Category Archives: पर्यटन

‘आयएनएस गुलदार’ अरबी समुद्रात विसावली; सिंधुदुर्गात साकारणार देशातील पहिले पाण्याखालील संग्रहालय आणि पर्यटन केंद्र

   Follow us on        

सिंधुदुर्ग:भारतीय नौदला सेवेतून निवृत्त झालेली ‘आयएनएस गुलदार’ (INS Guldar) ही युद्धनौका महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विकास महामंडळाने (MTDC) सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील निवती रॉक जवळ यशस्वीरित्या समुद्रात बुडवली आहे. सुमारे २० ते २२ मीटर खोल समुद्राच्या तळाशी ही नौका आता विसावली असून, याद्वारे भारतात पहिल्यांदाच पाण्याखालील युद्धनौका संग्रहालय, कृत्रिम प्रवाळ (Artificial Coral Reef) आणि पाणबुडी (Submarine) पर्यटनाचा अनोखा प्रकल्प साकारला जात आहे. १९ मे रोजी विजयदुर्गजवळ अत्यंत काळजीपूर्वक आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली तब्बल ३६ तासांच्या अथक परिश्रमानंतर ही मोहीम फत्ते करण्यात आली. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे नौदल वारशाचे जतन करत सागरी पर्यटनाला चालना देणारा हा केवळ भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण आशियातील पहिलाच अभिनव उपक्रम ठरला आहे.

​जवळपास चार दशके भारतीय नौदलात शौर्य गाजवणारी कुंभीर-श्रेणीतील ही लँडिंग शिप १२ जानेवारी २०२४ रोजी सेवेतून निवृत्त झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२५ मध्ये नौदलाने ही नौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे विनामूल्य सुपूर्द केली. नौका समुद्रात विलीन करण्यापूर्वी तिची पूर्णपणे स्वच्छता करण्यात आली आणि सागरी पर्यावरणाला तसेच जलचरांना कोणताही धोका पोहोचू नये म्हणून त्यातील सर्व घातक व रासायनिक पदार्थ काढून टाकण्यात आले. मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सहकार्याने MTDC चे व्यवस्थापकीय संचालक निलेश गथाणे आणि त्यांची टीम या प्रकल्पावर काम करत आहे.

​हा प्रकल्प पुढील दीड वर्षात पर्यटकांसाठी पूर्णपणे खुला होण्याची शक्यता आहे. एकदा हा प्रकल्प सुरू झाला की, पर्यटकांना ‘पॅडी’ (PADI) प्रमाणित डायव्हर्सच्या मार्गदर्शनाखाली समुद्रात स्कुबा डायव्हिंग करून या खऱ्याखुऱ्या युद्धनौकेचा थरार जवळून अनुभवता येईल. तसेच ज्यांना पाण्यात उतरणे शक्य नाही, त्यांच्यासाठी विशेष पाणबुडी (Submarine) पर्यटनाची सोय केली जाणार आहे, जेणेकरून सुरक्षितपणे या ऐतिहासिक नौकेचे दर्शन घेता येईल. या जहाजाच्या अवशेषांवर हळूहळू वनस्पती, मासे आणि प्रवाळांची वाढ होऊन त्याचे रूपांतर एका मोठ्या कृत्रिम बेटासारख्या परिसंस्थेत होईल, ज्यामुळे सागरी जीवनाला मोठा फायदा होईल. या ऐतिहासिक आणि साहसी प्रकल्पामुळे कोकण किनारपट्टीवरील पर्यटनाला मोठी गती मिळणार असून, स्थानिक कोळी बांधव आणि तरुणांसाठी रोजगाराच्या अनेक नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

🌏 आपली जाहिरात लाखो वाचकापर्यंत पोहोचवा. जाहिरातीचा स्लॉट बूक करण्यासाठी संपर्क – 9356968462

पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! मालवणमध्ये या तारखेपासून जलपर्यटन आणि वॉटर स्पोर्ट्स पूर्णपणे बंद

