षा दल) पथकाने ‘ऑपरेशन उपलब्ध’ अंतर्गत कुडाळ रेल्वे स्थानकावर धडक कारवाई करत एका तिकीट दलालाला (टाउट) रंगेहात पकडले आहे. या कारवाईत दलालाकडे ३,५८० रुपये किमतीचे एक अवैध ‘तत्काळ’ तिकीट सापडले असून ते जप्त करण्यात आले आहे. हे तिकीट काळ्या बाजारात चढ्या दराने विकण्याच्या उद्देशाने काढण्यात आले होते. अशा अवैध विक्रीमुळे सामान्य प्रवाशांना हक्काची तिकिटे मिळवण्यात अडचणी येत होत्या.

​स्थानकावर नियमित तपासणी सुरू असताना आरपीएफला या व्यक्तीच्या हालचालींवर संशय आला. प्राथमिक चौकशीत तो बेकायदेशीरपणे तिकीट विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी कणकवली आरपीएफच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्यावर रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १४३ नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या कलमांतर्गत रेल्वे तिकिटांची अनधिकृत खरेदी-विक्री करणे हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा मानला जातो.

​रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि दलालांचा सुळसुळाट रोखण्यासाठी ‘ऑपरेशन उपलब्ध’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. प्रवाशांना पारदर्शक पद्धतीने आणि योग्य किमतीत तिकिटे मिळावीत, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. कोकण रेल्वे मार्गावर आरपीएफ पूर्णपणे सतर्क असून, प्रवाशांनीही कोणत्याही अनधिकृत व्यक्तीकडून तिकीट खरेदी करू नये आणि काही संशयास्पद आढळल्यास तात्काळ आरपीएफला कळवावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

वन्यजीवांची शिकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; शेकरू, उडणारी खारीसह ईतर दुर्मिळ प्राण्यांचे अवशेष जप्त

   Follow us on        

गडचिरोली:वन्यजीवांच्या शिकारीसाठी जंगलात दबा धरून बसलेल्या एका मोठ्या टोळीला जेरबंद करण्यात आलापल्ली वनविभागाला मोठे यश आले आहे. रविवारी, १९ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास आलापल्ली वनपरिक्षेत्रातील जंगलात काही जण शिकारीच्या उद्देशाने लपून बसल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव गणवीर यांच्या नेतृत्वाखालील गस्ती पथकाने तातडीने परिसरात सापळा रचला. वनविभागाच्या पथकाची चाहूल लागताच शिकाऱ्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पथकाने पाठलाग करून १२ जणांना ताब्यात घेतले.

​शिकाऱ्यांची झडती घेतली असता वनविभागाच्या हाती धक्कादायक पुरावे लागले आहेत. त्यांच्याकडून महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या शेकडूचे (चार अवशेष), एक उडणारी खार, एक हरीनाल पक्षी आणि घूबड प्रजातीतील पक्षांचे अवशेष व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील शिकारी टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या सर्व शिकाऱ्यांवर भारतीय वन अधिनियम, १९२७ आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत गंभीर गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

​सदर मोहीम आलापल्लीच्या उपवनसंरक्षक दिपाली तलमले व उपविभागीय वन अधिकारी शिवपाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात क्षेत्र सहाय्यक पुन्नमचंद बुधवार, वनरक्षक दत्ता सुरवसे, निलेश टेकाम, सुधाकर सोयाम, सुरेश मडावी, श्याम जंगमवार, नामाजी मडावी आणि देवाजी सलामे यांनी सहभाग घेतला. वन्यजीव संरक्षणासाठी वनविभागाचे विशेष लक्ष असून, नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती त्वरित वनविभागाला द्यावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव गणवीर यांनी केले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search