   Follow us on        

मालवण (प्रतिनिधी):पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! मालवणमध्ये या तारखेपासून जलपर्यटन आणि वॉटर स्पोर्ट्स पूर्णपणे बंद मालवणमधील यंदाच्या पर्यटन हंगामाचा शेवटचा टप्पा सुरू असून, आगामी पावसाळी कालावधीच्या पार्श्वभूमीवर समुद्रातील संभाव्य धोके लक्षात घेता मालवण बंदर क्षेत्रात सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा (वॉटर स्पोर्ट्स) प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाने जारी केले आहेत. हा बंदी आदेश २६ मे २०२६ पासून ते ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. मालवणच्या पर्यटनात सागरी व खाडीतील जलपर्यटनाचे मोठे महत्त्व असून दरवर्षी १ सप्टेंबर ते २५ मे असा हा जलपर्यटनाचा अधिकृत हंगाम असतो. सध्या मे महिन्यात या हंगामाचा शेवटचा टप्पा असल्यामुळे महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मालवण बंदर निरीक्षकांनी अधिकृत पत्र काढून ही बंदी जाहीर केली आहे.

​प्रादेशिक बंदर अधिकारी यांच्या १३ मे २०२६ च्या पत्राचा संदर्भ देऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ‘इनलँड व्हेसल्स ऍक्ट, १९१७’ अंतर्गत नोंदणी असलेल्या सर्व जहाजांना, बोटींना आणि जलवाहनांना या मान्सून काळात सुरक्षेच्या कारणास्तव आपली वाहतूक आणि व्यावसायिक उपक्रम थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार २६ मे ते ३१ ऑगस्ट या पावसाळी कालावधीत सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक, सर्व प्रकारच्या जलक्रीडा, नौकाविहार (बोटिंग) आणि स्कुबा डायव्हिंग या सेवा पूर्णपणे बंद राहतील.

​हा आदेश मालवणमधील एकूण ३९ प्रमुख संस्था, गृहनिर्माण व पर्यटन सोसायट्या आणि वैयक्तिक बोट चालकांना थेट बजावण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशन, शिवशक्ती जलपर्यटन संस्था, चिवला जलपर्यटन संस्था, तारकर्ली, देवबाग, दांडी येथील बोटिंग संघटना व वॉटर स्पोर्ट्स संस्था, तसेच स्थानिक स्कुबा डायव्हिंग व्यावसायिक आणि वैयक्तिक बोट मालकांचा समावेश आहे. कोकण किनारपट्टीवर पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. अशा धोकादायक परिस्थितीत पर्यटकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होऊ नये, म्हणून दरवर्षी प्रशासनातर्फे ही आवश्यक खबरदारी घेतली जाते.

ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी: ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ अंतर्गत मोफत बोधगया यात्रेचे आयोजन

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ अंतर्गत मुंबई जिल्ह्यातील ६० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी बोधगया (बिहार) येथे मोफत दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेद्वारे ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी उपलब्ध करून दिली जात असून, मुंबई शहरात राहणाऱ्या नागरिकांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.

​ही तीर्थयात्रा ३ जून ते ९ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासाची सोय, राहण्याची व्यवस्था आणि भोजन असा सर्व खर्च महाराष्ट्र शासनामार्फत केला जाणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना कोणत्याही आर्थिक शुल्काशिवाय बोधगया येथील पवित्र स्थळांचे दर्शन घेता येणार आहे.

​या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शासनाने काही अटी निश्चित केल्या आहेत. त्यानुसार, अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यासाठी ही उत्पन्नाची मर्यादा ठरवण्यात आली असून, अधिकृत कागदपत्रांच्या आधारे याची पडताळणी केली जाणार आहे.

​इच्छुक आणि पात्र ज्येष्ठ नागरिकांनी आपले अर्ज २० मे २०२६ पर्यंत मुंबई शहरातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांच्या कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. या योजनेबाबत अधिक माहिती किंवा प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींसाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात करण्यात आले आहे.

देवगड: कुणकेश्वर येथे प्राचीन ‘गंगाकुंड’ सापडले; २५० ते ३०० वर्षे जुने असण्याचा अंदाज

   Follow us on        

देवगड:दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र कुणकेश्वर मंदिर परिसरात एका प्राचीन ‘गंगाकुंडाचा’ शोध लागला आहे. मंदिरापासून साधारण १ ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या कुणकेश्वर-खालचीवाडी येथील ओहोळाजवळ हे पुरातन कुंड असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. हे गंगाकुंड सुमारे २५० ते ३०० वर्षांपूर्वीचे किंवा त्याहूनही प्राचीन असावे, असा प्राथमिक अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

​स्थानिक ग्रामस्थ संतोष लब्दे, संतोष लाड आणि शरद वाळके यांनी राबवलेल्या शोधमोहिमेमुळे हे दुर्लक्षित कुंड पुन्हा समोर आले आहे. अनेक वर्षांपासून झाडाझुडपांचा पालापाचोळा आणि गाळ साचल्यामुळे हे कुंड पूर्णतः बुजून गेले होते. या शोधानंतर कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली आणि कोकण इतिहास परिषदेचे रणजीत हिर्लेकर यांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर देवस्थान ट्रस्ट आणि स्थानिकांच्या मदतीने या परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे.

​या कुंडाची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून ते जांभ्या दगडात कोरलेले आहे. हे कुंड साधारण ६ बाय ६ फूट आकाराचे असून, त्यात विहिरीसारखी खोदाई करण्यात आली आहे. त्याच्या आत पुन्हा ३ बाय ३ फुटांचा एक खोल भाग असून त्याची खोली अंदाजे ५ ते ६ फूट आहे. विशेष म्हणजे, या कुंडात एका चौकोनी पारावर जांभ्या दगडात कोरलेले देखणे शिवलिंगही आहे. सध्या या कुंडात सुमारे तीन फूट खोलीपर्यंत काचेसारखे स्वच्छ पाणी साचलेले दिसत आहे.

​कोकण इतिहास परिषदेचे रणजीत हिर्लेकर यांनी माहिती दिली की, १९९२ मध्ये श्रीदेव कुणकेश्वर मंदिराच्या ‘वज्रलेपा’साठी याच गंगाकुंडातील पवित्र पाण्याचा वापर करण्यात आला होता. हे गंगाकुंड प्राचीन काळातील उत्कृष्ट पाणी व्यवस्थापनाचे एक उत्तम उदाहरण मानले जात आहे. स्वच्छता केल्यामुळे या ऐतिहासिक वारशाला आता पुन्हा उर्जितावस्था प्राप्त झाली असून, या शोधामुळे कुणकेश्वरच्या इतिहासात मोलाची भर पडली आहे.

मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवेला सरकारचा मोठा ‘बूस्टर’; मुंबई ते तळकोकण प्रवास आता एका तासात

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र  सरकारने कोकणातील पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून मुंबईकडे जाणाऱ्या विमानसेवेसाठी १०० टक्के व्हायाबिलिटी गॅप फंडिंग (VGF) मंजूर करण्यात आले आहे. या निर्णयामुळे विमानसेवा आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणार असून, नियमित उड्डाणांना चालना मिळणार आहे.

या निर्णयानंतर मुंबई ते चिपी (सिंधुदुर्ग) हा प्रवास आता केवळ एका तासात पूर्ण होणार आहे. ही सेवा आठवड्यातील सातही दिवस सुरू राहणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे वेळेची मोठी बचत होणार असून, प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर होईल.

कोकणातील पर्यटनासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. जलद आणि सुलभ हवाई सेवा उपलब्ध झाल्याने देशभरातील पर्यटकांना सिंधुदुर्ग आणि आसपासच्या पर्यटनस्थळांना भेट देणे अधिक सोपे होईल. त्यामुळे कोकण पर्यटनाचा ‘टेक ऑफ’ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

याशिवाय, या निर्णयाचा स्थानिक अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम होणार आहे. हॉटेल उद्योग, पर्यटनाशी संबंधित व्यवसाय आणि स्थानिक रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळणार आहे. यामुळे कोकणातील विकास प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे.

विधानभवनातील कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या या निर्णयाचे सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वागत केले आहे. त्यांनी सांगितले की, ही सेवा सुरू होणे ही प्रवाशांची दीर्घकाळाची मागणी होती. त्यामुळे हा निर्णय कोकणवासीयांसाठी दिलासादायक ठरला असून, प्रदेशाच्या विकासासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Konkan Tourism: वेंगुर्ल्यात होणार्‍या ताज समूहाच्या पाहिल्या ५ स्टार हॉटेल प्रकल्पाला गती

   Follow us on        

मुंबई, २४ मार्च २०२६: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात ताज समूहाच्या माध्यमातून पहिले ५ स्टार हॉटेल उभारण्याच्या प्रकल्पाला नवीन गती मिळाली आहे. आज मंत्रालयात पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकल्पाची आढावा बैठक पार पडली.या बैठकीत २३ डिसेंबर २०२५ रोजी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्देशांची अंमलबजावणी तपासण्यात आली.

शिरोडा-वेळाघर येथे सुमारे ५२ ते ५४ हेक्टर जमिनीवर प्रस्तावित हा प्रकल्प जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. सर्व संबंधित घटकांना सोबत घेऊन अंतिम मसुदा लवकरात लवकर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

बैठकीला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (ऑनलाइन), दि इंडियन हॉटेल्स लिमिटेड (ताज समूह) चे प्रतिनिधी बिजल देसाई व सिंथिया नोरोन्हा, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्गच्या निसर्गरम्य किनारपट्टी, स्वच्छ समुद्र आणि यूनेस्कोच्या तात्पुरत्या वारसा यादीतील ठिकाणांमुळे हा प्रकल्प जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र बनवण्यास मदत करेल. यामुळे स्थानिक रोजगार वाढेल आणि कोकण पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असे मानले जात आहे.पालकमंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पाला प्राधान्य दिले असून, सर्व अडचणी दूर करून तो लवकर पूर्ण करण्यावर भर दिला आहे. हा प्रकल्प अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, मात्र आता त्याला ठोस आकार येत आहे.

 

 

 

सिंधुदुर्ग: पर्यटनाचा नवा ट्रेंड ठरतोय स्थानिकांची डोकेदुखी

   Follow us on        

दोडामार्ग: उन्हाळा सुरू होताच दोडामार्ग तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी उसळताना दिसत आहे. विशेषतः गोवा तसेच आसपासच्या भागातील युवक-युवतींचा कल तिराळी नदी परिसराकडे वाढला असून, अनेक ठिकाणी बेधडकपणे पाण्यात उतरण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र या वाढत्या पर्यटनामुळे स्थानिक पातळीवर फायदा होण्याऐवजी मनस्ताप आणि धोकेच अधिक वाढताना दिसत आहेत.

सासोलीतून वानोशीला जाताना तिराळी नदीवरील मधल्या बंधाऱ्यावर तसेच इतर भागात रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी होत असते. या गर्दीत मद्यपी पर्यटकांचे प्रमाण लक्षणीय असल्याने परिसरातील वातावरण बिघडत आहे. मद्यधुंद अवस्थेत होणारी हुल्लडबाजी, आरडाओरड आणि अनुशासनहीन वर्तनामुळे या भागातील शांतता धोक्यात आली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अनेक पर्यटकांना नदीच्या पाण्याचा वेग, खोली किंवा धोकादायक ठिकाणांची पुरेशी माहिती नसतानाही ते थेट पाण्यात उतरतात. सासोली व वानोशी येथील पूल सध्या आकर्षणाचे केंद्र बनला असून, येथे फोटोसेशन करणे, पुलावरून उड्या मारणे आणि पोहणे असे धाडसी प्रकार मोठ्या प्रमाणात चालतात. परिणामी, बुडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, माहितीअभावी काही पर्यटकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.

या वाढत्या धोक्यांकडे लक्ष वेधत स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. संबंधित ठिकाणी कोणतीही सुरक्षा यंत्रणा, जीवनरक्षक कर्मचारी किंवा साधे सूचना फलकही नसल्याने अपघातांची शक्यता अधिक बळावली आहे. त्यामुळे हुल्लडबाजी रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवावा, मद्यपान करून येणाऱ्यांवर कारवाई करावी आणि धोकादायक ठिकाणी पाण्यात उतरण्यास बंदी घालावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Photo Credit – AI

एसटी संगे तीर्थाटन: पाहिल्या फेरीच्या यशानंतर अष्टविनायक यात्रेची पुण्याहून दुसरी फेरी जाहीर

   Follow us on        

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) तर्फे “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संगे तीर्थाटन योजना” अंतर्गत पुण्यातून अष्टविनायक यात्रेची दुसरी विशेष फेरी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यात्रेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर ही दुसरी यात्रा आयोजित करण्यात येत असून, ४ व ५ एप्रिल २०२६ (शनिवार व रविवार) या दोन दिवसांच्या कालावधीत ही यात्रा पार पडणार आहे.

या यात्रेदरम्यान प्रवाशांना सर्व सुखसोयींसह अष्टविनायकाचे दर्शन घडवण्यात येणार आहे. प्रवाशांसाठी विशेष किटचीही व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. एसटी कर्मचाऱ्यांमार्फत प्रवाशांची काळजी घेतली जाणार असून सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाची हमी दिली जात आहे.

या यात्रेसाठी प्रति व्यक्ती पॅकेज दर जाहीर करण्यात आले आहेत. पुरुषांसाठी ३,५०० रुपये, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी ३,००० रुपये, तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी २,४०० रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. इच्छुक प्रवाशांनी त्वरित नोंदणी करून या धार्मिक यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे विभागाकडून करण्यात आले आहे. बुकिंगसाठी संबंधित आगाराशी संपर्क साधण्याचेही सांगण्यात आले आहे.

सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यांवर आता सीसीटीव्हीची नजर!

   Follow us on        

मुंबई, २५ फेब्रुवारी २०२६: महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या समुद्रकिनारी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रस्तावाला गती देण्यावर भर देण्यात आला.

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या ८५व्या संचालक मंडळ बैठकीत या प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. मात्र, प्रशासकीय व तांत्रिक मान्यता प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत सर्व अडथळे दूर करून काम लवकरात लवकर सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सिंधुदुर्ग हा पर्यटनाचा जिल्हा असून, तारकरली, मालवण, देवगड, विजयदुर्ग, आचरा आदी ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तसेच किनारपट्टीवरील अवैध कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरेल, असे मत यावेळी व्यक्त झाले.बैठकीला आयटी विभागाचे वीरेंद्र सिंग, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे), जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे) व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या उपक्रमामुळे सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अधिक मजबूत होईल आणि पर्यटन क्षेत्राला नवीन चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

 

सिंधुदुर्गातील चार ऐतिहासिक समुद्री किल्ल्यांच्या संशोधनासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर

   Follow us on        

मालवण, १९ फेब्रुवारी २०२६: छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाचे संवर्धन आणि शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या चार प्रमुख समुद्री किल्ल्यांच्या सखोल अभ्यास, दस्तावेजीकरण आणि संशोधनासाठी मुंबई विद्यापीठांतर्गत मालवण येथे स्वतंत्र अध्यासन केंद्र (Study Centre) उभारण्यास मंजुरी मिळाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने या प्रकल्पासाठी ५० लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. हे केंद्र मालवणात स्थापन होणार असून, शिवकालीन व्यापार, आरमार व्यवस्था, या किल्ल्यांच्या रणनीतिक महत्त्व आणि ऐतिहासिक दस्तऐवजांचा वैज्ञानिक अभ्यास होईल. यामुळे युवा संशोधकांना मार्गदर्शन, व्याख्याने, संशोधन प्रकल्प आणि या वारशाचे जागतिक स्तरावर प्रसार होण्यास मदत होईल.

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या पुढाकाराने आणि प्रस्तावानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी एप्रिल २०२५ मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ३५८व्या वर्धापन दिनी या केंद्राची घोषणा करण्यात आली होती. आता निधी मंजुरीमुळे प्रकल्पाला प्रत्यक्ष गती मिळाली आहे.पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी या निर्णयाचे स्वागत करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री आशिष शेलार आणि महायुती सरकारचे आभार मानले आहेत.

या केंद्रामुळे शिवरायांच्या दूरदृष्टी आणि पराक्रमाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचेल आणि सिंधुदुर्गच्या सागरी वारशाला नवे आयाम मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.हे केंद्र केवळ संशोधनापुरते मर्यादित न राहता, स्थानिक इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि पर्यटन क्षेत्रालाही फायदेशीर ठरेल.

 

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search